You are on page 1of 206

1

डॉक्टर गणिताचे
स्मृतिग्रंथ - प्रा. डॉ. मुकुंद अमृत देशपांडे
डॉक्टर गणिताचे
स्मृतिग्रंथ

सर्व हक्क : © वसुधा मुकुंद देशपांडे


०३, अमृतवेल, निरंजन सोसायटी,
टिळक नगर, औरंगाबाद.
संपर्क : ९८८१४७२५६०.

स्मृतिग्रंथ समिती : श्री. सारंग देशपांडे


डाॅ. मंदार देशपांडे
सौ. नयना देशपांडे
डॉ. अपूर्वा देशपांडे

अक्षरजुळणी : अश्विनी दाशरथे, माे. ९८८११४८४८२


मुखपृष्ठ : भारत दुधाटे
मुद्रितशोधन : किरण दाशरथे
संपादन : सौरभ सदावर्ते
मुद्रक : नम्रता प्रिंटर्स, औरंगाबाद, माे. ९७६७५५४३१३
प्रकाशन दिनांक : ३ डिसेंबर २०२०

आवृत्ती पहिली
विनामूल्य खासगी वितरणासाठी
गरिबीचा शाप असतानासुद्धा, बुद्धिमत्ता आणि
कठीण परिश्रमाच्या जोरावर, आकाशाला
गवसणी घालणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास
समर्पित...
स्मृतीसुमने पानोपानी...
{ प्रस्तावना ०१
सहकारी...यांच्यासोबत घडलो होतो
१. मुकुंद देशपांडे : विद्यार्थिप्रिय शिक्षक प्राचार्य डॉ. शरद अदवंत ०३
२. डॉक्टर एमडी - गणिताला समर्पित व्यक्तिमत्त्व प्रा. डॉ. शरद गं. भोगले ०७
३. गणितासाठी MAD झालेला M.A.D. प्रा. डॉ. मंगला वैष्णव १०
४. प्रा. एम.ए. देशपांडे - एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व प्रा. डॉ. एस. आर. जोशी १२
५. डॉ. एम.ए.देशपांडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... प्रा. आर.जी.देशपांडे १४
६. एक चांगला मित्र प्रा. प्रवीण सोमय्या १६
७. प्रेमा तुझा रंग कसा…. प्रा. सुहास पानसे १८
८. शब्दांजली डॉ. आर. पी. शास्त्री २२
९. बुद्धिमान गणित डॉ. एम. ए. देशपांडे प्रा. डॉ. शुभदा देशमुख २४
१०. ध्येयनिष्ठ शिक्षक एम. ए. डी. सर प्रा. लीला शिंदे २६
११. मुकुंदायन... प्रा. शिवकुमार पिरथानी २८
१२. अभिमान वाटावा असा मित्र.... श्री. विजय सोमठाणकर ३०
१३. द्रष्टा शिक्षक... प्रा. दीपा विवेक खेकाळे ३२
१४. अमृतपुत्र - प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे उमेश बळवंत विटेकर ३४
१५. श्री श्री गुरु शरणम् । मुकुंद कृपाही केवलम्।। प्रकाश अनंतराव कुलकर्णी ३६

समाजाचे आधारस्तंभ
१६. मराठवाडा भूषण रावसाहेब दानवे पाटील ४०
१७. प्रा. देशपांडे : गरिबांचे सामान्य विद्यार्थ्यांचे आधारवड नंदकुमार घोडेले ४१
१८. प्रा. डाॅ. मुकुंद देशपांडे यांना मानाचा मुजरा!! गजानन बारवाल ४२

विद्यार्थी - ज्यांना घडवतांना मिळाला आनंद


१९. सर की भाऊजी… डॉ. अनंत कडेठाणकर ४३
२०. गुरु परमात्मा परेशु डाॅ. संजय जानवळे ४५
२१. ताल, लय, सुरातून शिकवणारा शिक्षक पद्मनाभ प्रकाश सहस्रबुद्धे ४७
२२. पैशाच्या मागे धावू नका डाॅ. उदय नाईक ४८
२३. MAD For Maths जान्हवी गणेश गुडसूरकर ५०
२४. माझे सर्वस्व हरपले बळीराम क्षीरसागर ५२
२५. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम देशपांडे ५६
२६. धन्यवाद….हा शब्द अपुरा… अंजली देशमुख मुंगीकर ५७
२७. परीस अभिजित दंडे ५९
२८. आदरांजली अरुणा सुरेश कुलकर्णी ६१
२९. घरमालक….छे! काका…… अजित अशोकराव वाणी ६३
३०. शिकवण्यात विलक्षण जादू असणारा जादूगार नीलेश जडे ६५
३१. स्व. देशपांडे (MAD) सर : एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्रीमती रजनी देवी शुक्ला ६६
३२. जेथे सुरुवात असते तेथे शेवट ठरलेलाच डॉ. सुहास रोटे ६७
३३. MAD = Mad About Dedication उत्कर्ष रवींद्र नागोरी ६८
३४. माझ्या मनातील देशपांडे सर मृणाल सुनील अत्रे ७०
३५. माझे शेजारी सीमा दिग्रसकर ७२
३६. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती विद्या सुशांत पंचपोर (मोदी) ७४
३७. आदरांजली सौ. मंगला रमेश भारदे ७७
३८. काकांचा आशीर्वाद जनार्दन बबनराव गायकवाड ७९
३९. प्रश्नांकित नव्हे….. उत्तरांकित व्यक्तिमत्त्व….. श्यामला अकोलकर ८१

रक्ताचे नाते-नात्यातील प्रेम


४०. ते माझे जावई होते श्रीमती वनमाला देशमुख ८४
४१. मुकुंदराव म्हणजे खंबीर आधाराचं दुसरं नाव सुरेश यशवंतराव भोपी ८६
४२. अमृतवेलीवरील एक सुगंधित पुष्प अशोक भालगावकर ८७
४३. लाख मरो, पण लाखांचा पोशिंदा न मरो.. तुकारामपंत नाना देशपांडे ९२
४४. स्मृतिगंधाचा दरवळ आशा रमेश घोटणकर ९५
४५. आठव रमेश देशपांडे ९९
४६. रक्षाबंधन शरयु रमेश देशपांडे १०१
४७. माझा लहान भाऊ श्रीकृष्ण मोहनराव देशपांडे १०५
४८. माझा भाऊराया मनीषा देशपांडे १०८
४९. नात्यातील माणुसकी जपणारे भाऊजी मंगला हरीश कुलकर्णी ११०
५०. मरावे परी कीर्तीरूपी उरावे दीपाली गोविंद देशपांडे १११
५१. अन्य नको वरदान जयंत उर्फ कमलाकर देशमुख ११४
५२. डॉ. मुकुंद देशपांडे : शिक्षक, मार्गदर्शक, पालक प्रा. चंद्रशेखर मधुकर देशपांडे ११५
५३. त्यांच्या आत्म्याला शांती मिळणारच !!! नीलिमा देशपांडे–कुळकर्णी ११७
५४. आयुष्याचे सोने करणारे गुरुवर्य श्याम सुंदर पांडे ११८
५५. असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही....! डॉ. जय भोपी ११९
५६. नियतीपुढे कुणाचे काय चालते? सौ. शुभांगी मुधलवाडकर १२०
५७. मामाच्या घरी जाऊया… शशांक देशपांडे १२१
५८. दीपस्तंभ डॉ. महेश देशपांडे १२३
५९. ध्येयनिष्ठ कर्मयोगी डॉक्टर लक्ष्मीकांत सावळे १२६
६०. तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे डाॅ. संजय देशमुख १२८
६१. कोटी कोटी प्रणाम… अंजली निशिकांत कुलकर्णी १३१
६२. आमचे देशपांडे मामा : भावाचे मित्र ते आमचे मामा सीमा सदाशिव देशपांडे १३३
६३. नि:शब्द ज्योती चंद्रकांत देशपांडे १३५
६४. गणितमय झालेले कुटुंब सौ. लीना देव १३६
६५. माणसातील देव संजय कुलकर्णी १३८
६६. आजोबा सुरभी व सौरभ कुलकर्णी १४०
६७. भावबंध शरयु (कमल) र. देशपांडे १४०
६८. तुफान व्यक्तिमत्त्व पूर्वा मंगेश कुरुळेकर १४१
६९. लोपले खळाळणारे हास्य स्नेहा श्रीकांतराव देशपांडे १४२
७०. व्यक्ती एक, पैलू अनेक शुभांगी राजेंद्र सावळे १४३
७१. भावपूर्ण आदरांजली मयुरा देशपांडे १४५
७२. टेण्ड टू द इन्फिनिटी… चेतन देशमुख १४६
७३. माझे काका माझे गुरू वृषाली रवींद्र निधोनकर १४७
७४. माझे काका रवींद्र लक्ष्मण देशपांडे धावडेकर १४९
७५. Hi Kaka भक्ती अमेय कुलकर्णी १५०
७६. हा विचार कधी मनात डोकावलाच नाही का बरे? सारंग मुकुंद देशपांडे १५२
७७. मला उमगलेले बाबा सौ. नयन सारंग देशपांडे १५४
७८. माझे मामा... सौ. गायत्री देशपांडे–सोंगदे १५७
७९. जिथे मुलांना पंख फुटतात... विश्वजित तुकारामपंत देशपांडे (धावडेकर) १५९
८०. आदरणीय बाबा… डॉ. मंदार देशपांडे १६१
८१. सर ते सासरे… नव्हे प्रेमळ वडील डॉ. सौ. अपूर्वा देशपांडे १६६
८२. वटवृक्ष मंजुषा देशपांडे १६९
८३. मना चंदनाचे परी त्वां झिजावे… अर्चना देशपांडे जाडे १७२
८४. माझे एक पान सुशील पीटर (ब्रदर) १७४
८५. माझ्या आठवणीतले आजोबा सोहम देशपांडे(नातू) १७६
८६. My Grandfather: An Inspirational Hero शौनक मंदार देशपांडे १७८
८७. MY GRANDFATHER स्वरा देशपांडे १८१
८८. देव्हारा सौ. शुभांगी देशपांडे १८२
८९. माझे दुसरे पान तृप्ती समीर गोगटे १८३
९०. ‘रोळे’ज थिएरम आणि जिंकलेले १०० रुपये किरण पांडे १८६
९१. आठवणींचे क्षण… शिरीष आठवले १८८
९२. आठवणींचे क्षण… केदार काशीकर १८८
प्रस्तावना
आपले आईवडील किंवा त्यांच्याप्रमाणेच आपले वात्सल्यपूर्वक पालन करणारे
आजी, आजोबा, मामा यासारखे नातेवाईक यांच्या स्मृती आपल्या मनात कायम
असतात; मात्र त्यांचे स्वरूप खासगी असते आणि त्या आपल्या मनातच राहतात. त्या
आठवणी जर प्रसिद्ध झाल्या तर त्यातला ग्राह्यांश इतरांनाही लाभदायक ठरू शकतो.
माझ्या मुलाचे- श्रीधरचे मित्र म्हणून मी डॉ. मंदार देशपांडे यांना ओळखतो. त्यांनी
आपल्या वडिलांच्या आठवणींचे संकलन करून घेतले आणि त्यांच्या आईने आपल्या
सहजीवनाच्या आठवणी स्वतः लिहिल्या. या दोन्ही आज प्रसिद्ध होत आहेत याचा मला
आनंद होतो.
अशा आठवणींमध्ये जे कोणाच्याही आयुष्यात सहज घडते व जो फक्त तपशिलाचा
भाग असतो त्याला फारसे महत्व असत नाही, परंतु प्रतिकूल परिस्थितीत दिलेला झगडा
आणि आयुष्यात मिळवलेले यश, परिश्रम आणि व्यासंग यामुळे एखाद्या विषयात
मिळवलेले प्राविण्य अशा अनेक गोष्टी इतरांनाही स्फूर्ती देणाऱ्या ठरू शकतात. सरस्वती
भुवन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ ज्यांनी काम केले त्या प्रा. डॉ.
मुकुंदराव देशपांड्यांच्या या आठवणी आहेत. आपली पत्नी एम. ए. झाली अशा शिक्षण
क्षेत्रातील महत्व त्यांना संसारातील तिच्या इतर प्राविण्यापेक्षा अधिक वाटते. संसारातल्या
सुख दुःखाच्या अनेक क्षणांना वसुधाबाईंनी बोलके केले आहे.
शिक्षकाचा व्यवसाय असा आहे की, ज्यात शेकडो लोकांचे जीवन घडवण्याची
किंवा निदान त्या घडणीला हातभार लावण्याची संधी त्यात मिळते. प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे
यांनी आपल्या आयुष्यात अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळण्यात मदत केली. नाही तरी
शिक्षकाच्या आयुष्यात अधिक काय मिळवायचे असते?
सारंग व डॉ. मंदार देशपांडे यांना वडिलांचा असा समृद्ध वारसा मिळाला याबद्दल
त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

{ नरेंद्र चपळगावकर
मा. न्यायमूर्ती (निवृत्त)

1
निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर
यांच्यासमवेत दिलखुलास चर्चा.

2
मुकुंद देशपांडे : विद्यार्थिप्रिय शिक्षक
मी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात १९६३ सालापासून
नोकरीला होतो. एप्रिल १९८४ मध्ये मी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार घेतला.
त्यावेळी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयासमोर अनेक प्रश्न होते. शैक्षणिक
गुणवत्तेपासून ते आर्थिक व्यवस्थापनाची चिंता निर्माण होईल असे विविध प्रश्न होते.
मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. प्राचार्यपदाचा रस्ता काटेरी आहे, हे माझ्या लक्षात
आले. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावयाचे
होते. उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होण्यापूर्वी सर्व प्राध्यापक सहकाऱ्यांची बैठक होत
असे. या बैठकीत मी आवाहन केले की, उन्हाळ्याच्या सुटीत ज्यांना शक्य असेल
त्या प्राध्यापकांनी महाविद्यालयात यावे. माझ्या आवाहनाला अनेक प्राध्यापकांनी
सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यात अग्रेसर होते प्राध्यापक डॉ. मुकुंद देशपांडे. मी लगेच
महाविद्यालयाच्या विकास विस्तार योजनांचे अग्रक्रम ठरवणे आणि निर्णय घेण्यासाठी
सुकाणू समितीची स्थापना केली. त्यात प्रा. डॉ. चंद्रकांत पाटील, प्रा. विजय दिवाण प्रा.
आर. एम. देशपांडे, प्रा. मोहिनीराज पाठक, प्रा. डॉ. शिवराज बिराजदार, प्रा. डॉ. जयश्री
देशपांडे अशा अनुभवी आणि संस्थेसाठी वेळ देऊ शकणाऱ्या प्राध्यापकांचा समावेश
होता. उन्हाळ्याच्या सुटीत सुकाणू समितीच्या अनेक बैठका झाल्या. बैठक संपल्यावर
आमच्या अनौपचारिक गप्पा होत असत. एका बैठकीत प्रा. डॉ. चंद्रकांत पाटलांनी
प्रत्येकाला बाराखडी येते का, असा प्रश्न केला. प्रत्येकाने होकार दिला. पाटील सरांनी
प्रत्येकाला बाराखडी म्हणा, असे सांगितले. प्रत्येक जण बाराखडी म्हणताना अडखळत
होता. फक्त अचूकपणे सांगितले ते प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे यांनी. माझासुद्धा बाराखडीचा
क्रम चुकला. नंतर मी बाराखडीचे नियमित पाठांतर केले.
मी अनेक वर्षे मराठी विज्ञान परिषदेचे काम करत होतो. त्याचा एक भाग
म्हणूनराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला विद्यार्थ्यांनी बसावे म्हणून मी आणि माझे सहकारी प्रयत्न
करत होतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित हे विषय शिकवण्यासाठी
तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग घेत असत. विज्ञान विषयाव्यतिरिक्त मानसिक क्षमता कसोटीचा

3
Mental Ability Test चा एक पेपर होता. हा विषय कोण शिकवणार? कारण हा विषय
शिकवणाऱ्या शिक्षकाला खूप तयारी करावी लागते. मी एका बैठकीत आवाहन केले.
फक्त एका प्राध्यापकाने होकार दिला त्याचे नाव प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे.
आम्ही सर्वांनी महाविद्यालयात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. बाहेरचा कोणीही
व्यक्ती महाविद्यालयाच्या परिसरात येऊ नये, याबाबत काही निर्बंध घातले होते.
एकेदिवशी पाच-सहा तरुण माझ्या केबिनमध्ये आले. त्यांनी सांगितले की, ते दुसऱ्या
महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तरीही त्यांना प्रा. एम ए. देशपांडे यांच्या वर्गात
बसू द्यावे. प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे यांची ख्याती औरंगाबाद येथेच नव्हे, तर संपूर्ण
मराठवाड्यात झाली.
मुकुंदरावांचा जन्म धावडा, ता. भोकरदन, जि. जालना येथे दिनांक ३ डिसेंबर १९४८
रोजी झाला. वडील श्री. अमृतरावांचे कुटुंब निम्नमध्यमवर्गीय होते. शाळेत शिकत
असतानाच शिक्षकांच्या लक्षात आले की, मुकुंद हा अत्यंत बुद्धिमान आहे. त्यांनी श्री.
अमृतराव यांना सांगितले की, तुमचा मुलगा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. त्याला पुढचे
शिक्षण घेऊ द्या. मुकुंदरावांनी शिक्षकांची आणि वडिलांची अपेक्षा पूर्ण केली. सामान्य
कुटुंबातील मुकुंद यांनी एम.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश मिळवले. पदव्युत्तर परीक्षा
विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली आणि ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. अनेक
मानसन्मान मिळवत त्यांनी १९९८ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. यशाच्या अत्युच्च
शिखरावर असतानाच त्यांनी हा निर्णय घेतला. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात
शिकत असताना ते शिक्षकप्रिय विद्यार्थी होते आणि महाविद्यालयात शिक्षक झाले तेव्हा ते
विद्यार्थिप्रिय होते.
माझे धाकटे बंधू अॅड. दिलीप भालचंद्र अदवंत हे बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रमासाठी
सरस्वती भुवन कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिकत होते. मुकुंद देशपांडे
त्यांचे वर्गमित्र. आमचे घर त्यावेळी औरंगपुरा येथे होते. मुकुंद देशपांडे विद्यार्थी असताना
अनेकदा घरी येत असत. अत्यंत साधी राहणी आणि संयमित विचारसरणी. यामुळे
त्यांच्या शालीनतेची ओळख तेव्हापासून होती.
आम्ही मूळचे विहामांडवा, ता. पैठण, जि. औरंगाबाद येथील रहिवासी. पैठण
येथे अदवंतांचे दोन वाडे आहेत. माझे दोन चुलते आणि तीन चुलत भाऊ व्यवसायाने
4
वकील. भेटीसाठी अथवा कामानिमित्त अनेकदा पैठणला जात असे. एकदा पैठण येथे
अॅड. आत्मारामपंत देशमुख यांची भेट झाली. त्यांनी घरी यावे यासाठी खूप आग्रह
केला. मी माझी पत्नी सौ. शुभदासह त्यांचाया घरी गेलो. तेव्हा मला समजले की अॅड.
आत्मारामपंतांची थोरली मुलगी वसुंधरा या डॉ. मुकुंद देशपांडे यांच्या पत्नी आहेत.
त्यावेळी अॅड. देशमुख साहेबांनी सांगितले की, त्यांची सर्व मुले उच्चविद्याविभूषित
आहेत. दुसरा मुलगा कमलाकर देशमुख पुणे येथे टेल्को कंपनीत अधिकारी आहेत.
तिसरी मुलगी मंजूषा या मुंबईत स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये मोठ्या पदावर आहेत
आणि चौथे डॉ. संजय देशमुख हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात आहेत.
अँड. आत्माराम पंतांची मुलगी वसुंधरा, सासरी आल्यावर त्यांचे नाव वसुधा झाले.
श्रीमती वसुधाताई बी.एड. आहेत. त्यांनी बी.एड. अभ्यासक्रम दोन विषयांत केला.
पहिली बी. एड. पदवी गणित आणि दुसरी बी.एड. पदवी मराठी विषयात मिळवली.
त्यांनाही अध्यापनाची आवड होती. काही वर्षं त्यांनीही अध्यापक म्हणून नोकरी केली.
सुरुवातीस देवगाव रंगारी आणि नंतर औरंगाबाद येथील होलीक्रॉस मराठी प्रशालेत त्यांनी
अध्यापनाचे काम केले. पुढे त्यांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आदर्श गृहिणी, आदर्श
मातेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
परमपूज्य ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज हे माझे गुरुदेव. त्यांचा आश्रम
श्रीक्षेत्र सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर येथे आहे. प्रा. डॉ. मुकुंदराव सोनई येथे
परमपूज्य योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी नेहमी जात असत. नंतर
परमपूज्य स्वामी महाराजांनी बीड बायपास, सातारा परिसर औरंगाबाद येथे भव्य असे
रेणुका मंदिर बांधले. आणि ते अनेक वर्षं औरंगाबादला वास्तव्यास होते. तेव्हा मुकुंदराव
स्वामींच्या दर्शनास जात असत. त्यांचा मोठा मुलगा सारंग, बालचिकित्सक डॉक्टर
मंदार आणि सर्व कुटुंबीयांची योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांवर अपार श्रद्धा आहे.
स्वामी महाराजांचा मुलगा परमपूज्य अप्पा महाराज औरंगाबाद येथील रेणुकामाता मंदिर,
बीड बायपास, सातारा परिसर येथे असतात. दरवर्षी गुरुपौर्णिमेला व्यासपूजनाचा मोठा
सोहळा संपन्न होतो. हजारो शिष्य, भक्त गुरुपौर्णिमेला दर्शनासाठी जमतात. त्यासाठी खूप
खर्च करावा लागतो. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी मंदिरात पैशांची
जुळवाजुळव सुरू होती. त्यावेळी मी मुकुंदरावांना सहज माहिती दिली. त्यांनी पाच
5
आकडी रक्कम गुरुचरणी अर्पण केली.
सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात देशपांडे आडनाव असलेले चार प्राध्यापक
होते. त्यांची नावे प्रा. आर. एम. देशपांडे, प्रा. डॉ. रत्नाकर देशपांडे, प्रा. प्रदीप देशपांडे
आणि प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे. आडनावाचा गोंधळ टाळण्यासाठी देशपांडे नावाने
संबोधन करण्याऐवजी इंग्रजी आद्याक्षराने संबोधन करण्याला सुरुवात झाली. प्रा. आर.
एम. देशपांडे यांचे आर. एम., प्रा. रत्नाकर देशपांडे यांचे आर. जी., प्रा. प्रदीप देशपांडेंचे
पी.जी. आणि प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे यांचे एम.ए.
प्रा. मुकुंद देशपांडे यांची महाविद्यालयातच नव्हे, तर बाहेरच्या जगातही ओळख
एम. ए. या आद्याक्षरांनीच झाली. गणित विषय हा अनेकांसाठी अवघड विषय आहे.
मात्र, अवघड विषय सोपा करून शिकवण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. व्यवहारात
सचोटी आणि शिकवण्याची हातोटी यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत वाढत
राहिला. अमेरिकेच्या एका शिक्षणविषयक अहवालात देशाची उंची किती या प्रश्नाचे
उत्तर नमूद केले आहे. जेवढी उंची शिक्षकाची तेवढीच देशाची. सरस्वती भुवन विज्ञान
महाविद्यालयाने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मानांकन मिळवले आहे.
हे यश संस्थेचे, महाविद्यालयाचे अथवा प्राचार्यांचे नसते. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या
अथक प्रयत्नातून संस्थेची यशोगाथा तयार होते. त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची
भूमिका स्वकर्तृत्वाने उज्ज्वल करणारे प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे हे बिनीचे शिलेदार होते.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

{ प्राचार्य डॉ. शरद अदवंत


औरंगाबाद
***

6
डॉक्टर एमडी - गणिताला समर्पित व्यक्तिमत्त्व
डॉ. एम. ए. देशपांडे व मी समवयस्क. तेगणित शिकवायचे, मी संख्याशास्त्र.
सुरुवातीला १९६८ मध्ये गणित व संख्याशास्त्र या दोन्ही विषयांचा तत्कालीन मराठवाडा
विद्यापीठात (आताचे बामु) एकच सामायिक विभाग होता. गणित व संख्याशास्त्र म्हणजे
सख्खे चुलत भाऊच. त्यामुळे माझी व प्रा. देशपांडेंची ओळख अगदी तेव्हापासूनची.
बोलता-बोलता पन्नास वर्षे झाली.
डॉक्टर एम.ए. डीं. चे पीएच. डी. चे मार्गदर्शक होते विद्यापीठातील गणित विषयाचे
रीडर, गणिताचा अभ्यास, अध्यापन व संशोधनाला वाहून घेतलेले ज्ञानतपस्वी डॉ. दा.
य. कस्तुरे सर. दर उन्हाळ्याच्या सुटीमध्ये एम.ए.डी., गेवराईचे प्रा. रावसाहेब शास्त्री,
जालन्याचे प्रा. भारूका, प्रा. दसरे, मी स्वतः आणि अन्य काही पी एच.डी.चे विद्यार्थी
विद्यापीठात रोज अभ्यासासाठी एकत्र येत असू. साधारणपणे सकाळी दहा ते संध्याकाळी
सहापर्यंत आम्हीवाचन, लेखन, मनन करत असू. आमचे गाईड असलेले प्राध्यापकही
असायचे. दिवसभरात साधारणपणे दोन-तीन वेळा आम्ही संशोधक विद्यार्थी जवळच्या
कॅन्टीनमध्ये चहापानाला जायचो. मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. काहीजण त्यांच्या
गाईडबद्दल गमतीदार गोष्टी सांगायचे. किस्से सांगायचे. आमचे गाईड जास्त बोलत
नाहीत, लिहूनच स्पष्ट सूचना देतात. कोणी म्हणायचे, कस्तुरे सरांच्या खोलीत शिरताना
इतकं दडपण असतं, ते शांतपणे वाचनात मग्न असतात. काहीवेळा तर खोलीत कुणी
आल्याचं त्यांना कळायचेही नाही. दुसरे कोणी तरी म्हणायचे, आमच्या गाईडचं तसं
नाही. या या, बसा म्हणत माझं हसत स्वागत करतात. बराच वेळ वायफळ गप्पांत जातो.
मग कामाकडे वळतात. संध्याकाळी परत जाताना आज काही फारसा प्रोग्रेस झाला नाही
असं वाटतं. फारच घासून घेतात बाबा ही गाईड मंडळी. एक जण वैतागून सांगू लागतो.
सगळं शांतपणे ऐकल्यावर प्रा. एम.ए.डी. मिश्कीलपणे हसायचे आणि म्हणायचे,‘अरे
बाबा, गणितामध्ये पीएचडी मिळवणे म्हणजे तपश्चर्या आहे. डॉक्टर लक्ष्मीकांत या
जगप्रसिद्ध गणितज्ञाच्या नावाने आपले मॅथेमॅटिक्स डिपार्टमेंट ओळखले जाते. सतत
अभ्यास आणि कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही.’
‘वाटलं तर अर्धा कप चहा अजून घेऊया अन् अभ्यासाला लागूया,’असा गोड
सल्ला मी बहुधा द्यायचो. कारण माझं एक कपभर चहाने कधीच समाधान होत नसे.
चहानंतरचे तंबाखूजन्य उपक्रम आटोपत आम्ही नव्या उत्साहाने डिपार्टमेंटकडे परतायचो.
7
काहींच्या बाबतीत अशा तीन-चार उन्हाळ्याच्या सुट्या गेल्या असाव्यात. एखादा
अपवाद वगळता आम्ही सर्वच पीएचडी मात्र झालो.
मी एकदा एमएडींना माझा पीएच.डी चा टॉपिक थोडक्यात सांगितला व त्यांनी मला
त्यांचा समजावून सांगितला. त्यांना माझा टॉपिक सहज समजला असावा. मला मात्र
त्यांच्या पीएच.डी. टॉपिकमधलं अवाक्षरही उमजलं नाही. मी नंतर पुन्हा एकमेकांच्या
पीएचडी टॉपिकवर चर्चा करणेच बंद केले. मला अजूनही असं वाटतं की, इतक्या कुशाग्र
बुद्धीच्या प्राध्यापकाने कॉलेजमध्ये शिकवण्याऐवजी विद्यापीठात येऊन संशोधन केले
असते तर भारतालाच नव्हे, तर जगाला एक उत्कृष्ट गणितज्ञ संशोधक मिळाला असता.
पण हजारो विद्यार्थ्यांना गणित सोपं करून शिकवणाऱ्या एमएडींना बहुधा स्वतःच्या
करिअरपेक्षा इतरांचे करिअर घडवण्यामध्ये एक वेगळे समाधान मिळत असावे.
मी माझी विद्यापीठातील अधिव्याख्यात्याची नोकरी सोडून १९८१ मध्ये औरंगाबाद
येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) सहयोगी प्राध्यापक म्हणून नोकरी
सुरू केली. १९८७ मध्ये मी प्राध्यापक व विद्या शाखाप्रमुख झालो. बहुधा १९८९ मधील
एक महत्त्वाची घटना म्हणजे वाल्मीमध्ये पाटबंधारे खात्यातील डायरेक्ट क्लासवन
अभियंत्यांसाठी इंडक्शन प्रशिक्षण वर्ग सुरू झाला. या महत्त्वाच्या कोर्सचे वैशिष्ट्य
म्हणजे यातील एक भाग वाल्मीमध्ये, तर दुसरा भाग आयआयटी, पवई मुंबई येथे
शिकवला जाणार होता. वाल्मीमधील अभ्यासक्रमांमध्ये अॅडव्हान्स मॅथ्स शिकवण्याचा
भाग समाविष्ट होता. या बॅचसाठी गणितासाठी नामवंत व त प्राध्यापक असावेत,
असा आमचे तत्कालीन शिक्षक संचालक श्री. नारायणराव जोशी साहेबांचा आग्रह होता.
औरंगाबादमधील नावे शोधताना पटकन संचालक साहेब व मी दोघांनीही एमएडींचे नाव
घेतले. दोघांच्याही आग्रहानंतर, सुरुवातीला वर्षभरासाठी डेप्युटेशनवर यायला ते तयार
झाले. बहुधा कामातील तोचतोपणा, रुटीनमधून बाहेर पडणे हेही कारण असावे. शिवाय
वाल्मीचारम्य परिसर. भारतातील अग्रगण्य संस्था असे वलय हेही कारण असावे. एमएडी
वाल्मीत गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्या बॅचला त्यांनी त्यांच्या नेहमीच्याच
सिद्धहस्त हातोटीने शिकवले. त्यांच्या वैयक्तिक अडचणीही सोडवल्या. उत्कृष्ट
प्राध्यापक म्हणून सर्वजण एमडींचा गौरवाने उल्लेख करू लागले. आता वाल्मीमध्ये
कायमस्वरूपी यावे, असा आग्रह केला गेला. पण एमएडी वाल्मीत रमले नाहीत.
8
परिसर रम्य, पण वातावरण टिपिकल सरकारी. साडेदहा ते साडेपाच थांबणे आवश्यक.
प्राध्यापक व प्रमुख, सहसंचालक, संचालक अशी हायरार्की. कॉलेजच्या मोकळ्या-
चाकळ्या वातावरणात रमलेले एमएडी चक्क वाल्मी सोडून परत स.भु.मध्ये परतले.
एमएडींची व माझी शेवटची भेट दोन वर्षांपूर्वी गंगा मेडिकल स्टोअर्समध्ये
योगायोगाने झाली. अर्थात दोघेही औषधं घेण्यासाठी गेलो होतो. तेथे आमच्या गप्पा खूपच
रंगल्या. काम होऊनही इतका वेळ गप्पा मारणाऱ्या आम्हा दोन म्हाताऱ्यांकडे सेल्समन
बघतच राहिला. मी नंतर सहज विचारले, घरी सोडून देऊ का? हसत हसत एमएडी
नको म्हणाले. गाडी आहे, ड्रायव्हर आहे, मुलं खूप काळजी घेतात माझी. त्यांच्या त्या
बोलण्यात कौतुक होतं, धन्यता होती. त्यांचे डोळेही थोडेसे पाणावलेले होते....

{ प्रा. डॉ. शरद गं. भोगले


औरंगाबाद
***

9
गणितासाठी MAD झालेला M.A.D.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने व्यवस्थापनाच्या सोयीसाठी १९७०साली कला,
वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विभाजन केले. विज्ञान महाविद्यालयात १९७०
साली मराठी विभागप्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली.
मी रुजूतर झाले, पण शिकवण्याचा, तेही महाविद्यालयात शिकवण्याचा अनुभव
शून्य. शिकवण्याची माझी पाटी कोरी होती. नुसतं एम.ए. पास होऊन विद्यार्थ्यांना
शिकवता येत नसतं. त्यासाठी अधिक काही करण्याची आवश्यकता असते, हे माझ्या
लक्षात आलं. त्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहिले. त्यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांनी फार
मोलाचं मार्गदर्शन केलं. प्राचार्य संपतराय, उपप्राचार्य उमेशचंद्र, सर्ज सर, नागभूषण
मॅडम, शिराळकर मॅडम, आर. एम. देशपांडे, लीला कुलकर्णी, कोरान्नेसर अशा सर्व
स्टाफने मला सांभाळून घेतले. त्यात वयाने लहान असलेला M.A.D. होता.
या सर्वांच्या प्रोत्साहनाने माझा अध्यापनाचा प्रवास सुरू झाला. आत्मविश्वासाने मी
शिकवू लागले. घरी शिकवण्याची तयारी करून जाऊ लागले. विद्यार्थी आणि मी यांच्यात
एक नाते तयार झाले. तसेच सर्व स्टाफशी एक घरगुती अनुबंध तयार झाला. सारा स्टाफ
त्यांच्या त्यांच्या विषयातील No. 1 होता. M.A.D. तर +1 होता.
नोकरीतील बुजरेपणा जात होता. प्रत्येक प्राध्यापकाविषयी वेगळेपण कानावर येत
होतं. M.A.D. विषयी असंच अनेकविध कानावर आलं. स्टाफ, विद्यार्थी, पालक त्यांना
M.A.D. म्हणूनच ओळखायचा. मला आधी कळलंच नाही की हे काय प्रकरण आहे.
नंतर मला कळलं की, तो त्यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म आहे. मुकुंद अमृत देशपांडे. हे
नाव कदाचित ते स्वतः विसरले असतील. असा माझा तर्क आहे. कोणी त्यांना आपला
परिचय सांगा असं म्हणाले असतील, तर ते पटकन M.A.D. म्हणाले असतील असे
मला वाटते. त्यांच्या गणित शिकवण्यास कॉलेज विद्यार्थी फार मानत असत. इतका त्यांचा
शिकवण्यात हातखंडा होता. असं सारखं कानावर यायचं. Maths आणि M.A.D.
हे समीकरण होतं. स्वतः शिकत असताना ते पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणित
शिकवायचे म्हणे. भास्कराचार्य, लीलावती यांनी पचवली आहे की काय हा विचार मनात
यायचा.
माझा त्यांच्या गणित शिकवण्याशी प्रत्यक्ष संबंध आला नाही. कारण मॅट्रिकनंतर
माझी गणिताशी फारकत झाली होती. त्यांच्या-माझ्यामधलं साम्य म्हणजे ते Maths
10
शिकवायचे आणि मी Marathi =2M. दुसरं म्हणजे त्यांचं नाव मुकुंद आणि माझं नाव
मंगला =2M.
त्यांच्या घरची परिस्थिती साधारण होती. त्यामुळे ते स्वबळावर शिकत होते.
आमच्या लहानपणी घरात खूप माणसं काका, काकी, बहिणी, भाऊ, त्यात चुलत-
मालत असायच्या. M.A.D. च्या घरातही असंच होतं. मला माझं घर, माझी भावंडं
पुढं आणायची, आई-वडील आणि घरातील इतरांना सुखी करायचं, हे त्यांचं ध्येय
होतं. त्यासाठी ते 24x7 तास धडपडत असत. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत
नसतो. कर्तव्याचं, सर्वांना सुखी करण्याचं त्यांना जणू वेडच लागलं होतं. मी वयाने
मोठी असल्यामुळे मला त्यांच्यात साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांचा भास व्हायचा.
नकारात्मक विचार त्यांना कधी शिवलानाही. मनानं ठरवलं की ते पूर्ण झालंच पाहिजे हा
निश्चय. त्यांच्या मनातल्या सर्व गोष्टी त्यांनी प्राप्त केल्या, असे म्हणता येईल.
ही सगळीच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी घरातून म्हणजे पत्नीकडून साथ मिळणं
आवश्यक असते. वसुधाताईने आत्मनिवेदन भक्तीच्या माध्यमातून त्यांना साथ दिली.
मुलांनी त्यांचे नाव थोर केले. हे भाग्यच.
त्यांचा मित्रपरिवार मोठा. त्या सागरासारख्या मित्रपरिवारात मी मंगला वैष्णव
बिंदूरूप. मला माझं हे बिंदूपणही गौरवपूर्ण वाटतं. कारण एवढ्या हुशार, कष्टाळू,
ध्येयासक्त व्यक्तीच्या मित्रपरिवारात मी आहे.
कदाचित देवलोकात देवांना गणित शिकवण्यासाठी M.A.D..ला देवाने बोलावले
असावे. M.A.D. नं आपलं गणिताविषयीचं मॅडपण जपलं, याचं मला कौतुक आहे.
वसुधाताई, मुले, सुना आणि नातवंडे यांना आशीर्वाद.

{ प्रा. डॉ. मंगला वैष्णव


औरंगाबाद
***

11
प्रा. एम.ए. देशपांडे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व
मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दामोदर यज्ञेश्वर कस्तुरे
यांचे पीएच.डी.चे पहिले विद्यार्थी डॉ. एम.ए. देशपांडे होते, हे सांगण्यास मला अभिमान
वाटतो. मराठवाडा विद्यापीठाच्या गणित विभागात डॉ. कस्तुरे हे विभागप्रमुख असताना
डॉ. एम.ए. देशपांडे हे त्यांच्याकडे पीएच. डी. साठी लागणाऱ्या मार्गदर्शनासाठी दर
उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुटमध्ये गणित विभागात जाऊन रोज किमान सहा तास
तरी अभ्यास करत. त्याच सुमारास आम्ही एकंदर सहा प्राध्यापक सुटीच्या कालावधीत
गणितविभागात जाऊन अभ्यास करत असू. यामध्ये डॉ. देशपांडे, प्रा. भारुका, प्रा. आर.
पी. शास्त्री हे डॉ. कस्तुरेंकडे मार्गदर्शन घेत असूत. तर प्रा. दसरे, प्रा. जे. एन. देशपांडे
व मी स्वतः डॉ. गोपाळ शेंडगे यांचे मार्गदर्शन घेत असू. मधल्या सुटीत आम्ही चहा
घेण्यासाठी एकत्र जमत असू. आम्हा सर्वांना पीएचडीची पदवी संपादन करण्यासाठी पाच
ते सात वर्षांचा कालावधी लागला.
प्रा. देशपांडे संशोधन सुरू असताना औरंगाबादच्या प्रसिद्ध अशा सरस्वती भुवन
महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते पीएचडी झाल्यावर आम्ही त्यांना
आमच्या महाविद्यालयात गणितावरती काही व्याख्याने देण्यासाठी बोलावले. त्या सुमारास
मी अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात गणित विभागाचा विभागप्रमुख म्हणून
कार्यरत होतो. त्यांची व्याख्याने आम्ही बी.एस्सी. च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती.
त्यांनी प्रतलीय भूमिती (Co-ordinate geometry of two dimension) हा विषय
निवडला होता. भूमितीतील मूलभूत संकल्पना त्यांनी अगदी सोप्या भाषेत व उदाहरणांद्वारे
स्पष्ट केल्या. मूलभूत शाखेच्या अभ्यासाचे महत्त्व एखाद्या प्रतलामध्ये Plane बिंदूचे स्थान
दोन संख्यांच्या साह्याने कसे निश्चित होते, हे त्यांनी व्यावहारिक उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
त्यांची व्याख्यान देण्याची व संकल्पना स्पष्ट करण्याची पद्धत मला वसर्व विद्यार्थ्यांना फारच
आवडली. अधूनमधून ते व्याख्यान चालू असताना विनोदी चुटके तेही विषयाशी निगडित
असे सांगत असत. त्यामुळे त्यांची व्याख्याने कधीच कंटाळवाणी वाटली नाहीत. प्रा. एम.ए.
देशपांडे स. भु. महाविद्यालयात काम करीत असताना खासगी शिकवणी वर्ग घेत. बहुसंख्य
विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शन घेत असत. जेव्हा सरस्वती भुवन संस्थेने त्यांना खासगी शिकवण्या
करण्याची बंदी केली तेव्हा त्यांनी नोकरी सोडून स्वतंत्रपणे कोचिंग क्लासेस सुरू केले.
त्याकाळात अकरावी व बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना गणित या विषयात त्यांनी बहुमोल
12
मार्गदर्शन केले. औरंगाबाद शहरातील ६० ते ७० टक्के विद्यार्थी देशपांडे सरांच्या क्लासला
जात. त्यांचे बहुमोल मार्गदर्शन घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत. त्या काळात विद्यार्थी मी
मॅड (MAD) च्या क्लासला जातो असे गमतीने म्हणत. एम.ए.डी. हे डॉ. एम.ए. देशपांडे
यांचे संक्षिप्त नाव. त्याकाळात व आताही प्रचलित आहे.
डॉ. देशपांडे हे दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुटीतही नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
खासगी वर्ग चालवत. मी एकदा त्यांच्या परवानगीने अकरावीसाठी घेत असलेल्या एका
तासाला जाऊन सर्वात मागच्या बाजूच्या बाकावर बसलो. त्यांची हसत-खेळत गणित
विषय शिकवण्याची पद्धत मला खूपच आवडली. त्या तासाला उपयोगी पडणारी सूत्रे
ते आधीच बोर्डाच्या वरच्या बाजूला लिहून ठेवत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती सूत्रे लवकर
पाठहोत असत. 1/2+1/4+1/8+1/16+……….अशी अनंतपदे. या सर्व संख्येची
बेरीज 1 कशी येते हे त्यांनी आकृती काढून भूमितीच्या साहाय्याने समजावून सांगितले.
समजा AB हे अंतर 1KM आहे. C हा AB चा मध्यबिंदू, D हा CB चा
मध्यबिंदू, DE हा DB चा मध्यबिंदू घेऊन व याप्रमाणे मध्यबिंदू विचारात घेऊन
1/2+1/4+1/8+1/16+……….ही बेरीज 1येते हे त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक पाहता
हे जी अनंत संख्येची पदावली आहे, ती मधील पदे भौमितिक प्रकारची (Numbers in
geometric progression)आहेत. प्रा. देशपांडे यांना सामान्य ज्ञानही भरपूर होते. तसेच
त्यांना बुद्धिबळ खेळण्याचीसुद्धा आवड होती. बऱ्याच वेळा त्यांनी मला बुद्धिबळाच्या
डावात हरवले आहे. ते मॅथेमॅटिकल सोसायटीचे आश्रयदाता (Petron Member)
सभासद होते. तसेच या संस्थेमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या bulletin of the mathematical
society या षण्मासिकातही त्यांचे काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या आकस्मिक
निधनामुळे त्यांच्या सर्व कुटुंबीयांना, त्यांच्या अनेक मित्रांना, तसेच विद्यार्थ्यांना मोठा
मानसिक धक्का बसला यात काही शंकाच नाही. त्या सर्वांना हा धक्का सहन करण्याचे
बळ परमेश्वर देवो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. तसेच प्रा. देशपांडे यांच्या
आत्म्याला सद्गती प्राप्त होवोही परमेश्वरचरणी प्रार्थना करून हा लेख संपवतो.
{प्रा. डॉ. एस. आर. जोशी
निवृत्त प्राध्यापक, गणित विभाग योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई
***
13
डॉ. एम.ए. देशपांडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
एम.ए. सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे, आपण त्यात लेख
लिहावा. असा श्रीमती देशपांडे वहिनींचा फोन आला. तुम्ही त्यांचे जवळचे सहकारी
आहात. क्षणभर मन भरून आले. एम. ए. सरांविषयी काय लिहावे काहीं सुचत नव्हते.
Words were locked in heart. याप्रसंगी मला ली हंटच्या ‘आबू बेन आधम’
या कवितेचे स्मरण झाले. आबू बेन आधम सुफी संत होता. त्याचे संपूर्ण जीवन
दीनदुबळ्यांना मदत करण्यात, लोकसेवेत गेले. कविता मराठीतून अशी होती
शुक्ल पक्षी रात्रीस निजागारी। स्वप्न केली जी दूर दशासारी।।
एका रात्री आबू बेन आधम शांत झोपेत असताना पहाटे त्याला स्वप्न पडले.स्वप्नात
त्याच्या खोलीचा कोपरा प्रकाशमय झाला. एक तेजोमय देवदूत सुवर्ण अक्षरात वहीत
लिहीत होता. आधमने त्याला काय लिहीत आहे? अशी विचारणा केली. त्याने उत्तर दिले
की, मी अशा व्यक्तींची यादी करीत आहे, जे देवभक्ती, नामस्मरण करतात. देव त्यांना
आशीर्वाद देईल. आधमने त्यात त्याचे नाव आहे का? अशी विचारणा केली. देवदूताने
यादी तपासली. त्यात त्याचे नाव नव्हते. आधमने विनंती केली मी देवभक्ती करत नाही,
पण लोकसेवा करतो. यादीत शेवटी माझे नाव लिही. देवदूताने नाव लिहिले आणि तो
अदृश्य झाला. दुसऱ्या रात्री तो पुन्हा देवांनी आशीर्वाद दिलेल्या व्यक्तींची यादी घेऊन
प्रकट झाला आणि यादी पाहून तो आश्चर्यचकित झाला. यादीत त्याचे नाव पहिले होते.
सरांनी आपल्या अध्यापनातून अखंड विद्यार्थी सेवा केली. अगणित विद्यार्थी
त्यांच्याकडून गणित शिकले. असंख्य विद्यार्थी अभियंते, तंत्रज्ञ, उद्योजक म्हणून कार्यरत
आहेत. उच्चपदी आहेत. ते सारे M.A.D. सरांकडे गणित शिकले. लौकिक अर्थाने सर
अध्यापनात M.A.D.होते.
सर माझ्या साठी मार्गदर्शक होते. प्रेरणास्थान होते. मी १९७७ साली स.भु.त प्राध्यापक
म्हणून कार्यरत झालो. पहिल्याच वर्षी मला Workshop Technology D चा वर्ग दिला.
मी मेहनत घेत विद्यार्थ्यांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करीत होतो. एकेदिवशी एका
व्यक्तीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. “R.G.ना तू? केमिस्ट्री शिकवतोस ना? छान
शिकवतोस.तुझ्याबद्दल विद्यार्थी छान अभिप्राय देतात.अजून मेहनत घे.चांगला शिक्षक
आहेस. खासगी वर्ग घेण्याचा विचारही कर. All the best.’ ते एम.ए.सर होते. त्यांच्या
सल्ल्यानुसार मी शिकवीत गेलो आणि काही अंशी यशस्वी झालो.
14
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी मान्यता द्यावी, असा ते सतत आग्रह धरत असत.
एकेकाळी स.भु.तील D-3 combinationप्रसिद्ध होते. सरांसोबत काम करण्याची
Thakar classes ICDमध्ये संधी मिळाली. त्यांचे सदैव मार्गदर्शन मिळाले.स.भु.
महाविद्यालयात एम.ए.सर अतिशय विद्यार्थिप्रिय प्राध्यापक होते. महाविद्यालयाच्या प्रत्येक
कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी होत. विशेषत: स्नेहसंमेलनात ते खूप सहभाग घेत. तीन
अंकी नाटक दिग्दर्शित करण्यात त्यांना खूप आनंद मिळायचा. मला आठवते एकेवर्षी
त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हे नाटक खूप गाजले. माझी माहिती
बरोबर असेल तर त्यांनी विद्यापीठात नाट्यशास्त्र डिप्लोमा केला होता.त्यांचे सहयोगी
प्राध्यापकांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. इतरांना ते सदैव मदत करत असत.
महाविद्यालयीन व्यवस्थापनात त्यांचा खूप आदर केला जाई. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली
नसती तर ते प्राचार्य पदाचे प्रबळ दावेदार होते. त्यांच्या अध्यापन प्रेमामुळेच त्यांनी नोकरी
सोडली आणि आपल्याच विश्वात रममाण झाले.
माझ्या दोन्ही मुली सरांच्या विद्यार्थिनी. स्मृतिग्रंथाविषयी मी माझ्या मोठ्यामुलीशी
बोललो. ती सरांच्या आठवणीने भारावून गेली. तिने सांगितले, सर संपूर्ण पेपर
सोडविण्यासाठी आग्रही असत. शंभर मार्क तर कोणीही मिळवतो. क्लासच्या आठवणी
सांगत होती. भिंतीवर कठड्यावर बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या गमती जमती सांगत
होती. माझी लहान मुलगी बारावीला मेरीटमध्ये प्रथम आली तेव्हा सर घरी आले आणि
प्रथम माझे अभिनंदन केले. माझ्यातील शिक्षकाचे अभिनंदन केले.
शेवटी अजूनही सरांचे शब्द ऐकू येतात
“R.G.काय चाललंय? Classes वगैरे घेतोस की नाही?’
पुनश्च विनम्र अभिवादन.

{ प्रा. आर.जी.देशपांडे (निवृत्त)


स.भु. महाविद्यालय, औरंगाबाद
***

15
एक चांगला मित्र
मुकुंद देशपांडे एक स्वाभिमानी शिक्षक, ज्याने आयुष्यात कष्ट, कष्ट आणि
कष्ट करून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. एक उत्कृष्ट नामांकित शिक्षक म्हणून प्रतिष्ठा
मिळवली. त्याला लहानपणापासूनच गणित विषयाची आवड होती. घरची परिस्थिती
बेताचीच होती, पण शिक्षणाची आवड आणि गणिताचे वेड त्यामुळे परिस्थितीने
आपोआप मार्ग दाखवून दिला. आणि शालेय शिक्षण मिळवतच सहाध्यायींना
शिकवण्याचे कार्य सुरू केले. याचा तिहेरी लाभ झाला. स्वतःचा अभ्यास पक्का होत
गेला, शिकवण्याची कलाही अवगत झाली आणि अर्थार्जनही होत गेले.
जीवनात प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता प्रगतिपथावर चालत राहणे हेच खरे
आयुष्य जगण्यासाठीचे गुपित आहे. हे लक्षात ठेवून आपल्या आयुष्यात असेच जगत
राहिला. आयुष्यात राग, लोभ, प्रेम करणारे आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्र भेटतात.
मुकुंदाच्याही आयुष्यात असे भरपूर लोक भेटले. त्यांना त्याने प्रेमाने टिकवून ठेवले.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याला भेटलेले विद्यार्थी व त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांची
झालेली प्रगती ही दोघांच्याही जीवनाचा अनमोल ठेवा आहे. त्याला आयुष्यात भेटलेले
प्रेमळ नातेवाईक, मुले, सुना नातवंडे आणि मित्र ही मोठी कमाई आहे. सगळ्यात
महत्त्वाचे म्हणजे त्याला आयुष्यात मिळालेला योग्य अनुरूप जोडीदार. वहिनीच्या
सहकार्याने व प्रेरणेने आयुष्याची दिशा बदलली व प्रगतीच्या उच्चतम शिखरावर पोहोचून
समाधानाची पूर्तता झाली. सरांची दोन्ही मुले संस्कारी, उच्चशिक्षित, आपापल्या क्षेत्रात
नामांकित. हे जीवनातील एक अपेक्षांचे संतोषपूर्ण समाधानही लाभले.
तो आपल्या सर्व सहकाऱ्यांना शैक्षणिक तसेच वैयक्तिक अडचणीत नेहमी
तत्परतेने मदत करायचा. माझा विषय संख्याशास्त्र, मात्र गणिताचेही वर्ग घ्यावे लागायचे.
सुरुवातीला खूप अडचणी असायच्या. तेव्हा मुकुंदाचे हमखास व हक्काचे सहकार्य
मिळायचे. आज त्याची आठवण झाली की मन भरून येते. शिक्षक झाला नसता तर तो
एक उत्कृष्ट नाट्यकलाकार झाला असता.त्याने कॉलेजमध्ये शिकत असताना कितीतरी
नाटकांत कामे केली. आपल्या उत्कृष्ट अभिनयाची प्रस्तुती करत प्रेक्षकांची वाहवा
मिळवली होती. महाविद्यालयात कार्यरत असताना स्नेहसंमेलनात मुकुंदाची विशेषणाची
विशेष रुची ही नाटकाच्या दिग्दर्शनात असायची. त्यामुळे एक उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट
शिक्षक म्हणून विद्यार्थिप्रिय होण्यास वेळ लागला नाही. मनमिळाऊ व्यक्ती उत्तम
16
सहकारी म्हणूनही त्याची ख्याती होती.
त्याच्या स्मृतीत खालील ओळीने माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
पानांच्या हालचालींसाठी वारं हवं असतं । मनं जुळण्यासाठी नातं हवं असतं ।
नात्यासाठी विश्वास हवा असतो । त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री ।।
मैत्रीचं नातं जगावेगळं असतं । रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं ।
मैत्रीच नातं कधी कुठे केव्हा जुळतं कळतही नाही ।
मात्र जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून असतं ।।
मुकुंदसारखा चांगला मित्र, एक चांगला सहकारी मिळणे अशक्य…

{ प्रा. प्रवीण सोमय्या


औरंगाबाद
***

17
प्रेमा तुझा रंग कसा….
कै. प्रा. डॉ. मुकुंद अमृत देशपांडे सरांना ओळखणारे बहुतेक लोक “एमएडी’ या
टोपण नावाने ओळखत. परंतु हा माणूस एवढा मोठा होता की त्यांचा “असा’ उल्लेख
करावयास देखील माझी लेखणी धजावत नाही. देशपांडे सरांचा एक शिक्षक म्हणून
माझा परिचय मी स.भु. विज्ञानाच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला
त्यावेळी झाला. पुढे द्वितीय आणि तृतीय वर्षालादेखील सर आम्हाला शिकवत असत.
सरांच्या शिकवण्याबद्दल अक्षरशः लाखो विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. येथे
देखील अनेकांनी त्याबद्दल नमूद केले असल्याने मी फारसं सांगत नाही.
देशपांडे सरांचा आणि माझा “खरा परिचय’ मी महाविद्यालयातून जवळपास बाहेर
पडण्याचा टप्प्यात म्हणजे तृतीय वर्षाला असताना झाला आणि पुढे दिवसेंदिवस तो
वाढतच गेला! नाटकात काम करण्याची भयंकर आवड असल्यामुळे महाविद्यालयात
प्रवेश घेतल्यापासूनच मी दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत असे.
अंतिम वर्षाला असताना मात्र तीन अंकी नाटकात काम करण्याचा किडा डोक्यात
वळवळला. त्यावर्षी ही जबाबदारी नाट्यक्षेत्रातील जाणकार देशपांडे सर, अशोक झाल्टे
सर आणि उल्काताई देशमुख मॅडम यांच्यावर होती.
मी जेव्हा नाटकाच्या प्राथमिक निवड चाचणीसाठी गेलो त्यावेळी पुरेशी तयारी केली
असूनही मनावर प्रचंड दडपण होते. चाचणीसाठी चाळीसएक मुले आणि सात-आठ
मुली हजर होत्या. मी सोडून जवळपास सगळ्याच मुलांच्या चाचण्यादेखील पार पडल्या,
पण माझा काही नंबर आला नाही! आपल्याला चाचणी न घेताच बाद ठरवण्यात आले
असावे, अशी भीती मनात घर करू लागली. बहुतेक सगळे विद्यार्थी निघून गेले होते
आणि शेवटी एकदाचं देशपांडे सरांनी मला बोलावले. मी पाठ केलेला संवाद म्हणायला
सुरुवात करणार इतक्यात सरांनी मला थांबवलं आणि त्यांच्या हातातलं नाटकाचं पुस्तक
मला देऊन त्यामधील एक विशिष्ट स्वगत म्हणावयास सांगितलं. झालं! आधीच
मनाच्या अस्वस्थतेमुळे झालेल्या घाबरगुंडीत अधिकच भर पडली. उसनं अवसान
आणत कसंबसं ते स्वगत मी म्हणून दाखवलं. माझा परफॉर्मन्स फार काही चांगला झाला
नसल्याचं मला तिघांच्याही चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवलं होतं. पण दोनच मिनिटांत
देशपांडे सरांनी “या वर्षी आपण वसंत कानेटकर यांचं ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक
बसवणार असून त्यामधील प्रा. बल्लाळ मार्तंड गुप्ते यांच्या प्रमुख भूमिकेसाठी सुहास
18
पानसेची निवड पक्की केली आहे, हे जाहीर केलं.
त्यानंतर जवळपास अर्धा तास त्या तीन प्राध्यापक मंडळींमध्ये नाटकाच्या
निवडीबद्दल आणि त्यातील प्रमुख भूमिकेसाठी केलेल्या माझ्या निवडीबाबत बरीच
उलटसुलट चर्चा झाली. पण देशपांडे सर मात्र त्यांच्या दोन्ही निर्णयांबद्दल ठाम होते.
शेवटी एकदाचा समितीचा अंतिम निर्णय झाला, बाकी पात्रांचं कास्टिंग झालं आणि
यथावकाश तालमींना सुरुवात झाली.
या नाटकाच्या बऱ्याच तालमी देशपांडे सरांच्या घरी झाल्या. अशा वेळी त्यांचं
सगळं कुटुंबच तालीममय होऊन जात असे! देशपांडे मॅडम आमची सगळी बडदास्त
ठेवायच्या. सरांच्या घरी तालमी झाल्यामुळे आम्ही सगळेच कलाकार सरांच्या सगळ्याच
कुटुंबीयांच्या खूप जवळ आलो आणि तेव्हा निर्माण झालेले बंध आजतागायत टिकून
आहेत!
‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकसंबंधीच्या अनंत आठवणी आजदेखील मनात घर
करून आहेत. त्यापैकी देशपांडे सरांशी निगडित एक- दोन ठळक आठवणी सांगतो.
नाटकातील माझी भूमिका निवृत्तीला पोहोचलेल्या मानसशास्त्राच्या पोक्त,
विसरभोळा, विद्वान, विनोदी आणि विक्षिप्त अशा अनेकविध छटा असलेल्या
प्राध्यापकाची होती. सुरुवातीला मला माझ्या भूमिकेची नस काही केल्या सापडत नव्हती.
मग एक दिवस सरांनी मला एकट्याला वेगळं बोलावलं आणि माझी अडचण समजावून
घेतली. मला भूमिकेसाठी “रोल मॉडेल’ म्हणून कुणीच समोर येत नाहीय, असं जेव्हा
मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी लगेचंच “मला मॉडेल समज’ असं सांगितलं. मी पडत्या
फळाची आज्ञा मानली आणि खरं सांगतो की, त्यानंतर माझ्या भूमिकेला जो उठाव आला
तो कल्पनातीत होता. (सरांनी त्यावेळी दिलेला सल्ला मी केवळ नाटकापुरताच नव्हे, तर
भावी आयुष्यातदेखील पाळला असून त्यामुळे मला खूप फायदा झाला.)
नाटक तीन दिवसांवर येऊन ठेपलं असताना ते फारसं काही नीट बसलेलं नाही,
अशी वदंता प्राचार्यांच्या कानावर गेली. त्यांनी लगेच नाटकाची “रंगीत तालीम’ सादर
करण्याचे फर्मान काढले. रंगीत तालीम बघण्यासाठी उपप्रचार्यांना विनंती केली आणि
त्यांच्या अभिप्रायावर अंतिम प्रयोगाबाबत काय ते ठरवले जाईल, असे सांगितले.
झाले,आमचे टेन्शन आणखीनच वाढले आणि परिणामस्वरूप रंगीत तालमीचा
19
अक्षरशः फज्जा उडाला. उपप्राचार्य रंगीत तालीम संपताक्षणीच आमच्यासह मार्गदर्शक
प्राध्यापकांवर बेसुमार भडकले आणि त्यांनी” हे नाटक स्नेहसंमेलनात होणार नाही,’
असे लगेच जाहीरदेखील करून टाकले! आम्ही तर जाम घाबरून गेलो. देशपांडे
सरांनी मात्र न डगमगता आमची बाजू घेतली आणि “तीन दिवसांत हेच नाटक अप्रतिम
स्वरूपात आम्ही सादर करू’, अशी हमी प्राचार्यांना देऊन अंतिम नाट्यप्रयोगास
परवानगी मिळवली. एकीकडे समस्त विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये “या वर्षीच्या
स्नेहसमेलनाचं नाटक नीट बसलेलं नाही’ किंवा “स्नेहसंमेलनासाठी इतकं गंभीर नाटक
घ्यायचंच कशाला?’ अशा चर्चा रंगू लागल्या, तर दुसरीकडे देशपांडे सरांसकट समस्त
मार्गदर्शक प्राध्यापकांनी आम्हा सगळ्यांची व्यवस्थित खरडपट्टी काढून नंतरचे तीन
दिवस आमच्यावर अतोनात मेहनत घेतली. आम्ही तमाम कलाकार विद्यार्थीदेखील
झपाटल्यासारखे तालमी करीत होतो. या सगळ्याचा परिणाम म्हणजे नाटकाचा प्रयोग
दृष्ट लागावा असा उत्कृष्ट झाला. सगळ्यांच्याच भूमिका अप्रतिम वठल्या होत्या. अगोदर
रागावलेल्या उपप्राचार्यांसकट सगळ्यांनीच आम्हा सर्वांचे मनापासून कौतुक केले.
संस्थेच्या इतिहासात प्रथमच स्नेहसंमेलनासाठी बसवलेल्या नाटकाचे त्यानंतर दोन-तीन
प्रयोग आयोजित करण्यात आले. पैकी एक प्रयोग तर केवळ स.भु. शिक्षण संस्थेच्या
सदस्यांच्या कुटुंबीयांसाठी करण्यात आला! अजूनही काही प्रयोग होणार होते, पण
प्राचार्यांनी परवानगी नाकारल्यामुळे ते झाले नाहीत. परंतु त्या नाटकामुळे निर्माण झालेले
देशपांडे कुटुंबीयांचे आणि माझे स्नेहसंबंध आजही टिकून आहेत. त्यावेळी सरांनी केलेली
“पानसेला डोळ्यासमोर ठेवूनच मी ते नाटक निवडले होते आणि तो पुढे जाऊन नक्कीच
एक यशस्वी प्राध्यापक बनेल’, ही भविष्यवाणी पुढे शंभर टक्के खरी ठरली!
१९८७ पासून मी स.भु. विज्ञान महाविद्यालयातच भौतिकशास्त्राचा प्राध्यापक
म्हणून रुजू झालो. पुढे बरीच वर्षे सरांचा एक सहकारी म्हणून सहवास लाभला. त्या
काळातदेखील सरांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या आजतागायत मला
उपयोगी पडत आहेत.
संस्थेशी काही बाबतीत तात्त्विक मतभेद झाल्यामुळे पुढे सरांना महाविद्यालयातून
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारावी लागली. त्याचवेळी सरांनी मला, “पानसे, तुझ्यावरदेखील
उद्या ही वेळ येणार आहे आणि त्यासाठी तू तयार असलं पाहिजेस’, असं बजावलं होतं!
20
त्यांचं हे भाकीतदेखील नजीकच्या भविष्यकाळात सत्यात उतरले! मलाही २००७ साली
महाविद्यालयातून स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली!
स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावरदेखील सरांशी वरचेवर संपर्क येतच गेला. प्रत्येक
भेटीच्यावेळी सरांचा एक नवीनच पैलू उलगडत गेला आणि सर अधिकाधिक समजत
गेले. सरांनी आपल्या विद्यार्थ्यांवर जेवढे प्रेम आणि सुसंस्कार केले तेवढेच त्यांच्या
मुलांवरही केले. त्यांची दोन्ही मुले त्यांचं नाव आजही उज्ज्वल करत आहेत.
एम. ए. देशपांडे सरांच्या स्मृतिग्रंथासाठी डॉ. मंदार मुकुंद देशपांडे यांनी मला माझ्या
भावना व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे!
धन्यवाद.

{ प्रा. सुहास पानसे


औरंगाबाद
***

21
शब्दांजली
शब्दांजलीच्या निमित्ताने पन्नास वर्षांच्या मित्र सहवासाच्या अविस्मरणीय आठवणी
विशद करताना विरहाचे दुःख सारखे मनाला अस्वस्थ करते. एवढ्या दीर्घ मित्रप्रेमाच्या
कालावधीच्या त्या अविस्मरणीय अनुभवांचे वर्णन मर्यादित शब्दांत करणे अवघड
असून हे शब्दातीतच ठरेल. परंतु भावना व्यक्त करण्याच्या उद्देशाने ज्याच्या सहवासाने
जीवनाला योग्य आकार मिळून आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली व स्वतंत्र
व्यक्तिमत्त्व निर्माण झाले त्याचे ऋण मी कसे फेडू, हाच प्रश्न सारखा मनाला बोचतो
आहे. म्हणूनच याप्रदीर्घ सहवासातील आठवणींचा प्रपंच.
इसवी सन १९७० मध्ये विद्यापीठाच्या गणित विभागात आम्ही पदव्युत्तर वर्षाच्या
शेवटच्या वर्षात शिकत होतो. ऑगस्ट महिन्यात वेरूळ या माझ्या जन्मगावी एक भयंकर
दुर्घटना घडून त्यात माझ्या घरातील एकाच वेळी पाच व्यक्तींचे अपघाती निधन झाले.
त्यात माझी आई, दोन भाऊ, बहिणींचा समावेश होता. त्यावेळी माझ्यावर दुःखाचा
डोंगरच कोसळला होता. डोळ्यासमोर भविष्याचा काळोखच जणू पसरल्याची जाणीव
झाली. अशा या न भूतो न भविष्यति कठीण प्रसंगी या जिवलग मित्राने प्रत्यक्ष भेट घेऊन
माझे होईल तेवढे सांत्वन करण्याचा प्रयत्न करून मला फार मोठा नैतिकआधार दिला.
घरातील व्यक्तींच्या दु:खद अपघाती निधनाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे वर्षभर गावी
वडिलांजवळ होतो.
माझे शैक्षणिक वर्ष असेच वाया जाणार, असे मनोमन वाटत होते. कारण दु:खद
प्रसंगाच्या असह्य वेदनांनी मनाला संपूर्ण जखडून टाकले होते. परंतु, माझ्या मित्राने
माझ्या शैक्षणिक वर्षाचा सहानुभूतिपूर्वक विचार करून फेब्रुवारी १९७१ मध्ये माझी भेट
घेतली.‘चल, मी तुला न्यायलाच आलो आहे,’ असे म्हणून माझी खरोखरच दखल
घेतली. आणि मला दुःखातून मनोमन सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि
कालांतराने त्याच्या या प्रयत्नांना यशही आले. स्वतःसोबतच्या दिनचयेबरोबरच माझेही
अभ्यासाचे वेळापत्रक नियोजित केले. त्याचप्रमाणे कार्यवाहीही यशस्वीपणे पार पाडून
स्वतःच्या उज्ज्वल यशाबरोबरच पदव्युत्तर वर्गात मलाही यश मिळवून दिले. त्यामुळेच
माझे एक वेगळेच अस्तित्व निर्माण झाले.
केवळ या जिवलग मित्रामुळेच माझ्या जीवनाचे सार्थक झाले. परंतु खरोखर
स्वतः परोपकारी असल्याचे सिद्ध करून माझ्यावरील रक्ताच्या नात्याबाहेरचे बंधुप्रेमही
22
कर्तृत्वाने सिद्ध करण्यासही तो चुकला नाही, हे विशेष. एवढेच नव्हे, तर आम्ही दोघांनी
एकाच गुरूंच्या (कै. डॉ. दा. य. कस्तुरे) मार्गदर्शनाखाली गणित विषयात विद्यावाचस्पती
पीएच.डी. ही पदवी संपादन करीत असताना या मित्राने व डॉ. सुधाकर जोशी यांनी
वेळोवेळी मला येणाऱ्या अडचणी दूर करण्यात सिंहाचा वाटा उचलला. हे मी कधीच
विसरू शकणार नाही.
कौटुंबिक परिवारातील सहवास आणि सौख्य समाधानकारक असल्याचा
मानसिक आनंद मनाला एक वेगळाच सुखद अनुभव देऊन जातो. म्हणूनच अशा
निर्मळ, नि:स्वार्थी, परोपकारी आणि मर्यादा पुरुषोत्तम जिवलग मित्राच्या चरणी, मी
मुकुंद भावनाभावित होऊन त्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त माझी ही अविस्मरणीय
आठवणींची भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.

{ डॉ. आर. पी. शास्त्री


औरंगाबाद
***

23
बुद्धिमान गणित डॉ. एम. ए. देशपांडे
अतिशय बुद्धिमान आणि गोल्ड मेडलिस्ट डॉ. एम. ए. देशपांडे हे मला शिक्षक
म्हणून लाभले, हे माझे भाग्यच. सर जसे बुद्धिमान होते तसेच त्यांची शिकवण्याची
हातोटी वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे ते विद्यार्थिप्रिय होते. अकरावी ते बी.एस्सी. थर्ड
इयरपर्यंत मी त्यांच्या हाताखाली शिकले. बी.एस्सी.ला ते आम्हाला स्फेरिकल ट्रिग्नोमेट्री
शिकवायचे. बी.एस्सी.ला शिकत असताना आम्ही म्हणजे मी व माझी मैत्रीण उषा
जेवळीकर डिफिकल्टीज घेऊन त्यांच्या घरी जायचो. तेव्हा सरस्वती भुवन कॉलनीत
राहायचे. त्यामुळे कॉलेजमधून परस्पर त्यांच्याकडे जाणे आम्हाला सोयीचे होते. सरांनी
आम्हाला कधीच नाराज केले नाही किंवा कधीही रागावले नाहीत.
सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाची नोकरी करत असताना
ते घरी गणिताची शिकवणी घ्यायचे. त्यामुळे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे मॅनेजमेंट
त्यांच्यावर नाराज होते. देशपांडे सर संस्थेतच राहावेत, अशी मॅनेजमेंटची इच्छा होती.
पण एकाच वेळी नोकरी करत असताना खासगी शिकवणी घेणे संस्थेच्या शिस्तीत बसत
नव्हते. एकदा गोविंदभाई यांनी त्यांना बोलावून ‘तुम्ही शिकवणी बंद करा’ असे सांगितले.
सरांनी नोकरी सोडली, पण शिकवणी वर्ग चालू ठेवले. त्यांनी नोकरी सोडली तेव्हा मी
सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका म्हणून काम
करत होते. सरांनी राजीनामा दिल्याचे कळले तेव्हा मला खूप वाईट वाटले. आता जर
मला विषयात काही अडचण आली तर हक्काने कोणाकडे जाऊ, असा प्रश्न पडला.
महाविद्यालयातील गणित विभागाचा एक आधारस्तंभ निघून गेला.
सर उदार मनाचे होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांकडून ते फीस
घेत नसत. त्यांचे गणितावर निरतिशय प्रेम होते.‘गणिताशिवाय मी जगू शकत नाही’ असे
ते म्हणायचे. सरांचे पीएच.डी. खरेतर माझ्या खूप आधी झाले होते. माझा आणि देशपांडे
सरांचा पीएच.डी. प्रबंधाचा विषय डिफरेन्शियल इक्वेशनसंबंधी होता. त्यामुळे माझा
या कामात काही अडले तर मी बऱ्याचदा गाइडकडे जायच्या आधी देशपांडे सरांकडे
जायची. याहीवेळी त्यांनी मला खूप मदत केली.
माझे व देशपांडे सरांचे पीएच.डी.चे गाइड एकच होते, डॉ. डी. वाय. कस्तुरे.
कस्तुरे सरांची एक पद्धत होती. ते एकदा टॉपिक तयार करून तो बोर्डावर प्रेझेंट करायला
सांगायचे. सर विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत होते, तोपर्यंत विद्यापीठाच्या मॅथ्स
24
डिपार्टमेंटमध्ये हे प्रेझेंटेशन व्हायचे. रिटायरमेंटनंतर विद्यापीठाच्या सुविधांचा वापर
करणे हे कस्तुरे सरांच्या तत्त्वात न बसणारे होते. इतर कुठेही प्रेझेंटेशनसाठी आवश्यक
असणारी मोठा बोर्डची सोयही नव्हती. अशा अडचणीच्या वेळी देशपांडे सरांनी त्यांची
शिकवण्याची जागा उदार मनाने आम्हाला वापरायला दिली. प्रेझेंटेशन सुरू असताना
देशपांडे मॅडम आमच्यासाठी चहा करायच्या आणि सर चहा आणून द्यायचे.
कस्तुरे सर व विद्यापीठातले इतर प्रोफेसर्स त्यांना म्हणायचे की, तुम्ही शिकवणे
सोडून द्या आणि रिसर्च फिल्डमध्ये या. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सरांची
गणितातली प्रगल्भता सगळ्यांनाच ठाऊक होती. देशपांडे सर रिसर्चमध्ये आले असते
तर गणित क्षेत्रात नक्कीच मोलाची भर पडली असती. देशपांडे सर एम.एस्सी.ला
असताना त्यांच्या वर्गातील मुलांची शिकवणी घ्यायचे, हे जेव्हा मला कळले तेव्हामाझा
त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.
त्यांच्या निधनाने गणित क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
डॉ. देशपांडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

{ प्रा. डॉ. शुभदा देशमुख, (निवृत्त)


स.भु. विज्ञान कनिष्ठमहाविद्यालय, औरंगाबाद

***

25
ध्येयनिष्ठ शिक्षक एम. ए. डी. सर
विशुद्ध अंत:करण, शुद्ध चित्त, स्थितप्रज्ञता हीच जीवनाची समृद्धी. काही माणसांबद्दल
पहिल्या भेटीतच मनात अशी प्रतिमा तयार होते. त्या प्रतिमेला प्रतिबिंबाचा प्रत्यक्षात प्रत्यय
येतो. अशीच काहीशी सरांविषयीची एक प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. सर गणित या
विषयाचे निष्णात शिक्षक. मुळात गणित हा विषय अत्यंत अवघड, न आवडणारा, निरस
असलेला विषय. शिकवणारा शिक्षकही साहजिकच गणित विषयासारखाच… हा पूर्वग्रह
माझ्या मनात होता.
माझी मैत्रीण विद्या अनगदकर आणि तिचा मुलगा योगेश अनगदकर. त्याचे मित्र
आणि माझा मुलगा कपिल यांच्यामुळेच सरांच्या खऱ्या प्रतिमेचा परिचय मला झाला.
सरांचा मुलगा सारंग आणि कपिलची मैत्री झाली. तो आमच्या घरी यायचा. त्याचं वागणं,
बोलणं अत्यंत सालस. कपिल सुट्यांमध्ये एकदा औरंगाबादला आला. माझा नातू-
कपिलचा मुलगा यालाथोडं बरं वाटत नव्हतं. म्हणून त्याला डॉ. मंदारकडे नेलं. मंदारच्या
वैद्यकीय उपचारांनी त्याला बरंही वाटलं. पण कपिल जेव्हा काऊंटरवर बिल देण्यासाठी
गेला, तेव्हा मंदार म्हणाला,“अरे कपिल दादा, जसा माझा दादा तसा तू. मी कसं बिलघेणार
तुझ्याकडून?”सारंग आणि मंदार ही दोन्ही भावंडं उच्चविद्याविभूषित, सरांची सालस मुलं
शोभत आहेत. हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला. गणिताचा क्लास लावायचा तर तो एम. ए.
डी. सरांचाच. सर्व मुले एवढी आग्रही का? याचं कोडं मला उलगडत गेलं. मुळात सर एक
सज्जन आणि नितळ मनाचा माणूस म्हणून मुलांना परिचित असायचे. उत्तम शिक्षक म्हणून
असलेला अनुभव हा विलक्षण असायचा. गणितासारखा क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने
शिकवण्याची हातोटी, विषय समजावून सांगण्याची खेळकर पद्धत, हसतखेळत शिक्षण
अत्यंत प्रभावी होते. पहिल्या बाकावरच्या विद्यार्थ्यांपासून ते शेवटच्या बाकावर बसलेल्या
विद्यार्थ्याकडे सजगपणे लक्ष देण्याची सरांची पद्धत ही वर्गातल्या सर्वांना शिकवण्याच्या
प्रक्रियेत सामावून घेणारी अशी होती. सरांसमोर सगळेच विद्यार्थी हे समान असत. सर्वांना
सारखाच धाक, सारखाच जिव्हाळा वाटत असे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये गणिताची
गोडी निर्माण झाली. शिकवणे हे गणित विषयापुरते मर्यादित न राहता सरांचे नितळ वागणे,
प्रेमळ स्वभाव, शिस्त, निरपेक्ष दृष्टी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणाची भावना जोपासली
गेली. आपले सर, आपला क्लास असून विनाकारणच्या शिस्तीचं दडपण मुलांना वाटायचं
नाही. सर्व विद्यार्थ्यांना सर आपले वाटायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे काळजी,
26
गणित विषयासंबंधीची तळमळ, चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित
विषयाची गोडी तर निर्माण झालीच, पण आयुष्याचे गणित कसे सोडवायचे हेही कळले.
शिकवणी वर्गात सरांनी हजारो विद्यार्थ्यांची मने जिंकली. कितीतरी विद्यार्थ्यांच्या बोलक्या
प्रतिक्रिया म्हणजे सरांबद्दलचा आदर, कृतज्ञतेचा साक्षात्कार. सरांचा गणित विषयाचा
अभ्यास आणि इतिहास शिकवण्याची विलक्षण शैली प्रभावी असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला
सरांच्या शिकवणी वर्गात प्रवेश घ्यावासा वाटायचा. कधीकधी तर सर्वांना प्रवेश देणे
जागेअभावी अशक्य व्हायचं. प्रवेश देणे शक्य होणार नाही हे सांगणंही सरांना जड जायचं.
सरांच्यापहाटे पाचपासून संध्याकाळपर्यंत सर्व बॅचेस फुल. वर्गातले सर्व विद्यार्थी बाहेर
पडल्याशिवाय सर कधीच वर्गातून बाहेर पडणार नाहीत. घरासारखी काळजी घेणारा क्लास.
धंदेवाईक वृत्तीने सरांनी कधीच क्लासकडे बघितले नाही. त्यांनी हा व्यवसाय अत्यंत निष्ठेने
केला. कितीतरी गरीब हुशार विद्यार्थ्यांना मोफत शिकवलं आणि त्यात कुठलाही आविर्भाव
नव्हता. नेहमी प्रसन्न चित्ताने गणित शिकवताना जणू देवाची भक्तीच. अशा भक्तिभावानं
शेवटच्या क्षणापर्यंत सेवा दिली. सर्व विद्यार्थ्यांना विषय आत्मसात व्हावा हीच तळमळ होती.
प्रत्यक्ष आयुष्याच्या व्यवहारात मात्र त्यांनी कधीही गणिती हिशेब केला नाही. आयुष्यात
देण्याचाच आनंद मिळवला. अर्थात हा एवढा मोठा गोतावळा समर्थपणे पेलला गेला तो
देशपांडे वहिनींमुळेच. विद्यार्थी वर्गाच्या आत शिस्तीत असतात, परंतु वर्गाबाहेर विद्यार्थ्यांचा
वयपरत्वे बेशिस्तपणा सांभाळला तो वहिनींनी. वर्गाबाहेर हे अवघड व्यवस्थापन त्यांनी कसे
सांभाळले मला याचे मला नवल वाटते. शिकवणी वर्गात व्यवस्थापन सांभाळत त्यांनीघराचे
व्यवस्थापनही उत्तमरीत्या सांभाळले. याची प्रचिती मिळाली ती त्यांच्या दोन सद्गुणी
मुलांच्या आणि सुनांच्या रूपात. शाळा, महाविद्यालय शिक्षक कसा असावा याच्या बऱ्याच
दंतकथा रंगवल्या जातात, परंतु इतक्या तळमळीने, तन्मयतेने शिकवणारा शिक्षक एम. ए.
देशपांडेंसारखाच. त्यांनी तन-मन-धनाने नि:स्पृहपणे विद्यादान केले. सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे
नेमके चित्र आचार्य विनोबा भावे यांच्या शब्दांत करता येईल,
शिक्षक विद्यार्थिपरायण । विद्यार्थी शिक्षकपरायण ।
दोघे ज्ञानपरायण । ज्ञान सेवापरायण ।।
असा होता देशपांडे सरांमधला शिक्षक.
{ प्रा. लीला शिंदे, औरंगाबाद
27
मुकुंदायन...
उन्हाळ्याच्या सुट्या संपल्या. शाळा सुरू झाली. आमच्या नववीच्या वर्गात एका नवीन
विद्यार्थ्याने प्रवेश घेतला. मुकुंद देशपांडेशी मित्रत्व झाले आणि लवकरच मुकुंद आम्हा
भावंडांपैकी एक होऊन गेला. आता आमचा वेळ बरोबरच जाऊ लागला. अभ्यास, खेळ
नव्हे, तर जेवण आणि झोपणेही बरोबरच होऊ लागले.
मॅट्रिकनंतर मुकुंदने औरंगाबादला एस.बी. ला आणि मी गव्हर्नमेंट महाविद्यालयात
प्रवेश घेतला. शिक्षण घेताना मुकुंदाला अर्थार्जनासाठी पडेल ते आणि मिळेल ते काम
करून शिक्षण घ्यावे लागले. पुढे त्याने त्यावेळच्या परिस्थितीमुळे गणिताच्या ट्युशन्स घेणे
सुरू केले. तो विद्यार्थी होता त्याच वेळी शिक्षकही होता. अर्थार्जनाचा मार्ग व आवडीचा
विषय असा मार्ग चालत तो बी.एस्सी. झाला. पुढे एम.एस्सी. गणितात तो प्रथम क्रमांकाने
पास होऊन सुवर्णपदकाचा मानकरी झाला. नंतर एस.बी. कॉलेजमध्ये गणिताचा प्राध्यापक
झाला. तो एक हाडाचा शिक्षक होता. कॉलेजमध्ये तो असा शिकवायचा की त्या वर्गाच्या
विद्यार्थ्यांना ट्युशन लावावीच लागू नये. पुढे कित्येक वर्षं अभ्यास करून त्याने पीएच.
डी. मिळवली. तो गणिताचा डॉक्टर झाला. मी त्याला डॉक्टरेट मिळाल्यावर भेटायला
गेलो. त्याच्या पाठीवर थाप मारून, ‘काय डॉक्टर साहेब?”असे म्हणालो. अभिनंदन केले.
दिलखुलास गप्पा मारल्या. खूप खुश झालो. हलाखीच्या झटक्याने त्याच्या मानसिकतेवर
परिणाम झाला. त्यामुळे सतत सोसत राहून लवकर मिळवता होणे हा त्याचा मनोभाव
झाला. त्याच्यामध्ये एक वेगळी प्रतिमा होती‌. तो गणित सोडून इतर कोणत्याही विषयाशी
जोडला गेला असता तरी तो एक विद्वान माणूस बनला असता यात वादच नाही. पण तो
ट्युशनमध्ये अडकला. मुकुंदाला बौद्धिकतेचं देणं लाभलं होतं. तो कोणत्याही विषयात
गेला असता.... साहित्य, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्रे तरी तो प्रथम श्रेणीत प्रथमच
राहिला असता. ट्युशनमध्ये अडकला नसता तर त्याने त्या विषयात स्वतःचे क्षेत्र निर्माण
करून राष्ट्रीय स्तरावरील नावलौकिक मिळवला असता यात अजिबातच संशय नाही.
जेव्हा जेव्हा मी त्याच्याकडे जायचो तेव्हा तेव्हा हा विषय निघायचा. वहिनी पण याबाबतीत
माझ्याशी सहमत असायच्या‌. पण तो इतकेच म्हणायचा, ‘ते जाऊ दे.जे शक्य होते ते झाले.
जे आहे ते असे आहे.”
मुकुंदाचा विद्यार्थी जीवनातील कष्टाचा काळ सोडला तर नंतर सर्व बाबी व्यवस्थित
आणि वेळेवर पार पडल्या. वसुधाताई (आमच्या वहिनीसाब) सारखे व्यक्तिमत्त्व त्याला
28
सर्वार्थाने सहचारी म्हणून मिळाले. ‘फळे रसाळ गोमटी” असे पुत्र अभियंता सारंग आणि
डाॅ. मंदार संसारवेलीवर आली‌. अगोदर पदमपुऱ्यात अमृत ते अमृतवेल या वास्तूत सुखी
व आनंदी संसार झाला. एक दिवस मी त्याच्या नवीन बंगल्यात ‘अमृतवेल’मध्ये गेलो.
मुकुंद म्हणाला, मी ट्युशन बंद केल्या. मी वहिनीसाबकडून त्याची खात्री करून घेतली
आणि म्हणालो, मला हा सोनियाचा दिवस सेलिब्रेट करायचा आहे. वहिनी म्हणाल्या, इथेच
करा. पण मी मुकुंदाला घेऊन आमचे मित्र श्री. प्रकाश कुलकर्णी यांच्याकडे गेलो. त्यांना
बरोबर घेऊन रात्र जागवली‌. फार अभावाने दिसणारा एक गुण मुकुंदमध्ये होता, इतक्या
व्यग्रतेतदेखील त्याला सगळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, सामाजिक, राजकीय घडामोडींची
इत्थंभूत माहिती असे. मी पॉलिटिकल सायन्सचा प्राध्यापक. आम्ही भेटलो की तो अशा
विषयावर चर्चा करत असे. मी म्हणायचो,‘कशाला हे काढतोस? मी यासाठी तुझ्याकडे
येतो का?”मुकुंद म्हणायचा, ‘वेळ थोडा वेगळेपणाने गेला पाहिजे.” तो अशा चर्चेत
आग्रही मते मांडायचा. त्याबद्दल त्याची निश्चित अशी मते होती. त्यांना अत्यंत तार्किकपणे
तो मांडतही असे. मुकुंद खऱ्या अर्थाने देशाचा चांगला नागरिकही होता. नावाबरोबर डिग्री
न लावणे, स्वतःचे राहणीमान साधेसुधे असणे, मनाची संवेदनशीलता या वागणुकीतल्या
अनेक बाबी दैनिक जीवन व्यवहाराचा एक भाग असतात. तेव्हा ती त्या व्यक्तीच्या अंगभूत
मोठेपणाची ग्वाहीच असते. पण अतिजवळिकीत किती ते लक्षात येत नाही. मात्र, त्यामुळे
त्या व्यक्तीच्या महानतेत फरकही पडत नाही. असेच होते मुकुंद देशपांडे....
एकेदिवशी सकाळी मोबाईलची बेल वाजली. माझं सकाळी मौन असतं. मी फोन
उचलत नाही. पण त्यादिवशी उचलला. तिकडून प्रकाश बोलत होता. मी म्हणालो, ‘आज
सकाळी सकाळी आठवण?”म्हणाला, ‘बातमी द्यायची आहे.” ‘अशी काय बातमी
आहे?”आणि त्याने ती बातमी दिली. काही वेळ स्तब्धता... पलीकडे काही सुचलं नाही.
मग मीच म्हणालो,‘याला काय बातमी म्हणतात? खरी आहे का?”तिकडून, ‘तुला
ताबडतोब औरंगाबादला यायचं आहे....”
स्तब्धता आणि अश्रू....
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा... पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा....
बस इतकंच!!!!
{ प्रा. शिवकुमार पिरथानी, कन्नड
29
अभिमान वाटावा असा मित्र....
विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे आवडते एम.ए.डी. सर, पण आमच्या ग्रुपसाठी मुकुंद देशपांडे.
आता फक्त त्याच्या सहवासातील आठवणीच शिल्लक आहेत.
विज्ञान पदवी प्रथम वर्षापासून महाविद्यालयातील तास संपल्यावर आम्हा सर्व
मित्रांचा गणिताचा वर्ग शहागंजातील महात्मा गांधी पुतळ्यामागच्या खोलीत भरायचा.
वर्ग घेणारा, शिकवणारा मुकुंद देशपांडे. महाविद्यालयात गणिताचा जो भाग शिकवला
जायचा, तोच भाग आम्ही मुकुंद देशपांडेकडून समजेपर्यंत, आत्मसात होईपर्यंत
शिकायचो. ज्या वर्गाचे महाविद्यालयात अध्ययन त्याच वर्गाचे अध्यापन यशस्वीरीत्या
अधिक कौशल्याने करण्याची कुवत आणि प्रावीण्य त्याच्या अंगी असल्यामुळे वर्गात
सहज सहाध्यायी आणि घरी मार्गदर्शक, अध्यापक ही दोन्ही नाती एकाच वेळी त्याने
निभावली. हा क्रम एम.एस्सी. पर्यंत चालू होता.
या प्रावीण्यासोबतच वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यातदेखील तेवढ्याच
समर्थपणे मुशाफिरी चालू असे. तो बहुश्रुत असल्यामुळे या सर्व गोष्टी सहजपणे करीत
असे. नाट्याभिनय कलादेखील अंगी असल्याने महाविद्यालयातील नाटकात कामे करून
सकस अभिनयाची कलाही त्याने सर्वांना दाखवून दिली. यासाठी नाट्य क्षेत्रासाठी
आवश्यक असलेली दांडगी, सूक्ष्म निरीक्षण शक्ती त्याच्या अंगी होती. याचा प्रत्यय तो
महाविद्यालयात अध्यापन करीत असताना आला. योग्य पात्रासाठी योग्य व्यक्तीची
निवड. त्या व्यक्तीच्या लकबींचा अभ्यास हे सर्व प्रा. सुहास पानसे सरांनी विदित केले
आहे.
कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आलेल्या सर्व अडथळ्यांना बाजूला
सारून आपल्या निश्चित ध्येयापर्यंत वाटचाल करीत राहणे हा त्याचा स्वभाव आम्ही सर्व
वर्गमित्रांनी अनुभवला आहे. एम.एस्सी.चे सुवर्णपदक त्याचा एक पुरावा आहे.
शिक्षण घेत असताना भावंडांची काळजी घेण्यासाठी त्याने किती कष्ट सोसले, याचे
आम्ही सर्व मित्र साक्षीदार आहोत. याबाबतीत त्याच्या कमालीच्या सहनशीलतेचे जे
दर्शन झाले त्याची तुलना करण्यास शब्द तोकडे पडतात. महाविद्यालयीन जीवनापासून
मुकुंद ज्याच्या पाठीशी पूर्णपणे आधारस्तंभ म्हणून उभा राहिला तो आमचा मित्र कै.
मोहन चिटणीस आज आठवणीपुरताच शिल्लक राहिला याचे दुःख होते.
गणित शिकवणे ही मुकुंदाची अत्यंत आवडीची गोष्ट. हजरजबाबीपणा, कल्पकतेने
30
शिकवण्याची हातोटी आणि कुशल वक्ता असल्यामुळे त्याने परीक्षार्थी न घडवता
विद्यार्थी घडवले. गणिताच्या मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांकडून दृढ करून घेण्यावर
त्याचा जास्त भर असे. या सर्व गोष्टींमुळे तो जीवनभर विद्यार्थ्यांच्या आदराचा, प्रेमाचा
मेरूमणी ठरला.
देशपांडे सरांनी जर शिकवणी वर्ग बंद केले तर त्यांच्या घरासमोर उपोषणाला बसू
आणि वर्ग घेण्यास भाग पाडू, असे विद्यार्थी बोलत असत. त्यामुळे काही व्यावसायिक
प्रतिस्पर्ध्यांची पोटदुखी वाढत असे. दरवर्षी अफवांचे पेव फुटे. एक वर्ष तर मुकुंदाला
असाध्य आजार झाला, अशी अफवा कानावर आली. मी खात्री करण्यासाठी त्याला
घरी भेटायला गेलो. तेव्हा त्याने सांगितले की, दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात मी आजारी
असल्याची अफवा पसरवली जाते. हे नवीन नाही. आता याची मला सवय झाली आहे.
असे म्हणून त्याने ते सहज हसण्यावारी नेले.
स्वतः मेहनतीने केलेल्या अर्थार्जनात इतरांचा, नातेवाइकांचा, समाजातील घटकांचा
देखील वाटा असतो ही त्याची मूलभूत धारणा. परंतु या सहानुभूतीचा गैरफायदाही
इतरांनी घेण्याची संभाव्यता नाकारता येत नाही. याचा त्याला व विशेषतः वहिनींनाही
खूप मनस्ताप झाला असेल. तो त्यांनी न सांगता सहनदेखील केला असेल. अतीव
सहनशीलतेचा तो पुतळाच होता.

{ श्री. विजय सोमठाणकर,


पुणे.
***

31
द्रष्टा शिक्षक...
आम्ही सुयोग कॉलनीत राहायला आलोतेव्हा सुयोग कॉलनी कुठे आहे? असं कोणी
विचारले तर सहज आम्ही सांगायचो,”ते एम.ए.देशपांडे सरांचे क्लासेस आहेत ना,त्या
कॉलनीत!’ लगेच विचारणाऱ्याच्या लक्षात यायचं,इतकी सरांच्या क्लासेसची प्रसिद्धी
होती!!
देशपांडे सरांकडे पाहिले की त्यांचा आदरयुक्त दरारा वाटायचा.आजकाल फार
क्वचित लोकांविषयी असा दरारा वाटतो. माझे वडीलही अतिशय तत्त्वनिष्ठ शिक्षक होते.
त्यांचाही गणित, फिजिक्स हा विषय होता, त्यामुळे नकळत मी देशपांडे सरांमध्ये माझ्या
वडिलांना शोधू लागले. कधी मला त्यांच्याशी जास्त बोलण्याची वेळ आली नाही,पण
कधी ते बाहेर दिसले की त्यांच्याविषयी अपार आदर वाटायचा.
औरंगाबादमध्ये त्यांचे क्लासेस सुरू होते तेव्हा शहरात प्रायव्हेट ट्युशन क्लासेस
सुरू होतेच. मग अशी काय विशेष गोष्ट होती की मुलांचा ओढा केवळ गणितासाठी
सरांच्या क्लासेसमध्ये यायचा होता!! मी तर गणिताची विद्यार्थिनीही नाही, पण
गणितासारखा गहन, कठीण विषय क्लासमधल्या सर्वच मुलांच्या सहजतेने गळी
उतरवण्याचेजे कौशल्य सरांमध्ये होते,ते अद्वितीय!! मला नाही वाटत,त्यांनी शिकवताना
भेदभाव केला असेल!! ते तर मुलांना “अनंतहस्ते कमलावराने..’ देण्यास सज्ज होते.
ज्या मुलांनी भक्तिभावाने घेतलं,ते आज त्यांच्या नावाची ध्वजा केवळ देशातच नाही,तर
जगभर फडकवत आहेत!!
माझा कॉलेजला जाण्यायेण्याचा रस्ता देशपांडे सरांच्या घरावरूनच असायचा.
कधीकधी सरांचं शिकवणं रस्त्यावरून जाताना ऐकू यायचं.आणि कधीकधी ते छानपैकी
गाण्यात काही शिकवत असायचे!! मी मनोमन त्यांच्यातील शिक्षकाला प्रणाम करायचे!!
किती भाग्यवान आहेत सरांचे विद्यार्थी, ज्यांना गणित हा रुक्ष विषय न वाटता हवाहवासा
वाटतोय,ते केवळ सरांमुळे!
माझ्या मुलीला सरांकडे शिकता आले याचा तिला आणि मलाही अभिमान वाटतो.
कारण ही ट्युशन केवळ मार्कांसाठी नव्हती,तर तिला नकळत आदर्श जीवनमूल्ये एका
समृद्ध शिक्षकाकडून मिळणार होती, जी तिला आयुष्यभर मार्गदर्शक ठरतील.
म्हणूनच देशपांडे सरांचं वेगळेपण हे उठून दिसतं. शिक्षकी पेशाच्या नावाखाली
अनेक वाईट पायंडेही सहजतेने पाडणारे अनेक शिक्षक मी पाहते. तेव्हा देशपांडे सरांचं
32
द्रष्टेपण अधोरेखित केल्याशिवाय राहावत नाही.मनाशी पक्की खूणगाठ बांधून,शिक्षक
म्हणून जर कधी चुकीची गोष्ट करायची वेळ आलीच तर अशावेळी आपल्या
आयुष्यातील तत्त्वनिष्ठ शिक्षकांना आठवावं. ज्यामध्ये एम.ए.देशपांडे सर अग्रभागी
असतील आणि ते दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतील आणि आपण निश्चिंत होऊ!

{ प्रा. दीपा विवेक खेकाळे


देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद.

***

प्रा. डॉ. सोमय्या, प्रा. कोरान्ने आणि गणित विभागातील इतर सहकारी
प्राध्यापकांसोबत… स.भु. विज्ञान महाविद्यालय.

33
अमृतपुत्र प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे
बेचाळीस वर्षांपूर्वीचा हिवाळा. वासरमणी आपला कार्यभार निशादेवीकडे सोपवून
अंतर्धान पावला. सायंभ्रमण करताना अकल्पितपणे सुयोग कॉलनीकडे वळलो.
डावीकडच्या शेतात काजव्यांचे ताटवे चमचमत होते. पुढे गेल्यावर गच्चीवरून अमृतपुत्र
मुकुंदगुरूंची रसना गणित स्रवत होती. तळमजल्यावर आपल्या पंचवर्षीय सुपुत्रास
खेळवत असणाऱ्या सरांच्या सहधर्मचारिणी सुहास्यवदना सौ. वसूताई होत्या. नयन व
श्रवण दोन्हीही तृप्त झाले. बाळाशी खेळताना मनही प्रफुल्लित झाले.
इ. स. १९७१ मध्ये श्री सरस्वती भुवन महाविद्यालय, औरंगाबाद येथे मराठवाड्यातील
गणित शिक्षकांसाठी उद्बोधन शिबिर आयोजित केले होते. तेथे मा. देशपांडे सर एक
मार्गदर्शक, तर मी एक शिबिरार्थी होतो. मार्गदर्शकांत सर वयाने लहान होते; मात्र
बरेच शिबिरार्थी सरांपेक्षा वयाने मोठे होते. सर्व शिबिरार्थी इ. ८ वी ते ११ वी या वर्गांना
शिकवण्याचा ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभवी असे गणित विषयातील प्रशिक्षित पदवीधर होते.
काहींनी पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलेले होते. सदर शिबिराचे छायाचित्र सोबत जोडले
असून त्यात सर उजवीकडून दुसऱ्या खुर्चीवर असून मी शेवटच्या रांगेत डावीकडून
तिसरा आहे.
एक महिना कार्यकालाच्या या शिबिरात दररोज सरांचा एक तास असे.
अध्यापनाचा घटक पूर्णपणे अभ्यासून अत्यंत सोप्या पद्धतीने ते शिकवीत. समधानपूर्वक
शंकानिरसनही करीत. सर्वांना आपलेसे करण्याचा स्वभाव, सभ्यता, विनयशीलता तसेच
आदरपूर्वक वागविण्याची पद्धत यामुळे सरांची छाप पडली ती कायमचीच.
सर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खासगी शिकवणी वर्ग चालवीत, ते त्यांना
गणितात पारंगत करण्याच्या ध्यासानेच! होतकरू गरीब विद्यार्थ्यांना ते वर्ग फीमध्ये
सवलत देत. परिणामी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांचे गणिताचे निकाल उंचावले. आज
सर्वदूर त्यांचे हजारो विद्यार्थी आहेत. गणित विषय घेण्याऱ्या श्री. शारदा मंदिरच्या गुणवंत
विद्यार्थिनी सरांच्या शिकवणी वर्गात असत. इ. स. १९७९ पासून पुढे २७ वर्षे सरांच्या
शेजारी राहण्याचे भाग्य मला लाभले.
“सद्वर्तनं च विद्वत्ता तथाध्यापनकौशलम् ।
शिष्याप्रियत्वमेतद्धि गुरोर्गुणचतुष्टयम्” ।।
अशा सरांचे अध्यापन मी घरून तसेच जाता येता जाणीवपूर्वक ऐकत असे. त्यामुळे
34
इ. स. १९५९ पूर्वी मी शिकलेल्या महाविद्यालयीन गणिताची उजळणी होई. सरांच्या
अध्यापनात वक्तशीरपणा, निश्चय, जिद्द, चिकाटी, कटिबद्धता, शिस्त आणि उत्तम
वर्गनियंत्रण असे. गणिताचे अध्यापन हेच त्यांनी जीवनाचे सर्वस्व ठरविले. ते सर्व घटक
शिकवीत. आधल्या रात्रीच पुढील दिवशी शिकविण्यासाठीचे फलक लेखन ते करीत.
कालानुसार त्यांनी त्यांच्या मोठ्या सूनबाईला अध्यापनासाठी तयार केले. शेवटी शेवटी
त्या उत्तमप्रकारे वर्ग घेऊ लागल्या तेव्हाही सर पूर्णवेळ वर्गात थांबत आणि विद्यार्थ्यांचे
शंकानिरसन करत. दरवर्षी शिकवणी वर्गाच्या सुरुवातीला प्रवेशासाठी काही दिवस सौ.
वसूताईंचे पिताश्री त्यांच्या सर्वतोपरी मदतीला येत, तर त्यांचट्या मातोश्री स्वयंपाकघर
सांभाळीत. सर्वांचा स्वभाव इतका चांगला की सरांकडे त्यांचे सर्व नातेवाईक आणि मित्र
यांचा सतत वावर असे. आमची सरांच्या सर्व नातलगांशी मैत्री झाली.
सरांच्या घरातील स्त्रीकर्मचाऱ्यांसह त्यांच्याही कुटुंबातील जास्तीतजास्त घटकांना
काम देऊन प्रसंगी जास्तीची आर्थिक मदत करून सरांनी त्यांचे संसार सावरले ही
उल्लेखनीय बाब आहे. अंकशास्त्रातील “कापरेकर स्थिरांकाचे संशोधक” मा. कापरेकर
यांचे सप्रयोग व्याख्यान श्री शारदा मंदिर व नंतर श्री स. भु. महाविद्यालयात झाले. त्यानंतर
ते मा. कापरेकरांना भोजनासाठी सर घरी घेऊन आले. “गुणि गुणं वेत्ति”।
श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेतील इ. १० वीच्या प्रथम सत्र परीक्षेत गणितातील
अनुत्तीर्ण मुलींचा शालांत परीक्षेत १००% निकाल लावण्या संबधीच्या माझ्या यशस्वी
व प्रथम परितोषिकप्राप्त कृती संशोधन प्रकल्पाचे सर मार्गदर्शक होते. हे त्यांचे अनंत
उपकार! माझ्या एकमेव चिरंजीवाचा उपनयन संस्कार करावयाचा होता. कार्यक्रमासाठी
कोठेही सहज कार्यालय, आचारी, सेवकवर्ग उपलब्ध होत नव्हते. तेव्हा सर व मी असे
परस्पर सहकार्याने आपापल्या चिरंजीवांचे उपनयन संस्कार सलग दोन दिवसांत क्रमाने
पार पाडले.
सरांच्या स्मृतीस नतमस्तक होऊन ही श्रद्धांजली.
{ उमेश बळवंत विटेकर,
से. नि. उपमुख्याध्यापक,
श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद.
***
35
श्री श्री गुरु शरणम् । मुकुंद कृपाही केवलम्।।
माझे प्रिय सन्मित्र मुकुंद देशपांडे यांचा प्रथम स्मृतिदिन हा शब्दरूपाने संग्रहित होत
आहे, हे समजताच त्यांच्याविषयी मनही उचंबळून आले. मनातले भाव व्यक्त करायला
शब्द अपुरे पडतात. परंतु भाव व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही म्हणून हा दुबळा प्रयत्न.
मुकुंद देशपांडेविषयी १९६२ मध्ये प्रथम मी तेव्हाच्या वर्गमित्राकडून ऐकले. तेव्हाच
मनामध्ये कुतूहल जागे झाले. कारण मी १९६२ मध्ये कन्नड सोडले होते. तेव्हा हे कन्नड
येथे त्यांच्या बंधूंसह शिक्षणास स्थायिक झाले. एक अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धी असलेला
विद्यार्थी उदयास आला. पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येथील सरस्वती भुवन
महाविद्यालयात १९६७ साली माझी प्रथम भेट झाली. तेव्हापासूनच माझ्या जीवनाला
दिशा मिळाली. गणित हा विषय त्यांचा अत्यंत आवडीचा. त्याच दरम्यान शहागंज येथील
महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक खोली घेऊन ज्ञानार्जन तसेच ज्ञानदान दोन्ही एकाच
वेळी सुरू झाले. ज्या वर्गात शिकायचे त्याच वर्गाची गणिताची ट्युशन घ्यायचे. परिस्थिती
अनुकूल नव्हती, परंतु जिद्द आणि ध्येयप्राप्तीसाठी सतत प्रयत्न. याच दरम्यान त्यांच्या व
माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये जवळचे नाते निर्माण झाले. यामुळे ते आमच्याशी
समरस झाले. १९६९ मध्ये बी.एस्सी. आम्ही दोघेही उत्तीर्ण झालो. माझे पुढील शिक्षण
थांबले, परंतु त्यांनी पुढील शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घेतला.
१९७१ मध्ये एमएस्सी गणित परीक्षेत प्रथम श्रेणीत प्रथम घेऊन सुवर्णपदकाचे मानकरी
ठरले. दीक्षांत समारोहात त्यांना सुवर्णपदक श्री. अलीयावरजंग तसंच कुलगुरूआर. पी.
नाथ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मुकुंद देशपांडे यांची राहणी अत्यंत साधी. पदक
स्वीकारण्यास ते शर्ट व पायजमा घालूनच स्टेजवर गेले.
पुढे त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांना सरस्वती भुवन महाविद्यालयाततेव्हाचे सरचिटणीस
श्री. गोविंदभाई श्राॅफ यांनी गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरीची ऑफर दिली व
ते महाविद्यालयात रुजू झाले. या कॉलेजमध्ये त्यांची प्रतिभा अधिकच उजळून निघाली.
गणित विषयात ते अत्यंत लोकप्रिय प्राध्यापक झाले. गणित विषय म्हटला की प्रा. मुकुंद
देशपांडे असे समीकरण तयार झाले. सर्वांच्या कल्याणाची चिंता करणारे प्रेमळ, निर्मोही
व कुठलाही अहंकार नाही. कौटुंबिक, सामाजिक व शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शन करणारा
माणूस प्रा. मुकुंद देशपांडे.
स्वदेशे पूज्यते राजा | विद्वान सर्वत्र पूज्यते ||
36
या उक्तीप्रमाणे सदा सर्वत्र पूज्यते, असे तेजोवलय निर्माण झाले. देशपांडे म्हणजे
ज्ञान, परिश्रम व विद्यादान यांची त्रिवेणीच होय. ज्या क्षेत्रात पाऊल टाकले त्यात त्यांनी
पूर्णत्व प्राप्त केले. इंग्रजी विषयाच्या एका प्राध्यापकाचे मत आहे, Let the bassel be
burnt I shall reproduce it. याप्रमाणेच त्यांचे गणित विषयाचे ज्ञान होते. गणित हा
विषय म्हणजे अवघड, क्लिष्ट अशी विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती त्यांनी अत्यंत
सोप्या साध्या सरळ पद्धतीने गणित शिकवून दूर केली. याच दरम्यान त्यांनी गणित
विषयात पीएच.डी. प्राप्त केली वते डॉ. मुकुंद देशपांडे म्हणून परिचित झाले. हा त्यांचा
एक प्रकारे सन्मानच आहे.
आम्ही दोघेही एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमांत तसेच सुखदुःखात सहभागी
होतो. यथावकाश त्यांचे लग्न झाले. संसार सुखावह सुरू झाला. ते सपत्नीक स.भु.
कॉलनीत राहावयास आले. लग्नसोहळ्यात आमचे सर्व कुटुंबीय सहभागी होते. कौटुंबिक
जिव्हाळा व प्रेमापोटी ते दरवर्षी दीपावलीत भाऊबीजेस आमच्या आईकडून औक्षण
करून घेत. तेव्हापासूनच आमचं नवीन नातं मामा म्हणून प्रचलित झालं.
मी राजेराय टाकळी (ता. खुलताबाद) येथे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत
होतो. अचानक दि. ६ एप्रिल १९७२ रोजी घरी निरोप आला की, सात तारखेला सकाळी
नऊ वाजता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा क्रांतीचौक येथे रुजू व्हावे. तेव्हा टेलिफोन
किंवा इतर सुविधा उपलब्ध नव्हती. त्याच रात्री मुकुंद देशपांडे व माझे बंधू विलास पुरंदरे
ऑटो रिक्षा घेऊन आले. याद्वारे औरंगाबाद येथे सकाळीच येऊन बँकेत हजर झालो. ती
माझ्या जीवनातील अलौकिक घटना होती. त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन.
त्यांचेही नवीन घरात, सुयोग कॉलनी, पदमपुरा येथे आगमन झाले. यथावकाश त्यांना
चि. सारंग व चि. मंदार अशी पुत्ररत्ने प्राप्त झाली. त्यांच्या उपनयन संस्कार दि. १/३/८७
रोजी, त्यांच्या निवासस्थानी, सर्व मित्र मंडळींसह, कुटुंबीयांसह संपन्न झाला. त्यांच्या
वैवाहिक जीवनात वसुधा वहिनींचे योगदान त्यांच्या वैभवास निश्चित कारणीभूत आहे.
कुटुंबातील बंधू-भगिनी, त्यांच्या सुखदुःखात यथायोग्य कर्तव्य पार पाडली. त्यांचे वडील
(बाबा) त्यांच्या पितृभक्ती व देवतुल्य सेवेमुळे अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्याकडेच
वास्तव्यास होते.
काही वर्षांनंतर सरस्वती भुवन महाविद्यालयामधून राजीनामा देऊन सकाळ व
37
संध्याकाळ गणिताची ट्युशन आपल्या निवासस्थानी सुरू केली. त्यास प्रचंड संख्येने
विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. आजपावेतो हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
त्यांनी तर गणित क्षेत्रात देदीप्यमान इतिहास घडविला. दरम्यान, चिरंजीव सारंग, चिरंजीव
मंदार यांचे लग्नकार्य होऊन तेआपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले.
देशपांडे सरांचा नोकरीतही एकयशस्वी, प्रामाणिक, सदाचारी प्राध्यापक असा
नावलौकिक होता. तेशिस्तप्रिय होतेव वेळेचे बंधन पाळीत असत. त्यांनी वेळेचा योग्य
उपयोग करून घेतला. विद्यार्थी वर्गाचा आत्मविश्वास वाढवण्यात त्यांचा हातखंडा. या
ज्ञानदानामुळे अनेक विद्यार्थी आपले जन्मभर ऋणी झाले आहेत. अव्याहत ज्ञानदानामुळे
त्यांचे प्रकृती स्वास्थ्य त्यांना अनुकूल नव्हते. त्यांनी या कार्यातून निवृत्ती स्वीकारावी, असे
सर्व आप्तस्वकीयांचे व आम्हा मित्र मंडळींचे त्यांना आग्रहाचे सांगणे होते. परंतु ते सदैव
कार्यमग्न होते. त्यातच विविध आजारांमुळे त्यांची जीवन-मरणाशी झुंज चालू होती. या
परिस्थितीत पण एक दिवस शिवकुमार पिरथानी यांना घेऊन ते माझ्याकडे आले. बाहेर
एकत्र जेवण केले व संपूर्ण कालखंड आमच्या समोर उभा केला. मनमोकळ्या गप्पा
झाल्या. शांत व प्रसन्न मनाची अनुभूती त्या वेळेला आली.
एके दिवशी आम्ही उभयता त्यांच्या भेटीला गेलो होतो. आनंदी भाव प्रसन्न चेहऱ्यावर
प्रकट झाले. बराच वेळ होतो. तोपर्यंत जीवनातील चढ-उतार याविषयी तसेच आजारी
असण्याचे भाव जागृत होऊ दिले नाहीत. पण काळ जवळ आला होता. अखेर प्राणज्योत
मालवली व एका उत्तुंग व्यक्तीची अखेर झाली. कुटुंबीयांनी शेवटपर्यंत भरपूर प्रयत्न
केले, परंतु नियतीला ते मान्य नव्हते. त्यांच्या अकाली जाण्याने अमृतवेल वास्तू पोरकी
झाली आहे. लिहावे तितके थोडेच आहे, परंतु शब्द मर्यादा असल्यामुळे माझी लेखणी
येथेच थांबवतो.
त्यांच्या प्रथम स्मृतीनिमित्ताने आमच्या सर्व कुटुंबीयांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन.
प्राध्यापक मुकुंद देशपांडे यांचे काही विशेष
१. धैर्य हीच जीवनाची कला.
२. सन्मान मिळण्याीपेक्षा सन्मा्नास पात्र असणे
३. चेहऱ्यावरील प्रसन्नता व वाणीतील गोडवा
४. पूर्वपुण्याई, आई-वडिलांचे आशीर्वाद व संस्कार यामुळे विनम्र,
38
निर्भय, सरळ स्वभाव. मदत करण्याची तयारी. सत्याची अत्यंत आवड. त्यामुळे
त्यांचे वैचारिक जीवन समृद्ध झाले.
५. ज्ञानाचे प्रखर तेज चेहऱ्यावर विलसत असे. त्यांच्यासमोर गेल्यावर
शरणागत. दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती.
६. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची अमौलिक मदत
गाजावाजा न करता केली.
७. माउलींच्या शब्दांत स्वभाव अत्यंत प्रेमळ व कष्टाळू.
तैसे साच मवाळ । मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ।

{ प्रकाश अनंतराव कुलकर्णी


औरंगाबाद

***

39
मराठवाडा भूषण
माझ्या लोकसभा मतदारसंघातील रहिवासी असलेले, मराठवाड्यातील प्रसिद्ध
गणित शिक्षक प्रा. डॉ. मुकुंद अमृत देशपांडे (वय एकाहत्तर वर्षे) यांचे दिनांक १४
ऑक्टोबर २०१९ रोजी दीर्घ आजाराने पुणे येथे निधन झाले.
ते मूळचे धावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील रहिवासी होते. एका
गरीब कुटुंबात जन्म घेतलेले कै. प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे सर यांनी हलाखीच्या परिस्थितीत
प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. गणित हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने पाचवीच्या
वर्गात शिकतानापासून त्यांनी गणिताचे शिकवणी वर्गघेत आपले शिक्षण पूर्ण केले. दहावी
व बारावीमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. गणित विषयातून एम.एस्सी. केल्यानंतर
त्यांनी पीएच.डी. केले. गणिताचे डॉक्टरम्हणून ते मराठवाड्यासह राज्यभर प्रसिद्ध होते.
सरस्वती भुवन महाविद्यालयात गणित विषयाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ
काम केले. गणित विषयाची शिकवणी घेताना त्यांनी हजारो गरजू विद्यार्थ्यांना मदत केली.
कै. देशपांडे सर यांच्याकडून अनेकांना शिष्यवृत्ती दिली जात होती. स्वेच्छानिवृत्तीनंतर
त्यांनी काही काळ वाल्मीमध्ये वर्ग एकचे अधिकारी म्हणून नोकरी केली होती.
प्रा. डॉ. मुकुंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रा. डॉ. मुकुंद अमृत देशपांडे स्मृतिग्रंथ
समितीतर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या स्मृतिग्रंथास माझ्यातर्फे शुभेच्छा.

{ रावसाहेब दानवे पाटील


खासदार, लोकसभा

***

40
प्रा. मुकुंद अमृत देशपांडे : गरिबांचे सामान्य विद्यार्थ्यांचे आधारवड
प्रा. मुकुंदजी अमृत देशपांडे यांच्या स्मृतीस कोटी कोटी वंदन. स्मृतीस अभिवादन !!
सामाजिकभावनेतून, विद्यार्थ्यांना शिक्षकी पेशाच्या माध्यमातून गणितासारखा
अवघड विषय सोप्या भाषेत शिकवून देशाची भावी पिढी घडवण्याचे पुण्याचे काम त्यांनी
केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना कधीही विसरू शकत नाही. विसरणेसुद्धा शक्य नाही.
सतत शिक्षणाची, समाजाला समाजसेवेची प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व.
भोकरदन तालुक्यात धावड्यासारख्या गावात गरीब कुटुंबात जन्म घेतल्यानंतर
या बिकट परिस्थितीतून ते शिकले व मोठे झाले. त्याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच
गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या त्यांनी कुठलीही फी न घेता मोफत शिकवण्या
घेतल्या. त्यांनी स्वतः शिक्षणात उंच भरारी घेतली. एमस्सी. गोल्ड मेडलिस्ट, गणितात
पीएचडी पदवी घेतली. संभाजीनगरच्या नामांकित सरस्वती भुवनसारख्या शिक्षण संस्थेत
प्राध्यापक म्हणून त्यांची कामगिरी म्हणजे संभाजीनगरच्या शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचात
मानाचा तुरा.
त्यांचे एक सुपुत्र डॉ. मंदार देशपांडे, वैद्यकीय सेवेत लहान मुलांचे डॉक्टर म्हणून
आज जी सेवा देण्याचे काम करतात, ती खऱ्या अर्थाने त्यांनी समाजाला आदर्श पुत्राच्या
रूपाने दिलेली ही देण आहे. एक संस्कारित कुटुंब, वैभवशाली कुटुंबाला घडवणारे
व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. मुकुंद देशपांडे.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत असताना त्यांची प्रेरणा, त्यांचे शिक्षण
क्षेत्रातील महानकार्य, त्यांनी दाखवलेला समाजसेवेच्या मार्गाने आपण सर्वजण पुढे
जाऊया. हाच संकल्प त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने.
धन्यवाद !!

{ नंदकुमार घोडेले
माजी महापौर, औरंगाबाद

***

41
माझ्या आठवणीतील गणित महर्षी प्रा. डाॅ. मुकुंद देशपांडे यांना मानाचा मुजरा!!
पदमपुरा येथील सुयोग काॅलनी येथे राहून सरांनी, ‘माणसाचा भूतकाळ पाहू नका,
भविष्याचा काय विचार करता, तर वर्तमानात जगा. आपल्याशी कोण कसं वागतं
हेही पाहून नका. वेळ, प्रसंग पाहून प्रत्येकासाठी आपलं मन चांगलंच ठेवा, जीवन
आपोआपच सुंदर होईल.’ हा संदेश सर्व विद्यार्थ्यांना दिला. सरांकडे शिकणाऱ्या सर्व
विद्यार्थ्यांचे जीवनच सरांनी बदलून टाकले. लहानपणापासून गणिताची आवड स्वतःसह
सर्वांच्याच मनात निर्माण केली.
सरांमुळे पदमपुरा भागाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली, याचा मला
खूपच अभिमान वाटतो. फक्त गणितच शिकवण्याचे काम सरांनी केले नाही, तर
विद्यार्थी घडवण्याचे कामही केले. सरांचे विद्यार्थी कोणी ङॉक्टर, कोणी वकील,
कोणी इंजिनिअर, कोणी सीए, तर कोणी प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्याचबरोबर त्यांनी
महाराष्ट्राची शान, कर्तव्याची जाण, सामान्यांचे कैवारी, सर्वांची प्रेरणा व संकटाची ढाल
बाल रोगत डाॅ. मंदार देशपांडें सारखा कोहिनूर हिरा या शहराला दिला. याचा सार्थ
अभिमान माझ्यासह संपूर्ण शहरवासीयांना आहे.
आपल्या पवित्र स्मृतिदिनानिमित्त माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे भावपूर्ण
आदरांजली.

{गजानन बारवाल
माजी महापौर व नगरसेवक, औरंगाबाद

***

42
सर की भाऊजी…
ऋषितुल्य गुरू एमएडी सरांच्या आठवणीत रमताना मला थेट माझं लहानपण
आठवतं. माझं लहानपण पैठणला गेले. आमच्या घरासमोरच कै. ॲड. आत्मारामपंत
देशमुख यांचं घर होतं. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा म्हणजे आत्ताचे पुण्याचे आरोग्य
संचालक डॉ. संजय देशमुख. संजू आणि मी पहिली-दुसरीपासूनचे वर्गमित्र. त्यावेळी
रोवलेल्या आमच्या मैत्रीच्या बीजाचं रूपांतर आता मोठ्या वटवृक्षात झाले आहे.
अभ्यासाच्या बाबतीत आमच्या दोघांमध्ये निकोप स्पर्धा असायची. त्या स्पर्धेने आमच्या
दोघांचाही खूप फायदा झाला.
परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या दोन्ही कुटुंबांत खूप आपुलकी
आणि प्रेम होतं. त्यांच्या देशमुखांच्या घरात संजू सर्व भावंडांत धाकटा, तर आमच्या
घरात मी सर्व भावंडांमध्ये मोठा होतो. दोन्ही मोठ्या बहिणींना आणि भावाला पाहून मला
ते माझेसुद्धा ताई आणि अण्णा वाटू लागले आणि त्यांनीही मलासुद्धा संजूइतकंच प्रेम
दिलं. दोन्ही ताई खुप सुंदर आणि प्रेमळ. वसूताईचा आम्हाला खुप अभिमान वाटायचा.
ती कॉलेजला जायची. ती मोठी असल्याने साहजिकच तिचं लग्न आधी झालं आणि
मुकुंदराव देशपांडे यांचा भाऊजींचा रूपात आम्हाला परिचय झाला. त्यावेळी मी आणि
संजू दोघेही लहान होतो. मुकुंदराव हे एक हसतमुख, रुबाबदार, थोडंसं मितभाषी
व्यक्तिमत्त्व. ते आम्हाला खूप आवडायचे. ते पैठणला आले की देशमुखांच्या घरात
आणि पर्यायानं आमच्या घरात उत्साहाचं वातावरण असायचं. आमच्या दोन्ही कुटुंबांत
प्रेम असल्यामुळे आमच्या घरीही ते यायचे. त्यावेळी मला आणि संजूला दोघांनाही
कल्पना नव्हती की पुढे त्यांच्याशी आमचा संबंध गुरू-शिष्याच्या नात्यातून येईल.
अकरावीनंतर आम्ही दोघांनी बारावीकरिता औरंगाबादला स. भु. विज्ञान
महाविद्यालयात प्रवेश घेतला. कदाचित या निर्णयापाठीसुद्धा तेच असावेत. त्यावेळी
एमएडी सरांकडून गणित शिकण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यांची गणित
शिकवण्याची हातोटी अशी होती की त्यांना हाडाचे गणिताचे शिक्षक असंच म्हणावं
लागेल. त्या काळच्या रिवाजाप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गणिताची शिकवणी लावली.
त्यावेळी ते समर्थनगरमध्ये राहायचे आणि त्यांच्या घरासमोरच असलेल्या मोनालिसा
ब्यूटी पार्लर शेजारी त्यांचे शिकवणीचे वर्ग असायचे. मला तर त्यांना सर म्हणावे की
भाऊजी म्हणावे, असा प्रश्न पडायचा. परंतु बहुतेक त्यांना असा काही प्रश्न पडत नसावा.
43
कारण त्यांच्या दृष्टीने सगळे विद्यार्थी सारखेच होते. सगळ्यांनाच ते तेवढ्याच तन्मयतेने
आणि शांतपणे, सोप्या भाषेत शिकवायचे. मेहुणे म्हणून आमच्या दोघांचेही त्यांनी विशेष
लाड केले नाहीत. त्यांच्याकरिता त्यांचा शिक्षकी पेशा हीच प्राथमिकता होती, हे आजही
अभिमानाने सांगावेसे वाटते .
त्यांच्या अध्यापनामुळेच आम्ही आमच्या आयुष्यात यशाचे शिखर गाठू शकलो.
योगायोगाने माझी पत्नी ॲडव्होकेट सौ. नीलिमा हीसुद्धा त्यांचीच विद्यार्थिनी. सर
आवर्जून त्याचा उल्लेख करायचे.त्यांच्या घरी गेल्यावर मात्र ते फक्त भाऊजी असायचे.
तेथे त्यांच्या विनोदी स्वभावाची प्रचिती यायची. त्यांच्याशी कधी सरळसरळ संगीताबद्दल
चर्चा झाली नाही, पण त्यांना संगीतात रुची होती हे मी छातीठोकपणे सांगू शकतो.
कारण त्यांच्या पदमपुऱ्यातल्या घरात मी रेकॉर्डप्लेअरवर सुमधुर गाणी ऐकलेली आहेत.
हेमंतकुमारची गाणी मी पहिल्यांदा त्यांच्याकडेच ऐकली. त्यांच्याकडच्या त्यावेळच्या
गाण्यांच्या रेकॉर्ड आठवल्या तर त्यांच्या रसिकतेची कल्पना येईल. त्यांच्या कार्यमग्नतेचा
आणि संगीताच्या आवडीचा वारसा सारंग आणि मंदार यांनी पुढे चालवला आहे याबद्दल
त्यांचं कौतुक वाटतं .
मधुमेहामुळे त्यांची प्रकृती शेवटी ढासळत गेली, पण तरीही विद्वत्तेचं तेज त्यांच्या
चेहऱ्यावरून शेवटपर्यंत तसूभरही कमी झालं नाही. सर म्हणावं की भाऊजी, हा प्रश्न
जरी मला शेवटपर्यंत सुटला नाही तरी मला सर म्हणून त्यांचा कायम आदर वाटायचा तर
आमचे विद्वान भाऊजी म्हणून अभिमान.
त्यांचं आयुष्य नेहमीच विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील.

{ डॉ. अनंत कडेठाणकर


औरंगाबाद

***

44
गुरु परमात्मा परेशु
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्यांचा दृढविश्वासू ।।
आई-बाबांनी जन्म दिला, पालनपोषण केले. या देहाला लहानाचं मोठं करण्यात
त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. म्हणूनच ते माझ्या आयुष्यात निर्विवाद अग्रस्थानी
आहेत. आई-वडिलांसारखीच आणखी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप मोलाची आहे,
ती व्यक्ती म्हणजे माझे “गुरू’. आई-बाबा देह देतात, पण देहातल्या मनाची मशागत
करण्याचं मोलाचं काम नि:स्वार्थपणे माझ्या गुरुजींनी केले.
आमचं सामान्य शेतकरी कुटुंब. हलाखीची नाजूक आर्थिक परिस्थिती असली
तरी त्यातही आम्ही खूप समाधानी होतो. कारण आहे त्यात समाधान मानायची आमची
प्रवृत्ती होती.असेते दिवस जात होते. शिकत होतो, पण कुठलंच ध्येय न बाळगता. माझं
शिकणं व जगणं सुरू होतं. भविष्याचा पुसटसा विचारही नव्हता. अशावेळी आयुष्याची
पाऊलवाट तुडवताना अनेक वळणावर लाभलेल्या गुरुजींनी मला स्वप्ने पाहण्याचे व ते
कसे साकार करायचे हे शिकवले.
मी ज्या संस्कृतींत वाढलो, ती संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे असं मी मानतो. ती सर्वश्रेष्ठ
होण्यास अनेक कारणे असली तरी “गुरू’ हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण! अगदी प्राचीन
काळापासून वाल्मीकी,व्यास, सांदिपानी, द्रोणाचार्य यांनी गुरू-शिष्यांच्या नात्यातली
ही परंपरा समृद्ध केली. माझ्या गुरूंनी मला घडवले. त्या सर्वांच्या आठवणी मी माझ्या
मनाच्या एका खास कोपऱ्यात पिपंळपानासारख्या जतन केल्या आहेत.
१९८८-९० चा तो काळ. माझ्या आयुष्याला वळण देणारा कालखंड. म्हणून तो
आजही अगदी जसाच्या तसा माझ्या स्मरणात आहे. दहावी बीडला झाल्यानंतर मला
अकरावीला औरंगाबाद येथील देवगिरी काॅलेजमध्ये शिकण्यासाठी ठेवण्यात आले. तेव्हा
मी देवगिरी काॅलेजच्याच वसतिगृहावर राहत असे. गणित माझ्या आवडीचा विषय होता.
दहावीला मला गणितात १५० पैकी १४८ गुण मिळाले होते. डाॅक्टर होण्याचं स्वप्न उराशी
बाळगले होते. त्यामुळे गणिताचा माफक अभ्यास केला होता. काॅलेजव्यतिरिक्त कोचिंग
क्लासही लावले होते.
बारावीला असताना संस्थाचालकांनी अचानक कोचिंग क्लास चालवण्यास मज्जाव
केला. काॅलेजात “फॅकल्टी इंप्रूव्हमेंट क्लासेस’ सुरू करण्यात आले. प्रा. कोठुळे सर व
प्रा. चंद्रकांत गायकवाड सर यांनी आमच्यावर प्रचंड मेहनत घेतली, पण बायोलाॅजी ग्रुप
45
असल्याने मी गणिताचा फारसा अभ्यास केला नाही. प्रथमसत्र परीक्षेत मला खूपच कमी
मार्क्स मिळाले. माझ्या मनात नापास होण्याची भीती दाटली होती. वेळ तर फार कमी
राहिला होता. काय करावे ते सुचत नव्हते. मन सैरभैर झाले होते.तेव्हा माझ्या एका मित्राने
मला होस्टेलपासून जवळच पदमपुरा येथील मुकुंद देशपांडे सरांकडे, ते माझा प्राॅब्लेम
सोडवतील म्हणून नेले.
त्यांच्यासमोर मला नीट बोलताही येत नव्हते. माझ्या मनाला माझीच लाज होती.
सरांनी मात्र ते अचूक हेरले. मला त्यांनी जवळ घेतले आणि “तुझे गणित मी सोडवतो’,
असं हसत ते म्हणाले अन् त्यांनी मला लगेच दुसऱ्या दिवशीपासून यायला सांगितले.
भल्या पहाटे क्लास असायचा. उठायला उशीर होत असे. धावपळ होई. सरांची मुद्रा
मात्र प्रसन्न असायची. गणित शिकवण्यात त्यांचा भारी हातखंडा! अगदी तल्लीन होऊन
ते शिकवायचे. ते मितभाषी होते. त्यांचा स्वभाव मृदू व शांत होता. प्रसंगी ते वज्रासारखे
कठोर होत. अपेक्षित बदल झाला की, दिलखुलास दाद देत असत. तेव्हा मला फार बरे
वाटे. त्यामुळे मी अक्षरश: त्यांच्या शिकवण्याच्या प्रेमात पडलो होतो. क्लास सुटला तरी
खुणेनेच ते मला थांबायला सांगत असत. मग माझे प्राॅब्लेम सोडवत असत. कशामुळे
माहीत नाही मला सरांनी मला अगदी ट्युशन फीसमध्येही सूट दिली होती.
परीक्षा झाली. मला गणितात १०० पैकी ९३ मार्क्स मिळाले होते. सर माझ्यासाठी
जणू देवच होते. पहाटे उठायचे. कडाक्याची थंडी, त्यात गणित सारं कष्टप्रद ! “सुटलो
एकदाचा यांच्या तावडीतून’(विशेषत: मुकुंद देशपांडे सरांच्या) असे जेव्हा परीक्षा संपली
तेव्हा वाटले होते. त्या परिस्थितीत मनातले विचार साहजिकच असतील, पण आज
जेव्हा मी माझ्या आयुष्याची ही नागमोडी वळणाची, चढउतारांची वाट चालत आहे तेव्हा
प्रत्येक पावलागणिक मला सरांची आठवण येते. सरांनी मला केवळ बारावीचे गणित
सोडवायला शिकवले नाही, तर आयुष्याचे गणित कसे सोडवायचे, हेच जणू नकळत
मला सांगितले, याची प्रचिती मला आज येत आहे. माझ्या पाठीशी असलेल्या त्यांच्या
शिकवणीच्या शिदोरीवर माझी वाटचाल सुरू आहे.
{ डाॅ. संजय जानवळे
बालरोगत , बीड
***
46
ताल, लय, सुरातून शिकवणारा शिक्षक
‘अरे, तू एमएडीकडे गणिताचा क्लास लावणार आहेस का?’ मला हा प्रश्न माझ्या
मित्राने विचारला.घरी आलो आणि वडिलांना चाचपडत विचारलं, ‘गणिताचा क्लास
लावायचा आहे, एम. ए. देशपांडे म्हणून एक सर आहेत त्यांच्याकडे. लावू का?’ सुदैवाने ते
वडिलांच्या ओळखीचे निघाले. मग आम्ही त्यांना भेटायला गेलो. अतिशय मृदुभाषी माणूस.
वडिलांशी बोलणे झाल्यावर नाव तिथेच नोंदवले आणि मग सकाळी ६ ची बॅच चालू झाली.
सकाळी सहाची वेळ असली तरी बोर्ड एकदम सजवल्यासारखा वाटायचा. एका
बाजूला सुवाच्य अक्षरात, आज काय प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते
सोडवून दाखवायला जागा मोकळी सोडलेली असायची. प्रत्येक वर्गात काही ‘हुशार’
मुलं असतात आणि त्यांना गप्प बसवत नाही. एमएडी सर अशांकडे योग्य ते लक्ष द्यायचे.
त्यांच्या शिकवण्यामध्ये एक लय असायची. शुद्ध-कोमल-तीव्र असे सर्व प्रकारचे सूर
असायचे. गणितामधील क्लिष्ट गोष्टी सांगताना ते ठराविक लयीत आणि शैलीत उच्चार
करायचे. मला वाटतं, गणिताचा बाऊ वाटणाऱ्या मुलांना त्या शैलीचा अनेक प्रमेय
लक्षात ठेवायला निश्चित उपयोग व्हायचा. ‘पॅराबोला’ला ते ‘प्याराबोला’ असे मुद्दामहून
म्हणायचे. त्यांचे प्रश्नार्थक डोळे आणि चेहऱ्यावरचे मिश्कील हास्य हे मुलांना सहज काबूत
ठेवायचे. गणिताचा मास्तर म्हणजे नावडता, हे समीकरण त्यांनी साफ चूक ठरवलं होतं.
काही मास्तरांमुळे काही विषय आपसूक कळतात. तसे त्यांच्या बाबतीत गणित विषयाचे
होते. मला गणित विषय आवडायचा आणि त्यांचे शिकवलेले शब्द, प्रमेयाच्या सिद्धीमध्ये
वापरात आलेल्या पायऱ्या डोक्यात सहज बसून असायच्या. टेस्ट सिरीजमध्ये चांगले गुण
मिळायचे तेव्हा मला ते सांगायचे,‘सहस्रबुद्धे, तुम्ही चांगलं करताय, अशीच प्रॅक्टिस चालू
ठेवा.’ विद्यार्थ्यांना ते अहो-जाहो घालायचे. सुरुवातीला जरा अजब वाटलं, पण मग सवय
झाली. मला बारावीला गणितात ९९ टक्के मिळाले. एमएडी सरांना विद्यार्थ्यांचा हा निकाल
नवीन नव्हता,पण त्यांनी माझं कौतुक केल्याचं अजून विसरलो नाहीये. आजकालच्या युगात
जिथे एक-एक गुण मुलांना शेकडोंनी मेरिटमध्ये खाली-वर करतो तिथे त्यांच्या प्रयत्नांनी
आज कितीतरी जण त्यांना हव्या असलेल्या पदव्या घेऊ शकले आहेत. त्यांच्या स्मृतिग्रंथात
लिहायचा योग आज डॉ. मंदारमुळे आला. त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपल्या भावना
मांडण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद होत आहे.
{ पद्मनाभ प्रकाश सहस्रबुद्धे , Product Manager, Logic Monitor India Pvt Ltd. पुणे
47
पैशाच्या मागे धावू नका
एम. ए. देशपांडे सर यापेक्षा एम.ए. देशपांडे काका म्हणणे जास्त योग्य ठरेल. माझा
आणि काकांचा संपर्क मी एम.बी.बी.एस. नंतर औरंगाबाद इथं मंदारसोबत इटर्नशिप
करताना सर्वप्रथम आला आणि त्यानंतर लगेचच एम.ए.डी. सर हे काय भव्य-दिव्य
व्यक्तिमत्त्व आहे हे माझ्या दुसऱ्या एका जिवलग मित्राकडून समजले आणि पुढे
अनुभवायलासुद्धा मिळाले. पी.जी. एन्ट्रन्सच्या तयारीसाठी मंदार आणि मी सोबत
अभ्यास करत असू. त्यासाठी पूर्ण वेळ मी सरांकडेच राहायला असे.
तसे पाहता मंदारची व माझी ओळख देखील अगदी नवीनच होती, परंतु देशपांडे
कुटुंबाने मला लगेच आपलेसे केले आणि त्यांच्या घरातला एक सदस्यच करून घेतले.
काका आणि काकू त्यांच्या मुलाप्रमाणेच माझा सांभाळ करीत आणि माझी सर्व व्यवस्था
ठेवीत.
इंटर्नशिप,अभ्यास या गोष्टींतून जास्त वेळ मिळत नसे. परंतु, उरलेल्या थोड्या
वेळातील संपर्कातून नेहमीच हसतमुख, शांत, कुठल्यान कुठल्या कार्यात व्यग्र असलेले
काका मला नेहमीच मार्गदर्शन करीत. त्यांचे प्रत्येक वाक्य हे सखोल विचारातून आणि
प्रदीर्घ अनुभवातून आलेले असे आणि त्यामुळे मनातील सर्व संभ्रम दूर होऊन पुढील
मार्गक्रमणासाठी दिशादर्शक असे.
काकांचे त्यांच्या नातवासोबत म्हणजे सोहमसोबत असलेले नाते मला फार आवडे.
माझ्या आजोबांनी मला कधीच इतक्या प्रेमाने जवळ घेतलेले आठवत नाही. त्यामुळे
मला त्यांचे फार अप्रूप वाटे. कुठल्याही प्रसंगात शांत राहून योग्य निर्णय विचारपूर्वक कसे
घ्यावे त्याबद्दल काका नेहमी मार्गदर्शन करत.
त्यांच्या जालन्याच्या भेटीत ते आवर्जून माझ्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी,
‘पैशांच्या मागे कधीच धावू नका, कामच असे करा की, पैसा तुमच्याकडे धावून येईल.
वैद्यकीय क्षेत्रात काम करताना ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत त्यासाठी पेशंटला
दुसऱ्या योग्य व्यक्तीकडे पाठवताना जराही मागे पुढे पाहू नका.” असे सांगितले. हा
त्यांचा संदेश सदैव लक्षात आहे आणि त्यानुसार मार्गक्रमण केल्याने निश्चितच पेशंटचे
अनेकानेक आशीर्वाद मी मिळवले आहेत.
औरंगाबाद सोडल्यावर जेव्हा केव्हा औरंगाबादला जाणे होई त्यावेळी काका-काकूंना
भेटल्याशिवाय मनाचे समाधान होतच नसे. पुढे काकांचे प्रकृतीस्वास्थ बिघडत गेले, परंतु
48
तसे असतानाही माझ्या आईच्या निधनानंतर काका आवर्जून मला भेटायला जालन्याला
आले. आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात की त्यांचे आयुष्य आपल्यासाठी आदर्शव्रत
असते. त्यांचे विचार दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असतात. एम.ए.डी. सर त्यांपैकीच एक.
त्यांच्या आठवणी सदैव मनात रुंजी घालत राहतील. सरांसोबत वेळ घालवायला
मिळाला याबद्दल परमेश्वराचे कोटी-कोटी आभार.

{ डाॅ. उदय नाईक


नांदेड.
***

49
MAD For Maths
नमस्कार….

माझे नाव सौ. जान्हवी गणेश गुडसूरकर. निगडी प्राधिकरण, पुणे येथे राहते.
मी देशपांडे सरांची विद्यार्थिनी आहे. मी बारावीत असताना देशपांडे सरांकडे गणित
शिकायला जायचे. त्यामुळे मी त्यांना जवळून ओळखते. ते मला सरदेशपांडे (माझ्या
माहेरचे आडनाव) या नावाने संबोधायचे. देशपांडे सरांना आम्ही सगळे विद्यार्थी
एम.ए.डी.(मुकुंद अमृत देशपांडे) म्हणून ओळखायचो. अर्थात हे त्यांच्या संपूर्ण नावाचं
शॉर्टफॉर्म होतं. पण माझ्यासाठी या नावाचा अर्थ होता Mad For Maths.Yes.He was
Mad about Maths and was Mad for Maths.
गणित हा त्यांचा जीव की प्राण. भल्याभल्यांना गणित हा शब्दच ऐकून घाम फुटतो
तिथे या महान शिक्षकाने गणिताला आपल्या खडूने फळ्यावर नाचवले आहे. त्यांची
गणित शिकवण्याची पद्धत तर जगावेगळी. विद्यार्थ्यांची गणिताबद्दलची भीती दूर व्हावी
म्हणून हसत खेळत विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत ते शिकवायचे. दैनंदिन जीवनातील
उदाहरणे देऊन गणितातील सूत्रं, प्रमेयं कशी लक्षात ठेवायची याबद्दलच्या टिप्सही
त्यांच्याकडून मिळायच्या. पहाटे साडेपाच वाजता त्यांची पहिली भेट व्हायची. त्यांच्या
शिकवणीचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पहिल्या बॅचला जे शिकवलं तेच इतर बॅचेसमध्ये
शिकवलं जायचं. असं का? तर विद्यार्थ्यांना जी वेळ सोयीची आहे त्या वेळेला
विद्यार्थ्यांचे येऊन बसावे. नुकसान होता कामा नये, हा त्यामागचा उद्देश.
ज्या विद्यार्थ्यांना मनापासून शिकण्याची इच्छा आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे
ज्यांनाफीस भरणं शक्य होत नाही, अशांना सरांनी कुठलीही फीस न घेता शिकवले.
सरांचे विद्यार्थी फक्त भारतातच नाही, तर विदेशातही स्थायिक झाले. इतकं मोठं केलंय
सरांनी आम्हाला.
सरांविषयी एवढंच म्हणेन
तुमच्यामुळे झाली आमची गणिताशी मैत्री ।
गणितात पास होऊन जाऊ ही झाली खात्री ।
शिकवणीने तुमच्या बळ दिले आम्हाला गणिताशी लढायचे ।
सोप्या भाषेत सांगितले तुम्ही सूत्र कसे लक्षात ठेवायचे ।
50
You were a true man who was MAD for Maths
तुमच्यामुळे सोपा झाला गणिताचा अवघड अभ्यास।
आज तुम्ही नाहीत आमच्यात तरी आहात आमच्या आठवणीत ।
कारण हेही शिकलोय तुमच्याकडून की कसं सोडवायचं आयुष्याचं गणित ।।

{ सौ. जान्हवी गणेश गुडसूरकर


पुणे.

***

51
माझे सर्वस्व हरपले
श्री. एम. ए. देशपांडे सर यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी माझ्या सरांच्या
आठवणी मांडत आहे. प्रथम वर्ष गणित शिकवणीसाठी माझे बाबा मला सरांच्या घरी
घेऊन गेले. तेव्हा त्यांचे लहान भाऊ गोविंद सर ही शिकवण घेतील, असे सांगितले.
त्याचबरोबर द्वितीय वर्षाची शिकवणी ते स्वतः घेत असत. गोविंद सर यांनी माझी प्रथम
वर्षाची फीस घेतली. पुढे सरांच्या लक्षात आले की मी फीस देण्याच्या स्थितीत नाही.
तेव्हा त्यांनी मला व बाबांना बोलावून घेतले. सर आणि बाबांची चर्चा झाली. त्यानंतर
माझ्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी सांगितले की, मी आपल्या मुलाची फीस घेणार
नाही. त्यांनी माझी द्वितीय वर्षाची फीस माफ केली. मला त्यांनी क्लासमध्ये काम दिले.
वर्ग सुरू होण्यापूर्वीची तयारी माझ्याकडे सोपवण्यात आली.
आमच्या काळात शिकवणे हे सतरंजीवर बसून होत असे. त्यामुळे वर्गाची
साफसफाई मी करीत असे. सारंग हे सरांचे मोठे चिरंजीव. त्यावेळी लहान होते. त्यातून
पुढे सर पदमपुरा येथील नवीन घरी राहण्यासाठी गेले. तेव्हा सरांनी मला सारंगला
समर्थनगरमधील शाळेत नेऊन सोडणे व परत घेऊन येणे अशी जबाबदारी दिली.
त्याबद्दल मला सर शंभर रुपये प्रति महिना देत असत. कारण मला गावाकडून येणारे
पैसे खूप कमी असत. सरांच्या असे लक्षात आले की, माझ्याकडे अंगावर घालण्यासाठी
कपडे नाहीत. तेव्हा त्यांनी मला नांदेड टेरिकॉटचा नवा ड्रेस दिला होता. पुढे शिक्षण
होईपर्यंत दरवर्षी ते कपडे देत असत.
त्यांनी मला त्यांच्या कुटुंब सदस्याप्रमाणेच वागवले होते. त्यामुळे मलाही देशपांडे
नावाने ओळखले जाऊ लागले. सरांनी माझा बारकाईने अभ्यास केला व माझ्या मानसिक
स्थितीवर लक्ष ठेवून मला स्वतःच्या मुलांप्रमाणे मार्गदर्शन करत होते. माझ्या जीवनातील
काही काळ फार वाईट गेलेला होता. त्याचा परिणाम म्हणजे मला त्याकाळी वेड्याच्या
दवाखान्यात उपचार घ्यावे लागले होते. ही कल्पना आल्यावर ते सतत चौकशी करून
दिलासा देत असत. पुढे त्यांना विश्वास आल्यावर त्यांनी मला घरातील किराणा व इतर
सामान खरेदीसाठी पाठवले. त्यातून उरलेले पैसे ते मला देत असत.
माझ्या रूमवर मला अभ्यास करण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्यांच्यावरच्या
रिकाम्या खोलीत त्यांनी जागा दिली होती. कधी कधी ते मला जेवणही देत. माझ्यासोबत
शिकायला स्व. प्रमोद जोशी हेही आले. माझ्याप्रमाणेच त्यांचीही परिस्थिती होती. आम्हा
52
दोघांना सरांनी शिक्षण व काम याची सांगड घालून दिली होती. जोशी यांना शहागंज
गांधी चौकातील भारतीय मेडिकल यांच्यामार्फत मेडिकल एजन्सीमध्ये काम मिळवून
दिले. त्यांनीही मिळेल ते काम करून शिक्षण घेतले. पुढे सरांनी मला सुटीमध्ये भारूका
मेडिकलमध्ये कामाला लावले. महिन्याच्या शेवटी मला मेडिकल स्टोअर्स मालकाने
शंभर रुपये दिले. तीच माझ्या आयुष्यातील पहिली कमाई. दुकानात काम केल्यामुळे मला
बाहेरच्या कामाची सवय झाली व जगातील व्यवहार कळला.
प्रमोद जोशी हेही अत्यंत बुद्धिमान, मेहनती, इमानदार होते. माझा व जोशी यांचा
संपर्क सरांसोबत आला नसता तर आम्ही शिक्षणही घेऊ शकलो नसतो. दोघांनाही बाहेर
नोकरी करून तुटपुंज्या पगारावर जीवन काढावे लागले असते. आमच्या मिळालेल्या
पदव्या फक्त सर आणि मॅडम यांच्यामुळेच. माझे व जोशी यांचे दोघांचेही वडील
प्राथमिक शिक्षक होते. त्याकाळात शिक्षकांना घर चालवून मुलांना शहरात शिकवणे
फारच अवघड होते.
पुढे १९८१ साली मी बी. एस्सी. फायनल परीक्षा झाल्यावर उन्हाळी सुटीत गावी
गेलो. एके दिवशी मी शेतातील विहिरीत काम करत असताना मला निरोप आला. तुमचे
कॉलेजचे सर तुमच्या घरी आले आहेत आणि तुम्हाला घरी बोलावले आहे. सर मे
महिन्याच्या उन्हाळ्यात त्यांच्या राजदूत मोटारसायकलवर औरंगाबादहून उमरावती या
गावी मला नेण्यासाठी आले होते. त्यांनी ताबडतोब निघायला सांगितले. कारण आमचा
एक वर्गमित्र श्री. गुलाब खांड्रे यांनी निरोप दिला होता की, औरंगाबाद येथे जीजीटी
कंपनीत टाइम ऑफिसमध्ये टाइम कीपरची नोकरी उपलब्ध आहे. सर त्यावेळी स्वतःचा
वेळ व पैसा खर्च करून मला उमरावती या माझ्या गावावरून औरंगाबाद येथे घेऊन
आले. त्यामुळे मला जीजीटीमध्ये टाइम कीपर म्हणून नोकरी मिळाली.
प्रत्येक विद्यार्थ्याची सखोल चौकशी करून त्याला त्याच्यापद्धतीने ते मार्गदर्शन करीत
असत. शिक्षणक्षेत्रात सरांनी एक दबदबा निर्माण केला होता. ते वर्गात जो विषय शिकवीत
त्याचा सखोल अभ्यास वर्गातच होत असे. अत्यंत सोप्या पद्धतीने गणितासारखा विषय
विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देत ते शिकवत असत. सरांनी शिकवलेले कायमस्वरूपी
लक्षात राहत असे. भविष्यात आमच्यासारखे अनेक विद्यार्थी नामांकित शिक्षक झाले
किंवा प्राध्यापक झाले. सरांचे स्वतःच्या अभ्यासाचे एक तंत्र होते. हे स्वतः अभ्यास करत
53
असत. जेव्हा ते गणित विषयाच्या पीएच. डी. ची तयारी करत होते तेव्हा ते रात्रभर जागून
दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी जात असत.
त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे मॅडम आणि मुले जेव्हा मामाच्या गावाला जात, तेव्हा
सर मला जेवणासाठी सोबत घेऊन जायचे. आम्ही शहागंज येथील मेवाड हॉटेलमध्ये
जात असू. तेव्हा मला म्हणायचे, क्षीरसागर, आपल्याला असं जेवण करायचंय की उद्या
या वेळेपर्यंत भूक लागणार नाही. त्यामुळे मलाही एक वेळ जेवणाची सवय लागली आहे.
माझे लग्न झाल्यावर माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझ्या या सवयीची कल्पना आली की
यात बदल नाही.
सरांच्या प्रत्येक नातेवाइकाने मला जे प्रेम दिले त्यांचाही मी अत्यंत ऋणी राहीन.
सरांचे बाबा, मेहुणे, पुतणे सर्व मला एक नातेवाईक मानत असत. मी सरांकडे
असलेला त्यांचा एक मुलगा म्हणूनच ते समजत. मला सरांनी व मॅडमनी माझ्या
आई-वडिलांप्रमाणेच प्रेम केले. माझ्या वैयक्तिक, घरगुती व नोकरीच्या समस्या
सोडवण्यासाठी ते मदत करत होते. आमच्या बाबांच्या स्वभावाची त्यांना पूर्ण कल्पना
होती. हे मला म्हणायचे. तुमचे बाबा खूप चंचल आहेत. पुढे आई-बाबा अपघातात गेले.
तेव्हा त्यांनी जो मानसिक आधार दिला तो न विसरण्यासारखा आहे. आमच्या पिढीला
सरांसारख्या त्यागी लोकांनी आधार दिला नसता तर आम्ही काळाच्या ओघात संपलो
असतो. आम्ही आमच्या क्षेत्रात जे नाव कमावले, त्याचे सर्व श्रेय सर आणि त्यांच्या
कुटुंबाला जाते.
माझ्या दोन्ही मुलांच्या शिकवणीची जबाबदारी सरांनी घेतली होती. त्यामुळे
त्यांना कॉम्प्युटर क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम मिळाले. त्या काळात ग्रामीण भागातील
शिक्षकांच्या मुलाचे आयुष्य त्यांनी कोणतीही अपेक्षा न करता घडवले. सरांना व्यक्तींची
खूप पारख होती. त्यांनी एखाद्याबद्दल मांडलेले भविष्य तंतोतंत खरे उतरत असे. त्या
व्यक्तीच्या जीवनात येणारा संघर्ष सरांनी केलेल्या विधानातून बऱ्याच वेळी आला होता.
मी कॉलेजमध्ये असताना माझा फार मोठा गैरसमज होता कीसर गर्भश्रीमंत
असतील. पण हा गैरसमज सर जाण्यापूर्वी दूर झाला. एकदा मी सरांना भेटावयास गेलो
असता, त्यांनी बालपणी शिक्षणासाठी खाल्लेल्या खस्ता मला सांगितल्या. सर बोलत
असताना तास न‌् तास ऐकावे असे वाटे. कारण या वाणीचा लाभ पुन्हा केव्हा भेटणार
54
असे वाटे.
मी कॉलेजमध्ये असताना सरांनी स्वतःच्या नातेवाइकांनाही मदत केली. सरांचे
मोठे बंधू नोकरी करण्याच्या स्थितीत नव्हते. त्यावेळी त्यांनी केलेली धावपळ आजही
डोळ्यांसमोर आहे. त्यांचे लहान भाऊ गोविंद काका यांनाही त्यांनी आईवडिलांची
आठवण येऊ दिली नाही, कारण यांच्या मातोश्री लहानपणीच देवाघरी गेल्या होत्या.
ज्याप्रमाणे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांनी संसार करून परमार्थ केला तसे
आमचे सर आणि आमच्या गुरुमाउली यांनी केला. त्यांची पुढील पिढीही त्याच मार्गाने
परंपरा चालवत आहे.
जेवढे लिहीन तेवढे कमीच आहे. जसे जसे मला आठवले, तसे सादर करण्याचा
प्रयत्न केला.
श्री गुरुचरणी स्वीकार व्हावा..

{ बळीराम क्षीरसागर
निवृत्त शिक्षक, पाचोड

***

55
अजातशत्रू व्यक्तिमत्त्व
मी १९७५ ला एम.एस्सी. झालो. कॉलेजला असताना श्री. मुकुंद देशपांडे सरांनी गणित
शिकवले. त्यांच्याकडे क्लासला जाणं हा आमचा आवडीचा विषय होता. त्यांची हसत
खेळत गणित शिकवण्याची विलक्षण हातोटी होती. ते आमचे शिक्षकही होते आणि मित्रही.
नेहमी हसतमुख असायचे. आम्ही गप्पा मारत शिकत असू आणि आमच्यात विद्यार्थी-
शिक्षक असं अंतर नव्हतंच कधी.
२०१८ साली ऑक्टोबरला मी औरंगाबादला असताना माझ्या मित्राने- राजा कुलकर्णीने
त्यांचा विषय काढला आणि आम्ही लगेच वेळ न घालवता त्यांना भेटायला गेलो. त्यांना
तो मध्यंतरी भेटला होता. पण मी मात्र १९७५ नंतर त्यांना भेटलोच नव्हतो. त्यांच्या घरी
गेलो आणि राजाने त्यांना स्वतःची ओळख करून द्यायला सुरुवात केली. त्यांनी लगेच
ओळखले राजाला. मी पुढे होऊन म्हणालो,‘सर, तुम्ही कदाचित मला ओळखणार
नाहीत. मी देशपांडे…’ माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतते म्हणाले,‘हो मी ओळखलं.
पी.पी.’ मी चाटच पडलो. ४३ वर्षांनंतर भेटत होतो मी सरांना. मला खूप आनंद झाला
आणि गहिवरूनही आलं. खूप गप्पा मारल्या. अगदी भरभरून. खूप छान वाटलं. ते सगळे
क्षण मनात साठवून ठेवावेत असं वाटत होतं. खूप समाधानाने त्यांचा निरोप घेऊन आम्ही
परतलो. सरांचा शहागंजमध्ये असलेला क्लास आठवला. आम्ही सायकलीवर क्लासला
जायचो. अवघड वाटणारी सूत्रं आवडायला लागायची आणि सरांच्या शिकवणीमुळे
आम्ही गणितावर प्रेम करायला शिकलो. गणिताच्या प्रॉब्लेमकडे खेळकरपणे कसे
बघायचे आणि कसा साधा सरळ अॅप्रोच ठेवायचा हे मी त्यांच्याकडून शिकलो. कदाचित
आयुष्यातल्या प्रश्नां कडेदेखील शांतपणे, शुद्ध तार्किक पद्धतीने बघायला शिकलो ते
याचमुळे. मुकुंद देशपांडे सर गेल्याचे समजले. आपल्या मनाचा एक अत्यंत आपुलकीचा
भाग कोरडा झाला, ओसाड झाला असे वाटले. मन सुन्न झाले. मुकुंद देशपांडे सर म्हणजे
आम्हा सर्व मित्रांच्या मनातील एक जिव्हाळ्याचा, आपुलकीचा कप्पा. सरांकडे शिकायला
जायचं म्हणजे एक आनंद सोहळाच असायचा. कधी कंटाळा आला क्लासला जायचा
असं झालंच नाही. मी गणितात एमस्सी. केले. त्यांच्याकडून गणित शिकल्यामुळे गणिताची
आवड निर्माण झाली हे महत्त्वाचं कारण. ते मित्रच जास्त होते शिक्षक असण्यापेक्षा. सरांची
कमतरता कशानेच भरून निघू शकत नाही. एक सर्वांचं आवडतं, अजातशत्रू असलेलं,
हसतमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
{ पुरुषोत्तम देशपांड,े निवृत्त बिझनेस हेड, ब्रँड कॉन्सेप्ट्स लिमिटेड, ठाणे.
56
धन्यवाद….हा शब्द अपुरा…
मी त्यावेळी आठवी-नववीत शिकत असेन, जेव्हा मी माननीय डॉ. एम. ए. देशपांडे
(MAD) सरांचे नाव पहिल्यांदा माझ्या ताईकडून ऐकले. ताई त्यावेळी एस.बी.
कॉलेजमध्ये बी.एस्सी. करत होती. तिला मॅथ्स शिकवायला MAD सर होते. ताईकडून
सरांची गणित शिकवण्याची विशिष्ट शैली, विद्यार्थ्यांना एका एका फॉर्म्युल्याचे हेड
बनवणे, वर्गात खेळीमेळीचे वातावरण तयार करणे याबद्दल रोजच ऐकायला मिळायचे.
ताई सरांचे लेक्चर अटेंड करून येईल त्यादिवशी आमच्या घरातले वातावरण गणितमय
होऊन जात असे. सरांनी आज काय व कसे शिकवले, यावर घरात चर्चासत्र असे.
अशाप्रकारे सरांबद्दल रोजच ऐकल्याने मलाही आयुष्यात त्यांच्याकडून कधीतरी
मॅथ्स शिकायला मिळावे असे वाटत होते. माझी दहावी झाल्यावर जेव्हा मी एस. बी.
कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला, तेव्हा मी खूप खुश झाले. ताईला सांगितले, आता
मला पण MAD सरांकडून मॅथ्स शिकता येईल. पण जेव्हा तिने सांगितले, सर सिनियर
कॉलेजला शिकवतात, तेव्हा माझा हिरमोड झाला. सर अकरावी-बारावीची शिकवणी
घ्यायचे. पण आमच्या घरात कोणीच शिकवण्या न लावण्याने माझा तोही चान्स
गेल्यासारखा होता.
पण मग अकरावीच्या उन्हाळ्याच्या सुटीत एस.बी. कॉलेजने बारावीची पूर्वतयारी
करण्यासाठी समरकोर्स सुरू केला. मी तो जॉईन केला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या
बॅचचे मॅथ्स 1 सरांना दिले. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. जसे सरांबद्दल ऐकले
होते तसेच आमचे M1 चे वर्ग सर घेत. त्यांच्यामुळे माझे M1 पक्के झाले. समर कोर्स
संपला व माझे रेग्युलर कॉलेज आणि बारावीचा जोरदार अभ्यास सुरू झाला.
अशात सप्टेंबर-ऑक्टोबर आला. पण माझी M2ची गाडी Integration टॉपिक वर
काही केल्या smooth चालेना. मी खूप घाबरले आणि क्लास जॉईन करायचे ठरवले.
माझ्या इतर तीन-चार मैत्रिणी सरांकडे सुरुवातीपासून जात होत्या. त्यांच्यासोबत मी
सरांना भेटायला गेले. सरांना सांगितले की, मला इंटिग्रेशन टॉपिकसाठी क्लास जॉईन
करायचा आहे. सरांकडे सर्वजण पूर्ण वर्षासाठी क्लास लावत. माझ्या या रिक्वेस्टने ते
थोडे गोंधळले. पण माझी अडचण ऐकून ते क्लासला ये म्हणाले. फीसबद्दल नंतर
सांगतो, असे त्यांनी सांगितले.
सर रोज चार ते पाच बॅचेस घ्यायचे आणि विशेष म्हणजे या सगळ्या बॅचेसमध्ये
57
सारख्याच स्पीडने शिकवले जायचे. म्हणजे सकाळच्या बॅचमधला विद्यार्थी एखाद्या
वेळी संध्याकाळच्या बॅचला गेला, तरीही त्याचा एकही प्रॉब्लेम मिस होत नसे. सरांनाही
कोणते विद्यार्थी कोणत्या बॅचमध्ये येतात लक्षात असे. त्यामुळे एखादा विद्यार्थी दुसऱ्या
बॅचमध्ये गेल्यावर त्यांचा मजेशीर शेरा सर्वांना ऐकायला मिळत असे. मी ज्या बॅचला
जायला लागले त्याच बॅचला माझ्या मैत्रिणी त्यांची नेहमीची बॅच सोडून माझ्यासोबत या
नवीन बॅचमध्ये यायला लागल्या. एकदम तीन-चार मुली दुसऱ्या बॅचच्याआल्यानंसर्व
विद्यार्थ्यांना जागेची अडचण होत होती. मग सरांनी मला एका कमी गर्दी असलेल्या
बॅचला यायला सांगितले. मला तो पर्याय खूप आवडला. आणि माझ्या मैत्रिणींसोबत
सरांकडून इंटिग्रेशन शिकले. सरांनी हा टॉपिक इतका सोपा करून शिकवला की मी
एकदम रिलॅक्स झाले. या दोन्ही विषयांना सरांकडून मार्गदर्शन मिळाल्याने अवघड
मॅथ्सचा अभ्यास खूपच सोपा होऊन गेला.
मी बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन GCEA इथून इंजिनिअरिंग पूर्ण केले.
सरांनी माझ्याकडून एक-दोन महिन्यांची क्लासची फी घेतलीच नाही. मी ठरवले होते की,
बारावी पास झाल्यावर सरांना काहीतरी भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानावेत, पण या ना
त्या कारणाने ते राहूनच गेले. नंतर अनेकदा त्यांना भेटण्याची खूपच इच्छा होती. वाटले
होते एखाद्या शिक्षकदिनी त्यांना जाऊन भेटावे, पण तेही राहून गेले. आज सरांचे आणि
देशपांडे मॅडमचेही मनापासून आभार.
देशपांडे सर यांना,
‘सर, खूप खूप धन्यवाद. जेव्हा मॅथ्स विषय निघतो, तेव्हा फळ्यासमोर एका हातात
खडू घेऊन स्मितहास्य करणारी तुमची एक सुंदर छबी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते.
धन्यवाद.’
स्मृतिग्रंथानिमित्ताने सरांबद्दल लिहायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद.

{ सौ. अंजली देशमुख मुंगीकर,


पुणे.

***
58
परीस
खरंतर “परीस” ही संज्ञा गणित विषयाशी संबंधित नाही, पण ह्या व्यक्तीस दुसरे
विशेषणच सापडत नाही. होय, मी सांगणार आहे आपल्या सगळ्यांना त्यांच्या प्रेमात मॅड
बनवणाऱ्या मॅड सरांबद्दल!
सर आपल्याला प्रा. मुकुंद देशपांडे या नावाने कधीच परिचित नव्हते. ते आपले
MAD सरच आहेत. १९९३ ला मी स. भु. प्रशालेत दहावी पास झालो. आर्ट्स अथवा
कॉमर्सची आवड नसल्याने आपसूक ११ वी सायन्सला प्रवेश घेतला. क्लासेस सुरू झाले
आणि काही आठवड्यांत लक्षात आले की मेडिकलकडे माझा कल नाही. मग बायोलॉजी
ऐवजी इलेक्ट्रॉनिक्स हा विषय घेतला आणि PCM ग्रुप फोकस केला.
बऱ्याच जणांनी गणितासाठी M.A. Deshpande सरांचा क्लास सुचवला.
एकदिवस माझे बाबा मला सरांच्या घरी घेऊन गेले. सरांचे प्रथम दर्शन होताच “गणिताचे
शिक्षक” ही भीती जाऊन ह्यांची आणि आपली गट्टी जमणार ह्याची खात्री पटली.
सर माझ्या बाबांना म्हणाले, ‘तुमच्या मुलाशी माझे ट्युनिंग जमले की अर्धी लढाई
जिंकली.’ सरांचा सुसंवादीपणा त्यावेळी मनाला मोहून गेला. “तुला दहावीला गणितात
किती मार्क होते?” असा रूढीवादी प्रश्न सरांनी विचारलाच नाही. मला वाटते सरांना
विद्यार्थ्यांच्या कोऱ्यापाटीवर ठसवून अमीट असे संस्कार करायचे होते. पहिल्या भेटीतच
सरांच्या अचूक आणि आश्वासक संवादामुळे आपण अचूक ठिकाणी आलो आहोत
याची खात्री पटली. सकाळी ५.३० ची बॅच जॉईन केली. पहाटे पोहोचून स्कुटर क्लासमध्ये
लावून जाऊन बसायचे. ३ ते ४ मिनिटांत सर क्लासमध्ये यायचे. तेल लावून चापून चोपून
बसवलेले केस आणि काळ्या फ्रेमचा जाड भिंगाचा चष्मा घालून सर क्लास सुरु करायचे
आणि तुफान हास्याचा मंतरलेला एक तास खूप छान जायचा. सरांची एक स्टाईल
होती, ते बोर्डवरचा प्रश्न एका विद्यार्थ्याला वाचायला सांगत, मग उत्तर समजावून सांगत.
त्यांचीही डायरेक्ट मेथड प्रश्न नीट समजणे किती आवश्यक आहे ह्यासाठीच असायची.
क्लासमधील विद्यार्थ्यांना ते मजेशीर टोपण नावं ठेवत. ही नावं चालू मालिका, नवीन
चित्रपट ह्यामधील असत. विनोदात्मक संवादातून विद्यार्थ्यांशी नाळ जोडणे ही सरांची
स्पेशालिटी होती. कधी कधी काही प्रॉब्लेम्सला सर रोख बक्षीस ठेवत आणि जो विद्यार्थी
पहिल्यांदा सोडवून दाखवेल त्याला लगेच खिशातून पैसे काढून बक्षीस देत असत. मला
पण असेच एकदा एक बक्षीस मिळाले होते आणि क्लासनंतर घरी येताना त्या पैशाचे
59
अण्णाकडे वडासांबार खाल्ल्याचे आठवते.
सर पूर्ण अभ्यासक्रम खूप छान कव्हर करत. वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके तसेच
मागील बऱ्याच वर्षांच्या पेपरमधील असंख्य प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून घेत. दिवसा मागून
दिवस जात होते व खूप छान तयारी होत होती. सगळ्याच अभ्यासक्रमाशी सरांनी दोस्ती
करून दिली होती. कधीही प्रॉब्लेम सोडवावा व युनिक उत्तर यावे असे होणे म्हणजे
‘कपिलाषष्ठीचा योग’ असे नामकरण सर करत असत. समजा सरांच्या क्लासमधील
शूटिंग करून म्यूट करून दाखवले तर हा क्लास गणित विषयाचा आहे असे पायथागोरस
काय आइन्स्टाइनलाही खरे वाटणार नाही. असाच बारावीचा क्लासचा शेवटचा
दिवसआला आणि सरांना भावूक होताना मी पहिल्यांदा पाहिलं. वर्षानुवर्षे अव्याहतपणे
क्लासेस चालूच, वेगवेगळे असंख्य विद्यार्थी नजरे खालून गेलेले आणि रुक्ष अशा गणित
विषयात अखंड बुडालेल्या सरांचे हळवेपण अजूनही डोळ्यात साठलेले आहे. सर
तेव्हा म्हणाले होते, गणितात ९८-९९ मार्क मिळवणं सोपं आहे, पण १०० मार्क मिळवणं
अवघड आहे. गणिताच्या पेपरच्या आदल्या दिवशी मी दुसऱ्याच विषयाच्या पेपरचा
केलेला अभ्यास हेच मला परीसस्पर्श लाभल्याचे सूचक होते. बारावीचा निकाल हातात
आल्यावर पेढे घेऊन सरांकडे मीगेलो, त्यांनी माझे खूप कौतुक केले आणि माझे गणित
विषयातले २ मार्क कोठे गेले असावेत ते मला त्यांच्या विनोदी शैलीत समजावून सांगितले.
पुढे इंजिनिअरिंग झाल्यावर मला प्रथम MAD सर आठवले, ज्यांनी गणिताचा पाया
भक्कम केला होता. मी सरांकडे पेढे घेऊन गेलो असता इतक्या वर्षांनी आपला विद्यार्थी
भेटायला आला हे पाहून त्यांच्या डोळ्यात दिसलेला आनंद मी कधीही विसरू शकणार
नाही. माझ्या आयुष्यातली ती एक जमापुंजी! कालांतराने बऱ्याच वर्षांनी माझ्या मुलाला
घेऊन सरांना भेटलो. त्यावेळेस त्यांनी क्लासेस घेणे थांबवले होते. खूप गप्पा झाल्या.
गप्पांच्या ओघात मी सरांना विचारले की, माझ्या मुलाला वैदिक मॅथ्स शिकवणे कसे राहील?
यावर त्यांनी मला काळाप्रमाणे चालण्याचा सल्ला दिला. ते मला म्हणाले, आता नवीन
अभ्यासक्रम, ॲप्लिकेशन आणि अॅक्टिव्हिटी ओरिएंटेड आहे. या भेटीतून सरांची मॉडर्न
आणि प्रॅक्टिकल विचारसरणी भावून गेली. या विचारसरणीचा प्रभाव कायम मनावर राहील.
सरांच्या परीसस्पर्शाने मी आणि माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचे सोने झाले.
{अभिजित दंडे, मस्कत, ओमान.
60
आदरांजली
“लाभले मजला ऐसे गुरू |
ज्ञानी जे उदाहरण कल्पतरू ||”
‘एम. ए. डी.’ सर म्हटले की डोळ्यासमोर येते ते त्यांचे हसरे व्यक्तिमत्त्व. मी १९७५
ला गणित विषय घेऊन बी. एस्सी. झाले. सरांकडे कॉलेजमध्ये, क्लासमध्ये गणित
शिकणे हा एक आनंददायी अनुभव! खूप मजा यायची सरांच्या क्लासमध्ये!
खरं तर गणित हा सर्वांना क्लिष्ट, रुक्ष वाटणारा विषय, पण सरांची
शिकवण्याचीहातोटी अशी अफलातून होती की कोणीही गणिताच्या प्रेमात पडावे.
औरंगाबादला गणित शिकायचे म्हटले की सरांशिवाय दुसरे नाव शक्यच नाही. मी तर
पीयूसीला आणि बीएस्सीला सरांच्या शिकवण्याचा खूप आनंद घेतला. विद्यार्थी असो,
सरांकडे आला की त्याला गणिताची गोडी लागणारच!
सकाळी सहाच्या बॅचला सर अप टू डेट तयार असायचे. त्यांना कुणी उशिरा
आलेले चालायचे नाही. कुणी वर्गात जांभई दिली की त्यावर सरांच्या खास विनोदातून
कानपिचक्या... गणितासारखा गंभीर वाटणारा विषय सरांनी आयुष्यभर हसत-खेळत
शिकवला. सरांकडे शिकतोय म्हटलंही ९० टक्क्यांवर जाणार हे ठरलेले असायचे.
२० टक्के विद्यार्थी फ्रीशिप, तर दहा टक्के अर्ध्या फ्री शिपवर शिकायचे. आपल्या
ज्ञानार्जनातून सरांनी अनेक उत्तम विद्यार्थी घडवले. आजही ते सारे विद्यार्थी सरांच्या
आठवणींनी नक्कीच हळवे होत असतील.
आम्ही दोघे पती-पत्नी, तसेच आमच्या पुढच्या पिढीतील, घरची ओळखीची
सर्व मुले मुली सरांकडे शिकली. मी बीएस्सीला व पती सुरेश यांनी एमस्सीला सरांकडे
शिकण्याचा पुरेपूर आनंद लुटला आणि अभ्यासही हसत-खेळत केला.
आजच्या व्यवहारी जगात ज्ञानार्जन करता नाही, समाजाचे ऋण भेटणारी,
विद्यार्थ्यांचे हित जपणारी अशी माणसे फार दुर्मिळ आहेत. आम्हाला आणि पुढच्या
पिढीला सर अनुभवायला मिळाले हे आमचे भाग्यच!
सरांच्या या ज्ञान यज्ञात त्यांची पत्नी व सुधाताईंनी त्यांना दिलेली साथ अत्यंत
मोलाची आहे. संसार, नोकरी सांभाळून व नंतर नोकरी सोडूनही पूर्ण वेळ सरांचा व्याप
सांभाळणे सोपे नव्हते.
आमच्या लग्नानंतर सरांची कित्येक वर्षांची भेट नव्हती, कारण आम्ही
61
औरंगाबादच्या बाहेरच होतो. परंतु योगायोग पाहा की, गेल्या वर्षी शिक्षक दिनानिमित्त
आम्ही दोघे सरांना भेटायला गेलो होतो. सरांना व्हीलचेअरवर पाहून खूप वाईट वाटले.
पण सरांनी मात्र नेहमीप्रमाणे आमचे आनंदाने स्वागत केले. खूप गप्पा झाल्या. शेवटी
शेवटी झालेल्या त्या भेटी आम्ही दोघेही विसरणे शक्य नाही.
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
उजाले उनकी यादों के हमारे साथ रहने दो |
न जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाए ||

{ सौ. अरुणा सुरेश कुलकर्णी


{ सुरेश रामचंद्र कुलकर्णी

***

विद्यार्थिनी सौ. अरुणा सुरेश कुलकर्णी सरांना शिक्षक दिनाच्या


शुभेच्छा देतांना.

62
घरमालक….छे! काका……
देशपांडे काका खरे तर आमचे घरमालक. १९८१ ला वडिलांची बदली पैठणहून
औरंगाबादला झाली आणि आम्ही सुयोग कॅलनीत देशपांडे काकांच्या घरात राहायला
आलो. पण थोड्याच दिवसांत घरमालक-भाडेकरू हे नातं जाऊन काका-मावशीत ते
कधी रूपांतरित झालं समजलंच नाही.
आम्ही भावंडं लहान होतो, त्यात मोठा भाऊ खूप बंड. पूर्ण कॉलनीत आमचाच
गोंधळ जास्त असायचा. मोठा भाऊ पतंग उडवण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावर
गच्चीच्या भिंतीवर चढायचा. त्यामुळे काकांना गच्चीवर जाण्याचा जिनाच पत्रे ठोकून बंद
करावा लागला. पण इतके असूनही त्यांची कधी तक्रार नसायची.
दिवसागणिक देशपांडे कुटुंबीयांशी आमचे नाते अधिक दृढ होत गेले. आई आणि
देशपांडे मावशी तर अगदी सख्ख्या बहिणीच. एकमेकींशिवाय त्यांचे पानही हलत नसे.
आमचे बाबा खूप स्पष्टवक्ते. कधीही समोरच्याची भीडभाड त्यांनी ठेवली नाही. पण
देशपांडेकाकांशी त्यांची खूप चांगली मैत्री झाली,ती शेवटपर्यंत टिकली. देशपांडे काका
वडिलांच्या जवळच्या काही मोजक्या मित्रांपैकी एक होते.
काका सतत व्यग्र असायचे. पण त्यातूनही ते वेळ काढून पहाटे ५ वाजता आमचा
व त्यांचा मोठा मुलगा सारंगचा अभ्यास घेत असत. बाबांना आमच्या शाळेत किंवा
कॉलेजमध्ये कधी जास्त लक्ष घालावे नाही लागले.
आम्ही १९८६ला आमच्या घरात राहायला आल्यावरही देशपांडे काका व मावशीशी
आमचे संबंध कमी झाले नाहीत. काहीना काही कारणास्तव जाणे-येणे चालूच असायचे.
खरे देशपांडेकाका मला कॉलेजला गेल्यावरच समजले. मला गणिताविषयी फारशी
आवड नव्हती, पण काकांची शिकवण्याची हातोटीच अशी होती की कधी अडचण
आली नाही. काका खूप उत्तम शिक्षक होते, पण त्याहूनही माणूस म्हणून ते खूप मोठे
होते. ते कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत असत. पुस्तके देण्यापासून ते
स्वतःच्या क्लासमध्ये फुकट शिकवण्यापर्यंत ते मदत करत. पण याविषयी ते कोणालाही
सांगत नसत किंवा मी काही वेगळे करतोय ही भावनाही त्यांच्यात नसायची.माझ्या वर्गात
एक ग्रामीण भागातून आलेला मित्र होता. त्याला काकांनी पुस्तकं दिली होती. त्यातले एक
पुस्तक त्याच्याकडून हरवले. तो खूप घाबरला होता की, सर आता रागावणार. त्यामुळे
त्याने काही दिवस सांगितलेच नाही की, पुस्तक हरवले. पण काही दिवसांनी काकांच्याच
63
लक्षात आले की याच्याजवळ पुस्तक नाही. तेव्हा काकांनी त्याला परत एक नवीन
पुस्तक आणून दिले. फुकट शिकणाऱ्यांची संख्या खूप असायची काकांच्या क्लासमध्ये.
पण काका कधीही विद्यार्थ्यांना फीबद्दल विचारत नसत. खरंतर त्यांचे लक्षच नसायचे
फीकडे. त्यांनी त्याची कधी फिकीरही केली नाही आणि आपण कोणाला मदत करतोय
ही भावनाही त्यांना स्पर्श करायची नाही. त्यांनी आयुष्यभर आपले ज्ञान मुक्तहस्ते वाटले.

{अजित अशोकराव वाणी


औरंगाबाद

***

64
शिकवण्यात विलक्षण जादू असणारा जादूगार
महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर हवे असलेले करिअर निवडता यावे,
यासाठी गणित हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यावर बरंचसं अवलंबून आहे हे पटले.
अभ्यासातील अविभाज्य घटक ठरवला तर खरं, पण गणित विषयाची भीती वाटत होती.
त्यावेळी आदरणीय MAD सरांचा क्लास जॉईन केला. आणि गणित याविषयाकडे
बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
अभ्यास वाढला, आवड निर्माण झाली. त्यामुळे गणित हा विषय सोपा आणि
इंटरेस्टिंग वाटू लागला. सरांच्या शिकवण्यात विलक्षण जादू होती. विविध प्रकारच्या
विषयांतील तत्त्वज्ञान ते आधुनिक गणित इथपर्यंतचा प्रवास अगदी सहजरंगात घडत
असे. शिकवण्यात transfer ratio 100 percent असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह/
प्रयत्न असे. ज्ञानाच्या व शिक्षण कलेच्या साधनेमुळे वलयांकित असणारे सर, प्रत्यक्षात
मात्र अत्यंत साधे, शांत आणि निर्विकार होते..! त्यांचे हे रूप नेमके मला नेहमी भावले
होते.गणित विषयाचे प्राध्यापक असण्यापेक्षाही सर मित्रत्वाच्या नात्याने मार्गदर्शन करत
असत. व्यक्तिगत संवादातून प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचा सरांच्या
स्वभावामुळे आम्ही विद्यार्थी प्रेरणेने व गोडीने अभ्यास करत असू.
काही महिन्यांपूर्वी सर आजारी असल्याचे कळले, परंतु रुग्णालयाचे निर्बंध
असल्यामुळे त्यांना भेटता आले नाही.नंतर काही दिवसानंतर अचानक त्यांच्या निधनाची
बातमी कळली आणि मन हेलावून गेले....
मन भूतकाळात गेले आणि सरांचा तास आणि त्यांचा आवाज चित्रपटासारखा
स्वच्छ उभा राहिला....” जडे सांगा..Hyperbola eccentricity काय आहे?’
उत्तर तयार होते, पण उत्तर ऐकणारे सर अनंतात विलीन झालेले होते...
सरांच्या ऋषीत्वाला अंतःकरणापासून वंदन...!!!!

{ नीलेश जडे
पुणे
***

65
स्व. मुकुंदराव देशपांडे (MAD) सर : एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व
खरं म्हणजे सरांच्या नावापुढे स्व. लावणे हे मनाला अजिबात पटत नाही, परंतु
नियतीसमोर कोणाचेही काही चालत नाही.
तसा आमचा-त्यांचा परिचय १९७६ पासूनचा. त्यानंतर आम्ही आणि देशपांडे परिवार
१९७८ पासून सुयोग कॉलनी येथे राहावयास आलो. शेजारी मोठे शेत, मोठा उघडा नाला.
सगळीकडून मोकळा परिसर, डासांचे साम्राज्य. बहुतेक सुविधा नसूनही तो कॉलनीमध्ये
सुवर्णकाळ होता. सर्व परिवार नवीनच आलेले होते. विटेकर सर, पुजारी सर, पाठक
साहेब, तुंगार साहेब, शुक्ला साहेब (म्हणजे आम्ही) सर्व एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो.
सीमोल्लंघन - दसऱ्याला सर्व पुरुष मंडळी एकत्र जात असत. सणवार, दिवाळी मिलन
प्रत्येकाच्या घरी व्हायचं. दिवाळी फराळ आठ दिवस चालायचा.
कॉलनीमध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. सरांचे मार्गदर्शन, तसेच स्त्रियांमध्ये
वसुंधरा देशपांडे, विटेकर व सर्वच स्त्रिया हिरीरीने भाग घेत असू, मात्र गणपती स्थापनेला
जागा नव्हती. मिळेल तेथे गणपतीची स्थापना होत असे. मुलांचा उत्साह शिगेला पोहोचत
असे. छोटा सारंगगाणे छान म्हणायचा. फार कौतुक वाटायचे. त्यावेळेसचे वर्णन जेवढे
करावे तेवढे थोडेच आहे. सरांचा स्वभाव मितभाषी, बोलणे संयमी, अभ्यासपूर्ण,
मुद्देसूद चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य. गोल्ड मेडलिस्ट विद्वान असूनही निगर्वी. नम्रता,
मिळून-मिसळून वागण्याची वृत्ती. सरांच्या ट्युशन्स सकाळी पाच वाजल्यापासून सुरू
व्हायच्या. आम्हालाच नवल वाटे, सरांचा शिकवण्याचा स्टॅमिना किती आहे. सोप्या
शब्दांत शिकवण्याची त्यांची हातोटी होती. त्यांच्या विद्यार्थ्यांचीही मुले ट्युशनला येत
होती. म्हणजे दोन पिढ्या सरांच्या मार्गदर्शनाच्या लाभार्थी आहेत. या त्यांच्या ज्ञानदानाच्या
कार्यामध्ये पत्नी वसुंधराचे मोलाचे सहकार्य होते. सर्व प्रशासकीय व्यवस्था त्या अतिशय
व्यवस्थित सांभाळत. तसेच पदमपुरा परिसराचा वावर तिकडून असल्यामुळे गाड्या
पार्किंगकडेही विशेष लक्ष द्यावे लागे.
देशपांडे परिवार हा एक आदर्श परिवार आहे. आई-वडील दोघे अत्यंत बिझी
असूनही दोन्ही मुलांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. आई-वडिलांचे नाव काढले. सुनाही
सुशिक्षित, सुसंस्कारित मिळाल्या.श्रीमती वसुंधराताईंना दीर्घ आयुरारोग्य लाभो ही
शुभेच्छा. शेवटी एका ज्ञानमहर्षीला श्रद्धासुमन अर्पण करून दोन शब्द संपवते.
{श्रीमती रजनी देवी शुक्ला, औरंगाबाद.
66
जेथे सुरुवात असते तेथे शेवट ठरलेलाच
‘सुहास, जेथे सुरुवात असते तेथे शेवट देखील ठरलेलाच.’ या वाक्याने मी भानावर आलो.
प्रचंड राग हळूहळू शांत होत गेला. रागाचे कारणही तसेच होते.
अमृत हॉस्पिटलची जुन्या भाड्याची जागा. सर्व ठरले. कामे देखील उरकत आली
होती. आणि.. अचानक कळले की, कोणीतरी कोर्टात केस केली आहे. आम्ही आता
दवाखाना नाही चालू करू शकत. मनामध्ये प्रचंड वादळ सुरू झाले. असे काय झाले?
त्याला सांगितले होते ना की, जागेवर काही बोजा नसावा. मग असे का झाले? त्याने का
नाही आधी सांगितले? आमचेतर खूप नुकसान केले त्याने. सर्व राग मध्यस्थावर. आता
भेटला की पाहतोच. माझ्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. डोळ्यात लाली उतरली. या
माझ्या हालचालींवर मात्र माझ्या नकळत देशपांडे (MAD) काकांचे लक्ष होते. त्यांच्या
हाताने माझ्यासारखे असंख्य तरुण घडवले होते. विद्यार्थ्याला एका नजरेत ओळखण्याचे
गणित त्यांच्याकडे होते. साहजिक माझ्या हावभावावरून माझी मानसिक स्थिती त्यांच्या
सहजच लक्षात आली आणि त्यांच्या तोंडून ते शब्द आले.“सुहास, जिथे सुरुवात तिथे
शेवट देखील ठरलेलाच असतो. कदाचित हीदेखील तुमची सुरुवातच आहे. पहिल्याच
अपयशामुळे खचून न जाता मार्गक्रमण चालू ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा,जे होतं ते
चांगल्यासाठीच होतं. कदाचित या इमारतीपेक्षाही तुमचे इस्पितळ मोठ्या जागेत असेल.”
त्यांच्या या बोलण्यामुळे माझ्या मनातला विस्तव एका क्षणात विझला व मी शांतपणे
विचार करायला लागलो. आजदेखील त्यांचे ते वाक्य माझ्या स्मरणात आहे.
अमृत हॉस्पिटलच्या सुरुवातीच्या काळात देशपांडे काकांसोबत खूप वेळ घालवण्याचा
योग आला. जुन्या इमारतीचे मालक श्री. झवेरीजी यांच्या दुकानावर आम्ही बऱ्याच
वेळा चर्चेसाठी एकत्र जमत असू. काका फार मोजकेच बोलत असत, पण त्यांचे शब्द
झवेरीजी लक्ष देऊन ऐकत असत. एकदा फक्त मीच झवेरींकडे गेलो होतो. मला त्यांनी
काकांबद्दल विचारले. तेव्हा काकांना ताप होता, त्यामुळे ते आले नव्हते. हे ऐकून झवेरीजी
म्हणाले,“खयाल रखो उनका. उनकी वजह सेही मैने आपको मेरी जगा दी है. मै हिरोंका
व्यापार करता हूं और हिरोंकी अच्छी परख है मुझे.” देशपांडे सरांबद्दल त्यांचे विचार ऐकून
मी थक्क झालो. कदाचित झवेरीलाही माझ्यासारखी प्रचिती आली असणार हे नक्की.
काकांचे असे निघून जाणे ही मनाला चटका लावणारी गोष्ट ठरली.
{ डॉ. सुहास रोटे, अमृत बाल रुग्णालय
67
MAD = Mad About Dedication
He was M.A.D and he was still famous…..Mad About Dedication
(towards Mathematics)
I was just overwhelmed when Mandar mentioned to me that you
have put some words regarding unwanted fear if anyone could have
made run away, it was MAD sir. It was because of him only that my
fear towards this so called complicated subject was removed from
the root and I am sure there are many more students like me who can
vouch for the same.
Since, me and Dr. Mandar also share our friendship from long time
say around 4th standard till 12th. Both our families were known to
each other too, which was an added advantage to know sir personally
also rather than just being his student. It is just not easy to tell how
passionate sir was towards his subject. I was very fortunate to be his
student. There are so many things which I can share about his teaching
style, methods, simplicity, his tone and many more. I think which
I can’t miss to mention is the way he use to teach trigonometry, oh
god, just can’t resist smile on my face imagining him hearing out. The
way he use to say Sin, Cos, Tan and their equations. It was this simple
things and techniques he used which makes us still remember those
complicated concepts with ease.
He left college and started teaching students at his home so
maximum students can get benefited. He was also very considerate
about the situation of students in the society and in relation to that he
had given free education to many students. Anyone can get irritated
when dealing with students, but he was exception for this too. I never
ever saw him scolding anyone or getting irritated for asking repeated
questions, on the contrary he use to smile and smile and reply patiently
68
till the problem was solved. I realized this quality is so difficult to
have, as when trying to solve my own kids problem I lose patience. I
want to thank God, that I was quite lucky to be knowing him and was
blessed to be his student.
I just have one complaint towards Almighty is for such a nice
person who had put his life for educating the kids from all over the
society, his last few years were painful due to health issues. That
was not we had expected. He was also lucky enough to have such a
wonderful, supporting family.
My regards and Pranam to him on this occasion.

{ उत्कर्ष रवींद्र नागोरी


औरंगाबाद

***

69
माझ्या मनातील देशपांडे सर
तसं पाहिलं तर गणित म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या रुक्ष विषय. पण देशपांडे सरांनी
विद्यार्थी आणि गणिताची गोडी यांचे असे काही सूत्र जमविले की, विद्यार्थ्यांच्या जीवनाचे
सगळे कोण आणि दृष्टिकोन सूत्रबद्ध झाले आणि जीवनाचं गणित समजलं. माझा
आणि सरांचा सहवास हा एक विद्यार्थी आणि शिक्षक त्यापेक्षाही वेगळा राहिला. ते माझे
मार्गदर्शक, उत्साहवर्धक, कौतुक करणारे, संयम काय असतो हे शिकवणारे आदर्श
व्यक्तिमत्त्व आहेत. बेंजामिन फ्रँकलीन या अमेरिकन लेखकाने म्हटले आहे, Tell me
and I forget. Touch me and I remember. Involve me and I learn.
प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी (Involve) करून घेण्याची एक जिद्द नेहमी सरांमध्ये
बघायला मिळायची. त्याकरिता ते ममतेने, मायेने, मार्मिकपणे, विनोदबुद्धीने विद्यार्थ्यांच्या
मनावर राज्य करीत राहिले. उगीच नाही सकाळी पाच वाजताही मुलं आनंदाने क्लासला
यायचे. दुरून दुरून देशपांडे सरांना शोधत यायचे. कुठलीही जाहिरात नाही,only
mouth publicity तरीही क्लास हाऊसफुल. जिथे जागा मिळेल तिथे हे दाटीवाटीने
बसून मुले आनंदाने शिकत होती.
१९९२ ते १९९५ दरम्यान स.भु. कॉलेजचे दिवस. आम्ही बीएस्सी. करत होतो आणि
सर आम्हाला मॅथ्स शिकवायचे. फक्त सरांच्याच क्लासला ९०% पेक्षा जास्त हजेरी
असायची. सकाळी अकरा वाजेपर्यंत इतर विषयांचे क्लास संपून जायचे. सरांचा क्लास
३.४५ ला असायचा. एवढा वेळ मध्ये असूनदेखील ३.४५ ला सरांच्या क्लाससाठी
सर्वजण हजर असायचे. मॅथ्स या विषयावर अनाहूत प्रेम करणारे आम्ही सर्व मित्र-
मैत्रिणी आणि आमचे आवडते सर. विनोद करताना चेहऱ्यावर कुठलेही भाव न येऊ
देता, पण मिश्कील हसणे हे सरांचे वैशिष्ट्य होते. आजही आठवलं तर असं भासतं
की, आपण क्लासमध्ये आहोत आणि सर शिकवत आहेत. त्यावेळी गमतीने आमचे
क्लासमेट त्यांना रणधीर कपूर म्हणायचे.
१९९५ ला सर कल्चरल कमिटीचे अध्यक्ष आणि मी कल्चरल सेक्रेटरी. स.भु.
विज्ञान कॉलेजच्या इतिहासात झाला नाही इतका अप्रतिम कार्यक्रम आम्ही साजरा केला.
आम्ही सर्व उत्साही मित्र-मैत्रिणी आणि आमच्या विचारांशी सहमत आमचे सर. यामुळे
हे वर्ष आयुष्यात सदैव स्मरणात राहील. या सहवासातून सरांच्या स्वभावातील आणखी
एक पैलू समजला. आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे. प्रसंगी चुकांची
70
जबाबदारी घेणे. याप्रसंगी सरांनी माझ्यासाठी जे कौतुकास्पद उद्गार काढले ते मला
आजही जसेच्या तसे पाठ आहेत.
पुढे लग्न होऊन योगायोगाने मी सुयोग काॅलनीत सरांच्या शेजारीच राहायला आले.
मी माझ्या घरातच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली. त्याचे उद्घाटन देखील सर आणि
वसुधा काकू यांच्या हस्ते केले. दरवर्षी गुरुपौर्णिमेला न चुकता मी सरांचा आशीर्वाद
घ्यायला जायचे. पण सर यावर्षी मात्र तुमची खूप उणीव भासली. सर, आपल्यासारखे
विद्यार्थ्यांना भरभरून ज्ञान देणारे शिक्षक या भूतलावर कमीच. पण, आपल्यासारख्या
आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या पावलावर पाऊल ठेवतच समाजात पाऊलवाट निर्माण करणारे
व त्या वाटेची वहिवाट व नंतर समाजात आदर्श राजमार्ग तयार होतात. आपल्या अथक
परिश्रमातून, अध्ययनातून, अभ्यासातून, ज्ञानोपासकतेतून व आचरणातून सरांनी
मुक्तकंठाने, मुक्तहस्ताने आणि मुक्तछंदाने समाज घडविण्याचे अविरत आणि अविश्रांत
काम केले.

त्यांना माझा सादर प्रणाम. संत कबीर म्हणतात,


“गुरुगोविंद दोनों खड़े, काको लागूँ पाय।
बलिहारी गुरू आपने, गोविंद दियो दिखाय ।।”
सरांचं सदैव आपुलकीने, आपलेपणाने आणि आस्थेने वागणे, हाच माझ्यासाठी खूप
मोठा आशीर्वाद आहे. धन्यवाद.

{ सौ. मृणाल सुनील अत्रे


(पूर्वाश्रमीची मनीषा रमेश भालेराव)
व्यवस्थापक, देवगिरी नागरी सहकारी बँक, औरंगाबाद

***

71
माझे शेजारी
माझे १९९२ साली लग्न झाले व मी सुयोग कॉलनीमध्ये राहायला आले. त्यावेळी
आमच्या घराच्या एका बाजूला रिकामा प्लॉट, समोरून दूरदूरपर्यंत शेत, पाठीमागे पडके
घर, ज्याला सर्वजण भूतबंगला म्हणत व दुसऱ्या बाजूला देशपांडे काका व काकू हे
एकमेव शेजारी.
तसे आमचे घर जुनेच होते, कारण माझे पती त्यांच्या शिक्षणापासून इथेच राहत होते.
त्यामुळे आम्ही लग्न करून इथेच आलो. तेव्हा शेजारी म्हणून काका-काकूच असत.मी
वयाने लहान व त्या मोठ्या असल्याने सुरुवातीला फारसे बोलणे होत नसे. त्यांच्याकडे
नेहमी गर्दी असायची. कधी क्लासची मुलं, कधी पालक, तर काही नातेवाईक. त्यांचा
व्याप मोठा होता. त्यातून आम्ही समोरासमोर आलो की बोलणे होत असे.
माझा संसार नवीन असल्याने त्यांनी संसारातील अनेक बाबी मला समजावून
सांगितल्या. सुरुवातीला काकांशी बोलणं तसं कमीच होतं, त्यामुळे त्यांच्या स्वभावाचा
मला फार अंदाज नव्हता. आम्हाला सुरुवातीला नळाचे पाणी पुरत नव्हते. काकूंकडे
बोअर असल्याने आम्ही त्यांच्याकडून पाणी आणत असू. एकदा हे काकांच्या नजरेस
आले. तेव्हा ते काकूंना म्हणाले, तिला बोअर लावून नळी घरात दे, ती बादलीने किती
पाणी नेईल? त्यावेळी काकांच्या प्रेमळ स्वभावाचा मला पहिल्यांदा अनुभव आला.
असाच एक पाण्याविषयी अजून प्रसंग आठवतो. समोरच्या शेतावर घरे झाली व कुटुंबे
राहायला आली. त्यांना पाण्याची वेगळी लाईन देण्यात आली. त्यावेळी माझ्या पाण्याचा
प्रश्न होताच. मी त्या लाईनमधून नळ घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा समोरच्यांचा याला
विरोध होता. त्यांना वाटत होते, एकाला दिले की समोरून सगळे घेतील. त्यामुळे जरा
वाद निर्माण झाला होता. तेव्हा काकांनी समोरच्यांना सांगितले की, मी या लाईनमधून
नळ घेणार नाही, पण सीमाला नळ घेऊ द्या. त्यांच्या या बोलण्याने वाद मिटला. त्यावेळी
माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आले व काकांच्या बोलण्याचा फार आधार वाटला.
त्यानंतरच्या काळात मलाही दोन मुले झाली. आम्ही संगोपनात रमलो. आमचे
आई-वडिलांचे कर्तव्य पार पाडणे चालूच होते. पण त्यातच दुःखाची बाब म्हणजे माझा
धाकटा मुलगा चौथ्या वर्गात असताना २००८ साली माझ्या पतीचे हृदयविकाराने निधन
झाले व माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीत काकूंनी आम्हाला खूप
मदत केली. अगदी पहिल्या दिवसापासून छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव ठेवून आमच्या
72
कुटुंबाला त्यांनी मदत केली. काकूदेखील वेळ काढून रोज येत, मला समजावत असत.
या गोष्टी सुरू होत्या. महिन्यानंतर काकांनी मला घरी बोलावले. मला समजावले,‘सीमा
जे घडले ते घडून गेले. हा नियतीचा खेळ आहे, प्रत्येकाला भोगावाच लागतो. आता
तू सावर व मुलांकडे लक्ष दे. त्यांच्या भविष्याचा विचार कर व व्यावहारिक गोष्टींकडे
लक्ष दे, जेणेकरून तुला पुढे त्रास होणार नाही व कुठलीही अडचण आल्यास मला
नि:संकोचपणे सांग.’
काहीही अडचण आली तर मीही जात असे व काका कितीही थकले असले तरी
मला वेळ देऊन मुलीसारखी वागणूक देत व समजावून सांगत. काकांचा मला नेहमीच
आधार वाटत होता. असे बरेच प्रसंग आहेत. शेवटी इतकेच म्हणेन,
काका तुम्ही शून्यातून विश्व निर्मुनी । कीर्ती सुगंध वृक्ष फुलवुनी ।
लोभ माया प्रीतीत देऊनी। अमर झालात तुम्ही जीवनी ।।

{ सीमा दिग्रसकर
औरंगाबाद

***

73
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती
सरांबद्दल लिहिण्यासारखे इतकं आहे की, एखादं पुस्तक लिहू शकतो. ही शब्दमर्यादा
त्यांच्या कार्यापुढे खूपच कमी आहे. म्हणतात ना, पूर्वसुकृत असल्याशिवाय नाही जुळत
गाठी. अगदी तसंच आमच्या बाबतीत घडलं होतं. सारंग देशपांडे माझ्या भावाचा जिवलग
मित्र आणि इथूनच सरांच्या कुटुंबाचा आणि आमचा ऋणानुबंधाचा प्रवास सुरू झाला.
सारंग माझ्या मोठ्या बहिणीला बहीण म्हणायचा आणि न चुकता राखी पौर्णिमेला राखी
बांधायचा. तिला अक्काच म्हणायचा. आणि खरोखरच ती देशपांडे कुटुंबाची वसू काकू
आणि काकांची मुलगीच होऊन गेली.
कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रेमाची, ऋणानुबंधाची नाती श्रेष्ठ ठरतात. हे
नियतीने दाखवून दिले. अक्काचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले आणि
सरांच्या, वसू काकूंच्या सहवासात येण्याचे भाग्य आम्हाला लाभले. सरांचे क्लास
ज्या कॉलनीत चालू होते ती म्हणजे सुयोग कॉलनी. तिथे माझी बहीण स्वतःच्या घरात
राहायला आली. खरंतर सुयोग कॉलनी हे नाव फक्त कागदोपत्री होतं. तुम्ही सरांच्या
कॉलनीत राहता का किंवा तुम्ही सरांच्या क्लासजवळ राहता का, असा पत्ता आम्हाला
विचारला जात असे. सरांचे क्लास हीच खरी ओळख होती.
खूप कष्ट आणि प्रामाणिकपणा या सरांच्या जीवनाच्या नाण्याच्या दोन बाजू होत्या.
सरांनी चांगली नोकरी सोडून स्वतःचे क्लासेस सुरू केले. घरचीही जबाबदारी होतीच.
ती पार पाडता पाडता त्या क्लासचा वटवृक्ष कधी झाला ते कळलंच नाही. पण ही
सर्व जबाबदारी पार पाडताना काकू त्यांच्या आधारस्तंभ होत्या. हे आम्हालाच काय,
सर्वांनाच नेहमी जाणवायचं. सरांची सकाळी साडेपाच वाजता पहिली बॅच असायची
आणि इतकी सकाळी असूनही वर्ग अगदी भरलेला असायचा. हे आम्हाला विद्यार्थ्यांच्या
सायकली, गाडींवरून समजायचं. आजच्या इतर शिकवणी वर्गाची तुलना जर सरांच्या
क्लासशी केली तर, सरांची साध्या वर्गांची व्यवस्था. एसी नाही की कुठलीही आरामदायी
साधनं नाहीत. केवळ आणि केवळ सरांची शिकवण्याची पद्धत, हातोटी, समजावून
सांगण्याची कला व अभ्यास करून घेण्याची पद्धत, विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ, या
आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमुळेच संपूर्ण औरंगाबाद मध्ये सरांचे शिकवणे अगदी साध्या
पद्धतीचे म्हणून प्रसिद्ध होते. सरांनी कधीही आपल्या क्लासची जाहिरात केली नाही
किंवा कॉलनीत कुठेही क्लासची साधी पाटीदेखील लावली नाही. कोणत्याही पेपरमध्ये
74
त्यांनी कधीच जाहिरात दिलेली नाही. केवळ जो विद्यार्थी सरांच्या शिकवणीला येईल तो
स्वानुभवावरून अजून चार-पाच मित्रांना घेऊन येई. सरांचे विद्यार्थी हेच त्यांची चालती
बोलती अनुभवाची जाहिरात होती.
शिकवणी वर्गाबरोबरच सरांनी विद्यार्थ्यांना एक शिस्त लावली होती.कॉलनीत क्लास
असायचे, पण क्लास सुटल्यावर एकाही विद्यार्थ्याने असे वर्तन केले नाही ज्यामुळे
सरांच्या नावाला कमीपणा येईल. क्लास सुटला की आम्ही घडाळात न पाहताही सांगत
असू किती वाजले ते.
मी भाग्यवान नाही, कारण सरांचे शिकवणे मला अनुभवायला मिळाले नाही. पण
एक काका आणि काकू म्हणून त्यांचा जो सहवास लाभला हे आमचे पूर्वपुण्य समजतो.
सरांची खूप वैशिष्ट्ये, गुण आहेत. आम्हाला जाणवलेले आणखीन एक वैशिष्ट्य
म्हणजे, अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी विनामूल्य शिकवले. त्याची जाणीवही
न होऊ देता. आमच्या कॉलनीत ते एक आदर्श कुटुंब होते. खडतर परिश्रम आणि
प्रामाणिकपणा या तत्त्वावर चालणारे काका व वसूकाकू यांना या तत्त्वाचे फळही मिळाले.
काकांचा मोठा मुलगा म्हणजे सारंग देशपांडे एक उत्तम इंजिनिअर, तर दुसरा बालरोग
त असलेला डॉ. मंदार देशपांडे हुशार, निष्णात डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे. सगळं
अगदी सुखात होतं. सरांनी सुयोग कॉलनी जरी सोडली तरी ते नियमित येत असत. पण
म्हणतात ना,
जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला….
देवालाही चांगली माणसंच फार आवडतात. सर्व विद्यार्थ्यांचे सर लाडके होते.
अजूनही त्यांच्या हातून खूप पिढ्या घडल्या असत्या. पण एका आजारामुळे ते शक्य झाले
नाही. तरीही त्या परिस्थितीत शिकवण्याची त्यांची जिद्द कायम होती. पण सरांना मुलाचे
नाही तर डॉक्टरचे म्हणणे ऐकावे लागले आणि काही काळ सर घरीच राहिले. खरंतर
आपण असं म्हणूया की, सर आपल्यातून फक्त शरीराने गेलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक
विद्यार्थ्यामधून ते आजही स्वतःच्या विद्यारूपी गुणांमुळे वसलेले आहेत. सरांना कोणीच
विसरू शकत नाही किंवा विसरणारही नाही. ते तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या, नातेवाइकांच्या
आणि असंख्य मित्रांच्या हृदयात आजही आहेत. फक्त देहाने आपण त्यांना पाहू शकत
नाही.
75
सरांच्या जाण्यामुळे त्यांची जागा भरून येणे शक्य नाही, मात्र नियतीला असे म्हणावे
वाटते, जमले तितुके केले तरीही
करणे सरले ही नाही। नकोस येऊ मरणा अजूनही । जगणे सरले नाही ….
अजूनही या काळात सरांच्या हातून खूप पिढ्या घडणे अपेक्षित होते. पण जन्म आणि
मृत्यू या दोन गोष्टी आजही परमेश्वरास्वाधीन आहेत. आज परदेशातही त्यांचे विद्यार्थी
आहेत. सरांनी दाखवून दिलेल्या कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या वाटेवरून सर्वांनी जावं
हीच त्यांना आजच्या दिवशी खरी श्रद्धांजली समजली जाईल.

{ सौ. विद्या सुशांत पंचपोर (मोदी)


शिक्षिका, औरंगाबाद

***

76
आदरांजली
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचे पैठण आठवले. नाथांच्या स्पर्शाने पुनित झालेले.
जायकवाडी धरणाने आधुनिक जगाच्या लक्षात राहिलेले. परंपरा घट्ट विणून ठेवणारे.
ऐतिहासिक महत्त्वाचे असलेले हे छोटे शहर, तालुका. त्यातील ती नाथगल्ली, दिंड्यांच्या
गजराने दुमदुमणारी. भानुदास-एकनाथच्या गजरात न्हाऊन निघालेली. त्या नाथगल्लीतून
कुच्चरओटा, रंगरहाटी आणि त्यानंतर तीर्थखांब, महानुभाव आश्रम आणि त्या जवळच
असलेले प्रतिष्ठान महाविद्यालय. या वळणांच्या रस्त्यावरच लागणारे ते वसूचे घर. छोटे
आणि टुमदार.
आठवणींचे गाठोडे एकदा सुटले ही त्यातील प्रत्येक आठवण अशी मनाभोवती फेर
धरते. सगळ्या आठवणी एकापाठोपाठ एक मनाचा ताबा घेतात. ते कॉलेजचे दिवस…
कॉलेजला जाताना-येताना हमखास पाय थांबायचे ते वसूच्या घरापाशी. तिथे या मनातलं
त्या मनात भरून मगच घर आठवायचं. वसू गोरीपान, उंच, पाठीवर वेणीचा शेपटा,
भावपूर्ण डोळे मनातील भाव सांगणारे. घरात गेले की, तिची आई सर्वांचं हसून स्वागत
करणारी, संसारासाठी सदैव पदर खोचून उभी. महिला मंडळाची मीटिंग वगैरे असली तर
त्यांच्या घरात गडबड असायची. त्यात डॉ. डाके बाई, नीताताई अजून आठवतात.
कॉलेजची चार वर्षं झाली. संपतासंपताच अनेकांचे संसार सुरू व्हायचे. नियतीने
दिलेले नशिबाचे दान घेऊन प्रत्येक जण संसारासाठी सज्ज व्हायची. अगदी निष्ठेने. तसेच
वसूच्या बाबतीतही झाले आणि कवितेची वही बाजूला ठेवून ती गणिताच्या क्लाससाठी
सिद्ध झाली. दोन मुलांना वाढवताना, संसारातील खस्ता खाताना, वर्षं अगदीं भराभर
निघून गेली. त्या काळात इतर मैत्रिणीही संसाराची लढाई लढत होत्या. दोन-चार वेळा
वसूच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. त्या थोड्या वेळाच्या भेटीतूनही तिच्या समृद्ध
संसाराची कल्पना आली. औरंगाबादचे ते घर तिने अगदी मनापासून परिपूर्ण केले होते.
आणि एक दिवस अचानक मन सुन्न करणारी ती बातमी कळली. कदाचित खोटी
असेल ही आशा फोल ठरली. वसूला फोन केला आणि तिचे ढासळलेले विश्व समोर
आले. ज्याच्या जोडीने इतकी वर्षं ठामपणे उभी होती तो आधारच निखळून पडला होता
आणि आयुष्य रंगहीन, रुचिहीन करून गेला होता. नवरा-बायकोचे नाते घट्टविणीने
बांधलेले. एकमेकांच्या उणिवा झाकून त्यांचे मोठेपण खूप मोठे करणारे. प्रत्येक
सुखदुःखात एकत्र असलेले. संसाराचा निर्णय एकत्र घेऊन ते पूर्ण होताना खुलणारं,
77
बहरणारं आणि आता अशा पायरीवर पोहोचलं होतं की, पूर्ण झालेली स्वप्ने दोघांनी
हातात हात घालून परत एकदा न्याहाळायची. कृतार्थता अनुभवायची आणि राहिलेला
प्रवास सुखाने शांतिपूर्ण करायचा. पण नियतीला हे मान्य नव्हतं. चांगल्या रस्त्यावरून
जात असताना एकदम खड्ड्यात पडावे तसे होते आणि जेव्हा हे लक्षात येते की, मला
वेगळे अस्तित्वच नाही त्यांच्याशिवाय, आपले वेगळे जगच नाही. तेव्हा निर्माण होणारी
पोकळी खूप भयानक असते. अनेक वर्षांच्या आठवणी सतत भोवती पिंगा घालतात
आणि जगणे अवघड होते.
देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व जबरदस्त होते. औरंगाबादमधील गणिताच्या
मार्गदर्शनासाठी तो एकमेव पर्याय होता आणि या प्रभुत्वाबरोबरच माणूसपण समृद्ध
करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. मला चांगले आठवते ते त्यांनी मंगळागौरीच्या जागरणाच्या
वेळेस गायलेले दिन ढल जाये.. हे गाईड या सिनेमातील सुप्रसिद्ध गीत.
अशा सर्व दिशांनी समृद्ध असलेला जोडीदार अचानक निघून गेल्यानंतर स्वतःला
सावरणे अवघडच. काळ हे सर्व दुःखांवरील औषध असते, असे म्हणतात. पण या
जखमेवर खपली बसणे फारच अवघड. पण नियती जसे प्रश्न निर्माण करते तसेच उत्तरही
तीच देईल, अशी आशा करू. उर्वरित आयुष्य जगायला वेगळ्या मार्गावरून बळ देईल.
मुले, सुना, नातवंडे सर्व मिळवून त्यासाठी प्रयत्न करतील हीच आशा.

{ सौ. मंगला रमेश भारदे


ता. शेवगाव, जि. अहमदनगर

***

78
काकांचा आशीर्वाद
इसवी सन २००७ ला मी नोकरीच्या शोधात होतो. बऱ्याच ठिकाणी नोकरी शोधत
काही वर्षं काही महिने नोकरी केली, पण कुठेच मन रमेना. मी एक माळकरी. म्हणजे
नेहमी मी गळ्यात तुळशीची माळ घालणारा. माझे आई-वडील सर्व कुटुंबच असे.
काहीच खाणे नाही, पिणे नाही. त्यामुळे आजच्या जगात निभाव लागणे अवघडच.
आम्ही सर्वजण पदमपुऱ्यात राहत होतो. अधून-मधून माझा भाऊ देशपांडे सरांच्या
क्लासवर जायचा. त्याच्या मित्रासोबत तिथल्या पार्किंगचेही काम करायचा. या
ओळखीतूनच मी देशपांडे सरांच्या क्लासवर नोकरीला लागलो.
माझ्या निर्व्यसनी स्वभावामुळे सरांचा आणि मॅडमचा आवडता झालो. जनार्दनाच्या
अंगी कामचुकारपणा नाही… असं सर मॅडमजवळ बोलायचे. मलाही कामाशी काम
करणे आवडायचे. सरांचा स्वभाव शांत. विनाकारण कुणावर चिडायचे नाहीत. उद्धटपणे
बोलायचे नाहीत. सर गरीब-श्रीमंत असा भेदभाव कधीच करत नसत.
बारावीची क्लासला येणारी मुले माझे मित्र बनत गेले. क्लासमध्ये काम करणारे
इतरही मित्र होते. एकंदर तिथले वातावरण खेळीमेळीचे होते. खूप काम असले तरी
सरांच्या स्वभावामुळे कामाचा ताण जाणवायचा नाही. सर शिकवत असताना अनेकदा
क्लासमध्ये थांबावे लागे. काही वेळा सरांनी शिकवताना केलेले विनोद कळत नसत, पण
पूर्ण वर्ग हसत-खेळत शिकत आहे हे कळायचे व मी आनंदित व्हायचो.
पूर्ण औरंगाबादमधून मुलं क्लाससाठी उन्हात, पावसात येतात म्हणजे सर खूप
छान शिकवतात हे कळायचे. अडी अडचणीला सर पैशांची मदत करायचे. प्रत्येकाचे
सुखदुःख जाणून घ्यायचे. आम्ही सर्व क्लासचे नोकर त्यांना सर न म्हणता काका
म्हणायचो. कधी कधी त्यांच्याबरोबर गाडीमध्ये जाण्याचा योग येई. तेव्हा ते राजकारण,
मतदान, निवडणूक अशा अनेक विषयांवर भरपूर गप्पा मारत. ‘काय जनार्दन, आपल्या
मतदारसंघातून कोण निवडून येईल?’ असेही विचारायचे.
काकांना कामच इतके असे की त्यांना बिनकामाच्या गप्पा मारायला कधीच आवडले
नाही. विद्यार्थ्यांशिवायही त्यांच्याकडे काहीबाही काम घेऊन मित्र, ओळखीचे आणि
नातेवाईक यायचे. महालक्ष्मीच्या सणाला आम्ही सर्व क्लासचे नोकर प्रसादाचे जेवण
करीत असू.
माझे लग्न ठरले तेव्हाही सरांनी मला आर्थिक मदत केली. विशेष म्हणजे त्यादिवशी
79
क्लासला सुट्टी दिली. त्यामुळे क्लासमध्ये नोकरी करणारे माझे सर्व मित्र माझ्या
लग्नाला पाचोडला येऊ शकले. मॅडमही माझ्या लग्नाला आल्या होत्या. हीच आपली
जिवाभावाची माणसे आहेत, असे वाटू लागले.
मला मुलगा झाल्यावर तो दाखवायला आम्ही काकांकडे गेलो. काकांनी आम्हाला
भरभरून आशीर्वाद दिले. सध्या मी काकांचा मुलगा डॉ. मंदार देशपांडेकडेच राहतो.
१४ ऑक्टोबरला काका हे जग सोडून गेले. फार फार वाईट वाटले. ईश्वर त्यांच्या
आत्म्यास शांती देवो.

{ जनार्दन बबनराव गायकवाड


औरंगाबाद

***

80
प्रश्नांकित नव्हे….. उत्तरांकित व्यक्तिमत्त्व…..
गणित हा असा विषय आहे की बहुतेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतंच. मग ते
अभ्यासातील गणित असो किंवा जगण्यातलं गणित असो. परंतु प्रत्येक गणित सहज
आनंदाने सोडवणारे आमचे एम.ए.डी. सर. गणित म्हटलं की आपोआप मागून येणारं
नाव.
लहानपणापासून परिस्थिती तशी जेमतेम. त्यातून तीन-चार भावंडं, वडील. सर्वच
मोठा प्रपंच चालणे व चालवणे फार जिकिरीचे म्हणजे अवघडच. अल्पवयातच आईचे
छत्र हरवल्यामुळे प्रचंड पोकळी निर्माण झालेली आणि त्यात हलाखीच्या परिस्थितीने
आलेला एकाकीपणा सतावत होते. पण म्हणतात ना, सुंदर सुबक मूर्ती घडण्यासाठी
त्यालाही प्रचंड हातोडे खावे लागतात. तसंच काहीसं. कालांतराने आजीने (आईची
आई) जालन्याला घेऊन जाऊन सांभाळण्याचा निर्णय झाला. कुठलीही तक्रार न करता
व आहे ती परिस्थिती चांगलीच आहे असे मानून जालना शहरातच दहावीपर्यंतचे शिक्षण
उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले. हौस-मौज कधी मनाला शिवली देखील नाही. मजा मात्र
एकच, सायकलवर फेरफटका.
वयाच्या या टप्प्यावर थोडं मागं वळून बघितलं, तरी अंगावर काटा येतो. पण
आमच्या गप्पा रंगल्या की कायम एकदा तरी म्हणत असतकी, खरंच तो काळ सुखाचा
आणि आनंदाचा होता. तास न‌् तास गप्पांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा.
पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद निश्चित झाले. शिक्षण तर घ्यायचेच, परंतु कसे?
व पुढे काय? हा प्रश्नही भेडसावत होताच. मात्र, जन्मजातच सहनशील स्वभाव,
प्रखर व तल्लख बुद्धी शांत बसू देत नव्हती. देव जेव्हा एक दार बंद करतो तेव्हा दहा
उघडीही करतो, तसंच काहीसं झालं. औरंगाबादला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, मित्रांना
गणित शिकवण्याचं काम सुरू झालं. यामुळे उदरनिर्वाह व राहण्याची व्यवस्था झाली.
अल्पवयापासून सुरू झालेलं ज्ञानार्जनाचं काम शेवटच्या श्वासापर्यंत अविरत चालूच
राहिलं. लहान वयात, अशा परिस्थितीत मुलांना अवघड वाटणारा विषय हळूहळू आवडू
लागला. हसत खेळत मन रमवून व अर्थातच स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर प्रचंड प्रसिद्धी
व नाव एक नवीन नाव उदयास येत होतं. वर्षांमागून वर्षे लोटली. शिकवणी आणि
शिक्षण चालूच होतं. बघता-बघता बी.एस्सी. मग एम.एस्सी. गणित विषयात सुवर्णपदक
मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आणि खऱ्या आयुष्याला सुरुवात
81
झाली. प्रथम स्वतःच्या शिकवण्या चालू ठेवून अर्धवेळ नोकरी पत्करली. ख्याती आणि
शिकवण्याची पद्धत अल्पावधीतच रुजवली गेली. हेच लक्षात घेता औरंगाबादमधील
नामवंत सरस्वती भुवन महाविद्यालयाची नोकरीची संधी चालून आली. नोकरी पूर्णवेळ
असल्यामुळे शिकवण्यांची वेळ संध्याकाळ ठरली. आता मोठे बंधूही नोकरीवर रुजू
झाल्यामुळे स्वतःची नोकरी व शिकवणी यामुळे आर्थिक बाजू बऱ्यापैकी सावरत होती.
एमएडी सरांचा विवाह आमच्या वसुधेशी करण्याचं निश्चित झालं. ठरल्याप्रमाणे
लग्न यथोचित पार पडून सर आता आमच्या पैठणचे जावई झाले. फक्त मुकुंदराव
म्हणून ओळख असलेल्या किंवा आम्ही ओळखत असलेल्या सरांचा स्वभाव प्रेमळ,
समजुतदार, शांत स्वभावानुसार यशस्वी आयुष्याबरोबरच संसाराची सुखी वाटचाल
चालू झाली. परंतु या सगळ्यात समाजकारणही सर विसरले नाहीत. भूतकाळातील
परिस्थितीची जाण इतकी होती की कालांतराने बऱ्याच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अगदी
स्वतःच्या घरात राहण्याची जागा देऊन आयुष्य घडवलं. बऱ्याच कष्टाने शिकवणी
वर्गाचा जम चांगलाच बसला होता. अक्षरशः कुठलीही जाहिरात न करता शिकवणी
क्लासमध्ये विद्यार्थ्यांना जागेचा तुटवडा भासू लागला. अपार कष्ट, सतत बोलणं, कमी
झोप… ताण वाढत होता. शेवटी पूर्ण विचार आणि निश्चय करून नोकरीचा राजीनामा
देऊन पूर्णवेळ म्हणजे सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत शिकवण्यांचा पदभार घेतला.
अत्यंत साध्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना कळेल असे शिकल्यामुळे निकाल पण तसा येत
होता.
पाहता पाहता प्रा. मुकुंद देशपांडे हे एमएडी म्हणून औरंगाबाद, मराठवाडा आणि
महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. प्रचंड बैठक, बोलणे व रोज पंधरा तास शिकवणे यामुळे
शारीरिक आणि मानसिक ताण वाढत होता. त्यामुळे संसाराच्या रथाचे सारथ्य पत्नी
वसुधाकडे सोपवले. गणितातील समीकरणं सोडवता सोडवता आयुष्याचं समीकरण
बदलणारी व्यक्ती म्हणजे एमएडी सर. यशाच्या या शिखरावर ही स्वतःला यत्किंचितही न
बदलता समाजसेवाही चालूच होती. खरोखरच शून्यातून विश्व घडवले. ते नेहमी म्हणत
असत,
भूतकाळ + वर्तमानकाळ = भविष्यकाळ.
तसेच भूतकाळाचे दुःख नको, वर्तमानातील परिस्थितीला तोंड देत भविष्य
82
परमेश्वराच्या स्वाधीन करायचे. याच गणितावर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला तोंड
देऊन, कष्ट करून, स्वावलंबी बनून, स्वबळावर आपले आयुष्य घडवले. कुठल्याही
बंधनात, मोहात न पडता स्वतःचा पूर्णवेळ झोकून, अनेकांचे मार्गदर्शक बनून, आयुष्य
घडवताना लाखमोलाची साथ देणारी आमची वसु. तिने सासर-माहेर, विद्यार्थी-पालक,
घर-ऑफिस व अपत्यांची काळजी उत्तमरीत्या सांभाळून जणू एक बाजू भक्कम केली
होती. कोणीतरी म्हणून गेलं की, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि हा
दाखला माझी बहीण, मैत्रीण, सवंगडी वसुधासाठी अगदी योग्य आहे. आम्ही दोघीही
नात्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर इतक्या गुंतूनही बालपणापासून ते आतापर्यंत प्रत्येक सुख-
दुःखात सोबती राहून, नात्यांचा एक वेगळेपणा, आपुलकी, आपलेपणा जपला यासाठी
खरंच आनंद होतो.
बोलण्या लिहिण्यासाठी इतकं आहे की, संपणारच नाही. सरांच्या, वसुधाच्या,
आमच्या कुटुंबाच्या इतक्या आठवणी आहेत, परंतु वेळेअभावी कुठेतरी थांबावं लागत
आहे. एमएडी सरांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वाला शतशः प्रणाम करून मी इथेच थांबते.
धन्यवाद.

{श्यामला अकोलकर
पुणे

***

83
ते माझे जावई होते
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले।
माणसाने माणसाशी माणसासम वागणे।।
या पद्याच्या ओळी वाचल्यावर मला आठवण आली ती मुकुंदराव देशपांडे यांची.
अनेक जण आज त्यांना वेगवेगळ्या नावांनी व नात्यांनी ओळखतात. विद्यार्थ्यांच्या जगात
तर शिक्षक म्हणून त्यांचे नाते सर्वश्रुतच आहे. यासर्व नात्यांपेक्षा एका वेगळ्या नात्याने
आम्ही बांधले गेलो होतो. ते माझे जावई होते. माझ्या मोठ्या मुलीचे पती…. वसुचा नवरा.
त्यांना आम्ही प्रथम पाहिले व हेच आपले जावई ही खूणगाठ मनाशी पक्की केली.
नंतर काहीही चौकशी न करता माझ्या काळजाचा घड निर्धास्तपणे त्यांच्या हवाली केला.
नाही पाहिले घरदाराला । पाहून दिले शहाण्या वराला ।।
हे शहाणपण केवळ बौद्धिक गणिताचे नव्हते, तर सर्वच विषयांचे होते. दूरदृष्टी,
माणसाचा स्वभाव, माणसाची पारख, लोहचुंबकीय स्वभाव. एक ना दोन… यादी
लांबत जाईल. हे सगळं असूनही पाय सदैव जमिनीवर. निगर्वी स्वभाव व साधेपणा या
तर त्यांना परमेश्वराने बहाल केलेल्या देणग्याच होत्या. लहानपणीच मातृछत्र हरवलेले व
हलाखीची परिस्थिती. याच्याशी झगडतच यशाचे शिखर गाठले. त्यांनी मला कधी सासू
मानलेच नाही. “आई” या नात्यानेच ते सदैव वागायचे. माझ्या मुलीला वसुला कधीही
माहेरची आठवण आली की, ते लगेच दोघेही पैठणला घेऊन जायचे. पैठण-औरंगाबाद
अंतर अगदीच कमी. रविवारी सकाळी येऊन संध्याकाळी परतजायचे, कारण सोमवारी
सकाळीच क्लास असायचे. ते आले की माझ्या मुलांना खूप आनंद व्हायचा. लहानात
लहान, तर थोरात थोर होण्याची कला त्यांना अवगत होती. गल्लीतील लोकांनाही न
सांगता आमचे जावई आले हे कळायचे. वातावरणात चैतन्य यायचे. सर्वजण थोडा थोडा
वेळ येऊन भेटून जायचे. जावईपणाचा थोडाही दर्प त्यांच्या वागण्यात जाणवायचा नाही.
बरं, जावयाचा पाहुणचार तरी किती सोपा… गुळाचा शिरा अन‌् कांद्याचे भजे.
माझ्या सर्व मुलांच्या शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. माझ्या
सासूबाई जात्यावरील ओवीत एकओवी म्हणायच्या,
जावई जावई कडुलिंबाचा गं पाला । लेकी बाई तुझ्यासाठी गोड केला ।।
ही ओवी माझ्या जावयांनी पूर्णपणे खोटी ठरवली. उलट असे म्हणावेसे वाटते की,
जावई जावई खडीसाखरेचा खडा । वसू बाईच्या संसारात पडे प्राजक्ताचा सडा ।।
84
माझ्या लेकीच्याच नाही, तर अनेकांच्या संसारात सुगंध निर्माण करणारे माझे
जावई…. नव्हे, माझा मुलगाच…. अचानक या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. अश्रूंना
थोपवणे अवघड आहे. ते शरीराने जरी गेले तरी मनाने, कृतीने आमच्यातच आहेत.
धन्य तो माणूस. त्यांच्या धन्यतेला त्रिवार प्रणाम..

{ श्रीमती वनमाला देशमुख


पैठण.
(लेखिका एम.ए.डी. सरांच्या सासूबाई आहेत. वय वर्षं ८८.)

***

85
मुकुंदराव म्हणजे खंबीर आधाराचं दुसरं नाव
१९९८ मध्ये माझी मुलगी नयन हिचे लग्न ठरले. नयन म्हणजे आमच्या घरातले
शेंडेफळ. हसणारे, खेळणारे. मांजरीच्या पिल्लासोबत रमणारे…. सासरी जाऊन कशी
राहील, अशी चिंता लागली होती. परंतु मुकुंदराव यांच्या एका वाक्यामुळे आम्हाला
धीर आला. ते म्हणाले होते, “आमच्या घरी दोन्ही मुलं. मुलगी नाही. नयनच्या रूपाने
आम्हाला मुलगीच प्राप्त झाली.”
मुकुंदराव म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर, काळजी करणारे मन, स्वतःच्या
इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंत:करण.
खूप समजूतदार. अकारण रागावलेले किंवा चिडलेले मी त्यांना कधी पाहिले नाही.
मनानेही खूप प्रेमळ.
एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटलेच आहे…
‘जर एक देश भ्रष्टाचारमुक्त आणि सुंदर मनाचे राष्ट्र बनू इच्छित असेल, तर तीन
प्रमुख सामाजिक सदस्य आहेत, जे काही फरक करू शकतात. ते म्हणजे वडील, आई
आणि शिक्षक.’ हे वाक्य मुकुंदराव यांच्या बाबतीत तंतोतंत बरोबर वाटते.
मुकुंदराव, तुम्ही या मराठवाड्याला, राज्याला व मी म्हणेल देशाला (कारण आपले
विद्यार्थी सातासमुद्रापार जाऊन उत्कृष्ट कार्य करत आहेत) सुंदर बनवण्यात यशस्वी
झालात.

{ सुरेश यशवंतराव भोपी


पुसद

***

86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
अमृतवेलीवरील एक सुगंधित पुष्प
मुलीचे शिक्षण, प्रशिक्षण पूर्ण झाले की, आई-वडिलांना काळजी असते आपल्या
मुलीच्या विवाहाची. आपल्या मुलीस अनुरूप जोडीदार मिळावा, सासरची माणसं
प्रेमळ असावीत, आपली मुलगी सुस्थळी पडावी, अशी इच्छा प्रत्येक पालकाची
असते. अपूर्वाचा एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागल्यानंतर तिच्या
विवाहासंबंधीचा विषय अर्चनाने माझ्याकडे काढला. अपूर्वाने दहावीच्या वर्गात प्रवेश
घेतल्यापासून अभ्यासाशिवाय इतर कुठल्याही गोष्टीत ती फारशी रमत नसे. त्यामुळे
काही दिवस तिला शारीरिक, मानसिक विश्रांती मिळावी म्हणून तिच्या विवाहाचा
विचार तूर्त करू नये, असं मला वाटत होतं. अपूर्वाचेदेखील मन पुढील शिक्षण एम.डी.
होईपर्यंत लग्नाचा विचार आईने करू नये, असे होते. परंतु विवाह हा जीवनातील एक
महत्त्वाचा संस्कार आहे. योग्यवेळी योग्य वयातच व्हायला हवा, लहान रोप जमिनीत जसे
लवकर रुजते तसेच योग्य वयात मुलींचे लग्न झाल्यास त्या संसारात रमतात. सासरच्या
वातावरणात लवकर समरस होतात, असं अर्चनाचं ठाम मत. तिचा हा विचार मला पटला
अन ्मग आम्ही अपूर्वासाठी योग्य स्थळ शोधण्यासाठी सुरुवात केली.
सर्वसाधारणपणे सर्व पालक सुरुवातीला आपल्या नात्यांतील, परिचयातील,
स्थळांचा प्राधान्याने विचार करतात. आम्ही तसाच विचार केला. डॉ. मुकुंदराव देशपांडे
आमच्या नात्यातीलच. नातेवाइकांमध्ये तसेच समाजामध्ये एक प्रतिष्ठित, सुसंस्कृत,
उच्चशिक्षित, संपन्न आर्थिक स्थिती असलेलं कुटुंब अशी त्यांची ओळख. चि. मंदार
दोन वर्षांपूर्वी एमबीबीएस झाला असून पुढील शिक्षण एमडी करत आहे हे माहीत होतं.
मंदारचे शिक्षण अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे आपल्या प्रपोजलचा विचार होईल की
नाही, अशी शंका मनात होती.मात्र, आपण प्रयत्न करून बघावा, असे अर्चनाचे मत.
एका रविवारी मी व अर्चना, देशपांडे यांच्याकडे गेलो. डॉ. मुकुंदरावव वसुधाताई
यांनी प्रसन्न मुद्रेने आमचे स्वागत केले. थोड्या औपचारिक गप्पा, इतर नातेवाइकांची
विचारपूस झाल्यानंतर मी त्यांना, अपूर्वा नुकतीच एमबीबीएस परीक्षा पास झाली आहे,
असे सांगितले. मी पुढे काही बोलणार तेवढ्यात मुकुंदराव म्हणाले, “अहो, अपूर्वा तर
आमची विद्यार्थिनी. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचेही
पेपरमध्ये वाचल्याचे मला आठवते.” मुकुंदराव सहा-सात वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाबद्दल
सांगत होते. मी आश्चर्यचकित होऊन ऐकत होतो. आश्चर्य वाटत होतं त्यांच्या तीव्र
87
स्मरणशक्तीचं. दरवर्षी शेकडो विद्यार्थी त्यांच्या शिकवणी वर्गातून बाहेर पडत असताना,
कितीतरी विद्यार्थ्यांना ते नावासकट ओळखत असत. अपूर्वाबद्दल सर्वसाधारण माहिती
त्यांना आहे हे माहीत झाल्यामुळे तिच्याबाबत फारसं सांगण्यासारखं काही नसल्यामुळे
थोडं थांबून मी म्हणालो,“यावर्षी अपूर्वाचा विवाह करण्याचा आम्ही विचार करतोय.
चि. मंदारसाठी आपण अपूर्वाचा विचार करावा,” असे मी त्यांना म्हणालो. आमच्या
येण्याचा हेतू आता त्यांना कळलाहोता. काहीसं मंद हसून ते म्हणाले, “भालगावकर,
मंदारच्या लग्नाचा विचारही अद्याप आमच्या मनात आला नाही. यासंदर्भात तुम्हीच प्रथम
आमच्याकडे आला आहात. मंदारचे एमडी अद्याप पूर्ण झाले नाही. तरी मंदारचे याबाबत
मत घेऊन तुम्हाला तसे कळवतो. त्या दोघांची पसंती झाल्यास पुढे काही अडचणी येतील
असे वाटत नाही. फार फार तर विवाहाची तारीख आपल्याला एक-दीड वर्ष पुढे निश्चित
करावी लागेल.”
मुकुंदराव यांनी सांगितलेली अडचण बरोबर होती. सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात
प्रत्येक पालकांना आपला मुलगा उच्चशिक्षित व्हावा, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य
मिळवावे. नोकरी-व्यवसायात स्थिर व्हावे व त्यानंतरच लग्नाचा विचार करावा असे
वाटणे स्वाभाविक आहे. परंतु मुकुंदराव यांनी आम्हाला सरळ नकारार्थी उत्तर दिले
नाही. त्यांचे संवेदनशील मन, सकारात्मक विचार करण्याची पद्धत, भिडस्त स्वभाव
व सौजन्यपूर्ण वागणूक यामुळे आम्हाला खूपच समाधान वाटले. त्यांचा निरोप घेऊन
आम्ही निघालो. मुकुंदरावांनी विचारले,“तुम्ही कसे आलात?” “रिक्षाने.” मी सांगितले.
मुकुंदराव आमच्याबरोबर रिक्षा स्टँडपर्यंत येण्यासाठी निघाले. मला मात्र खूपच
संकोचल्यासारखं वाटलं. शिष्टाचार म्हणून फार तर गेटपर्यंत येणं ठीक. मी त्यांना रिक्षा
स्टँडपर्यंत न येण्याबाबत म्हणालो. शेवटी वसुधाताई म्हणाल्या,“अहो भालगावकर,
देशपांडे फारच थोड्या लोकांना सोडण्यासाठी गेटपर्यंत जातात. तुम्हाला रिक्षा स्टँडपर्यंत
सोडण्यासाठी ते येत आहेत. म्हणजे त्यांचा मूड आज छान दिसतोय. येऊ द्या त्यांना
स्टँडपर्यंत.” मुकुंदराव रिक्षा स्टँडपर्यंत आमच्याबरोबर आले. रस्त्याने निरनिराळ्या
विषयांवर गप्पा झाल्या. त्यांच्याशी बोलताना विषय कधीच कमी पडत नसत. सर्वच
क्षेत्रांत त्यांना विलक्षण गती व माहिती होती.
पहिल्या भेटीतच मुकुंदरावांनी सांगितल्याप्रमाणे सात-आठ दिवसांनंतर मुकुंदराव,
88
वसुधाताई, मंदार, सारंग, नयन आमच्याकडे आले. अपूर्वाची सगळ्यांशी ओळख झाली.
मंदारबरोबर बोलणं झालं अन् थोड्या दिवसांनंतर त्यांच्याकडून पसंतीसंबंधी होकार
आला. आम्हा दोघांना आणि आता तिघांनाही मनापासून खूप आनंद झाला. आम्हीही
त्यांच्या घरी जाऊन आमच्या सर्वांच्या पसंतीसंबंधी तसेच नवीन नातेसंबंध निर्माण होत
आहे, त्याबाबत झालेला आनंद व्यक्त केला.
विवाहाची तारीख निश्चित करण्यास बराच अवधी होता. मधून-मधून देशपांडे
यांच्याकडे आमचे जाणे- येणे होते. एक दिवस असंच बोलण्याच्या ओघात मी मुकुंदराव
यांना विचारले, “आत्मारामपंत सध्या कोठे असतात?” आत्मारामपंत त्यांचे सासरे.
आमच्या दुर्गाकाकूकडून नातं. आमच्या गावी भालगावला त्यांचं जाणं- येणं होतं.
आमच्या वडिलांचेही त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. आत्मारामपंत सध्या पुणे येथे असतात,
असं मुकुंदराव म्हणाले. लगेच मुकुंदराव म्हणाले, मध्यंतरी फोन करून मी त्यांना
“मंदारने अपूर्वासंबंधी पसंती दिली आहे” असे सांगितले. आत्मारामपंत म्हणाले “अपूर्वा,
अशोकची मुलगी, उत्तमरावची नात. तुम्हाला रामाचा प्रसाद मिळाला आहे असे समजा.”
मुकुंदराव, आत्मारामपंतांनी व्यक्त केलेले मत त्यांच्याच शब्दांत मला सांगत होते.
मुकुंदरावांच्या बोलण्यातील आत्मीयता, सहजपणा, मोकळेपणा या प्रसंगातून आम्हाला
जाणवला.
आत्मारामपंतांनी आमच्या गावी असलेला समर्थस्थापित प्रभू रामचंद्रांचा मठ,
मठातील धार्मिक, आध्यात्मिक वातावरण, घराण्याची उच्च परंपरा, एकत्रित कुटुंब
पद्धती, कुटुंबातील आनंदी वातावरण, परंपरेने साजरे होणारे सण-उत्सव हे सगळे
जवळून बघितले होते. त्यामुळे नवीन नातेसंबंध जुळून येत आहेत याबद्दल त्यांना आनंद
वाटणे स्वाभाविक होते. मलाही आमच्या घराण्याबद्दल, आई-वडिलांबद्दल त्यांनी व्यक्त
केलेल्या उत्स्फूर्त भावनांबद्दल मनापासून आनंद वाटला.
पूर्वीच्या काळी मुलामुलींचे विवाह ठरवताना कुळ, वंश, घराण्याची सामाजिक
प्रतिष्ठा, सुसंस्कृतपणा, संस्कार या बाबी प्राधान्याने बघितल्या जात. आज-काल असा
विचार फारसा केला जात नाही. आधुनिक वैज्ञानिक संशोधन मात्र पूर्वीच्याच विचाराला
पुष्टी देतात. सुखी आनंदी वैवाहिक जीवन हे मुला-मुलींच्या आनुवंशिक रचनेवर
अवलंबून असते. मातापित्यांची शारीरिक-मानसिक जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढील
89
पिढीत संक्रमित होतात. काही जीन वैवाहिक जीवनात अडचणीदेखील निर्माण करतात.
असे संशोधन स्वीडनमधील कॅरोलिन्सका इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केले आहे. मंदार-
अपूर्वाचा विवाह ठरवताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या बाबींचा विचार आत्मारामपंत व
मुकुंदराव यांनी केला आहे, याचे आम्हाला मनापासून समाधान वाटले.
मुला-मुलींच्या पसंतीनंतर लग्नाआधीचा कौटुंबिक कार्यक्रम म्हणजे साखरपुडा.
काही कुटुंबांत तो इतक्या धूमधडाक्यात साजरा केला जातो की कधी कधी लग्न
सोहळ्याऐवजी साखरपुड्याचा कार्यक्रम लोकांच्या स्मरणात राहतो. आम्हालाही
प्रचलित रूढी, पद्धतीप्रमाणे हा कार्यक्रम कार्यालय घेऊन नीटनेटक्या पद्धतीने करावा
असे वाटत होते. त्यासंबंधी पूर्वतयारी करून आम्ही मुकुंदरावांकडे त्याबाबत विषय
काढला. आम्हाला असं वाटलं की, मुकुंदराव आनंदाने आमच्या प्रस्तावास होकार
देतील. पण अनुभव अनपेक्षितरीत्या निराळाच आला. मुकुंदराव शांतपणे म्हणाले,“हे
बघा अशोकराव, आपली दोन्ही घराणी, नातेवाईक सर्वसाधारणपणे एकमेकांना
परिचित आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम आपण घरीच करून घेतला तरी चालेल.” त्यांच्या
बोलण्यातील प्रामाणिकपणा बघून आमच्या घरीच अगदी मोजक्या नातेवाइकांच्या
उपस्थितीत हा साखरपुड्याचा कार्यक्रम आम्ही उत्साहाने, आनंदाने, थोडक्यात सांगायचं
म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा अवलंब करून साजरा केला.
सामाजिक प्रतिष्ठेसाठी, मोठेपणासाठी, आर्थिक क्षमता असतानाही अनावश्यक
खर्च करणे त्यांना आवडत नसे. इतरांनाही, आम्हालाही तसा सल्ला ते देत असत. कमी
खर्चात, साधेपणाने, कौटुंबिक कार्यक्रम साजरे करून जीवनात आनंद मिळवता येतो, हे
मुकुंदरावांच्या वागणूकीतून आम्हाला वेळोवेळी जाणवत होतं.
माणूस हा प्रकृतीपासून निर्माण झाला आहे. सत्त्व-रज-तम हे प्रकृतीचे तीन गुण
आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या मनात, बुद्धीत, स्वभावात हे गुण आढळून येतात. प्रत्येक
व्यक्तीमध्ये या गुणांचे प्रमाण किती हे कोणीही सांगू शकत नाही. परंतु माणसाच्या
जाणिवा, त्यांचे समाजातील वागणे, व्यवहार, आचरण यावरून त्यामध्ये गुणांचे प्रमाण
किती याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. मुकुंदरावांचा शांत, निर्मोही, निगर्वी स्वभाव,
साधी राहणी, बोलण्यातील, वागण्यातील सुसंस्कृतपणा. आपल्या सहवासात येणाऱ्या
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची मनापासूनची इच्छा. समाजाचं,
90
प्रकृतीचं आपण काही देणे लागतो. आपल्या ज्ञानाचा, समाजासाठी, विशेषतः शिकवणी
वर्गातून मुलांना मार्गदर्शन करण्याची इच्छा. या बाबींचा विचार केल्यास मुकुंदराव यांच्या
व्यक्तिमत्त्वामध्ये सात्विक गुणांचे प्रमाण खूपच आहे, असं मला त्यांच्या सहवासात
आल्यापासून नेहमी वाटत होतं.
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही सतत कार्यरत राहिल्यामुळे मागील वर्षी त्यांची
प्रकृती जास्त खालावत गेली. मंदार, सारंग त्यांच्या नोकरीच्या व्यवसायाच्या
जबाबदाऱ्या बाजूला ठेवून सतत काळजी घेत असत. अथक प्रयत्न करूनही प्रकृती
शरीर औषधोपचाराला साथ देत नव्हती. आणि शेवटी पुणे येथे त्यांचे दुःखद निधन
झाले. मला तसेच आमच्या कुटुंबातील सर्वांना खूप वाईट वाटले. अमृतवेलीवरील एक
सुगंधित पुष्प शिशिर ऋतू नसताना अद्याप आपल्या अस्तित्वाने व परिसरातील वातावरण
सुगंधित करण्याची क्षमता असताना, वेलीपासून हळुवारपणे गळून पडावे, तसे मुकुंदराव
आपणा सर्वांना सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांच्या सहवासातील आठवणी
दीर्घकाळ नव्हे, तर कायमच्या आपल्या स्मरणात राहतील.
त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

{अशोक भालगावकर
औरंगाबाद

***

91
लाख मरो, पण लाखांचा पोशिंदा न मरो..
स्वातंत्र्यपूर्व-उत्तर काळातील आमच्या देशपांडे धावडेकर घराण्याचा थोडा
इतिहास..
आज आम्ही देशपांडे आडनावाने जरी ओळखले जात असलो, तरी आमचे मूळ
घराणे मुळे होय. त्याबद्दल थोडी माहिती.
निझाम उलमुल्क मेहमूद बादशहा व उस्मान शहा यांच्या मुसलमानी आमदानीत मुळे
घराण्यातील पाचव्या व सहाव्या पिढीतील वाडवडिलांनी जहागीरदार व नबाब यांच्या
संपर्कातून राजदरबारी मान्यता प्राप्त करून, मौजे धावडा जहागिरीच्या रयतेचे रक्षण
व गौरवपूर्ण कामे करून लौकिक मिळवला. मुळे घराण्यातील आम्ही वंशपरंपरागत
मानदपद प्राप्त देशपांडे, कुलकर्णी, मुळे हे वंशज.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्याकाळातील प्लेग, कॉलरा, मलेरिया,
देवीच्या महामारीत बहुतेकांची प्रचंड हानी व मृत्यू झाला. त्यामुळे लगेच पुढे १९४७ च्या
काळात रझाकारीने असाहाय्य व भयभीत केले. आमच्या पिढीतील धैर्यवान बंधू श्रीकृष्ण
दादा यांच्या कर्तबगारीने रझाकारी समाप्त करण्याची प्रचंड कामगिरी करून घराण्याचा
नावलौकिक वाढवला. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व काळातील झाले.
स्वातंत्र्योत्तर काळात आमच्या घरात असेच गौरवपूर्ण व्यक्तिमत्त्व जन्मास आले
व त्याने आमच्या घराण्याचे नाव सर्वदूर पसरवले. ती व्यक्ती म्हणजे १९४८साली जन्म
झालेले मुकुंद अमृत देशपांडे होय. प्रचंड हलाखीची परिस्थिती व मातोश्रीच्या निधनामुळे
मुकुंदराव यांना वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या बंधू-भगिनींसह डोंगरी निबीड अरण्यातील
दुर्गम गावातील गुम्मी या मागास ग्रामीण मातुलगृही, आजीच्या समर्थ छायेखाली
शिक्षणासाठी जावे लागले. तेथे हुशार अशा विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्षी बुद्धिमत्तेच्या
जोरावर पुस्तके वगैरेंची वानवा असतानाही केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनाने एकाग्रपणे
मनन करून प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांकाने व चौथ्या वर्गात तालुक्यातून विशेष प्रावीण्याने
उत्तीर्ण झाले. गावात एकपाठी, चतुर, हजरजबाबी, सद्गुणी असा नावलौकिक मिळवला.
पुढील सातवीपर्यंतचे शिक्षण वडील बंधू अण्णा व मी जालन्यात स.भु.च्या सेवेत
रुजू झाल्यामुळे जालन्यात झाले. आम्ही सर्व सख्खे, चुलत बंधू-भगिनी, सुपाताई,
कमाताई, कृष्णराव, लक्ष्मणराव, गोविंदराव वाखाणण्यासारख्या गुण्यागोविंदाने जालन्यात
राहिलो. आजच्या पिढीने हे नमूद करावे ही इच्छा. या काळातही मुकुंदराव शहरी बुद्धिमान
92
मुलांवर ताण करून सातवी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
नंतर दामोदर यांचे स्थलांतर कन्नड मुक्कामी झाल्याकारणाने मुकुंदरावही
मराठवाड्यातील कन्नड या गावी गेले. दहावीला विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होऊन
वृत्तपत्रांत फोटो व नाव झळकले. आम्हा धावडेकर, देशपांड्यांच्या माना उन्नत झाल्या.
पुढील भविष्याच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादच्या नावाजलेल्या
महाविद्यालयात प्रवेश घेते झाले. कॉलेजमधील सुसंस्कृत, समृद्ध घराण्यातील गुमास्ते,
केतकर, कुलकर्णी अशा मित्रांच्या सहवासातून प्रगती होत गेली. कुठलाही अहंभाव न
ठेवता कष्टप्रद जीवन जगून उच्चविद्याविभूषित झाले. स.भु. कॉलेजमध्ये गणिताचे
प्राध्यापक झाले. पुढे अजूनही गणिताचे अध्ययन करून डॉक्टरेट मिळवली.
आमच्या देशपांडे घराण्याला पुढे आणण्याचा त्यांच्या मनी सदैव ध्यास होता.
आपण ज्या हाल-अपेष्टा भोगल्या, त्या इतरांच्या वाटेला येऊ नयेत ही तळमळ त्यांच्या
कृतीतून सदैव जाणवत होती. चुलत, मावस सर्व नात्यांबद्दल आंतरिक ओढ. प्रत्येकाच्या
अडचणीत मदतीचा हात देण्याची वृत्ती होती.
जे देशपांडेंचे वंशज काही काही कारणांनी एक-दोन पिढ्यांपासून अंतरलेले होते
त्यांनाही जवळ आणण्याचा सदैव प्रयत्न केला. सर्वांशी स्नेहसंबंध घट्ट करण्याकडे
वाटचाल होती. रोज दहा-बारा तास काम करूनही हे त्यांनी साधले. एकाच जन्मात हे
सर्व करणारा देशपांडे घराण्यातील हा कोहिनूर हिराच होता. लग्नानंतर सौ. वसुधाचीही
त्यांना योग्य साथ मिळाल्याने पुढील वाटचाल सुखकर झाली. स्वतः कुठलीही अपेक्षा
न ठेवता, केलेल्या कोणत्याही कामाचा उल्लेख न करता, मुकुंदरावांच्या संसारात तिने
स्थैर्य व जीवनाला संपन्नता आणली. अशी सहधर्मचारिणी भाग्यानेच मिळते. पुढे मुलांनी
व सुना नातवंडांनीही तो वारसा चालवला.
कॉलेजमध्ये मुकुंदरावांच्या संपर्कात आलेले देवगाव रंगारी येथील दत्ताजी
भांडवलदार हे मित्र. मुकुंदरावांच्या अलौकिक स्वभाव वैशिष्ट्यामुळे पूर्ण भांडवलदार
घराण्याची खूप जवळीक आली. दत्ताजींचे वडील आसाराम उर्फ दादा भांडवलदार यांची
देवगाव येथे गणेश विद्यालय नावाने शाळा होती. मुकुंदरावांचा मी भाऊ आहे या एवढ्या
शब्दावर मुलाखत न घेता त्या शाळेत माझी इंग्रजी विषय शिकवण्यासाठी नियुक्ती झाली.
पुढे बऱ्याच वर्षांनी त्याच शाळेत वसुधाही शिक्षका म्हणून नेमली गेली. हे माणसाचे
93
माणसावरील विश्वासाचे प्रतीक आहे. अशी विश्वासपात्रता मुकुंदरावांना आयुष्यभर
मिळत गेली.
देशपांडे घराण्याच्या सुख-दुःखाच्या प्रत्येक कार्यक्रमात वेळात वेळ काढून ते
सहभाग नोंदवत व चैतन्य निर्माण करत. अशाच एका कार्यक्रमात या पिढीतील आमचे
ज्येष्ठ पुतणे विनोद यांनी एक कल्पना मांडली. मुकुंदकाका आपण सर्व प्रसंगोपात
एकत्र येतो व समारंभ संपला की लगबगीने परत जातो. तेव्हा आपल्या घराण्याचा एक
मेळावा धावडा येथे घ्यावा. आपल्या घराण्यात अनेकांत अनेक कलागुण आहेत, परंतु
स्वभावाच्या बुजरेपणामुळे व्यक्त होता येत नाही, तेही होईल. आमच्या पुढील पिढीला हा
धावडेकरी बाणा कळेल…. वगैरे वगैरे.
परंतु मुकुंदरावांच्या व्यग्र जीवनामुळे व पुढे तब्येतीच्या तक्रारींमुळे ते शक्य झाले
नाही. मात्र, त्यांची ही इच्छा परमेश्वर कृपेने नक्कीच पूर्ण होईल. पण दुर्दैवाने अचानक
काळाने घाला घालून देशपांडे घराण्यातील एका आदर्श, होतकरू, परोपकारी वृत्तीच्या
व्यक्तीस हिरावून नेले. आम्ही सर्व धावडेकर ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना
स्वर्गप्राप्ती व्हावी.

{श्री. तुकारामपंत नाना देशपांडे


निवृत्त शिक्षक, देवगाव रंगारी

(लेख लिहिणारी व्यक्ती सरांचे ज्येष्ठ बंधू आहेत.


सरांच्या कर्तृत्वावर नितांत प्रेम करणारे व घराण्याचा जाज्वल्य अभिमान बाळगणारे आहेत.)

***

94
स्मृतिगंधाचा दरवळ
माझी भाची डॉ. सौ. अपूर्वा मंदार देशपांडे हिचा एकेदिवशी मला फोन आला. कारण
असे, तिचे सासरे स्व. मुकुंदराव अ. देशपांडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृतिग्रंथाचे
प्रकाशन करायचे आहे. आत्या, त्यासाठी तू लेख लिहिशील का? मी तत्काळ हो म्हणून
सांगितले. प्रासंगिक लिखाणाची मलाही आवड आहे. त्यातून पहिली ओळख अशी,
एम.ए.डी. सर आमच्या मुलांचे आदरणीय गुरू. दुसरे म्हणजे मुकुंदराव हे नात्याने आमचे
जावई. त्यानंतर त्यांचे नंबर दोनचे सुपुत्र डॉ. मंदार हे भावाचे जावई. अशीही नात्यांची
गुंफण.
लेख लिहिण्यासाठी मग विचारचक्र सुरू झाले आणि आठवले, आम्ही यांच्या
बदलीच्या निमित्ताने १९८८ साली पंढरपूर येथे होतो. तेथेच पैठणचे चाटुफळे नावाचे
गृहस्थ एसटी डेपो मॅनेजर या पदावर कार्यरत होते. एका गावचे असल्यामुळे त्यांचा
आमचा चांगला स्नेह. गप्पांच्या ओघात मुकुंदरावांच्या शालेय जीवनातील बरीच माहिती
कळली. त्यांची कुशाग्र आणि प्रखर बुद्धिमत्ता, सुरुवातीपासूनच गणित विषयावर
प्रभुत्व, अत्यंत कष्टाळू वृत्ती असे बरेच सद्गुणत्यांनी विदित केले. पण घरची परिस्थिती
हलाखीची, प्रतिकूल अशी. त्यातच मातृछत्र लोपलेले. मातेचे कोणतेच सुख त्यांच्या
वाटेला आले नाही. माया, ममता, जिव्हाळा असं बरंच त्यांना मिळालंच नाही. बिकट व
संकट काळावर मात करूनया शिक्षण क्षेत्रात प्रगती, यश प्राप्त केलं. हे सारं ते अत्यंत
भावविवश होऊन सांगत होते. आम्ही ऐकत होतो. त्यांनाही हे सगळं माहिती असण्याचे
कारण म्हणजे,ते औरंगाबादला वाड्यात अगदी शेजारीच राहत होते.
माझ्याही मनात आलं, परमेश्वर असं का करतो? एखाद्याला एखादी गोष्ट भरभरून
देतो, पण त्याला पूरक असणाऱ्या दुसऱ्या गोष्टींसाठी का हात आखडता घेतो? बहुधा
कसोटी घेण्यासाठी असेल. जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर, स्वबळावर, अत्यंत
परिश्रमपूर्वक, अभ्यासू वृत्तीने त्यांना औरंगाबाद येथे एस. बी. कॉलेजमध्ये गणिताचे
प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. अल्पावधीतच कॉलेजमध्ये ते सगळ्यांना प्रिय
झाले. विशेषतः विद्यार्थी वर्गात. अतिशय कठीण असा गणित विषय ते सोप्या पद्धतीने
विद्यार्थ्यांशी समरस होऊन शिकवीत. त्यामुळे मुलांच्या मनात आदरभाव निर्माण होत
असे. त्यांना प्रेम, आपुलकी वाटत असे.
यथावकाश त्यांचा विवाह माझी पुतणी वसुधा देशमुख यांच्याशी झाला. सुसंस्कृत
95
घराण्यातील, सुसंस्कारात वाढलेली, उच्चशिक्षित, सुस्वभावी अशी सुविद्य पत्नी
लाभली. सुखाचा संसार सुरू झाला. तीही एम.ए. बी.एड. झालेली. पण नोकरी,
करिअरच्या मागे न लागता संसाराची धुरा समर्थपणे सांभाळली. दोन्ही मुलांना नुसतं
वाढवलं नाही, तर योग्य रीतीने घडवलं. सासरची सगळी नाती सांभाळणे, सर्वांना
सर्वतोपरी साहाय्य, मदत करण्याचा स्वभाव. त्यामुळे सर्वांच्या कौतुकाला पात्र. आदर्श
संसार केला. काही काळ नोकरी केल्यानंतर मुकुंदराव यांनी पदमपुरा या भागात मॅथ्स या
विषयाचे क्लासेस सुरू केले. कुठेही, कशीही जाहिरात नसताना केवळ माऊथ टू माऊथ
अॅड इतकी प्रभावी ठरली. त्यांचा क्लास म्हणजे जणू काही सरस्वतीचे मंदिरच बनले.
अत्यंत निष्ठेने, अत्यंत तळमळीने हे ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले. त्यांचे अनेक विद्यार्थी
देश-विदेशात उच्च पदांवर काम करतात. त्यांच्या यशाचं श्रेय हे सरांना देऊन कृतज्ञतेचा
भाव व्यक्त करतात. मान-सन्मान, सत्कार, पुरस्कार, प्रसिद्धी यापासून ते कायम अलिप्त
असत. गर्व, अहंकार या गोष्टीही अतिदूर. साधी राहणी, उच्च विचारसरणी असे वागणे
होते.
दुहेरी नाते असल्यामुळे आमचे बरेच येणे-जाणे, भेटीगाठी होत असत. पदमपुऱ्यात
राहत असताना अशीच एकदा भाचीला आवडतं, म्हणून लोणचं घेऊन गेले. दुसऱ्या
भेटीत लगेच, आत्या तुम्ही दिलेले लोणचे आम्हीच संपवले बरं का. छान झाले होते. कृती
अगदी साधी, पण मला जाणवला त्यांचा मनमोकळेपणा, दिलदारपणा. त्यांची पत्नीही
खूप सुगरण, गृहकृत्यदक्ष आहे पण दुसऱ्यांची स्तुती, प्रशंसा करायला मन खूप मोठं
लागतं. तसं त्यांचं होतं. मीही सुखावले. या गोष्टीची मला नेहमी आठवण येते.
तसं प्रत्येक भेटीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अनुभवास आले. जुना काळ,
त्या काळातली माणसं, त्यांचे विचार, वागणे, संस्कृती, रीतिरिवाज, एकत्र कुटुंब पद्धती
या गोष्टी त्यांना प्रिय होत्या. लग्नकार्यात नात्यांच्या मेळाव्यात ते गप्पात रंगून जात.
सर्वांच्या भेटीचा आनंद घेत. ते फार धार्मिक नव्हते. पूजाअर्चा, मंदिरातले देवदर्शन
याकडे त्यांचा कल नव्हता. मानवताधर्म तितका जपला. त्यांच्या कार्यक्षेत्रात कायम गरीब
व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वरूपाची मदत करून, विद्यादानाचं खरं पुण्य प्राप्त
करून घेतलं. त्यातही गर्व, अभिमान नाही. नि:स्पृहवृत्तीने सारी कृती. काळाची पावले पुढे
पुढे सरकत होती. संसार बहरला, फुलला, त्याचा सुगंध सर्वत्र पसरला. मुलं मोठी झाली.
96
हुशार आणि कर्तृत्ववान बनली. धनसंपत्ती, गाडी बंगला सगळं कसं वैभवशाली. घरातही
आनंदी, शांत लक्ष्मीस्वरूप पत्नी, गुणी सुना, नातवंड, गोकुळासारखे घर. अतिथी देवो
भव म्हणत त्यांच्याकडे जाणाऱ्यांचे सदैव हसतमुखाने स्वागत व आदरातिथ्य होत असे.
विद्या विनयेन शोभते या उक्तीप्रमाणे सर्वांचे वागणे.
प्रगत विज्ञान युगात अनेक बदल झाले, तंत्रज्ञान विकसित झाले.त्यायोगे मानवाला
सुखसोयींची साधने मिळाली. प्रत्येक काम सोपे नीझटपट, शारीरिक कष्ट कमी झाले.
एकमेकांकडे जाणे-येणे, सहवास संपर्क सुसंवाद नाहीसा झाला. तंत्रज्ञानाने या गोष्टी
होऊ लागल्या. फोन, मोबाईल, व्हॉट्सअॅप या माध्यमाद्वारे मनं शुष्क, कोरडी झाली.
आपुलकी, प्रेम लयाला गेले. नवीन पिढी आत्मकेंद्री झाली. असे जरी असले तरी कधी
तरी जुन्या रीतिरिवाजांचाअनुभव येतो तो अशाप्रकारे. मुकुंदराव यांच्या नातवाच्या मुंजीची
पत्रिका द्यायला तेस्वतः दोघेही आमच्याकडे आले. त्यांनी आग्रहाने अगत्याने बोलावणे
केले. वाकून नमस्कार, हातावर अक्षता या सर्व गोष्टी तशा साध्याच, पण त्यात खूप
गूढ अर्थ असतो. आणि तोच माणसाला भावतो. आस्था, आपुलकी, प्रेम, ज्येष्ठांविषयी
आदर असे कितीतरी भाव यातून माणसाचं, व्यक्तीचं मूल्यमापन होत असतं. वेळ नाही
किंवा शरीरस्वास्थ्य या कारणाने व्हॉट्सअॅप वर पत्रिका पाठवू शकले असते, पण तसे
झाले नाही.
अशा कितीतरी त्यांच्याविषयीच्या आठवणी आहेत. अलीकडे मात्र त्यांच्या
आजाराचे भाचीकडून कळायचे. घरात दोन डॉक्टर. त्यामुळे वैद्यकीय उपचार भरपूर
झाले, पण यश आले नाही. मानवाला मृत्यू थांबवता येत नाही. मृत्यूला सामोरे जावेच
लागते. त्यांनी पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये १४ ऑक्टोबर २०१९ या दिवशी अवघ्या
परिवाराला, कुटुंबाला दुःखात टाकून शेवटचा श्वास घेतला. मुलांचे पितृछत्र, घराचा
आधार, पत्नीचा साथीदार क्षणार्धात निघून गेला. कुटुंबात फार मोठी पोकळी निर्माण
झाली. दुःखभार हलका व्हायला, सावरायला काळासारखं दुसरं औषध नाही.
त्यांच्या वाटेला सुखसोहळा, आनंद सोहळा हा फारसा आलाच नाही.ह्याचेअतीव
दुःख त्यांच्या पत्नीलाहोते. एकदा म्हणे असेच मुलांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
कौतुकाने, हौसेने कार्यक्रम ठरवला नी अचानक त्यांना दवाखान्यात अॅडमिट व्हावे
लागले. आम्ही भेटायला गेलो तेव्हा सद्गदित नेत्रात, भरल्या अश्रूंनी हे त्यांनी सांगितले.
97
ऐकून आम्हालाही खूप वाईट वाटले.
मृत्यूच्या सोहळ्यांनी मात्र दिगंत कीर्ती मिळाली. ते किती लोकप्रिय होते, हे
पण ते विधीसाठी आलेल्या लोकसंख्येवरून कळले. प्रत्येकाला, विशेषत: विद्यार्थी
वर्गाला आपल्या गुरूंचे शेवटचे दर्शन व्हावे ही मनोमन इच्छा. त्यासाठी लांबून,
परगावाहून सगळेजण पोहोचले आणि शेवटचा निरोप दिला. कीर्तिरूपाने, स्मृतिरूपाने
मुकुंदराव कायम आपल्यात असतील. ही भावभावनांची शब्दफुलांची ओंजळ प्रथम
स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चरणी अर्पून विनम्र अभिवादन.

{ सौ. आशा रमेश घोटणकर


औरंगाबाद

***

98
आठव
एम. ए. सरांना माझ्या लग्नाआधीपासून मी ओळखतो. साधा पायजमा, नेहरू
शर्ट, सावळारंग व मध्यम बांधा असा त्यांचा वेश असायचा. ऐशो आराम व चैन करणे
हा त्यांचा स्वभाव नव्हता. ते केव्हाही येणाऱ्या विद्यार्थी, नातेवाईक आणि सर्वांना
हसतमुखाने सामोरे जायचे. त्यांच्याकडे येणाऱ्यांच्या गहन प्रश्नांना सुलभतेने सोडवण्याचे
प्रयत्न ते करत असत. उच्चविद्याविभूषित व सुवर्णपदकाने सन्मानित असतानाही त्यांनी
त्याचा कधीही गर्व केला नाही.
माझे-सरांचे नाते म्हणजे मी त्यांचा मेहुणा. मी वयाने मोठा असलो तरी ते मानाने मोठे
होते. परंतु, नात्यापेक्षा आम्ही दोघे एकमेकांचे मित्र जास्त होतो. त्यामुळे माझे प्रश्न हे त्यांचे
प्रश्न असे ते समजत. नेहमीचा सहवास असल्याने आम्ही सुख-दुःखाचे भागीदार होतो.
माझ्याबाबत असाच एक अनुभव सांगता येईल. मी एक सरकारी नोकर. जेमतेम
माझा पगार. माझ्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी. अशा परिस्थितीत माझी बदली
औरंगाबादला झाली. आर्थिक ओढाताण खूप वाढलेली होती. माझी कोणाशीही जास्त
ओळख नव्हती. मी एम.ए. कडे गेलो असता त्यांना माझी अडचण सांगितली. त्यांनी
लगेच मला त्यांच्या ओळखीचे हे काम मिळवून दिले. माझा आर्थिक प्रश्न त्यामुळे सुटला.
अडचणीच्या वेळी मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. म्हणून ते आमच्यासारख्या
नातेवाईकांचे आधारवड होते.
दुसरा असाच एक प्रसंग म्हणजे मी औरंगाबादला प्लॉट घेतला होता. तो मूळ
मालकाच्या नावावर होता. काही अडचणींमुळे तो माझ्या नावे न करता बांधकाम पूर्ण
केले व राहायला गेलो. जवळजवळ पाच वर्षे घर मूळ मालकाच्या नावावर होते. काही
कार्यक्रमानिमित्त माझ्याकडे एम.ए. आले. त्यांना हे कळले. ते म्हणाले, तुमचं घर जाऊ
शकतं. मी तुम्हाला आर्थिक मदत करतो, तुमचं घर तुमच्या नावे करून घ्या. त्यांनी लगेच
पैशांची पूर्तता केली. मी ते घर माझ्या नावे करून घेतले. त्यामुळे संभाव्य धोक्यातून
त्यांनी माझी सुटका केली. एकदा सकाळीच मला फोन आला, ‘रमेशराव, आपल्याला
धावड्याला जायचंय. शेत बघायला जाऊया. डबे घेऊन जाऊ.’ हा आवाज होता एम. ए.
चा. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही कारमध्ये बसून गेलो. त्यांच्या मोठ्या भावाने निवृत्तीनंतर
आदर्श शेती केली होती. त्यांनी ते जातीने फिरवून दाखवले. हे त्यांचे जन्मगाव. गावाबद्दल
त्यांना फार आस्था होती. गावातल्या माणसांबद्दल प्रेम होते. शेतात आम्ही डबे खाल्ले.
99
गोड पाणी प्यायलो. असे अनुभव त्यांच्या व्यग्र जीवनातही ते आम्हाला देत असत.
एकदा असेच त्यांनी मला गुम्मी या गावी नेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले होते.
त्यांची जुनी शाळा पाहिली. मच्छिंद्रनाथाचे जुने मंदिर त्यांनी दाखवले. त्यांच्या मित्रांची
जुनी घरे दाखवली. मारुतीच्या पारावर ते त्यावेळी कसे खेळत असत याच्या गमतीजमती
सांगितल्या. सर्व प्रवासात त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या. सर खूप भावूक झाले होते.
मध्येच एका ठिकाणी थांबण्याचा योग आला. मी संधीचा फायदा घेऊन सरांना त्यांचे
आवडते कांदे भजे मागवले. त्याचा आस्वाद घेतला. हा अनुभव माझ्यासाठी वेगळा
होता. असे प्रसंग पुन्हा येणे नाही. सरांची ती प्रसन्न मुद्रा बघण्यास आता मिळणार नाही.
एकदा असाच एक प्रसंग घडला. आम्ही कुटुंबीयांनी काहीतरी व्यवसाय करायचे ठरवले,
परंतु हातात पैसा नाही. एवढेच काय, पागडी भरायचीही कुवत नाही. नेहमीप्रमाणे सर
एकदा आमच्याकडे आले. त्यांच्यासमोर आम्ही कुटुंबीयांचा वरील मनोदय व्यक्त केला.
ते म्हणाले, माझ्याकडे घेतलेले एक दुकान रिकामे आहे. सध्या मी त्याचा वापर करत
नाही. तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. अत्यंत अल्प दरात पागडी विरहित तो गाळा
त्यांनी आम्हाला वापरण्यासाठी ताब्यात दिला. त्या ठिकाणी कापड दुकान थाटले. कोणीही
पुढे जाणार असेल तर त्याला शक्य ती मदत करणे हा त्यांच्या स्वभावाचा खास गुण होता.
कोणतीही अडचण सोपी करून सांगणे ही त्यांच्या स्वभावाची हातोटी होती.
त्यात या स्वभावाला विनोदबुद्धीची जोड लाभल्याने समस्या घेऊन येणाऱ्याचे ते सहज
सुलभतेने निराकरण करत असत. त्यांच्या अशा स्वभावामुळे त्यांच्याकडे गेल्यावर वेळ
कसा जायचा याचे भानच नसायचे. कार्यप्रसंगाने त्यांच्या घरी माझी कार्यक्रमांत हजेरी
असायची. त्याचप्रमाणे आमच्याकडील कोणत्याही कार्यक्रमात ते आवर्जून असायचे.
त्यांच्या जाण्याने माझ्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली. आता ती भरून येणे
शक्य नाही. आजही ज्या ज्या वेळी मला त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा असे
वाटते की ते बैठकीत येतील आणि नेहमीप्रमाणे चर्चा करतील. पण म्हणतात ना,‘जो
आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला.’
सर गेले व माझ्या मनातील चैतन्य मावळले. प्रत्येक हानीला काळ हेच औषध
असते. एम.ए. जरी गेले तरी माझ्यासारख्या मित्राच्या ते चिरस्मृतीत राहतील.
{ रमेश देशपांडे, औरंगाबाद
100
रक्षाबंधन
१४ ऑक्टोबर २०१९ हा दिवस अतिशय धक्कादायक ठरला. या दिवशी माझा मोठा
भाऊ मुकुंद आम्हाला सोडून लांबच्या प्रवासाला निघून गेला आणि बालपणीच्या काही
आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या. आम्ही पाच भावंडे म्हणजे चार भाऊ आणि मी.
लहानपणी आमची आई आम्हाला सोडून गेली. आमच्या आजीने आमचा सांभाळ केला.
आम्हा सर्वात मुकुंदा बुद्धिमान होता.
मोठे दोघेजण शिक्षणासाठी शहरात गेले होते. भोकरदन तालुक्यातील धावडा हे
आमचे गाव. तिथून जवळच गुम्मी नावाचे आजीचे गाव. ती पण विधवा होती.आम्ही
तिला नानी म्हणत असू. आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची. माझे वडील दर आठ
दिवसाला धान्य घेऊन गुम्मीला येत असत. मी, मुकुंदा आणि गोविंद असे तिकडे राहत
होतो. मुकुंदा आमच्यात मोठा. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी असे. तो अभ्यासात हुशार,
बोलण्यात चतुर. त्यामुळे आई नाही म्हणून गावात याला पोथी वाचायला बोलावत असत.
त्याच्यासमोर आलेले धान्य तो घरी घेऊन येत असे. एकदा तर गोविंदाला चटणीवर
तेल हवे होते, परंतु ते विकत घेण्यास पैसे नव्हते. तो हट्ट करू लागला, तेव्हा मुकुंदाने
बाटलीत थोडे पाणी घेतले व त्याला वाढले. त्याचे रडणे थांबले व तो जेवला. कीर्तनाला
नानीबरोबर जाताना त्याने अनेकदा गोविंदला पाठीवर घेतले होते. त्याने लहानपणी काय
नाही केले? शेतात मिरच्या तोडणे, कापूस वेचणे, भुईमुगाच्या शेंगा काढणे ही कामे
आम्ही दोघांनी मिळून केली. नाटकात काम करून वाहवा मिळवली. शेतात जाऊन
डोक्यावर लाकडांच्या मोळ्याही आणल्या.
आमच्या गावात आबा नावाचे एक निवृत्त शिक्षक राहत होते. ते आम्हाला रोज
रात्री उरलेले अन्न आणून द्यायचे. एके दिवशी आमच्याकडे फक्त एक भाकरी होती.
मुकुंदा म्हणाला, तुम्ही दोघेही चटणी-भाकरी खाऊन घ्या. आबा घेऊन येतील, मग मी
खाईन. पण त्या दिवशी ते आलेच नाहीत. आमचा मुकुंदा उपाशी झोपला. असे आमचे
लहानपणीचे आयुष्य खूप हलाखीत गेले. परंतु मुकुंदाला परिस्थितीची जाणीव होती.
सेवाभाव त्याच्यात होता. बुद्धीच्या जोरावर परिस्थिती बदलण्याची ताकद त्याच्यात होती.
पुढील आयुष्यात हे तो विसरला नाही. मरेपर्यंत त्याने कधीही अन्न आपल्या ताटात टाकले
नाही.
पुढे मोठ्या भावाने शिक्षणासाठी आम्हाला शहरात नेले. गणितात मुकुंदाचे खूप
101
प्रावीण्य होते. त्याला सरस्वती प्रसन्न होती. दहावीपासूनच त्याने गणिताची शिकवणी
घेणे सुरू केले. नंतर त्याला कधी मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. गणितात
सुवर्णपदक मिळवले, पीएचडी केली आणि गणिताचा अथांग सागर निर्माण करून
लक्ष्मीला खेचून आणले. गणिताचा प्राध्यापक आणि सगळे त्याला एम.ए.डी. म्हणू
लागले.
माझ्या आयुष्यात एम.ए.चे स्थान फार मोठे होते. मला आठवते, दहावी प्रवेश
घेण्यासाठी शारदा मंदिरला जायचे होते. मी खेड्यातली, बुजणारी. औरंगाबादसारखे
शहर पाहिले नव्हते. मुकुंदा म्हणाला, काळजी करू नकोस. मी तुला घेऊन जातो. तो
मला घेऊन गेला. शाळेचा परिसर दाखवला. एवढेच नाही, तर मला एका मैत्रिणीची
ओळख करून दिली. तिच्याबरोबर मी रोज शाळेत जाऊ लागले. असा होता माझा भाऊ.
माझी दहावीची परीक्षा होती. मी खेड्यातून आलेली, त्याच्या आग्रहाखातर ऐच्छिक
विषय गणित घेतलेला होता. गावाकडे शिकवायला शिक्षक नव्हते. त्यामुळे उच्च
गणितात मला काही येत नव्हते. गणिताच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी मला रडायला
यायला लागले. मुकुंदा आला आणि मला विचारले,‘उद्या गणिताचा पेपर आहे, तयारी
झाली का?’ मी रडू लागले. तो म्हणाला, ‘एवढा गणितज्ञ भाऊ असताना तू रडतेस?’
मी म्हटले, ‘तू काय करणार?’ तो म्हणाला,‘आण पुस्तक.’ आणि त्याने माझी परीक्षेची
तयारी करून घेतली.‘तेवढेच कर, पास होशील.’ मी म्हटलं,‘तू काय भविष्यवेत्ता
आहेस?’आणि काय आश्चर्य.. त्याने जे करून घेतले तेच परीक्षेत आले. पेपर देऊन
आल्यावर माझा चेहरा फुलला आणि निकाल लागल्यावर मी उच्च गणितात पास झाले.
माझे लग्न मोडले होते. मी नाराज झाले. एम.ए. ला सांगितले तेव्हा त्याने लगेच
बैठक बोलावून लग्न ठरवले. माझ्यासाठी त्याने मोठ्या भावाचा रोष पत्करला होता.त्याने
माझ्या विवाहाची स.भु.त मोठी पार्टी दिली होती. अजूनही डोळ्यासमोर आहे. प्रत्येक
वेळी माझ्यामागे तो खंबीरपणे उभा राहिला होता. मला मुलगा झाला. त्यावेळी तो मला
भेटायला आला. माझी आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. तो म्हणाला,‘मी तुला शिलाई
मशीन घेऊन देतो, शिवणकाम कर आणि संसाराला हातभार लाव.’ त्याने मला शिलाई
मशीन घेऊन दिली. मी शिलाईकाम शिकले आणि परिस्थिती सुधारण्यास मदत झाली.
असा तो मार्गदर्शक ठरला.
102
नंतर काही दिवसांनी डी.एड. साठी माझा नंबर लागला. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे
आमचे कुटुंब मोठे होते. आम्ही जालन्याला राहायचो. डीएड औरंगाबादला करायचे होते.
त्यावेळीही त्याने प्रोत्साहन दिले. मला म्हणाला, काही दिवस मुलांना घेऊन माझ्याकडे
राहा. त्याचेही घर त्यावेळी भाड्याचे असून लहानच होते, परंतु त्याचे मन मोठे होते.
काही दिवसांनी माझी बदली झाली. मी जालना येथे गेले. दोन वर्षांचे डी.एड. पूर्ण केले,
पण हाय रे दैवा…सरकारी नोकरीसाठी वय निघून गेले होते. खासगी क्षेत्रात काम मिळेना.
तेव्हा अजिंठा येथे इंग्लिश स्कूलमध्ये अल्प पगारावर मला ऑफर आली. काय करावे
काही सुचेना. एम.ए. कडे गेले. त्याला म्हणाले, ‘काय करू? पगार कमी आहे. अजिंठा
दूर आहे. दोन मुलांना घेऊन मी कशी राहणार?’ तो म्हणाला,‘हिंमत दाखव. यामधून
काहीतरी चांगले होईल.’ मी त्याचे म्हणणे ऐकले आणि आपल्याला नोकरी मिळणारच
नाही हा दृष्टिकोन बदलण्यास मला मदत झाली. मी तिथे जास्त दिवस राहिले नाही, पण
त्यामुळे माझ्यात त्याने आत्मविश्वास निर्माण केला.
माझ्या घराचे बांधकाम चालू होते. अर्ध्यावर आल्यावर पैशांअभावी ते बंद पडले.
एम.ए. बांधकाम बघायला आला. म्हणाला, मी काही रक्कम देतो, बांधकाम पूर्ण करा.
परंतु, यांच्या स्वभावात ते नव्हते. आमच्याकडे एक प्लॉट होता. आम्ही म्हणालो, तू तो
प्लॉट ठेवून घे आणि आम्हाला पैसे दे. त्याप्रमाणे त्याने केले. घराचे बांधकाम पूर्ण झाले.
मी त्याला अनेकदा,‘अरे, प्लॉट तुझ्या नावावर करून घे.’असे सांगितले, परंतु त्याने तसे
केले नाही. नंतर काही दिवसांनी जेवढे पैसे त्याने दिले होते, तेवढेच पैसे परत घेऊन त्याने
आमचा प्लॉट आम्हाला परत केला. त्यावेळी त्याची किंमत दहा पटींनी वाढली होती, पण
बहिणीचे नाते त्याने असे जपले होते.
दिवाळीची भाऊबीज त्याने कधी चुकवली नाही. दिवाळीला त्याने मनपसंत साडी
घेतली. फक्त एकाच दिवशी नात्याला उजाळा द्यायचा या मताचा तो कधीही नव्हता.
आणि जे काही करायचे ते नि:स्वार्थ वृत्तीने करायचा. तो मला म्हणायचा, ‘आपण
दुसऱ्याला जे देतो ते परत येण्याच्या अपेक्षेने देऊ नये. कारण त्यामुळे आपल्याला आनंद
मिळत नाही. माणसाची जिवंतपणी सेवा करावी.’
याप्रमाणे तो वाढला. काकांची सेवा केली, वडिलांची सेवा केली. लहान भावाकडे
लक्ष दिले. मोठ्या भावाची तर मरेपर्यंत सेवा केली. सर्व कुटुंबासाठी तो तत्पर असे.
103
सर्वांचे दुःख हलके करत असे. कोणतीही समस्या घेऊन त्याच्याकडे गेले की, अनेक
उदाहरणे देऊन आपले दुःख कसे छोटे आहे, हे तो पटवून द्यायचा. समुपदेशकाचे काम
करायचा.
एम. ए. स्वर्गवासी झाला. तो तेथेही गणिताचे संशोधन करत असेल. गणित त्याच्या
रोमारोमात भिनले होते. त्याच्या कार्याला शतशः प्रणाम. त्याच्यासाठी ही चारोळी…
काय आणि किती आठवणी, गेलास आम्हाला सोडुनी।
दाटले गगनयान आता, नाही येणार तू फिरूनी।
मिळो तुला शांती स्वर्गातुनी, हीच प्रार्थना ईश्वरचरणी, प्रार्थिते तुझी भगिनी ।।

{शरयू रमेश देशपांडे


निवृत्त मुख्याध्यापिका, औरंगाबाद

***

104
माझा लहान भाऊ
प्रसिद्ध विद्यार्थी, प्रिय प्राध्यापक, राज्यभर विखुरलेले शिष्य, सुविद्य, सुशील पत्नी,
कर्तबगार दोन सुपुत्र-एक इंजिनिअर आणि दुसरा डॉक्टर, उच्च विद्याविभूषित सुना,
नातवंडांचे गोकुळ आणि लक्ष्मीचा वरदहस्त. हे चित्र मुकुंदास आठवता आज मितीस
दिसते. मात्र, हे सर्व वैभव सुखासुखी प्राप्त झालेले नाही. या मागे त्यांचे खडतर कष्ट,
जिद्द, संकटास सामोरे जाण्याची सहज प्रवृत्ती यामुळे शक्य झाले. त्याचे कष्ट त्याच्या
कुटुंबीयांस फारसे ज्ञात नसावे कारण गत गोष्टींचा बाऊ अथवा बडेजाव करणे हा त्याचा
स्वभाव नव्हता.
मुकुंदा माझ्याहून वयाने लहान. त्यावेळी साधारण मोठी मुले आपणापेक्षा लहानांस
त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेत नसत. कारण जंगल भटकंती, डोंगरावर चढणे,
पोहणे असे कार्यक्रम असत. त्यामुळे ते वयाने लहान मुलांना घेत नसत, परंतु लहान
असूनही याबाबतीत तो तोडीस तोड होता. त्यामुळे तो आमच्यात केव्हा सामील झाला ते
कळलेच नाही. त्याचा बालपणीचा बराच काळ माझ्यासोबत गेला होता.
उन्हाळ्यात सुट्या लागल्यानंतर दिवसभर तो आमच्यासोबतच असे. फक्त
जेवणापुरते तो घरी जात असे. एकदा आम्ही सर्व मित्रमंडळी पोहण्यास मेह नदीत
साबळ्या कुंडावर गेलो. ते कुंड अरुंद असून बरेच खोल आहे. तिथे पोहोचल्यावर शिडी
घाटावर गेलो. तिथे धबधबा आहे. शे-दोनशेफुटांवरून पाणी पडते. त्याचा आवाज
पावसाळ्यात मोठी धार झाल्यावर गावातही येतो. त्याला खेटून घबाड आहे. घबाड
म्हणजे वाघाचे ठिकाण आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने धबधब्याची धार लहान
होती. तो दगडी घाट उतरून मेह नदीत उतरण्याचा आम्ही मित्रांनी निश्चय केला. मुकुंदा
खाडीच्या तोंडाशी बसून राहिला. आम्ही मित्रमंडळी जेमतेम पाच-सहा फूट खाली
उतरल्यानंतर मुकुंदाने,‘अरे वाघ आला..’ असे ओरडणे सुरू केले. आम्ही सर्व घाबरून
वर आलो. त्याला विचारणा केली,‘कुठे आहे वाघ?’ तर तो म्हणाला की,‘तुम्ही जो घाट
उतरत आहात तो फार कठीण आहे. पाय वगैरे घसरल्यास पुढील संकटाची कल्पना
करवत नाही म्हणून सांगितले. त्याशिवाय तुम्ही वर आला नसता, त्यासाठी ही युक्ती
केली.’ त्याच्या उत्तराने आम्ही निरुत्तर झालो.
शिक्षणासाठी त्याला बऱ्याच ठिकाणी जावे लागले. जालन्याला डॉ. दिघेंकडे काम
करून तो शिकला. अभ्यासात अत्यंत हुशार. बोलण्यात चतुर. त्यामुळे तो कुणातही
105
सहज मिसळत असे. शिक्षणासाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागले. परंतु स्वबळावर
त्याने सर्व प्राप्त केले. त्याच्या प्रयत्नांची दाद द्यावी असेच आहे सगळे.
आमच्या गावात विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण दादा आणि दोन-तीन जण रात्री पंचपदी
म्हणत असत. त्यावेळी आम्हीपण जात असू. आमच्यासोबत मुकुंदाही असे. एक
दिवस श्रीकृष्ण दादांनी एक अभंग लिहून घेऊन दुसऱ्या दिवशी तो पाठ करून ठेवायला
सांगितले. त्याने तो लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण भजनात निघालो.
मुकुंदाला, अभंग पाठ झाला का? असे विचारले. त्यावेळी त्याने ‘नाही’ म्हणून सांगितले.
त्यानंतर खिशातून कागद काढून चालता चालता त्याने त्वरित तो अभंगपाठ केला आणि
बिनचूक म्हणून दाखवला.
मला नोकरी लागल्यानंतर काही दिवस तो व मी खोलीवर एकत्र राहत होतो. त्यावेळी
त्याचे शिक्षण सुरू होते. त्याचा खर्च तोच करत असे. तो कमाई कशी करत असे मला
माहीत नव्हते. एकेदिवशी त्याच्याकडे पाहिले असता त्याचे डोळे लाल दिसले. त्याला
विचारणा केली असता ‘जागरण झाले’ असे उत्तर दिले, पण माझे समाधान झाले नाही.
अधिक विचारणा केली असता, छापखान्यात अक्षरे जुळवण्याचे काम करतो असे त्याने
सांगितले. मला फार आश्चर्य वाटले. हे काम तो कधी शिकला हे कळलेच नाही.
पुढे त्याचे शिक्षण पूर्ण झाले. त्याने शिकवणी घेण्यास सुरुवात केली. शहागंजमध्ये
खोली भाड्याने घेऊन शिकवणी वर्ग काढला. पुढे त्याची भरभराट होत राहिली. नंतर
माझी बदली झाल्याने त्याच्याशी संपर्क कमी झाला, परंतु आपुलकीची भावना कमी झाली
नाही.
लहानपणापासून त्याला नाटकात काम करण्याची हौस. माझ्या मोठ्या भावाबरोबर
तो तालमीला जात असे. त्याने गावातील व कॉलेजातही नाटकांत काम केले. जीव
ओतून भूमिका करण्यालर त्याचा भर होता. त्याचा मला भावलेला मुख्य स्वभाव म्हणजे
परिस्थितीला दोष द्यायचा नाही आणि कोणाकडून अपेक्षाही करायची नाही. असा तो
स्थितप्रज्ञ होता. दुसऱ्यास मदत करण्यास तो सदैव तत्पर असे. भावासही त्याने खूप
मदत केली. त्यात सख्खा-चुलत असा भेदभाव केला नाही. भाऊबंदकी हा शब्द त्याच्या
कोषात नव्हता. माझ्या भावालाही त्याने नोकरी लावून दिली. पण गर्व नाही, जाहिरातबाजी
नाही. आपल्याकडे असे म्हणतात की,‘उजव्या हाताने उजव्या हाताने दिलेले दान डाव्या
106
हाताला ही समजू नये’ त्यादृष्टीने त्याने अनेकांना मदत केली.
त्यात मीदेखील आहे. संपर्क कमी झाल्याने गाठीभेटी जास्त होत नसत, पण
भेट झाल्यास मनमोकळी चर्चा होतअसे. त्याने प्राप्त केलेले वैभव हे सचोटीने,
प्रामाणिकपणाने केल्याने त्याच्या घरी लक्ष्मीचा वरदहस्त निरंतर वास करेल.
मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्याची तब्येत बरी नसल्याने मी पुण्याहून त्याला फोन
केला. त्यावेळेस त्याच्याशी बोलणे झाले. आता तब्येत बरी असल्याचे व डायलिसिस
उपचार सुरू असल्याचे त्याने सांगितले. त्यापूर्वी त्याची मुंबई येथे मोठी शस्त्रक्रिया झाली
होती. त्यातूनतोपूर्ण बरा झाला. मला पूर्वीचा दणकट मुकुंद आठवत असल्याने तो त्यातून
बरा होईल याची खात्री होती, परंतु ते घडले नव्हते.
काही अपरिहार्य कारणाने मी मुकुंदाच्या अंत्ययात्रेस उपस्थित राहू शकलो नाही.
त्यामुळे काय की, मला असे सतत वाटते की, मुकुंद आपणास अजूनही भेटेल. आपण
त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारू. मात्र, वस्तुस्थितीची जाणीव होताच मन विषण्ण होते.
त्याच्या सद्गुणांमुळे त्याला निश्चितच स्वर्गप्राप्ती झाली असेल आणि तेथे तो गणित
शिकवत असेल, असे वाटते.

{ श्रीकृष्ण मोहनराव देशपांडे


पुणे

***

107
माझा भाऊराया
तू आमच्यातून निघून गेलास अजूनही पचनी पडत नाहीये.... दाटीवाटीनं बसलेल्या
शिकवणी वर्गात वातावरण हलकं फुलकं करून, अधून-मधून विनोद करत, मनापासून
मुलांना समजेल अशा सोप्या पद्धतीने शिकवणारा ‘एम. ए..डी.’ डोळ्यासमोर येतो.
तुझ्या त्या हातोटीमुळे बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणितासाठी तूच हवा असायचास;
गणिताचा राजा म्हणायचे तुला औरंगाबादचे लोक. तुझ्या क्लासची पाटीसुद्धा लावली
नव्हतीस तू; तरीसुद्धा बिल्डर लोक त्यांच्या पदमपुऱ्यातील घरांची जाहिरात ‘एम.ए.डी.
क्लासपासून जवळ’ अशी करत.
माझा भाऊ म्हणून हे सांगायला खूप अभिमान वाटायचा आणि वाटतो.
गावाकडचे, ओळखीचे, नात्यातले, सगळेच अडीअडचणींना नि:संकोचपणे
तुझ्याकडे यायचे आणि आपल्यासारखे खडतर भोग त्यांच्या वाट्याला नको यायला
अशा संवेदनशील मनाचा असल्यामुळे गरजवंताच्या मदतीला पुढे असायचास तू. खूप
जणांना खूप मदत केलीस. अगदी राहण्या-खाण्यापासून आणि गवगवा न करता....
स्वतःच्या भावंडांची, वडिलांची जबाबदारी तर निभावलीच, पण मी सख्खी बहीण
नसताना गरजेच्या वेळी मलाही खूप मदत झाली तुझी. मुलांना पण मार्गदर्शन केलंस.
मी औरंगाबादला असेपर्यंत रक्षाबंधन, भाऊबीज कधीच नाही चुकवलंस.
(माझ्याकडचं आणि प्रकाश कुलकर्णींच्या आईकडचं) तुम्ही दोघंही यायचात. पंकजच्या
लग्नाच्या वेळी तुझी तब्येत कमालीची ढासळली होती. आधाराशिवाय चालता येत
नव्हतं, पण सीमांत पूजनापासून सर्व कार्यक्रमांना हजेरी लावलीस. फार जाणवलं ते.....
माझी आई फारच लवकर गेली. नंतर दोन एक वर्षांत काकी म्हणजे तुझी आई
पण स्वर्गवासी झाली. नंतर मी माझ्या मावशीकडे आणि तू गुम्मीला नानीकडे राहायला
गेलास. पण दरम्यान मी, बाबी आणि तू एवढेच आपण सवंगडी. भातुकली खेळताना
मी अक्का, बाबी तिची ताई आणि तू नाना व्हायचास. एकदा काकी, आक्का, शेजारच्या
माई बायकांना घेऊन आपल्याच शेतात पार्टीसाठी गेलो होतो. शेत लांब असल्यामुळे
बैलगाडीतून जात असू. सर्व आटोपल्यावर शेतात फेर फटका मारायला सर्वजणी
निघाल्या. पण तू, मी आणि बाबी गप्पांच्या ओघात रस्ता चुकलो. पिकं असल्यामुळे रस्ता
कळत नव्हता. त्यात मध्येच तू वाघ आला वाघ आला असं पिल्लू सोडून दिलं. जंगल
जवळ असल्यामुळे कधीकधी वाघ दिसायचे म्हणे लोकांना. मग काय... तिघंही सैरावैरा

108
धावत सुटलो.... सोबत तार स्वरात रडारड..! नशिबानं जानकोबा सरक त्याच्या कानावर
तो हलकल्लोळ पडला आणि त्यांनी आपल्याला घरी आणून सोडलं. घाबरलेल्या
बायकांना पण निरोप पाठवून बोलावून घेतलं. (बोलणी पण त्यांनाच बसली.)
तू न डगमगता पडेल ते काम, अगदी पाणी भरणं, पापडाचा गोळा कुटणं, शिकवण्या
घेणं वगैरे करत अथक परिश्रम करून शिक्षण तर पूर्ण केलंसच, पण गणितात पीएच.
डी. गणितात गोल्डमेडल, सरस्वती भुवन सारख्या कॉलेजमध्ये प्राध्यापकी, शिवाय
वाल्मीमध्ये अधिकारीपद असा आलेख उंचावत नेला. एकंदरीतच खूप नाव कमावलंस.
रिकामा तर कधीच दिसला नाहीस. मी मॅट्रिक झाल्यानंतर दहा-बारा वर्षं धावड्यालाच
होते. कमल, गोविंद, मी आमचे छान सूर जुळले होते. गोविंद खूप बडबड्या, विनोदी,
लहान-मोठ्यामध्ये लोकप्रिय होता आणि कधी तरी तू आलास की तर ऊतच यायचा. तू
पण गुम्मीला असताना अत्र्यांच्या एका विनोदी नाटकात काम केलं होतं चिक्कू शेटजीचं.
ते संवाद म्हणून हसवायचास. कधी गाण्यातही सहभाग असायचा. आपण ‘औरंगाबाद
चांगलं’ की ‘अकोला-नागपूर’ असे वाद घालत असू. सारंगचं लग्न ठरल्यावर, ‘तुमच्या
विदर्भातली आहे बरं का सून... छान आहे!!’ म्हणालास. वसुधाच्या गृहप्रवेशानंतर
तुला एक स्थैर्य आणि घराला घरपण आलं. पैठणच्या सुसंस्कृत, प्रेमळ, शिस्तबद्ध
वातावरणातून आपल्या तिला, रुक्ष, बेशिस्त वातावरणात निभावणं सोपं नव्हतं. पण
तिने सर्वांची मर्जी सांभाळून, आल्या गेल्याचं करून, कुळाचार जपून मुलांचा ही उत्तम
संगोपन केलं. चांगले संस्कार दिले त्यांना..!! इतकं सगळं सांभाळून देवगावच्या शाळेत
नोकरी, बाहेरचीसुद्धा सगळीकामं, कसं तिला जमलं हे सगळं? नवल वाटतं. मुलंही तुला
विचारूनच सर्व निर्णय घेत. सुनापण संस्कारी आहेत. तुझ्या आजारपणात सर्व जण खूप
झटले. योग्य डॉक्टरांकडे नेऊन उत्तमोत्तम उपचार केले. मंदार, महेश दोघंही नामांकित
डॉक्टर तुझ्याकडे लक्ष ठेवून होते.
या सगळ्यांमुळे थोडं तरी बोनस आयुष्य तुला मिळालं असणार. खरं तर उर्वरित
आयुष्य आरामात, कुटुंबीयांच्या सहवासात, आनंदात घालवायची वेळ होती. पण तुला
होणारा त्रासही असहनीय असणार!! तरीही…
{ सौ. मनीषा देशपांडे, पुणे
***

109
नात्यातील माणुसकी जपणारे भाऊजी
मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला प्रसन्न करून जातो.
सहवासातील काही माणसांच्या बाबतीतही हेच होते. जगात चांगली माणसं आणि
माणुसकी असते, ती मी अनुभवली मुकुंद भाऊजींमध्ये. प्रा. डॉ. मुकुंद अमृत देशपांडे
हे माझे भाऊजी. ते माझ्या मोठ्या बहिणीचे दीर. गणिताचे प्राध्यापक म्हणून मला त्यांची
आदरयुक्त भीती वाटत असे. पण त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, भावाबद्दलचे नितांत प्रेम,
आपुलकी हे सर्व गोविंद देशपांडे- त्यांचे भाऊ आणि माझ्या भाऊजींच्या निधनानंतर
कळले. भावाच्या पश्चात त्यांनी पुतणी वृषालीचे लग्न व कन्यादानही केले. कौटुंबिक
कर्तव्यात वसुधाताईने पुरेपूर साथ दिली. भावाच्या पश्चात भाऊजी रेखाताईस लहान
बहीण समजून लक्ष देत.
त्याचा शिष्यवर्ग खूप मोठा आहे. माऊली क्लासच्या वाटुळे सरांच्या मते शून्यातून
विश्व निर्माण करणारे गणितज्ञ. आज ते आपल्यात देहरूपाने नसले तरी आठवणीत
कायम राहणार. फुलांचा दरवळ कायम अस्तित्व मागे ठेवून जातो. भाऊजींचंही आयुष्य
जणू असंच होतं.
हीच आदरांजली…

{ सौ. मंगला हरीश कुलकर्णी


संत मीरा माध्यमिक विद्यालय, औरंगाबाद.

***

110
मरावे परी कीर्तीरूपी उरावे
‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ ही म्हण तंतोतंत खरी वाटली, ज्या दिवशी माझे मोठे
दीर कै. डॉ. मुकुंद देशपांडे यांचे निर्वाण झाले. त्यादिवशी अगदी मुंगीसारखी माणसे
आली होती. खरेतर सगळ्यांनाच एक दिवशी इथून जायचे आहे, पण मागे कीर्ती ठेवून
जाणे हे महत्त्वाचे. आलेली सगळी माणसे खूप हळवी झाली होती. घरातला एखादा
माणूस जावा असे दुःख प्रत्येकाला वाटत होते.
माझा तर अगदी आधारच गेला असे झाले. ज्येष्ठ भ्राता- पित्याप्रमाणे त्यांनी मला
जीव लावला. माझा त्यांच्याशी जास्त संबंध हे म्हणजे त्यांचे लहान भाऊ (गोविंद
देशपांडे) गेल्यावर जास्त जवळून आला. लहान भाऊ गेल्यावर त्यांना खूपच दुःख झाले.
तेव्हापासूनच ते जास्त खचले होते. त्यांची जबाबदारी वाढली होती. कारण माझी मुलगी
लग्नाची होती. तिचे लग्न महत्त्वाचे होते. आणि त्यांनी उभयतांनी अगदी जबाबदारीने
ते पार पाडले. पोटच्या मुलीप्रमाणे कुठेही कसर ठेवली नाही. कारण आपल्या भावाला
एकच अपत्य असल्याची भावना त्यांना होती. मला लग्नघर वाटावे म्हणून ते वहिनींना
घेऊन माझ्याघरी येत व स्वतः तिथेच माझ्या घरी आराम करत. मला जास्त त्रास होऊ नये
ही त्यामागील भावना. कधी वेळ मिळत नसेल तरीसुद्धा वेळात वेळ काढून येत. दुसऱ्यांचे
दुःख जाणणारे असे माझे मोठे दीर. खरोखरच आम्ही भाग्यवंत आहोत की आमच्या
घरात थोर पुरुष जन्माला आला.
ते कुटुंब वत्सल होते. पण ही कुटुंब वत्सलता फक्त स्वतःची बायको-मुले
यांच्यापुरतीच नव्हती, तर बहीण, भाऊ, पुतणे या सगळ्यांचे चांगले कसे होईल ही
सदैव चिंता त्यांना असायची. आमचे भाऊजी कधी स्वतःसाठी जगलेच नाहीत. सतत
दुसऱ्यांचा विचार करत असत. जेवढे सगळ्यांसाठी करता येईल तेवढे ते करायचे. स्वतः
लक्ष्मीपुत्र, पण हातात कधी सोन्याची अंगठी घातली नाही की स्वतःची एकसष्टीसुद्धा
करू दिली नाही. स्वतःसाठी त्यांना काहीच नको वाटायचे.
परिस्थितीशी खूप संघर्ष करून यशस्वी वाटचाल करून कीर्ती मिळवणे फार
अवघड काम आहे. अगदी दोन वेळेस जेवण मिळणेसुद्धा अवघड होते. अशाही
परिस्थितीत स्वतःचा तोल सांभाळत खंबीरपणे परिस्थितीला तोंड दिले. खूप कीर्ती
मिळवली. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खूप हुशार, कर्तबगार, चौकोनी चिरा
असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. बोलण्यात, गाणे म्हणण्यात, नाटकात काम करण्यात
111
सगळ्यात ते हुशार होते. त्यांची आदरयुक्त भीती वाटत असे. त्यांच्यासमोर उभे
राहण्याचीसुद्धा भीती वाटायची. पण ते कधी चुकूनही कोणाचेही मन दुखावेल असे
बोलले नाहीत. सगळ्यांचं मन सांभाळून वागायचे. त्यांना हे सगळं करण्यासाठी साथही
तशीच मिळाली ती माझ्या जाऊबाई वसुधा देशपांडे यांची. त्याही खूपच समजून घेणाऱ्या,
सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या अशा प्रेमळ आहेत. म्हणतात ना की, पुरुषाच्या यशामागे
स्त्रीचा हात असतो. आमच्या वहिनींसाठी हे शब्द सार्थ आहेत. त्या भाऊजींच्या पाठीमागे
खंबीरपणे उभ्या होत्या. म्हणून त्यांना हे सगळं करणं शक्य झालं.
असं म्हणतात की, सरस्वती आणि लक्ष्मी एका ठिकाणी राहत नाहीत. पण माझ्या
भाऊजींच्या बाबतीत मात्र असे मुळीच नाही. त्यांच्या घरी दोघी एकाच वेळी आनंदाने
नांदत आहेत. दोन्ही मुलंसुद्धा सारंग आणि मंदार खूप हुशार व मनमिळाऊ निघाली. दोन्ही
मुलांनाही छान घडवलं. तसंच सुनाही छान मिळाल्या. सौ. नयन व सौ. अपूर्वा. दोघीही
खूप छान आहेत, मनमिळाऊ आहेत. चांगल्या माणसांचे सगळे चांगले होत असते, असे
मला वाटते.
गमतीने भाऊजी म्हणायचे,‘मी जन्मलो गरिबीत, पण मरणार मात्र श्रीमंतीतच’ आणि
झालेही तसेच. मुलांनी कुठलीही कसर ठेवली नाही, त्यांचे सर्व व्यवस्थित केले. त्यांनी
नेहमी म्हणावं की, ‘माणसं जिवंत असताना त्यांची सेवा करावी आपल्याला जशी जमेल
तशी.’ आणि हे खरं आहे. मी पंढरपूर पायी वारीला गेले होते. तेव्हा परत आल्यावर
अगदी सकाळी सात वाजताच ते माझ्या भेटीला आले. मला खूप आनंद झाला. त्यांना
काळजी वाटली, मी कशी असेन. मी थोडी काळवंडले होते. तेव्हा लगेच म्हणाले,‘किती
काळ्या पडलात.’ मला खूप वाईट वाटले व आनंदही झाला. त्यांना आपल्या लहान
बहिणीची किती ही काळजी?
मी मुलीकडे अमेरिकेला गेले होते. आल्यावर लगेच गरम गरम समोसे, जिलेबी
आणि बरेच काही घेऊन माझ्या भेटीसाठी आले. मी चार महिन्यांपासून घरात नाही. घरात
काही असेल की नसेल. आपण गेल्यावर पोहे वगैरे करत बसेल तर आपणच घेऊन जावे.
यावरून ते दुसऱ्यांचा किती विचार करत असत हे लक्षात येते. मला त्यावेळेसही खूप
आनंद झाला. खरंच वडिलांसारखे प्रेम कोणी करू शकत नाही. मला मात्र त्यादिवशी
माझ्या वडिलांची खूप आठवण आली. त्यांनी ती उणीव भरून काढली.
112
अशा किती आणि काय आठवणी आहेत ते सांगू शकत नाही. ते खूप प्रेमळ आणि
कुटुंबवत्सल होते. त्यांच्याबद्दल किती लिहावे आणि किती नको. शब्द अपुरे पडतात.
भाऊजी गेल्यावर जी पोकळी निर्माण झाली ती कशानेही भरून निघणार नाही.
शेवटी एवढेच म्हणावे वाटते की, अशा थोर थोर माणसास त्यांच्या लहान वहिनींची
तुटपुंज्या शब्दसुमनांची श्रद्धांजली.
तुमच्या आत्म्यास सुख, शांती, सद्गती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शेवटी ‘जो
आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला’ हेच खरे.

{ श्रीमती दीपाली गोविंद देशपांडे


औरंगाबाद

***

113
अन्य नको वरदान
जरी विसंबून या बाहूवर कुणी बिलगला दुर्बल जर्जर ।
तो नच व्हावा वंचित रीतीभर इतुके द्या अवसान |
प्रभो मज अन्य नको वरदान....।।
या ओळी कानावर पडल्या अन् एक प्रतिमा मनावर उमटली. ती म्हणजे श्री. मुकुंद
अमृतराव देशपांडे माझे मेहुणे. जे वरील उक्तीप्रमाणे आयुष्यभर व्रत घेतल्यासारखे
जगले. शून्यातून विश्वनिर्माण करूनही म्हणा किंवा फिनिक्स पक्ष्यासम राखेतून गगनाला
गवसणी घालूनही पाय जमिनीवर ठेवून, अनेकांना मदतीचा हात देऊन त्यांनी उपकृत
केले. यात सहकारी, नातेवाईक, कर्मचारी आणि हो विद्यार्थीसुद्धा, या सर्वांना अगदी तन-
मन-धनाने सर्वताेपरी मदत केली. एवढे सर्व करूनही स्वत: प्रसिद्धीपासून दूरच राहिले.
या प्रवासात त्यांना भक्कम साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची म्हणजे माझ्या
बहिणीची. ते म्हणतात ना,” देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक
दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे.’ जर मला आयुष्याच्या अंतापर्यंत असे हात घेता आले, तर
ती या थोर गणितज्ञाला माझी आदरांजली ठरेल.

{जयंत उर्फ कमलाकर देशमुख


पुणे
***

114
डॉ. मुकुंद देशपांडे : शिक्षक, मार्गदर्शक, पालक
आज मी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. आयुष्याचा ५९ वर्षांचा काळ कसा गेला,
असा सहज विचार करीत होतो. बालपण, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण,
नोकरी, त्यानंतरच्या जबाबदाऱ्या असे अनेक कालखंड डोळ्यांसमोरून तरळून
गेले. आणि लक्षात आले की, महाविद्यालयीन शिक्षण व त्यानंतर अखेरपर्यंत मुकुंदा
काकांची शिक्षक, मार्गदर्शक, पालक भूमिका सुरू झाली. १० वी नंतर जवळजवळ एक
महिना उशिरा मी स. भु. विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आलो. तेव्हा घरून
निघतानाच वडिलांनी सांगितले, ‘मुकुंदा तेथे आहे, तो सगळं पाहुन घेईल.’ ११ वी चे
प्रवेश बंद झाले होते, पण मुकुंदा काकांनी खटाटोप करून, वजन वापरून प्रवेश निश्चित
केला.
मी खेड्यातल्या शाळेतून एकदम स. भु. सारख्या महाविद्यालयात आलो, तेव्हा
वेळापत्रकसुद्धा समजले नाही. मग परत मुकुंदाकाकांनी वेळापत्रक, महाविद्यालय इमारत,
प्रयोगशाळा सर्व फिरून दाखवले व माझे नियमित शिक्षण सुरू झाले. उत्कृष्ट प्राध्यापक
अशी मुकुंदाकाकांची ख्याती होती. त्यांनी शिकवल्यानंतर चांगला निकाल लागणारच
याची खात्री असे. या नियमांनुसार मी जेजे विषय त्यांच्याकडून शिकलो त्यात कधीही
८५%पेक्षा कमी गुण मिळाले नाहीत. विद्यार्थिप्रिय प्राध्यापकाची प्रचिती अनेकवेळा येत
असे. इतर प्राध्यापकांच्या नियमित वर्गात (Regular lecture) तुरळक विद्यार्थी, पण
मुकुंदा काकांच्या अतिरिक्त तासाला सुद्धा (Extra lecture) वर्ग खचाखच भरलेला
असे. अनेक विद्यार्थी हातात वही, पेन घेऊन उभे राहून तास करीत असत. (यात मीसुद्धा
काही वेळा होतो.)
महाविद्यालयाचा निकाल वाढविण्यासाठी जास्त वेळ शिकवा, असे त्यांना
प्राचार्यांकडून सांगण्यात येई. नि:स्वार्थ मदत, प्रामाणिक सल्ला देशपांडे सरांकडून
नक्कीच मिळेल, अशी खात्री विद्यार्थ्यांना होती. अनेक विद्यार्थ्यांना, नातेवाइकांना,
संस्थांना त्यांनी शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात मदत केली.
मी एम.एस्सी.ला शिकत असताना अर्ध वेळ नोकरीसाठी एकाठिकाणी शब्द टाकला
व मला ती नोकरी मिळाली. एम.एस्सी. झाल्यानंतर प्राध्यापकाची नोकरी मुकुंदाकाकांच्या
ओळखीमुळेच मिळाली. मी प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केल्यानंतर यशस्वी
प्राध्यापक होण्यासाठी काय करावे, शिकवण्याची पद्धत, मुलांवर नियंत्रण, मुलांशी
115
संवाद, अभिनयाची गरज, शिक्षकाने करावयाचा गृहपाठ असे अनेक विषय विस्ताराने
समजावले. ‘प्रत्येक उदाहरण स्वतः सोडवल्यानंतरच वर्गात शिकवावे.” ही त्यांची सूचना
मी नेहमी पाळत आलो.
मुकुंदा काकांसोबत वसुधा काकूंनीसुद्धा आमचे पालकत्व आनंदाने स्वीकारले.
कुठल्याही शुभकार्यात, अवघडप्रसंगी दोघांचीही सक्रिय मदत तन, मन, धनासहित
ठरलेली असे. कोणतेही कार्य नीटनेटके, रीतसर, शोभेसे व्हावे, असा वसुधा काकूंचा
प्रयत्न असे, तर मुकुंदा काका काटकसर करण्यास सांगत. वसुध काकूंना ते म्हणायचे,
“तू शेखरला खर्चात टाकू नकोस.”
मुकुंदाकाका व वसुधाकाकूंनी मला पाल्य म्हणून स्वीकारले. तसेच सारंग, सौ.
नयन, डॉ. मंदार, डॉ. सौ. अपूर्वा यांनीसुद्धा ‘शेखरदादा’ म्हणुन स्वीकारले, यापेक्षा मोठा
मान कोणता असू शकेल?
मुकुंदाकाकांच्या निधनानंतर एका गाण्याच्या ओळीमनात आल्या “जो आवडतो
सर्वांना, तोचि आवडे देवाला” १४ ऑक्टोबर २०१९ रोजी मुकुंदाकाकांना देवाज्ञा
झाली, ही आज्ञा देवाला लांबवता आली नसती का? देवाने आवडतो याचा अर्थ
आपल्याकडे बोलावून घेणे असाच का लावला?

{ प्रा. चंद्रशेखर मधुकर देशपांडे


जे.एन.ई.सी., औरंगाबाद
***

116
त्यांच्या आत्म्याला शांती मिळणारच !!!
मुकुंदाकाकांनी अनेकजणांची आयुष्ये घडवली. अनेकांना नोकरी मिळवण्यासाठी,
लग्ने जुळवण्यासाठी पुढाकार घेतला, मनापासून प्रयत्न केले. अनेकांना योग्य सल्ले
दिले. त्यांच्या अशाच एका सल्ल्यामुळे माझ्या आयुष्यालासुद्धा योग्य दिशा मिळाली.
त्याचे असे झाले की, १९८५ साली सरस्वती भुवन शिक्षण संस्थेची गणिताच्या
सहशिक्षक पदासाठी एक जाहिरात आली होती. मी ही अर्ज केला. स्वतः आदरणीय कै.
पु. बा. जोशी व इतर ४–५ जणांनी मुलाखत घेतली. तुमची निवड झाली आहे आणि
जागा गोंदेगाव येथील आहे, हे ऐकताच माझा चेहरा पडला. त्यांना अंदाज आला असावा.
ते म्हणाले, घरी विचारून २–३ दिवसांत होकार-नकार कळवा. मी त्यांना सांगितले
की, आई-वडील येथे नसतात. मोठा भाऊ व लहान बहिणी येथे राहतात. अजून कुणी
नातेवाईक आहेत का? असे विचारल्यावर माझे चुलत काका डॉ. मुकुंद देशपांडे S. B.
Science College मध्ये प्राध्यापक आहेत, हे सांगितले.
घरी आल्यावर भावाला कल्पना दिली, परंतु इतक्या लांब कुठल्याकुठे जाऊन नोकरी
करण्याची अजिबात आवश्यकता नाही, असे त्याने स्पष्ट बजावल्यानंतर मी नकार
कळवला व तो विषय तिथेच थांबला. नंतर २–३ दिवसांनी मुकुंदाकाका आमच्याकडे
आले व म्हणाले की, पु. बा. जोशींनी मला बोलावून विचारले की, ‘तुमच्या पुतणीची
सहशिक्षकपदी निवड झाली होती, पण तिने नकार कळवलाय, काय कारण आहे?’
मग त्यांनी भावाला व्यवस्थित समजावून सांगितले. नोकरी सहजासहजी मिळत
नाही. एखाद-दोन वर्षं तेथे राहायचे आणि नंतर जवळच बिडकीनला बदलीसाठी
प्रयत्न करू. बिडकीनला औरंगाबादहून जाणे-येणे करता येईल, इ. इ. मुकुंदाकाकांच्या
सुसंगत, मुद्देसूद, समर्पक सल्ल्यामुळे भाऊही तयार झाला. अशा रीतीने माझा स. भु.
प्रशालेत प्रवेश झाला तो केवळ काकांमुळेच. यथावकाश मुकुंदा काकांनी बिडकीनला
बदलीसाठीसुद्धा प्रयत्न केले.
आयुष्यात त्यांनी केलेल्या अनेक पुण्यकर्मांमुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळणारच,
याची खात्री आहे.
{ सौ. नीलिमा देशपांडे– कुळकर्णी
मुख्याध्यापक, स. भु. प्रशाला, औरंगाबाद.
***
117
आयुष्याचे सोने करणारे गुरुवर्य
औरंगाबाद ही मराठवाड्याची शैक्षणिक राजधानी. १९८०-२००० ह्या काळात
मराठवाड्यातील इतर शहरी आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आपली
स्वप्नं घेऊन औरंगाबादला यायचे. स्वप्नं मोठी असायची, पण ती पूर्ण करण्यात अनेक
अडचणी असायच्या. त्यात प्रामुख्याने न्यूनगंड, नवीन शहरी वातावरण, मराठी ते इंग्रजी
हा माध्यमातला बदल, काहींच्या आर्थिक अडचणी. शालेय गणित व अकरावीनंतरचे
गणित यात खूप मोठा फरक. समजण्यास कठीण झाल्याने बरेच विद्यार्थी आत्मविश्वास
कमी झाल्यामुळे गावी परतण्याचा किंवा विज्ञान शाखा सोडण्याचा विचार करायचे.
पण सरांच्या शिकवण्याच्या विशेष शैलीमुळे गणित समजायला सोप व्हायचं आणि
विद्यार्थ्यांच्या मनावरचं दडपण कमी व्हायचं. शिवाय वर्ग सुरू होण्याच्या आधी व नंतर
अभ्यासेतर गोष्टींवर चर्चा व्हायची. आत्मविश्वास वाढायला फार उपयोगी मार्गदर्शन
असायचं. याशिवाय ते अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीत मदत करायचे. त्यांच्या
पाठीशी उभे राहायचे.
अशा या परिसासम गुरुवर्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं केलं.
त्यांच्या स्मृतींना वंदन.

{ श्याम सुंदर पांडे


जनरल मॅनेजर, श्रीनाथ रोटोपॅक, हैदराबाद

***

118
असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही....!
काय लिहू आणि किती लिहू, चार ओळींमध्ये बंदिस्त करण्यासारखे काकांचे
व्यक्तिमत्त्वच नव्हते....कुटुंबातल्या छोट्या-मोठ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे
राहून कुटुंबातल्या सगळ्यांना आधार देणारे आमचे देशपांडे काका..
देशपांडे काकांविषयीच्या अनेक आठवणी माझ्या मनात कोरल्या गेलेल्या आहेत.
त्यांच्या असंख्य सुखद आठवणींचा आशीर्वादरूपी खजिना आजही आम्हा सर्वांच्या
जवळ राहिला आहे. मी सिंगापूरला जाताना स्वतः कारने औरंगाबाद एअरपोर्टपर्यंत
सोडवणे असो... किंवा मी औरंगाबादला शिफ्ट झाल्यावर विश्वे यांचा फ्लॅट भाड्याने
मिळवून देणे असो... इतरांना मदत करण्याची वृत्ती, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे भान हे
काकांनी नेहमीच बाळगले..
शिक्षक म्हणून ज्ञान असणे जितके गरजेचे आहे, तितकेच विद्यार्थ्यांपर्यंत ते
पोहोचवण्याची पद्धत देखील महत्त्वाची आहे, असे त्यांना नेहमीच वाटायचे. प्रत्येक
विद्यार्थ्याची मानसिक पातळी ओळखून त्यांना सोप्या पद्धतीने कसे शिकवायचे याच्यावर
काका भर देत. विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांचे फोन यायचे, अतिशय सोप्या
पद्धतीने काका फोनवरच त्यांचे problem सोडवायचे. विद्यार्थ्यांसोबत त्यांचा उत्तम
समन्वय राहत असे. केवळ गणित विषयासंबंधी माहिती नव्हे, तर आपले अनुभवदेखील
विद्यार्थ्यांना कामास कसे येतील, याकडे त्यांचे लक्ष असे.
गोष्टी, उदाहरणे देऊन समजावल्यास मुलांना पटकन समजतात आणि नेहमीसाठी
लक्षात राहतात असे त्यांना वाटायचे. गणित विषयावरचं प्रभुत्व, बाहेरून काटेरी
शिस्तीचे..पण आतून मात्र मुलायम संवेदनशीलता....
जीव लावणारा मृदूस्वभाव, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक घडामोडींचं
अचूक ज्ञान असणारं...अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.. म्हणूनच..मी म्हटलं...असे व्यक्तिमत्त्व पुन्हा
होणे नाही....!
‘छोटी सी बात’ सिनेमा मधलं हे गाणं आठवतं… ना जाने क्यूँ होता है ये जिंदगी के
साथ, अचानक ये मन किसीके जाने के बाद, करे फिर उसकी याद, छोटी छोटीसी बात….!
{ डॉ. जय भोपी
MS (Ophth),पुसद.
***
119
नियतीपुढे कुणाचे काय चालते?
मी आज माझ्या शब्दांत जसे जमेल तसे स्मृतिग्रंथाबद्दल लिहिणार आहे. मी कधी
लेख लिहिला नाही, म्हणून आपल्यासमोर फार काही येईल असे वाटत नाही. तरीही दोन
शब्द लिहावेसे वाटले.
आम्ही १५ वर्षं पैठण येथे राहत होतो, नंतर औरंगाबाद येथे बदली झाल्यामुळे
येथे आलो. त्यावेळी सौ. वसुधा व मुकुंदराव यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. मला
औरंगाबादची फार माहिती नव्हती. मुलांचे अॅडमिशन वगैरे कुठे घ्यावे याबद्दल त्या
दोघांनी खूपच मदत केली. सरस्वती भुवन शाळेमध्ये मुकुंदरावांच्या ओळखीने माझ्या
मुलांचे अॅडमिशन झाले. नंतर माझ्या मुली वसूकडे शिकवणीला जायच्या. आमचे सध्या
जे घर आहे त्यासाठीही मुकुंदरावांनी खूप मदत केली. हा प्लॉटही त्यांच्या मित्राचा होता.
त्यांच्या प्रयत्नाने आम्ही हे घर घेतले.
त्यांचा स्वभाव म्हणजे कोणाच्याही गरजेला उपयोगी पडेल असा व सरळ होता. ते
घरी आल्यावर काही खाण्यासाठी दिले तर जे असेल ते काहीही नावे न ठेवता खायचे.
आज माझी मुले परदेशात आहेत, त्यामागे मुकुंदराव व वसू यांचे खूप मोठे श्रेय
आहे. माझ्या मुलांना त्यांची पदोपदी आठवण येते. माझ्या मुलीला गणित खूप अवघड
वाटायचे,पण त्यांनी तिला क्लासला येऊन बसत जा, असे सांगितले. नंतर तिला इतकी
गोडी लागली की तिला गणित खूप आवडायला लागले.
इतका चांगला माणूस इतक्या लवकर जाईल, असे वाटले नव्हते. त्यांना शेवटी
खूपच त्रास झाला.
अजून थोडी वर्षं तरी ते आपल्यामध्ये असायला हवे होते, परंतु नियतीपुढे कुणाचे
काय चालते?

{ सौ. शुभांगी मुधलवाडकर,


औरंगाबाद.

***

120
मामाच्या घरी जाऊया…
मुकुंदमामा. काळ्या जाड चौकोनी फ्रेमचा चष्मा, पांढरा कुर्ता आणि पांढरा पायजमा
आणि १९८० च्या जमान्यात राजदूत चालवत येणारा असं अंधुकसं काही आठवतंय.
साधारण आठवतंय तेव्हा आम्ही बहुधा भिसेंच्या वाड्यातल्या लहानशा दोन
खोल्यांमध्ये भाड्याने राहत होतो. सारंग किंवा मंदारच्या वाढदिवसाला मला व अर्चनाला
घेऊन जाण्यासाठी तो राजदूत मोटारसायकलवर यायचा.
मी आणि सारंग साधारण बरोबरीचे. माझी सरस्वती भुवनमधील अॅडमिशन त्यानेच
केले. त्या काळात माझा अण्णा मामांकडे (म्हणजे त्याचा मोठा भाऊ) चांगला ओढा
होता. पण त्या दोघांमध्ये जुना अबोला. सारंग व मंदारच्या मौंजीमध्ये तरी कमीतकमी
आपल्या मोठ्या भावाने यावंअसं त्याला खूप वाटत होतं. मुंजीच्या आदल्या दिवशी
सगळे पाहुणे आले, पण अण्णा मामा नाही. त्या रात्री त्याने मोठ्या आशेने मला
विचारलेला तो प्रश्न आजही तसाच आठवतो. शशांक, तुला काय वाटतं,अण्णा मामा
येतील कारे? मला काही कळत नव्हतं, पण मी हो, असे म्हटल्यावर त्याला झालेला
आनंद मला आठवतो.
मुकुंद मामाचं आमच्या घरी येणं म्हणजे पर्वणीच. तो आला की गप्पांचा ओघ सुरू
व्हायचा. त्याच्यासाठी तंबाखू आणि चुना यांची व्यवस्था केलेली असायची. कित्येक
प्रश्नांवर तो अगदी सहज आणि समर्पक उतारा सांगायचा. त्यातल्या त्यात गोविंद मामा
जर यात असेल तर मग विचारूच नका. कित्येक दिवाळीच्या भाऊबीज मला आठवतात.
त्या वेळी माझे चारही मामा एकत्र यायचे. आमच्याकडे जेवण. जेवणानंतर पत्त्यांचा फड
आणि मग भाऊबीजेचे कार्यक्रम. त्यात मुकुंद मामा, गोविंद मामा आणि अण्णा मामांची
जुगलबंदी. वा.. वा.. क्या बात है.
मी मामांकडे संध्याकाळी अभ्यासाला जायला लागलो. सारंग व मी एकमेकांच्या
सोबतीने अभ्यास करायचो. बारावीची माझी गणिताची ट्युशन मामाकडे. सकाळी
पहिली पाच ची बॅच करायची आणि परत यायचे. मामांना सकाळी बॅचच्या आधी चहा
लागायचा. त्यासाठी मामींना सकाळी पाचच्या आधी उठावं लागत होतं. मग मला सहाला
म्हणजेच पाच ची बॅच झाल्यावर चहा घ्यायला लावूनच त्या घरी जाऊ देत असत. काही
विद्यार्थ्यांची फीस घेण्यासाठी किंवा काही प्रॉब्लेम सांगण्यासाठी त्यांना सव्वासहा किंवा
सहा वीस एवढा वेळ होत असे. मला कॉलेज असल्यामुळे लवकर निघावे लागत होते.
121
त्यावर मी उतारा काढला. सकाळी पाचला मामांचा आणि माझा चहा मीच करायला
लागलो. समीकरण एकदम छान जमलं. मामांना चहा मिळाला आणि मलाही सहाला
ट्युशन झाल्यावर लगेच जाता यायचं. मामींनाही कधी थोडं उशिरा उठलं तर चालून
जायचं एखाद्या वेळेला.
त्याच्या दूरदृष्टीबद्दल एक गोष्ट आवर्जून आठवते. मी आणि सारंग इंजिनिअरिंगच्या
दुसऱ्या वर्षाला असताना त्यांनी आम्हाला दोघांनाही ICFAIच्या CA FOUNDA-
TION कोर्सला टाकलं होतं. ही गोष्ट साधारण १९९३-९४ची. आज वीस-पंचवीस
वर्षांनंतर ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की, जर का तुम्ही दोन प्रोफाईलमध्ये Expe-
rienced असाल म्हणजे Engineering + CA किंवा Computer + CA तर तुमचा
इंडस्ट्रीमध्ये Higher Post Acceptance जास्त असतो. ही गोष्ट मामांना १९९३-९४
लाच कळली होती.
जसं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. ‍याप्रमाणे मुकुंदमामाच्या
मागे वसुधामामी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभ्या होत्या. मग तो सरस्वती भुवनची नोकरी
सोडून मामांनी पूर्णवेळ क्लास सुरू करणे असो किंवा इतर कोणताही निर्णय. त्या
खंबीरपणे मामांच्या मागे होत्या. मामांच्या सगळ्याच भावंडांसाठी त्यांनी नेहमीं निष्काम
भावनेने मदत केलीये. मग तो गोविंद मामा असो किंवा लक्ष्मण मामा असो किंवा बहीण
म्हणजे माझी आई असो. इतकंच काय, पण शेवटी शेवटी त्यांनी अण्णा मामांसाठीही
खूप केलं. त्या दोघांत नेमकं काय होतं हे त्यांनाच माहीत. पण जरी अण्णा मामा बोलत
नव्हते तरी त्यांच्या बोलण्यातून मुकुंद मामाबद्दलचं कौतुक लपत नव्हतं. त्यामानाने त्याची
इहलोकीची यात्रा लवकर संपली. औरंगाबादला घरी गेल्यावर, कमल, थोडे मुगाचे भजी
आणि चहा कर. असं घराच्या दारात येऊन तो म्हणतोय, असा भास बऱ्याचदा होतो.
म्हणतात ना
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥
{ शशांक देशपांडे,
पुणे
***
122
दीपस्तंभ
पहाटेची वेळ. सगळ जग साखरझोपेत असताना झुंडीच्या झुंडी ६, सुयोग कॉलनीच्या
बंगल्याकडे जात. त्यात शहरातील सर्वच प्रमुख महाविद्यालयांतील विज्ञान, कला व
वाणिज्य शाखेतील १२वीचे विद्यार्थी असत. पहिल्या मजल्यावरचा हॉल गच्च भरून जाई.
बाकडे भरले की टिन असणाऱ्या गच्चीवरच्या त्या हॉलच्या पॅराफिटच्या भिंतीवर मुलं
बसत अन् एखाद्या जादूगाराने जादू दाखवावी तसं एम.ए.डी सर (सर्व विद्यार्थ्यांचे प्रेमळ
‘मॅड’ सर) भराभर गणिते सोडवत. अशा बॅचमागे बॅच होऊन चांगली दुपार होईपर्यंत
लोंढे येत-जात. दुपारच्या ३-४ तासांच्या अवकाशानंतर संध्याकाळी पुन्हा अशा ३-४ बॅच
झाल्या की त्या बंगल्यात निवांतपणा जाणवे.
वर्षानुवर्षे न थकता हे ज्ञानदानाचे सोहळे रंगत ते केवळ एम.ए.डी. सरांच्या
वैशिष्ट्यपूर्ण शैलीने. गणित शिकवणारे अनेक होते, पण गणितावर मनापासून प्रेम
करणारा, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पातळीवर जाऊन समजावून सांगून गणिताची भीती
घालवणारा, अन् एकदाही न चिडता कायम हसतखेळत, कोडी, गाणी आणि गोष्टींमधून
इंटिग्रेशन अन डिफरन्सिएशन सोपे करणारा हा गणिताचा जादूगार कित्येक पिढ्यांवर
आपलं गारूड करून गेला.
माझं अन् त्यांचं नातं मामा-भाच्याचं. लहानपणापासून कायम लक्षात राहिलेली गोष्ट
म्हणजे राखी पौर्णिमेचा सण अन् मुकुंदमामाची भेट. तो अगदी न चुकता यायचा; सोबत
जैन स्वीटचा मिक्स मिठाईचा बॉक्स. नंतर नंतर जेव्हा वैद्यकीय शिक्षण चालू होते तेव्हा
कधी कधी भेट चुकायची, पण घरात आलेला जैनस्वीटचा बॉक्स पहिला की कळायचं
तो येऊन गेला म्हणून.
तसा तो आणि मामी आल्या की आम्ही त्याचा सहवास सोडत नसू. मुकुंद मामा
कायम मिश्कीलपणे थट्टा करायचा. अनेक किस्से त्याच्याकडून ऐकायला मिळायचे.
एखाद्याचे समुपदेशन करायची कलादेखील त्याला चांगलीच अवगत होती. बोलून,
उदाहरणे देऊन तो आपत्ती काळातही मनोधैर्य उंचवायचा. ताण हलका करायचा. त्यामुळे
तो कायम संकटात साथ देणारा भाऊ म्हणून सदैव आईच्या पाठीशी उभा असलेला
आम्ही पाहिलाय.
पण केवळ बहीणच नाही, रक्ताचे-ओळखीचे, मित्र-नातेवाईक, जुने सोबती,
विद्यार्थी कोणालाही मदत करताना त्याचा हात आखडायचा नाही. त्यात दानशूरतेचा
123
अथवा कर्तृत्वाचा भाव मुळीच नसायचा. अशा कुठल्याही कृत्रिमतेपासून तो सदैव लांब
होता.
त्याच्या लहानपणीचे अनेक किस्से आई-गोविंद मामाच्या तोंडून आम्ही ऐकलेत.
गावातील जत्रेत नाटक करण्यापासून गावातल्या शाळेत फुकट शिकवणाऱ्या ‘फुकटे
गुरुजी’सारख्या आठवणीतून त्याची अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जाणीव व्हायची.
लांबच्या नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेणे, शिकता शिकताच खर्च भागवण्यासाठी
रात्री प्रेसमध्ये काम करणे, शिकवणी घेणे अशा अपार कष्टाने भरलेल्या संघर्षाच्या
आठवणी त्याच्याबद्दल आदर द्विगुणीत करत. सरस्वतीच्या कृपेमुळे अठराविश्वे दारिद्र्य
असणाऱ्या घरात जन्मूनही लक्ष्मीची जेव्हा कृपा झाली तेव्हाही त्याचे पाय कायम
जमिनीवर राहिले.
त्याने रसिकतेने मिळालेल्या सुबत्तेचा उपभोग घेतला, पण त्यात नवश्रीमंतीची नशा
डोक्यात जाऊ दिली नाही. त्यामुळे गावाकडून येणाऱ्या सगळ्यांची सरबराई करणे, अड-
नड भागवणे, सुख-दु:खात सहभागी होण्यात कधी कसूर झाली नाही.
त्याच्या या प्रतिमेची छाप कायम मनावर कोरली गेली. अन् माझ्यासारख्या अनेक
गलबतांसाठी तो दीपस्तंभासारखा कायम संकटात वाट दाखवत राहिला. या सगळ्यांना
समर्पक साथ दिली वसुधा मामींनी. यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तसे मामींनी
संसाराचा अन् व्यवसायाचा मेळ अचूक साधला. सारंग अन् मंदार यांनी देखील
अभिमानाने ऊर भरून येईल असे केलेले कर्तृत्व, याचि देही पाहण्याचा सुयोग त्याला
लाभला.
शेवटची काही वर्षे आजाराचा विळखा वाढतच होता. डॉक्टर असल्याने अनेक
वेळा सल्ला देण्यासाठी मी जात असे. पेसमेकर बसवल्यानंतर काही काळ चांगली उभारी
असलेली तब्येत पुन्हा पालिनुरोपॅथी आजाराने ढासळली. इतरांना मदत करणाऱ्या त्याला
आपल्या प्रकृती अस्वास्थ्याने इतरांना त्रास व्हावा हे आवडायचे नाही. त्यामुळे कायम
लवकर डिस्चार्ज घेण्याकडे त्यांचा ओढा असायचा. मंदार दादा अन् माझे नेहमी बोलणे
व्हायचे, पण प्रकृतीचे गुंतागुंतीचे गणित सोडवण्यात आम्ही शेवटी अपयशी ठरलो.
मंदार दादाचा पुण्याहून फोन आला अन् ती वाईट बातमी एकदाची धडकली.
त्याच्या दोन दिवस आधी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याची भेट घेतली होती.
124
व्हेंटिलेटर असूनही डोळ्यात तेच बोलके भाव, दीर्घ आजारपणाने आलेला कृशपणा….
त्यावेळीदेखील आशा वाटत होती की यातूनही हा बरा होईल अन् पुन्हा हिरीरीने भारत-
पाक युद्ध, मोदी, राहुल गांधी अशा विषयांवर आपल्याशी चर्चा करेल,पण नियतीचे खेळ
निराळेच.
शेवटच्या काळात सर्वच घरादाराने शर्थीचे प्रयत्न केले, मामींनी तर २४ तास अखंड
सेवा केली, पण सगळे पाश सोडून तो अनंताच्या यात्रेला गेला.
गेला कसं म्हणता येईल, पण...... तो जिवंत आहे, त्याच्या अनंत आठवणींतून.
त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही त्यांचा ‘कंटूर’ म्हणणारा आवाज घुमतोय.
सगळं कळूनही अजूनही मन मानत नाही. अस वाटतं, एखाद्या राखी पौर्णिमेला
मुकुंद मामा घरात उभा असेल. तेच चिरपरिचित हास्य घेऊन अन् हातात असेल मिक्स
मिठाईचा बॉक्स....

{डॉ. महेश देशपांडे,


हृदयरोगत , हेडगेवार रुग्णालय, औरंगाबाद

***

125
ध्येयनिष्ठ कर्मयोगी
कै. प्रा. डॉ. मुकुंद अमृतराव देशपांडे हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून
अनुकूलतेचा दरवाजा ठोठावणारे व्यक्तिमत्त्व असा त्यांचा उल्लेख केल्यास अयोग्य
होणार नाही. कारण धावडा नामक एका लहानशा गावात, एका सामान्य कुटुंबात, जन्मास
आलेले हे एक रत्न. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शालेय जीवनापासून
संघर्षमय जीवन जगून, शिक्षण घेण्याची आंतरिक ओढ असल्यामुळे बी.एस्सी. गणित ही
पदवी आणि एम.एस्सी. गणित या पदव्युत्तर विषयात विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले. गणित
विषयात जस्तीत जास्त गुण मिळवून विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचे मानकरी होण्याचा
मोलाचा बहुमान मिळवला. ही उपलब्धी त्यांच्या जीवनाची मोठी जमेची बाजू होती.
शिक्षण क्षेत्रात एवढे मोठे यश संपादन करून शैक्षणिक प्रवास त्यांनी थांबवला नाही,
तर गणित या विषयावरील एक विशेष प्रबंध लिहून अभ्यास करून विद्यापीठाला सादर
केला व पीएच.डी. विद्यावाचस्पती ही शिक्षण क्षेत्रातील अत्युच्च दर्जाची अजून एक पदवी
बहुमानासह संपादन केली. जिद्द व परिश्रमाने काय होत नाही हे दाखवून दिले.
हे व्यक्तिमत्त्व अत्यंत कष्टाळू, मितभाषी आणि मनमिळाऊ. साधी राहणी, उच्च
विचार, शिस्तप्रिय, विनम्र, गरिबीची आणिवेळेचीजाणव भान असणारं होतं. सतत
मदतीचा हात पुढे करणं मग कारण, सामाजिक असो किंवा कौटुंबिक त्याचा विचार न
करणारी व्यक्ती. विशेष बाब म्हणजे, जात-पात-धर्म यापलीकडे जाऊन सरस्वतीचं
विद्यादान करणारा हा एक धर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ कर्मयोगी होता, असा उल्लेख केल्यास
काहीच गैर होणार नाही.
शिक्षण चालू असतानापासून त्यांनी गणित विषयाचे शिकवणी वर्ग चालवले होते.
ज्या वर्गात शिकत त्याच वर्गाच्या विद्यार्थ्यांची ते शिकवणी घेत होते. एवढ्या तल्लख
बुद्धीचा माणूस.. लाखात एक..शोधून सापडणार नाही.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरस्वती भुवन संस्थेत गणित या विषयाचे प्राध्यापक म्हणून
त्यांनी नोकरीला सुरुवात केली. बुद्धीच्या जोरावर ज्ञानाचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व.
प्रशासकीय व विद्यार्थी जगतात सर्वांचे चाहते आणि आवडते होण्यास त्यांना फार वेळ
लागला नाही. आदराने प्रेमाने सर्व स्तरांवर त्यांना एमएडी MAD म्हणून संबोधले जायचे.
गणिताचे विशेष ज्ञान ही सरांना परमेश्वरी देण होती त्याचं त्यांनी जीवनात सोनं केलं.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून अनेक विद्यार्थ्यांची दशा व दिशा बदलून
126
टाकून अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग, वैद्यकीय क्षेत्रात जगभरात आज हजारोंच्या संख्येने
उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर इंजिनिअर होऊन आनंदी जीवन जगत आहेत. ही सरांची कृपा
व आशीर्वाद असे ते म्हणतात. ही एक उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.
गणित हा विषय माझा श्वास आहे, असे ते नेहमी म्हणायचे. त्यापासून मी माझ्या
शेवटच्या श्वासापर्यंत दूर जाणार नाही. हा त्यांचा शब्द असायचा तो त्यांनी खराही केला.
ज्ञानदानाचा जणू त्यांनी वसा घेतला होता. त्यापासून ते हयात असेपर्यंत कधीही दूर गेले
नाहीत. यासाठी त्यांनी कधी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्षही केलं, हेही आठवणीत आहे.
कौटुंबिक जीवनात पुरुषाच्या यशाच्या वाटचालीत एका कर्तृत्ववान, सुशील स्त्रीचा
अर्थात पत्नीचा सहभाग असतो, असे म्हणतात. या उक्तीने त्यांच्या आयुष्यात माझी
भाची पैठण निवासी कन्या पूर्वाश्रमीचे नाव वसुंधरा आत्मारामपंत देशमुख, अर्धांगिनी
पत्नी म्हणून प्रवेशित झाली. वर्तमानात श्रीमती वसुधा मुकुंदराव देशपांडे, धावडेकर.
उच्चशिक्षित शांत स्वभावाची. सर्वांना सोबत घेऊन चालणारी, तडजोड वृत्तीची,
प्रपंचाच्या चढ- उतारात साथ देणारी या व अशा अनेक गुणांनी संपन्न अशी साथ त्यांना
लाभली व त्यांचे पोरके जीवन, वर आकाश, खाली पृथ्वी,ना डोक्यावर कुणाचा हात
नापाठीवर कुणाची थापही अवस्था संपुष्टात येऊन ते सुखी समृद्ध कुटुंबाचं जीवन जगू
शकले. शून्यातून जग निर्माण करणाऱ्या या बहुआयामी व्यक्तिमत्वावर काळाने घाला
घातला.
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला, प्रमाणे त्यांनी अखेरचा श्वास घेऊन ते
परमेश्वराला प्यारे झाले.

{ डॉक्टर लक्ष्मीकांत सावळे


पुणे

***

127
तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे...
आजही मला स्पष्ट आठवतंय, किंबहुना डोळ्यांसमोर तरळतंय ते वर्ष १९७२! खरंतर
अख्ख्या महाराष्ट्रला ते भीषण दुष्काळासाठी माहीत आहे, पण आमच्या घरात आनंदी
आनंद होता. १८ मे रोजी माझा उपनयन संस्कार. (५-१० लोकांसमवेत, परसवाड्यात
भटजी बोलावून, पत्रिका न छापता आणि फोटो बिटोची भानगड नसलेला धार्मिक
सोपस्कार!) या गोष्टीमुळे मनात नाराजी तर होती. तथापी चारच दिवसांनी माझ्या ताईचं
लग्न असल्याने (२२ मे १९७२) उत्साह संचारला होता.
लग्नाआधीचे रुसवे-फुगवे (अर्थात वडीलधाऱ्या मंडळींच्या जुनाट माना
पानाच्या कल्पनांनी घडवून आणलेले) वगळता जोरदार तयारी चालू होती. असो. सर्व
अडथळेपार करत वसुताई बोहल्यावर चढणार होती. कुणीतरी औरंगाबादच्या गणित
विषयाच्या प्राध्यापकाबरोबर. आम्ही लहान असल्याने मेहुणा काय चीज आहे, हे
पाहण्याचा योग आला नव्हता. दारावर सोलापुरी चादरीचा मंडप, घोटणकरांच्या घरात
जानसवाडा व नाट्य मंदिरात लग्न.
धूमधडाका नसल्याने त्या वयात लग्न कार्य फार काही गांभीर्यानं घेतलं नाही,
किंबहुना पोट्ट्या सोट्ट्यांची मध्येमध्ये किटकिट नको म्हणून बहुतेक वेळेस आम्हाला
बाहेरचा रस्ता दाखवला जायचा.
मुकुंदराव अर्थात भाऊजी यांची खरी भेट झाली, दर्शन झालं ते मांडव परतणीच्या
वेळेस. गणिताचा प्राध्यापक आणि शहरी माणूस यामुळे आम्ही आमचं गणित बिघडू नये
म्हणून चार हात लांबच.
दहावीनंतर शिक्षणासाठी मोर्चा औरंगाबादला वळल्यानंतर मुकुंदरावांचे (माझ्यासाठी
आजन्म भाऊजी हाच उच्चार) खऱ्या अर्थाने गणित सुरू झाले.
खूप मोठं नाव, आदर आणि एमएडी सरांकडेच शिकवणीला यायची यासाठी मुलं
वडिलांच्या वशिल्यानं येत. गणितात त्यांचा हात धरणारा औरंगाबादेत नव्हता, पण
आमच्यासाठी घर की मुर्गी दाल बराबर.
एकदम साधं राहणं, कधी पांढऱ्या रंगाच्या शर्टचा रंग बदलला नाही, तर पँटने
काळपट किंवा काळा रंग सोडला नाही. वर्गात शिकवताना मी ट्युशन घेतोय, १
तास शिकवीन किंवा पैसे कमावण्याचा हा माझा धंदा याचा भास कधीच झाला नाही.
तन्मयतेने, आवडीने व मुलांची बुद्धिमत्ता व कल्पकतेने शिकवण्याची त्यांची हातोटी
128
खरंच आगळीच. शिकवताना विद्यार्थ्यांच्या मेंदूत एक न् एक शब्द उतरवणारा हा मास्तर.
गणितासारख्या क्लिष्ट विषयात विनोद निर्माण करून क्लासमध्ये हसवणे, शब्दांचे
खेळ करणे, शब्दांतील अक्षरांत बदल करणे किंबहुना कधीकधी अक्षराचा उच्चार
वेगळा करून वाक्याचा भावार्थ बदलून टाकणे हा त्यांचा आवडता खेळ. त्यातून रेखा व
बिंदूसारखी सम्यकरूपं शोधून गोडी निर्माण करणे हा त्यांचा हातखंडा.
प्रासंगिक उदाहरणे, प्रचलित राजकारण किंवा सिनेसृष्टीतील नायक-नायिकांचा
अथवा खलनायकाचा वापर गणित शिकवताना करून, क्लिष्टप्रमेये कशी जन्मभर
विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतील हा त्यांचा अखंड ध्यास.
या शिकवण्याच्या हातोटीमुळे औरंगाबादच नव्हे, तर मराठवाड्यातील १२ वीच्या
विद्यार्थ्यांचे गणित त्यांनी ताब्यात घेतले होते.
हरहुन्नरी कलाकार असल्यामुळे टीकेचे रूपांतर चांगल्यात कसे करावे ते शिकावे
मुकुंदराव भाऊजींकडून. नावाची आद्याक्षरं एमएडी असल्यानं त्याचे वाईट न वाटता तेच
नाव प्रसिद्ध होऊ दिलं. एवढंच नव्हे, तर नंतर त्याचं रूपांतर Mathematic Apptitide
Development Centre करून मार्मिकपणा दाखवून दिला.
स्वभाव तसा हजरजबाबी व खट्याळ. मार्मिक कोट्या (थोडासा चिमटा घेऊन)
करणं ही त्यांची आवड. मी नोकरीला असताना खेडेगावात ते ३-४ दिवस राहायला
आले होते. आमच्या स्वयंपाकवाल्या मावशींनी डाळ-तांदळाची खिचडी शेंगादाणे
घालून केली होती. (शेंगादाणे जरा जास्तच पडले होते म्हणा) जेवण वाढल्यावर ‘आज
शेंगादाण्याच्या खिचडीचा बेत दिसतोय. डाळ-तांदूळ चवीला घातले हे छान झाले’,
अशी खट्याळ प्रतिक्रिया दिली.
नाट्यक्षेत्राची आवड, संगीताची जाण व उत्तम आवाज. याचबरोबर राजकारण व
क्रीडा क्षेत्रातील उत्तम माहिती असं त्यांचं बुद्धिविश्व अफाट पसरलेले मी पाहिले आहे.
त्यामुळे सान थोर मंडळींशी गप्पा मारताना कोणत्याही विषयात त्यांना मर्दुमकी गाजवता
यायची. शिक्षकी पेशा, पैसा-अडका, Real Estate हे तसे दुरान्वयाने संबंध येणारे
विषय,पण त्यांचंही गणित त्यांनी लीलया हाताळलं.
शून्यातून विश्वनिर्मिती हा शब्द खरंतर लेखनामध्ये किंवा चर्चेत शोभतो, पण
अक्षरश: निर्धन परिस्थितीतून कोणतीही लबाडी किंवा वाममार्ग न स्वीकारता, एवढंच
129
नव्हे, तर सासर-माहेरच्या कुटुंबाला सोबत घेऊन जे साम्राज्य उभं केलं त्याची अल्पशी
तुलना आपण धीरूभाई अंबानी या व्यक्तिमत्त्वाशी करू शकतो. अर्थात हे माझं वैयक्तिक
मत.
मंज़िले बडी जिद्दी होती है। हासिल कहा नसीब से होती है।।
मगर वहा तुफान भी हार जाते है। जहा कश्तियाँ जिद पर होती है।।
या चार ओळींची जन्मभर आठवण यावी हा त्याचा स्वभाव.
भाऊजी शाळा-काँलेज शिकत असताना स्वत शिकायचं आणि व त्याचीच
शिकवणी वर्गमित्र किंवा खालच्या वर्गाची घ्यायची हा त्यांचा अर्थार्जनाचा विषय. पणही
शिदोरी बरोबर घेऊन त्यांनी जन्मभर वाटचाल केली. त्यातून मार्ग शोधला व दुसऱ्यांनाही
दाखवला.
बहुत कुछ सिखाया जिंदगी के सफर अनजाने ने।
वो किताबों मे दर्ज था या नही। जो पढाया सबक जमाने ने।।
माझ्यात व त्यांच्यात जवळपास १५ वर्षांचे अंतर. त्यामुळे आदर आणि धाक तर
होताच, पण त्यांच्या शब्दांतून किंवा कृतीतून नेहमीच सहकाऱ्याची, मित्राची भूमिका
राहिली. तू लढ, मी आहे तुझ्या पाठीशी, असा पाठिंबा शेवटपर्यंत राहिला.
मी मेडिकलला गेल्यावर माझं गणित सुटलं, पण त्यांच्या गणित प्रेमाचं कोडं आजही
मला सुटत नाहीये. कदाचित प्रेम म्हणा, गोडी म्हणा किंवा अर्थार्जनाचा विषय म्हणा
असंवाटायचं, पण गणित हा त्यांच्या आत्म्याचा व श्वासाचा भाग होता. हे मी भाऊजी
शेवटी आयसीयूमध्ये असताना अनुभवलं आहे.
लिहिता लिहिता खरंच १९७२ चे लग्न ते शेवटी आयसीयूची आठवण झाली.
मुकुंदरावांचा माझ्यासाठी पहिल्यापासून शेवटपर्यंत भाऊजी जीवनपट व आठवणी
कागदावर मांडणं खरंच अवघड आहे. आता उगाच वाटतंय की,
शामसे आँखों में नमी सी है।
आज फिर उनकी कमी सी है ।।
{ डाॅ. संजय देशमुख
पुणे
***
130
कोटी कोटी प्रणाम…
मुकुंदराव देशपांडे या नावापेक्षा एमएडी सर या नावाने त्यांना ओळखणाऱ्या व्यक्ती
आज औरंगाबादमध्ये आहेत. एमएडी सर = गणित हे सूत्र होतं. अतिशय प्रसिद्ध
व्यक्तिमत्त्व, अतिशय बुद्धिमान, साधे राहणीमान, उच्च विचारसरणी, अतिशय ज्ञानी व
बुद्धीचे भांडार असे गुण त्यांच्यात होते. सगळ्यांशी साधेपणाने बोलणे, त्यांच्या समस्या
सोडवणे, सगळ्यांना मदत करणे, हा गुण त्यांच्यात होता. मग ती मदत पैशाने असो की
श्रमाने.
धावड्यासारख्या छोट्या खेड्यातून येऊन येथे शिकून व स्वकर्तृत्वावर नोकरी
मिळवली. कोणाचे पाठबळ नसताना स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू केले. ही चाळीस-
पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. त्याकाळी ती साध्य करणे सोपी नव्हती. त्या काळी मुलांना
क्लासेस लावणे ही संकल्पना एवढी रुजली नव्हती, परंतु त्यांनी गणितासारखा अवघड
विषय मुलांना इतका सोपा करून शिकवला की, पूर्ण औरंगाबादची मुले त्यांच्याकडे
आकृष्ट झाली. त्यामागे त्यांचे परिश्रम, ध्येय, सचोटी आणि पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी
संवाद साधण्याची कला होती. यातून ते औरंगाबादशी एवढे आपलेसे झाले की, पालक,
मुलगा दहावी पास झाला की मुलांना एमएडी सरांच्या क्लासला घातले की बिनधास्त
व्हायचे. त्यांना खात्रीच असायची की, आपला मुलगा चांगल्या मार्कांनी पास होणारच.
इतका आत्मविश्वास लोकांच्यात निर्माण झाला. अशा ज्ञानी आणि यशस्वी पुरुषाच्या मागे
एक स्त्री असते, त्याप्रमाणे त्यांच्या पत्नीने त्यांना अखंड मोलाची साथ शेवटपर्यंत दिली.
त्यामुळेच ते इतके दिवस ज्ञानार्जन करू शकले. आजही ती माउली आपल्या मुलांना,
सुनांना व नातवंडांना साथ देत आहे. सरांना दोन्ही मुलेच आहेत. मोठा श्री. सारंग,
इंजिनिअर व लहान डॉक्टर मंदार देशपांडे, औरंगाबादमधील प्रथितयश व प्रसिद्ध डॉक्टर
आहे. त्यांच्या स्नुषा त्या त्या क्षेत्रातल्याच मिळाल्या आहेत व त्याही अतिशय हुशार. घर,
संसार आणि करिअर सांभाळत अतिशय उत्तमपणे आपले कार्य बजावत आहेत. त्या मागे
वसू मावशीचा फार मोलाचा वाटा आहे. पूर्वीपासूनच आमचे नाते होते. माझ्या जावेचे
काका तिला आई-वडिलांच्या पलीकडचे आहेत. पण आता नव्याने नाते जोडले गेले,
ते म्हणजे माझ्या सुनेची सख्खी मावशी व काका. पण आमच्यासाठी आधीचे काका-
काकूच.
या दांपत्याकडे बघितले की धन्य धन्य वाटते. कारण अखंड ज्ञानाचा झरा वाहतो
131
आहे, असे वाटते. मावशीचे बोलणे नुसतेच ऐकत राहावेसे वाटते. तिला या ज्ञानी
पुरुषाची संगत लाभली ती पती या रूपात. मुलांनाही त्यांनी अतिशय सुंदरपणे घडवले.
मुलं किती भाग्यवान, की असे आई-वडील त्यांना लाभले. आपल्या मुलांना तर कोणीही
घडवतं. मोठ्या नातवालाही बारावीला सरांनी शिकवलं. तो किती भाग्यवान, आपले
आजोबा आपल्याला किती सहज सोपं करून शिकवतात. त्याला किती अभिमान वाटत
असेल. असे हे धन्य आजोबा. शेवटपर्यंत ज्ञानार्जन करणे हाच ध्यासत्यांना होता व त्यांनी
तो पूर्ण केला. ते खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षक होते. आज ते आपल्यात नाहीत, पण असं
वाटतच नाही. ते आपल्या पाठीशी आहेत, आयुष्यात येणाऱ्या अडचणींची शिकवणी
घेण्यासाठी.
अशा या ज्ञानी पुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम.

{ अंजली निशिकांत कुलकर्णी


औरंगाबाद

***

132
आमचे मुकुंद देशपांडे मामा : भावाचे मित्र ते आमचे मामा हा प्रवास
मुकुंद देशपांडे आमचे मामा कसे झाले आणि आमच्याच घरातले एक कसे झाले
ते कळलेच नाही. ते एकटेच राहायचे, त्यामुळे आमच्या घरी सारखं येणं-जाणं व्हायचं.
आमच्या आईला त्यांनी मावस बहीण म्हणून स्वीकारलं आणि आईला हक्काचा भाऊ
आणि आम्हाला हक्काचा मामा मिळाला. आईला तिच्या माहेरी मोठी म्हणून बाई
म्हणायचे म्हणून तेसुद्धा आईला बाई म्हणून हाक मारायचे. आमच्या घरी केलेले कांद्याचं
थालीपीठ आणि लोणचं त्यांना खूप आवडायचं. आमच्या घरी कधी जेवण झालं की
दुसऱ्या दिवशी भाऊ किंवा प्रकाशला ते त्यांच्या मेसमध्ये घेऊन जायचे जेवायला. त्यांना
एमएस्सीमध्ये गोल्ड मेडल मिळालं तेव्हा सगळ्यात आधी आईला दाखवण्यासाठी घेऊन
आले. आम्हा सर्वांनाच या गोष्टीचा खूप आनंद झाला होता.
कॉलेजला येता-जाता आमच्याकडे चक्कर असायची. आईशी खूप गप्पा मारायचे.
मग त्यांची लग्न ठरविण्याची वेळ आली. स्थळ आलं. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला.
पहिलीच मुलगी पाहिली आणि पसंत पडली. पुढील बोलाचालीची बैठक आमच्या घरी
ठरली. यात आमची आई, भाऊ,ते स्वतः, मुलीचे वडील आणि काही मोठी मंडळी होती.
देण्याघेण्यावरून बोलाचाली फिस्कटली आणि बैठक मोडली. आईने साग्रसंगीत सगळा
स्वयंपाक केला होता. मग काय, आम्हीच जेवण करून घेतलं. दुसऱ्या दिवशी मुलीचे
वडील आले. आईकडे कमी-जास्त बोलणी झाली आणि लग्न ठरले.
मामा लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाच्या साडी खरेदीसाठी मी, प्रकाश व मामा
असे सगळे गेले होतो. खरेदी झाल्यावर आम्ही मेवाड हॉटेलमध्ये शिरा खाल्ला आणि
घरी आलो. कालांतराने आमच्याकडेही भाऊचं प्रकाशचं, त्यानंतर बाबूचं व माझं लग्न
झालं. लग्न झाल्यावरही ते आमच्याकडे आईशी गप्पा मारायला नेहमी यायचे. आईने
कोणती घरातील चिंता व्यक्त केली, काळजी सांगितली तर आईला धीर द्यायचे. आईला
मोठा आधार वाटायचा त्यांचा. दरवर्षी ते दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी आमच्याकडे
यायचे. शेवटपर्यंत भावा-बहिणीचं नातं त्यांनी टिकवलं होतं. सख्खा मामा तरी काय
करेल असे आमचे मुकुंद मामा होते.
ते स्वतः सर्वसाधारण परिस्थितीतून वर आले असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत
असलेल्या मुलांबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. अनेक वेळा ते हुशार व गरजू
विद्यार्थ्यांना आर्थिक मदतदेखील करत. नातेवाइकांसाठी तर ते सदैव मदतीसाठी तयार
133
असत. घरात असो किंवा कोठेही सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. सर्वच घटकांमध्ये
त्यांनी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध जोपासले होते.
त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर वरीलप्रमाणे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या
सर्व आठवणींना उजाळा मिळून डोळे पाणावले. खरं तर एक दिवस आपण सर्वजण वेळ
आल्यावर येथून निघून जाणार आहोत. परंतु आपण हयात असताना ज्या काही चांगल्या
गोष्टी केल्या असतील त्याच शेवटी उपयोगी पडतात व त्यामुळे समाजात नातेवाईक व
मित्रमंडळींमध्ये असलेले आपले स्थान लक्षात येते. आता आपल्या सर्वांचे आयुष्य खूप
गतिमान झालेले आहे. आपल्याला कशासाठीच वेळ मिळत नाही, असे सारखे आपले
म्हणणे असते. सर्व काही ऑनलाईन व सबंध जग व्हर्च्युअल. अशावेळी चाळीस-पन्नास
वर्षांपूर्वी असलेले आमचे संबंध विलक्षण समाधान देतात.

{ सौ. सीमा सदाशिव देशपांडे


पुणे

***

134
नि:शब्द
काही व्यक्तींचा सहवास आणि त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षण माणसाला
नि:शब्द करून जातात. तसेच काही मुकुंदकाका आणि वसुधा काकू यांच्या बाबतीत
घडले. ३० ऑक्टोबर १९९३चा तो रविवार आजही आठवतो. पदमपुऱ्यातील काकांच्या
घरात माझा चंद्रकांतबरोबर साखरपुडा झाला आणि पूर्वाश्रमीची कल्याणकर यांची लेक
देशपांडे धावडेकरांची सून झाली.
मला हीदेखील कल्पना नव्हती की, हे यांचे काका-काकू म्हणजे माझे चुलत सासू-सासरे
आहेत. आधी फक्त बैठक ठरली होती, पण नंतर बैठकीतच पंधरा-वीस जणांच्या उपस्थितीत
माझा साखरपुडाही झाला. काकूंच्या हातच्या इडली-सांबारची चव आजही आठवते. त्यानंतर
बऱ्याच वेळेस जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा सगळ्यांची न चुकता चौकशी करणारे, बोलता-
बोलता धावडेकरांच्या गमतीजमती सांगणारे, अनेक प्रसंगांचे अगदी इत्यंभूत बारिक-सारिक
गोष्टींसह रंगतदारपणे वर्णन सांगणारे आणि त्यातच जीवनातील संघर्षाची कहाणी उलगडताना
कुठेही त्याबद्दल खंत व्यक्त करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मुकुंदकाका. हे कधी मनावर
कोरले गेले ते कळले नाही. माझ्या सासूबाई कै. शकुंतला धावडेकर आणि माझे यजमान
श्री. चंद्रकांत देशपांडे यांनी त्यांच्या अधिक गोष्टी सांगितल्या. म्हणजे त्यांच्या वडिलांच्या
निधनानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा धर्तीवर यांना नोकरी मिळावी यासाठी काकांनी
त्यांच्या मित्राकडे शब्द टाकला इथपासून ते त्यांनी केलेल्या वेळोवेळी केलेल्या मदतीबद्दल.
माणसाला अडचणीच्या काळात आर्थिकपेक्षाही भावनिक आणि मानसिक आधाराची जास्त
गरज असते. तो या कुटुंबाकडून आम्हाला नक्कीच मिळाला. त्यांच्या या ऋणातून उतराई
व्हायचे असेल तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अखंड कार्यरत राहणे व संकटावर मात
करतानाही आपल्या कुटुंबाची जोडलेले राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल काकांना.
त्यांची मुलं आणि दोन्ही सुना त्यांचा हा वसा अमृतवेलच्या प्रांगणात नेहमीच
सांभाळतील, यात शंका नाही. शेवटी एवढेच म्हणेन,
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ।।
या विं.दा. करंदीकरांच्या ओळी काकांसाठी अधिक सार्थ ठरतात.
{ सौ. ज्योती चंद्रकांत देशपांडे, औरंगाबाद
***
135
गणितमय झालेले कुटुंब
मुकुंद अमृत देशपांडे, हे औरंगाबाद शहरातलं असं नाव की अख्खं औरंगाबाद शहर
त्यांना त्यांच्या आद्याक्षरांनी ओळखत असे- एम.ए.डी. औरंगाबाद शहरातील बहुसंख्य
विद्यार्थी आजही त्यांच्या मॅड सरांची सातत्याने आठवण काढत असणार. माझी बहीण
नयनही त्यांची सून आणि म्हणूनच माझा त्यांच्या कुटुंबाशी निकटचा संबंध आला.
श्री. मुकुंदराव अमृत देशपांडे, यांचे बालपण धावडा येथे गेले. मुळातच हुशार आणि
तल्लख बुद्धी असलेल्या मुकुंदरावांनी अगदी चौथी-पाचवीपासूनच शिकवण्या घ्यायला
सुरुवात केली. घरची परिस्थिती अत्यंत साधारण. गणिताची प्रचंड आवड. शिष्यवृत्ती
मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले. एम.एस्सी. मॅथ्स स्नातकोत्तर पदवी, त्यानंतर पीएच.डी.
तीदेखील मॅथ्समध्येच त्यांनी मिळवली आणि सरस्वती भुवन येथे प्रोफेसर म्हणून ते रुजू
झाले. कालांतराने तेथून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी स्वतःचे गणिताचे क्लासेस दहावी
व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केले. त्यांना विद्यार्थी आता गणिताचे मॅड सर असे
ओळखू लागले आणि मॅड सरांकडे आपला मुलगा शिकतोय, मग कसली चिंता नाही या
जाणिवेने पालकही निर्धास्त होऊ लागले. त्यांच्या शिकवण्याची उत्तम पद्धत हाच कळीचा
मुद्दा असायचा. कित्येक गरीब मुलांना त्यांनी मोफत शिकवले. आज त्यांचे विद्यार्थी खूप
मोठ्या पदांवर आहेत.
लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हींचा वास त्यांच्या घरात सुखेनैव नांदू लागला. पण या
सगळ्या ऐश्वर्याचा जराही अहंकार त्यांच्या मनी नव्हता. विशाल हृदयाचे, हसतमुख,
कोणालाही न दुखावणारे असे अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते.
लग्नानंतर माझी बहीण नयन प्रथम पुण्यात होती. सोहम आणि स्वरा अशी दोन मुले
म्हणजे सरांची नातवंडे झाल्यावर ती औरंगाबादला स्थायिक झाली. श्री. मुकुंदराव यांना
अत्यंत तीव्र स्वरूपाचा मधुमेह होता. त्यामुळे ते एकटे एवढे शिकवणी वर्ग घेऊ शकत
नव्हते. त्यांनी नयनला क्लासेस घेण्यासाठी तयार केले. त्यांनी खूप मेहनत घेतली.
आम्ही पुण्यात जात असू तेव्हा अनेकदा मुकुंदराव यांचा सहवास आम्हाला लाभला.
मुलात मुल होऊन खेळणारे मुकुंदराव आम्ही अनुभवले. सोन्यासारखं झळाळतं हृदय
असणारा माणूस आम्ही अगदी जवळून अनुभवला. सगळ्या भाच्या, भाचे, पुतण्या,
पुतणी सगळ्यांना त्यांनी खूप मदत केली.
नयनच्या सासूबाई श्रीमती वसुधा काकू तर क्लासेसच्या आधारस्तंभ होत्या. सगळे
136
प्रशासन त्या सांभाळत होत्या. दोन्ही मुलं, सुना, नातवंडे सारेच अत्यंत हुशार. एक
मुलगा-सून इंजिनिअर, तर दुसरा मुलगा-सून डॉक्टर.
आपल्या स्वभावामुळे ते सर्वांचेच लाडके होते. माझ्या मुलाला (आकाश देव)
बारावीत असताना कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो लगेच देशपांडे आजोबांना विचारत
असे आणि त्याचे सोल्युशन अर्थातच त्याला पटकन मिळत असे. पुढे आकाश BE
झाला. आज तो अमेरिकेत नोकरी करतो आहे.
असे आमचे सर्वांचे लाडके मुकुंदरावकाका मागच्या ऑक्टोबर २०१९ ला आम्हाला
सर्वांना सोडून चिरंतनाच्या प्रवासाला गेले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी
कधीच भरून निघणार नाही, पण आठवणी अनंत आहेत.
त्यांच्या स्मृतींना शतश: प्रणाम.

{ सौ. लीना देव


नागपूर

***

137
माणसातील देव
श्री. मुकुंद अमृत देशपांडे यांना सर्वजण MAD सर म्हणून ओळखायचे. संपूर्ण
मराठवाड्याचे ते एकमेव गणितज्ञ होते. अतिशय हुशार, स्वाभिमानी, स्वावलंबी व कडक
शिस्तीचे होते. सर्वांसाठी ते सर होते, पण माझ्या कुटुंबासाठी ते आमचे आधारस्तंभ
होते. माझ्या पत्नीचे ते काका होते. म्हणून आम्ही त्यांना काका म्हणायचो. मी त्यांच्या
क्लासमध्ये आठ ते नऊ वर्षं काम केले, त्यामुळे मी त्यांना जवळून पाहिले आहे.
त्यांनी साधारण परिस्थितीतून, कष्टाने, मेहनतीने व प्रामाणिकपणे शून्यातून जग
निर्माण केले. काकांना सरस्वती व लक्ष्मी प्रसन्न होत्या. पण त्याचा त्यांनी कधीही गर्व
केला नाही. त्याचा उपयोग त्यांनी हजारो मुलांना शिकवण्यासाठी केला. प्रत्येकाला मदत
करणे हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता. त्यांना शिकवण्याची खूप आवड होती. सतत तीस
वर्षं शिकवणे हे सोपे काम नाही. पण त्यांनी ते करून दाखवले. ते नेहमी म्हणायचे जास्त
फीस घेऊन कमी मुलांना शिकवण्यापेक्षा कमी फीस ठेवून जास्त मुलांना शिकवावे. त्यांचे
विचार इतके उच्च स्तराचे होते.
काकांची राहणी अगदी साधी होती. त्यांनी उभ्या आयुष्यात कधीच वाईट मार्गांचा
अवलंब केला नाही आणि वापरही केला नाही. त्यांनी नात्यात पती, वडील, भाऊ,
काका, मामा, सासरे, आजोबा, शिक्षक इत्यादी आलेख आणि प्रत्येक जबाबदारी
अगदी प्रामाणिकपणे सांभाळली. त्यांनी कधीच कोणाला दुखावले नाही. प्रत्येकाला
होईल त्यापेक्षा जास्तच मदत केली. आदर्श शिक्षक तर होतेच, पणत्या बरोबर ते आदर्श
कुटुंबप्रमुखसुद्धा होते. त्यांचे सर्व निर्णय घरातील सदस्य आदेश समजून पाळायचे.
त्यांच्या यशामागे त्यांच्या पत्नी वसुधा देशपांडे यांचा मोलाचा वाटा होता. त्या व त्यांची
दोन्ही मुले मंदार देशपांडे व सारंग देशपांडे, यांच्या दोन्ही सुना त्यांच्या मागे खंबीरपणे उभे
असायचे. सर्वांनी त्यांची अविरत आनंदाने सेवा केली.
काकांनी गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, असा भेदभाव कधीच केला नाही. त्यांना
सर्वांबद्दल आदर असायचा. त्यांनी पूर्ण आयुष्यात कोणाकडून कशाचीही अपेक्षा केली
नाही. सर्वांना सगळं काही देण्यातच त्यांचे जीवन सार्थ केलं.
त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.
त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मी आज जो काही आहे तो फक्त
काकांमुळे. काकांनी माझी ओळख कुलकर्णी सर व गुरुजी म्हणून करून दिली. अशा
138
महान व्यक्तीकडून आपली ओळख होणे म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते.
मी लेखक नाही, पण मी माझ्या भावनेतून त्यांच्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला.
माझ्याकडून काही चूक झाल्यास मला क्षमा करावी.
त्यांच्यासाठी मी एकच सांगतो ते म्हणजे, माणसातील देव म्हणजे एम.ए. देशपांडे
आमचे काका.
त्यांचा वारसा त्यांची दोन्ही मुले असाच पुढे नेतील, अशी मला पूर्ण खात्री आहे.
माझ्यासाठी एकच खंत नेहमीसाठी राहील, ती म्हणजे मी त्यांच्या शेवटच्या काही
दिवसांत त्यांची सेवा करू शकलो नाही.

{ संजय कुलकर्णी
औरंगाबाद

***

मी रंजना, काकांची लाडकी मुलगी असे म्हणाले तरी चालेल. काकांबद्दल जेवढे
सांगावे तेवढे थोडेच आहे. काका माझे वडिलांसारखे लाड करायचे. माझ्या वडिलांनंतर
माझ्या काकांनी माझा सांभाळ केला. माझ्या काकांचे छत्र आज नाही याचे खूप वाईट
वाटते.

{ रंजना कुलकर्णी
औरंगाबाद
***

139
आजोबा
आजोबा, हा शब्द ऐकून समजले असेलच मी सुरभी. माझ्या आईच्या वडिलांना
मी कधी बघितलं नाही, पण त्याची उणीव माझ्या काका आजोबांनी कधीच भासू दिली
नाही. माझ्यासाठी काका आजोबा म्हणजे God Gift आहेत. ते मला नेहमी म्हणायचे,
तू गाणं छान म्हणतेस. माझ्यासाठी एक गाणं म्हणून दाखव. प्रत्येक कार्यक्रमात मी त्यांना
एक गाणं म्हणून दाखवायचे. आज मला जो पुनर्जन्म मिळालाय, तो फक्त आजोबांच्या
आशीर्वादामुळेच. आजोबा सर्वांचे लाड करायचे. माझ्या आठवणीत आणि हृदयात माझे
आजोबा कायम राहतील. माझी एक सुंदर कविता खास माझ्या आजोबांसाठी….
खूप सुंदर होत्या त्या आठवणी । खूप मोहक होते ते क्षण ।
तुमची सोबत असताना । कायमच हरवायचे मन ।
तुम्ही दाखवलेल्या वाटेवरून । मला चालायचं आहे ।
तुम्ही दिलेल्या शिकवणीतूनच । मला शिकायचं आहे ।
आणि सगळ्यांना सांभाळता सांभाळता । हे जगसुद्धा जिंकायचं आहे ।।
आम्ही मनापासून प्रार्थना करतो, असे काका आजोबा सगळ्यांना लाभो.
{ सुरभी कुलकर्णी व सौरभ कुलकर्णी, औरंगाबाद
***
भावबंध
पांघरत होता नानीची घोंगडी । पण आज बांधली तीन तालाची माडी ।
सरस्वती त्याला लहानपणापासून प्रसन्न । गणितात पीएचडी आणली मिळवून ।
उद्ध्ररल्या देशपांडेंच्या सातपिढ्या । तुझा आम्हाला अभिमान आहे गड्या ।
दुख सर्वांचे घेतो वाटून । मदतीला नातलगांच्या येतो धावून।
वसुधाची साथ त्याला मनापासून । अपार कष्ट कधी नाही बसत थकून ।
सारंग, मंदार चालविती पुढे वारसा । आणि वैभवाच्या चढविती कळसा ।
नयन अपूर्वा त्यांच्या ज्योती । जणू अमृत बंगल्यातील समईच्या वाती ।
सोहन, शौनक, शाश्वत आणि स्वराही वेल्हाळ ।
असे माझे माहेर, जणू भासते गोकुळ । जणू भासते गोकुळ ।।
{ सौ. शरयु (कमल) र. देशपांडे, औरंगाबाद

140
तुफान व्यक्तिमत्त्व
मुकुंदराव काका, माझ्या आत्याचे यजमान म्हणजे खरंतर मामा. पण मी त्यांना
काकाच म्हणत असे. बारावीच्या CET च्या परीक्षेच्या आधी त्यांच्याकडे शिकण्याचा
योग आला. अतिशय हुशार आणि मिश्कील व्यक्तिमत्त्व. त्यांच्यासारखे तेच असे
म्हणायला हरकत नाही. खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून, आयुष्यभराची आठवण
दिली त्यांनी मला. माझं गणित सुधारण्याचं काम फक्त काकांनाच शक्य होतं, असं
म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच मी अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेऊ शकले.
सकाळी ५ वाजल्यापासून त्यांचे क्लास सुरू व्हायचे आणि तेवढ्याच तन्मयतेने ते
प्रत्येक वर्गात शिकवायचे. ते पाहून अभ्यास करायचा हुरूप यायचा. त्यांचा वर्गात कधीही
कोणत्याच विद्यार्थ्याला कंटाळा येत नसे, कारण त्यांचे मजेदार किस्से, विनोदी स्वभाव,
मिश्कीलपणा हे सगळे शिकवणीत मिसळून तो वर्ग घेण्याची कला त्यांच्यात होती. ह्याच
पद्धतीमुळे गणिताची आवड निर्माण झाली आणि रेखा, बिंदू आपल्याच घरातले सदस्य
वाटू लागले.
कौतुकही खूप छान शब्दांत करायचे ते. एकदा त्यांनी माझं अक्षर पाहिलं आणि ते
त्यांना खूप आवडलं. ते मला म्हणाले फॉर्म्युल्यांचे काही चार्ट तयार कर आणि मला दे.
आधी लक्षात नाही आले. मी छान अक्षरांत ते तयार केले आणि त्यांना दिले. त्यांनी ते
क्लासमध्ये लावले आणि सगळ्यांना क्लासमध्ये त्याबद्दल सांगितले. तेव्हा मला खूप
छान वाटलं.
त्यांचे वाचन अफाट होते. ते कविता पण खूप छान करीत असत. ते एकदा बोलायला
लागले की ऐकत राहावे असे वाटायचे. औरंगाबादमध्ये काकांचे नाव अगदी आदराने
घेतले जाते. त्यांच्यासारखा गणिताचा शिक्षक आणि एक तुफान व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे
नाही. मला खूप अलंकारिक शब्दांत लिहिता तर येत नाही, पण काकांविषयी खूप आदर
आहे माझ्या मनात. माझ्याच नाही, तर ज्याला ज्याला त्यांचा सहवास लाभला त्या
प्रत्येकाच्या काकांविषयी अतीव आदरआहे.
ते सदैव आपल्या स्मरणात राहतील.

{ सौ. पूर्वा मंगेश कुरुळेकर


पुणे, विद्यार्थिनी
141
लोपले खळाळणारे हास्य
दि. १३ ऑक्टोबर २०१९ ला एका साखरपुड्याच्या निमित्ताने औरंगाबादला जाण्याचा
योग आला. औरंगाबादस्थित नातेवाइकांकडुन मुकुंदमामांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल
वेळोवेळी कळत होते. तेव्हा आधी त्यांच्या भेटीला जाऊन नंतर लग्न कार्यालयात
जावयाचे ठरले. आठच्या सुमारास मुकुंद मामांना भेटायला जाणार होते, परंतु त्यांना
वैद्यकीय उपचाराकरितात्यांना पुण्याला हलविल्याचे कळले. १४ तारखेला ठाण्यास परत
आले आणि दुपारी मुकुंद मामा गेल्याचा फोन आला आणि धक्काच बसला. आणखी
एक दिवस तेथे राहिले असते तर निदान त्यांचे अंत्यदर्शन तरी घेता आले असते, ही
रुखरुख मनाला लागली.
मुकुंद मामांचे व्यक्तिमत्त्व हे हिमालयासारखे उत्तुंग होते. गणितासारखा अवघड
विषय ते रंगवून शिकवत असत. वर्गात शिरताना एक मिश्कील हसू घेऊनच शिरत
असत. मुकुंद मामांच्या स्वभावाचे अनेक पैलू होते. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन
यशाची सर्व शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. नातेसंबंधांविषयीदेखील ते खूप जागरूक होते.
नाती जपणारे, टिकवून ठेवणारे होते.
माझ्या लहानपणीचा एक प्रसंग मला आठवतो. माझी आई, जिला ते अक्का
म्हणायचे, तिच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. कमल मावशी म्हणजेच त्यांच्या धाकट्या
बहिणीच्या लग्नाच्या वेळेस माझ्या आईला लग्नास जाणे जरा अवघड होते. लग्नाला
अवघे दोनच दिवस शिल्लक असताना माझी आई औरंगाबादला पोहोचली नाही, म्हणून
मामा स्वतः आमच्या गावी आले व अवघे दोन तास थांबून रातोरात आमच्या आईस
घेऊन निघाले.
आई कृष्णा मामांकडे आली की ते तिला भेटायला येत आणि मग त्यांच्या गप्पा अशा
काही रंगत की रात्रीचे साडेबारा-एक कधी वाजायचे ते कळत नसे. कुठलीही गोष्ट इतकी
रंगवून सांगायचे की हसता हसता पुरेवाट व्हायची. असं हे हिमालयासारखं उत्तुंग आणि
हसरं व्यक्तिमत्त्व हरवलं, यावर अजून विश्वासच बसत नाहीये. तिथे स्वर्गातदेखील
दादा, अक्का, गोविंद मामा त्यांना भेटले असतील आणि गप्पांची मैफल रंगत असेल.
गोविंद मामाच्या कोपरखळ्या आणि उजूच्या खळखळून हसण्याने तेथील वातावरण
अजूनच प्रफुल्लित होत असणार!!
{ सौ. स्नेहा (विद्या) श्रीकांतराव देशपांड,े आयकर अधिकारी, ठाणे
142
व्यक्ती एक, पैलू अनेक
एखाद्या व्यक्तीमध्ये एवढे सारे पैलू असू शकतात ?
नव्हे नव्हे, असतातच,आहेत आणि होते !!!!
मी बोलत आहे प्रा.डॉ.श्री मुकुंद अमृत देशपांडे (M.A.D.) यांच्याबद्दल...
ते आमचे भाऊजी होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना प्रत्येक वेळी भाऊजी असा
उल्लेख असणारच. भूतकाळाच्या सामान्य घटनांना भविष्यकाळात कितीही मोठी सोनेरी
झालर लावता येत असताना भाऊजींनी त्या सामान्य घटना मनाच्या एका कोपऱ्यात
वर्षानुवर्षं ताज्या ठेवल्या. किंबहुना त्याची बऱ्याचदा उजळणीही केली होती. माझी मोठी
मावशी सौ. शीला नारायण पाटील म्हणजे त्यांच्या आठवणीतील ‘सांडू पाटील’म्हणजे
हेच त्यांच्या बालपणीचे (भूतकाळातील) सवगंडीच म्हणा ना. जेव्हा ते त्यांच्याबद्दल
भरभरून बोलत तेव्हा त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम, आदर, आपुलकी जणू काही ते नव्याने
अनुभवत असत. त्यामध्ये भाऊजी एवढे रमून जात की त्या विश्वात एक फेरफटका
मारून येत.
त्या काळातल्या आठवणी सांगताना त्यांचा तो प्रसन्न चेहरा, आनंदाने भरलेलं मन,
एकेका प्रसंगाची न तुटता तयार केलेली साखळी. जणू काही खळखळून वाहणारा नदीचा
प्रवाहच होय.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही कुणाला कमी न लेखणे हा भाव.
मी भाऊजींकडून शिकले, ‘माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपल्या
भूतकाळाला कधीही दोष देऊ नये. भूतकाळाच्या पायावरच वर्तमान आणि भविष्याची
इमारत उभी असते.’ हा त्यांच्याकडून शिकलेला पैलू होय.
कधी कधी तर आम्ही लहान-मोठे नाते विसरून गप्पा मारत असू.
आजही तो प्रसंग डोळ्यांसमोर जसाच्यातसा उभा राहतो. आम्ही मनसोक्त गप्पा
मारल्या,अगदी एखाद्या मित्रासोबत माराव्यात तशा. काही गोष्टी भाऊजी उलगडत गेले
आणि आमचा गप्पांचा फड रंगत गेला. तेव्हा कळले, मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी
समवयस्कच मित्र असावा असं काहीच नसतं. फक्त एकमेकांबद्दल अॅटॅचमेंट असावी
लागते. मी, राज, ताई आणि भाऊजी आमचा एकत्रित केलेला प्रवास. तेव्हा मला
त्यांच्याबद्दल नवनवीन अनुभवायला मिळाले. म्हणजे एखादा माणूस आपण विचार
करतो, त्यापेक्षा खूप वेगळा आणि मोकळ्या स्वभावाचा असतो हे कळलं.
शेवटी शेवटी तर आम्हा चौघांची म्हणजे ताई, भाऊजी, राज आणि मी चांगलीच
143
गट्टी जमली होती. आमची
त्यांच्या जाण्याने नात्यातली पोकळी निर्माण झाली जी कधीही भरून निघणार नाही
!!!!!
या आठवणीच आता कायम मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवायच्या. हेच
आठवणीचं गाठोडं आपल्या एकांत वेळी सोडायचं. तो आठवणींचा सुगंध सगळीकडे
पसरू द्यायचा आणि पुन्हा ते गाठोडं बांधून ठेवायचं.बस्स…हेच आता आपल्या हातात
आहे आणि हीच प्रा.डॉ. मुकुंद अमृत देशपांडे सरांना (भाऊजींना) पुन्हा एकदा भावपूर्ण
श्रद्धांजली.
त्यांच्या शिक्षण क्षेत्राच्या योगदानाबद्दल तर लिहिताना हात थरथरणे, आणि बोलताना
शब्दच न सुचणे….
अशा एका हाडाच्या शिक्षकाला MAD सरांना त्रिवार वंदन .....
गणिताच्या राज्यातील मी ऐक वेडा राजा ।
सर्वस्व पणाला लावुन घडवली सरस्वतीची लाडकी प्रजा ।
त्या प्रजेचा मी एक निष्ठावंत सेवक झालो
अन् भावी पिढीला घडवत गेलो ।
उच्च पदावर पोहोचवला प्रत्येक विद्यार्थी माझा ।
मी एक गणितवेडा राजा ।
मी एक गणितवेडा राजा ........ ।।

{ सौ . शुभांगी राजेंद्र सावळे


औरंगाबाद

***

144
भावपूर्ण आदरांजली
शंभर- दीडशे पोरं, इयत्ता त्यांची बारावी । गणित विषय जरा अवघडच ।
पण सर, सोपंच झालं तुमच्या घरी ।।१।।
एका तासापुरतं, आमचं वय, आमची स्वप्नं । सगळं तुमचं होऊन जायचं
विसर पडायचा सगळ्या जगाचा । वातावरणात पण गणित असायचं ।।२।।
मग कधी सुरुवात व्हायची । A Heighted Girl... नी ।
तर कधी हशा पिकायचा । X tends to Y नी ।।३।।
Latest movies, Hero अन् Heroine । सगळेच रिंगणात उतरायचे ।
जिव्हाळ्याचे विषय सगळे । प्रमेयात मिसळायचे ।।४।।
असू दे Conic section । वा असू दे calculus।
Probability असू दे । किंवा Algebraic equations ।
सगळे रथी- महारथी । शस्त्र टाकून द्यायचे ।
गणिततल्या या योद्ध्यापुढे । शरणागतीच पत्करायचे ।।५।।
अनेक आयुष्यं घडवलीत तुम्ही । आम्ही अजूनही घडतोय ।
घडता घडता तुमच्यासारखा । MAD गणित शोधतोय ।।६।।
आज छोटंसं गणिताचं रोपटं । देतंय Data Scienceची सावली ।
तुमच्यासारखंच शून्यातून विश्व उभं करू । हीच भावपूर्ण आदरांजली ।।७।।

{ सौ. मयुरा देशपांडे


अटलांटा, जाॅर्जिया (युएसए)

***

145
टेण्ड टू द इन्फिनिटी…
मुकुंदराव मामांमुळे अनेकांप्रमाणेच माझे ज्ञान वृद्धिंगत (+) झाले, माझ्यातल्या
अवगुणांना वजा (-) करायला मदत झाली, तसेच माझ्यातील गुणांना त्यांच्या
आशीर्वादाने आणि प्रोत्साहनाने गुणले (X), माझ्या कष्टांना, प्रयत्नांना त्यांच्या
मार्गदर्शनाने (divisor) (/) भागले तर आज जो कोणी मी आहे तो त्याचाच एक भाग
(quotient) आहे आणि खाली फक्त त्यांच्याविषयीच्या आदराची बाकी (remain-
der) उरली आहे.
नाव कमावणे ह्याचा खरा अर्थ ह्यांच्या जीवनातून लक्षात येतो, जगात कुठेही जा...
अगदी कुठेपण, जर कोणी औरंगाबादमधून १२वी पास झालेली व्यक्ती असेल तर MAD
सरांना ओळखणार नाही असे होणारच नाही. माझ्यासाठी मात्र ते मोठा बकासुर होते,
बालपणीच्या सुट्यांमध्ये घराच्या गच्चीवर बसून आकाशाकडे बघत बकासुराची गोष्ट
ऐकत कधी झोपायचो कळायचेच नाही. गोष्ट सांगण्याची पद्धतपण इतकी मजेदार की,
बकासुर हा असुरसुद्धा मजेशीर वाटायचा.
ज्याची भीती वाटावी अशा गणित विषयाला चारोळ्यांच्या स्वरूपात सादर करून
त्याला हसत खेळात शिकवायचा हातखंडा होता त्यांचा. सहज कशावरही कोटी किंवा
छानशी कविता करायचे, ती ऐकवताना मिश्कीलपणे गालातल्या गालात हसायचे. भाषेवर
पण प्रभुत्व होते. बोलता बोलता कोपरखळ्या आणि नकळत चिमटे, मात्र हे केवळ
सुज्ञाला समजतील असे असायचे. नाही तर काही न समजल्यामुळे, ‘काय मजेशीर
बोलतात हो तुम्ही..’ असे म्हणणारे होतेच की.
त्यांची बुद्धिमत्ता, कलागुण आज त्यांच्या मुलांमध्येच काय नातवंडांमध्येही
झिरपले आहेत. सारंगदादा, स्वरा, शौनक ह्यांच्या सुरेल आवाजातून ह्याची प्रचिती येते.
मंदारदादाच्या लेखनशैलीमधूनसुद्धा मुकुंदराव मामांची आठवण होते.
असे आमचे लाडके मुकुंदराव मामा आता ‘टेण्ड्सटू द इन्फिनिटी’ होऊन
आमच्या आठवणींमध्ये अमर झाले आहेत. अशा ह्या माझ्या मोठ्या बकासुराला ह्या
छोट्या बकासुराचे शत कोटी वंदन.
{ श्री. चेतन देशमुख,
हाेचिमिन्ह, व्हिएतनाम
***
146
माझे काका माझे गुरू
माझे काका डॉ. मुकुंद अमृतराव देशपांडे हे त्यांच्या नावापेक्षाही गणितातले
(MAD) या नावाने जास्त प्रसिद्ध होते. माझे काका माझे गुरूच होते. त्यांना १४
ऑक्टोबरला देवाज्ञा झाली. जेवढे दुःख मला माझे वडील गेल्यावर झाले तेवढेच दुःख
मला माझे काका गेल्यावर झाले.
भोकरदन तालुक्यातील धावडा गावामध्ये काकांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक
शिक्षणही तेथेच झाले. गणित विषयात त्यांचे खूप प्रावीण्य होते म्हणून काकांनी गणितात
सुवर्णपदक मिळवले आणि पीएच.डी. केली. काकांना सरस्वती खूप प्रसन्न होती.
आयुष्यभर त्यांनी गणिताची शिकवणी घेतली. काकांचा स्वभाव तसा शांत. ते खूप
कष्टाळू, अभ्यासात हुशार, बोलण्यात चतुर होते.
माझ्या करिअरची सुरुवात तशी काकांच्या क्लासपासूनच आहे. औरंगाबादमध्ये
पदमपुरा भागातल्या निवासस्थानी अकरावी-बारावीचे क्लासेस चालायचे. माझे
बी.एस्सी. कॉम्प्युटरचे शिक्षण पूर्ण झाले. तोच मला काकांच्या क्लासमध्ये काम
करण्याची संधी मिळाली. युनिट टेस्ट घेणे, पेपर चेक करणे असे माझ्या कामाचे स्वरूप
असायचे. नंतर एक वर्षाने बारावी ऑक्टोबर क्लासच्या काही मुलींना काकांनी मला
स्वतंत्र शिकवायला सांगितले होते. मी सुरुवातीला खूप घाबरले होते. काका इतके छान
शिकवतात तसे मला थोडे तरी जमेल का? पण काकांनी मला फार प्रोत्साहन दिले.
कदाचित त्यामुळेच मी छान शिकवू शकले. विशेष म्हणजे या सर्व मुली पास झाल्या
आणि मला एक छोटीशी भेटवस्तू दिली. त्यावेळी मला फार आनंद झाला होता.
गणितासारखा अवघड विषय सोपा करून हसत खेळत शिकवण्याची त्यांची पद्धत
आणि गणितातले वेगवेगळे फॉर्म्युले नेमके मिश्कील वाक्यात त्या मुलांच्या लक्षात
कसे राहता येईल याकडे सरांचा कल असायचा. त्यांच्या या शिकवण्याच्या वेगळ्या
पद्धतीमुळेच क्लासेस फुल असायचे. त्यांच्या क्लासचे कुठे नाव, बोर्ड, एकंदरीत कुठेही
मार्केटिंग नव्हती आणि त्यांना कधी ते आवडलेही नाही. मला खूप अभिमान वाटायचा,
जेव्हा माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या, ‘एम.ए.डी. तुझे काका आहेत का? किती छान. तू
किती लकी आहेस. तुमच्या घरातच एक ग्रेट मॅथेमॅटिशियन आहे.’
आमच्या घरात माझे वडील धरून हे चार भाऊ, परंतु स्वकष्टाने आणि जिद्दिने
करिअर करणारे फक्त माझे काकाच. काकांकडून मला खूप काही शिकायला
147
मिळाले. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं कसं असायला हवं, विद्यार्थ्यांमध्ये
आपल्याबद्दल आदरयुक्त प्रेम कसे निर्माण करायचे व कठीण विषय सोपा करून कसा
शिकवायचा, हे मी त्यांच्याकडूनच शिकले. म्हणूनच कदाचित आज मीही प्राध्यापक या
पदावर कार्यरत आहे. माझे करिअर कॉम्प्युटर विषयात झाले असले तरी मी कॉम्प्युटर
विषयासोबत गणित आणि स्टॅटिस्टिक्स हा विषयही शिकवते. मला पण गणित विषय फार
आवडतो.
माझ्या वडिलांचेही गणित फार चांगले होते. माझ्या वडिलांची तब्येत फारशी चांगली
नसायची तेव्हा काकांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली होती. माझे वडील माझ्या
लग्नाआधीच वारले होते. तेव्हा आम्हा सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काकांचा
तर त्यांच्या लहान भावावर म्हणजे माझ्या वडिलांवर खूप जीव होता. खूप खचून गेले होते
ते. माझे लग्न पार पाडण्यात काकूंचाही मोठा वाटा आहे. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे
त्यांनी माझे सर्व प्रेमाने केले. मला त्यांचा खूप अभिमान आहे.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, अशा मोठ्या कर्तृत्ववान काकास माझे शतश:
प्रणाम.
काकांसाठी चारोळ्या
गणिताचा घेऊन ध्यास। नवीन पिढीचा केला विकास ।।
दिवस रात्र करून घेतला अभ्यास। मुलांमध्ये जागवली आस ।।
अवघड विषय केलात सोपा । मॅथ्स बघितले कीआठवतात मॅडच्या गप्पा ।।
मॅडने व्यापला मनाचा कोपरा । हजारांपैकी एखादाच असतो असा ।।

{ वृषाली रवींद्र निधोनकर,


कॉम्प्युटर प्राध्यापिका, पुणे

***

148
माझे काका
कै. मुकुंद अमृतराव देशपांडे म्हणजे माझे काका. माझ्या काकांचा स्वभाव
मनमिळाऊ, अतिशय कष्टाळू व कुणालाही न दुखावणारा होता. सतत दुसऱ्यांना
कशी मदत करता येईल याकडे त्यांचे लक्ष असायचे. आज मी जे काही आहे ते माझ्या
काकांमुळेच. माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये, मग ती आर्थिक अडचण असो वा कौटुंबिक,
मला त्यांची मदत झालेली आहे. माझ्या धावडेकर घरातील एक मोठे व्यक्तिमत्त्व म्हणजे
माझे काका. आज माझे काका आमच्या सर्वांपासून फार लांब परलोकात गेले आहेत.
देवामध्ये देव म्हणून समाविष्ट झालेले आहेत. म्हणतात ना, “जो आवडे सर्वांना तोचि
आवडे देवाला.’ माझ्या जीवनात मला काकांची उणीव सतत भासत राहणार आहे.
माझ्या मते माझ्या काकांसारखे काका आजपर्यंत तरी कुठल्याही घराण्यामध्ये,
कुटुंबामध्ये जन्माला आलेले नसतील व येणारही नाहीत. "न भूतो न भविष्यति’ एवढेच
मी म्हणेन.
माझ्या काकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनामध्ये मी नि:स्वार्थ भावनेने
माझ्यासमोर आलेल्या प्रत्येकाची सेवा करण्याचा प्रयत्न करीन.
माझ्या काकांना माझे कोटी कोटी प्रणाम व साष्टांग नमस्कार….
आणि काकांचे शुभाशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेतच…..

काकांचाच लाडका पुतण्या,

{ रवींद्र लक्ष्मण देशपांडे धावडेकर

***

149
Hi Kaka
मी नेहमी मावशीकडे आल्या आल्या, ‘Hi Kaka, कसे आहात?’ हा प्रश्न
नकळतपणे विचारत असे व तुम्ही शांतचित्ताने सोफ्यावर काहीतरी वाचत बसलेले
असायचे व माझ्याकडे बघून एक स्मितहास्य करून ये, असं म्हणून माझं स्वागत करत
असत. आज मला ती जागा खूप रिती रिती भासते. आज Hi Kaka चे उत्तर द्यायला
कोणीच नाही…..
मला वाटायचे, इतका विद्वान माणूस, जो शेकडो विद्यार्थ्यांना घडवतो व घडवले
आहे त्यांच्याशी मी इतकी कॅज्युअली बोलते. हो, पण माझे त्यांच्याशी नातेच सहज सुंदर
व जवळकीचे होते. श्री. मुकुंदराव काकांचे गणित फारच छान, इतके सहज सुंदर होते
की ते ट्युशनच्या मुलांना कवितेत, गाण्यात, फॉर्म्युला घालून शिकवत असत. त्यामुळे
मुलांना लगेच लक्षात राहत असे. गणित या विषयाचा सगळेच बाऊ करतात, पण त्यांच्या
क्लासला शिकवणी लावून अतिशय सहज आत्मसात करत असत. त्यांचे पालकही
खुश आणि पाल्यही. असे आमचे काका. त्यांच्याकडून गणित शिकण्याचा योग घरातील
माझ्या बहिणी, भाऊ इतर नातेवाईक यांना आला, पण मला तो आला नाही, याची मला
खंत वाटते. ती मी त्यांना भेटून घालवायची. काकांची गुणवत्ता, हुशारी, कर्तव्यनिष्ठ,
कीर्ती, औरंगाबादमधील व बाहेरच्या गावाहून येऊन शिकणारे विद्यार्थी, त्यांना ज्ञान
देणारा शिक्षक. अतिशय साधे राहणीमान, निगर्वी, सगळ्यांना मदत करणारी, एवढे गुण
असणारी व्यक्ती आजपर्यंत मी तरी पाहिली नाही. त्यांचे एमएडी सर व गणित असे एक
सूत्रच होते.
ते औरंगाबादमधील अतिशय प्रसिद्ध असे व्यक्तिमत्त्व होते. मुलगा दहावी पास
झाला की आई-वडील सरांच्या क्लासला घालायचे आणि बिनधास्त व्हायचे. आपला
मुलगा बारावीला चांगल्या मार्कांनी पास होणारच, एवढा विश्वास होता त्यांच्यावर.
त्यांना क्लासेसमध्ये मदत करण्यासाठी माझ्या वसू मावशीची प्रचंड साथ होती. यशस्वी
पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीची साथ असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. माझी मावशी
त्यांच्याप्रमाणेच त्यांच्यामागे खंबीर उभी होती. तिने त्यांच्या क्लासेसचा कारभार अतिशय
चोखपणे सांभाळला. त्यामुळे ते बिनधास्त होते आणि गणित शिकवण्यात तल्लीन होते.
अशा महान पुरुषाला दोन रत्ने आहेत. मोठा सारंग दादा आणि मंदार दादा. दोन्ही मुले
अतिशय हुशार. मोठा इंजिनिअर आणि लहान डॉक्टर. त्यांना लाभलेल्या सहचारिणीही
150
त्यांच्याच क्षेत्रातल्या मिळाल्या. त्यामुळे ते दोघेही आपापल्या क्षेत्रात नावाजलेले आहेत.
त्यांच्या यशामागे माझे काका तर आहेतच, पण माझी मावशी खंबीरपणे आजही उभी
आहे. माझे दोन्ही भाऊ व दोन्ही वहिनी माझ्या काका व मावशीप्रमाणेच अतिशय हुशार,
निगर्वी व नावाजलेले आहेत. त्याचे श्रेय हे त्यांच्या मातापित्यालाच जाते.
अशा या माझ्या मुकुंदकाकांना सादर प्रणाम व पूर्ण कुटुंबास नमस्कार.

{ भक्ती अमेय कुलकर्णी


औरंगाबाद

***

151
हा विचार कधी मनात डोकावलाच नाही का बरे?
अल्प वयात हाल-अपेष्टांना सामोरे जाताना, किशोर वयातच अर्थार्जनासाठी
छापखान्यात रात्रपाळी करताना, काबाड कष्ट करून शिक्षणाचा मजबूत पाया रचताना,
कॉलेजच्या फीससाठी बालपणातच गणिताच्या शिकवणीची कास धरताना,
गावाकडे, छोटा-मोठा शेतकरी होऊन जगावे,
हा विचार कधी मनात डोकावलाच नाही का बरे?।।१।।
लाखो विद्यार्थ्यांना नित्य नेमाने व त्याच जोमाने शिकवताना, गणितीय कोट्या, चारोळ्या,
बालगीते व काव्य रचताना, नवनवीन सिद्धांत व हातोट्या नाटकीय पद्धतीने मांडताना,
सतत ३०-३५ वर्षे सकाळी ६ ची काकड आरती साकारताना,
काही दिवस आरामासाठी सुटी घ्यावी,
हा विचार कधी मनात डोकावलाच नाही का बरे?।।२।।
गरजू नातेवाईक व मित्रांच्या आयुष्यातील पीडा समजावून घेताना, कुठलीही अपेक्षा न
ठेवता, त्यांच्या संसाराचा गाडा हाकताना, गरीब विद्यार्थ्यांना scholarship व पुस्तके
आनंदाने पुरविताना, वेळोवेळी विद्यार्थी, नातेवाईक व मित्रपरिवाराला स्वघराचा आश्रय
देताना,
आजच्या जगात "हे’ सगळं बसतच नाही,
हा विचार कधी मनात डोकावलाच नाही का बरे?।।३।।
डॉक्टरांनी त्वरित हृदय शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेला असताना, १२ वीच्या मुलांची परीक्षा
दृष्टिक्षेपात व मनात हुरहूर माजवताना, दोन महिने शस्त्रक्रिया विलंब करून "त्या’
अवस्थेत खडू हाती घेऊन शिकविताना, आप्त स्वकीय विनवणी करून, मनधरणी
करून, आपसूकच थकताना,
कर्तव्यापेक्षा कधीतरी "तब्येत’ श्रेष्ठ,
हा विचार कधी मनात डोकावलाच नाही का बरे?।।४।।
स्नेही, गुरुजन व वडिलधारी व्यक्ती घरी आल्यास, त्यांना आदराने वागवताना,
आपल्या वाक्चातुर्य व अमाप विषयाच्या प्रगाढ अध्ययनाची जोड बांधताना, लहानग्या
चिमुकल्यांना विनोद व नाटकीय गोष्टी सांगून हशा पिकवताना, पायात चपला न घालता,
घरी आलेल्या पालकांना गेटपर्यंत वाटी लावताना,
मधुमेहाच्या व्यक्तीस खडा टोचून पायाला इजा होईल, हा विचार कधी
152
मनात डोकावलाच नाही का बरे?।।५।।
भावूक होऊन वाहत आहे ही शब्दरूपी सुमनांजली माझ्या वडिलांना, आपल्या MAD
सरांना, अभिमान वाटतो MAD स्टँड्सफॉर ‘मॅथेमॅटिकस अॅप्टिट्यूड डेव्हलपर’
संबोधताना. विद्यार्थी, मित्र, नातेवाईक, परिवार, खूप काही भरभरून वाटलं आहे तुम्ही
साऱ्यांना. एकच खंत मात्र सतत आहे मनात, तुमच्या आयुष्याचं हे गणित मांडताना,
Fathers Day व्यक्तिशः wish करता येणार नाही,
हा विचार कधी मनात डोकावलाच नाही का बरे?।।६।।

{ सारंग मुकुंद देशपांडे


ज्येष्ठ पुत्र, पुणे

***

153
मला उमगलेले बाबा
सासर...... कुणाचं प्रेमळ, कुणाचं खट्याळ, कुणाचं अवखळ, तर कुणाचं चक्क
डोक्याला ताप.......
लग्नानंतर प्रत्येकाला येणारा अनुभव हा निराळाच. मी लग्न होऊन देशपांडेंच्या
घरी आले. मनात विचारांचे काहूर होतेच, पण काही दिवसांतच सर्वांचे स्वभाव कळले
व आयुष्याचे गणित अगदी सोपे झाल्याची मला जाणीव झाली. आई–बाबा मला त्यांची
मुलगीच मानत. सारंग गमतीत म्हणत, “नयन, नेहमी वाटते की तू त्यांची मुलगी आहेस व
मी जावई.’ सासरे-सून हे नातं कधी एका वडील-मुलीने घेतले, मला माझेच कळले नाही.
अखेरच्या काही वर्षांत असे जाणवायचे की "बाबांना’ आपला हा गणिताचा वसा
कोणीतरी पुढे चालवावा, असे वाटत असावे. स्वराचा (माझी धाकटी मुलगी)जन्म
औरंगाबादचा. स्वराच्या जन्माच्या निमित्ताने मला औरंगाबादला राहावे लागले व” बाबांची’
विद्यार्थिनी होण्याची छान संधी नकळत चालून आली.
एखाद्या मंदिरात जशी रोज सकाळी काकड आरती होते, त्याच प्रमाणे "MAD’
सरांच्या तासाची सुरुवात सुद्धा कधी संतोषीमातेच्या, तर कधी वैष्णवदेवीच्या आरतीरूपी
फॉर्म्युला गायनाने होत असे. १०० मुलेही फॉर्म्युला आरती एका सुरात गात.
सर्व विद्यार्थी: (एकसाथ) चलो बुलावा आया है, भूतोने बुलाया है..
जय logo की... जय logo की.....
सर्व विद्यार्थी: (एकसाथ) Implicit Function ....जब जब आता है, x और y का
भाषेचे कुठलेही बंधन नाही. हिंदी, मराठी, इंग्रजी तर कधी हैदराबादी उर्दू शायरीसुद्धा
सर : किसीभी sin का sin inverse कौन?
सर्व विद्यार्थी : (एकसाथ).... वयीच.
लज्जतदार मेजवानीत पंचपक्वान्नं वाढतात, त्याप्रमाणे गणिताच्या “त्या’ तासात विविध
दर्शी चारोळ्या साद घालत. मनात कधी असाही विचार येऊन जातो की जणू शिव शाहीरच
“सरांना’ खुणावतात व सांगतात माझा पोवाडा वापर की…. मग काय, पोवाड्याची चव…
सर: parabola च्या a ला पकडून त्यामध्ये x1 मिळवा हो....जीजी रं जीजी....
संत एकनाथ महाराजांचे भारूड मग कसे बरे मागे राहील?
सर : Statement घेतलं का ?
विद्यार्थी : घेतलं.
154
सर : त्याच negation घेतलं का?
विद्यार्थी : घेतलं.
विद्यार्थी : आली आली हो tautology आली आली हो tautology.
लोकगीतं, नवी-जुनी फिल्मी गाणी तर unlimited असायची.” Derivative का
देखते ही साया, function को रोना ही आया....”
सौ साल पहले तेरा नाम k था. आज भी है. और कल भी रहेगा।’ एक बार चलू
आगाडी, एक बार चलू पिछाडी, दोनो नही है equal तो लिंटो मे ह ैबिगाडी’… “चिंता ता
चित्ता चित्ता…’
बिंदू, रेखासारख्या फिल्मी तारका लज्जत वाढवणाऱ्या लोणच्याचे काम नेहमीच करत.
रामायण, महाभारत तसेच "फिल्लमइस्टोरी’ तर complimentary वाढपी
असायच्या. रोज “Desserts’ च्या रूपात बालगीतांची गोड चवसुद्धा चाखावयास मिळे.
“दोन side आणि मधला angle ठाऊक आहे तुम्हाला, Rule Cosa चा येथे येतो मोठ्या
मोठ्या कामाला’.
Integration chapter मधील कव्वाली तर “cherry on the cake’ मुलांच्या no१
पसंतीची.”
x वालोंको पॆचिदा बनाते है, हमारा बचपन हे मिसे...........खुदा बचाये हमें ऐसें
प्रकारोसे.... गुणकारोसे, भागाकारोसे… समा(Integration) को गुस्सा है नक्कारो से,
गुणकारोसे, भागाकारोसे.’
मुलं "त्या’ एक तासात इतके रममाण व्हायचे की........ सर :” हद... हो गई,सीमा....
हो गई…
Logarithm चे निरनिराळे नियम शिकवताना समजावयाचे असायचे की असे करू
नका..
सर: लाखो बर्बाद हो गये. मार्का भी गये, इज्जत भी गई.
जर एखादं गणित दोन पद्धतींनी सोडवता येत असेल तर कोणती पद्धत वापरू, यासाठी
MAD Sir म्हणत “निष्पाप विद्यार्थी’
विद्यार्थ्याची मग निवड व्हायची क्लासमध्ये. Calculus ची सुरुवातच होते ती Func-
tions नी ... वेगवेगळ ेfunctions म्हणजे वेगवेगळे देश.... अजबच कल्पना! Rus-
155
sian ...Chinese.... Indian.... American.....England..... BODMASचा rule
सांगण्यासाठी मम्मी बच्चूचं नातं explain करायचे सर. बालवर्गातील काही concepts
ची उजळणी चालली असेल तर” याद करो वो सुहाने दिन....... गणिताच्या पेपरमध्ये हे
लिहिले तर Mogambo खुश होगा. Mogambo..... म्हणजे पेपर चेक करणारा..........
कधी ‘त्या’ तासात Newton, Leibniz, De Morgan यायचे, तर कधी Lagrange
गुरुजी सुद्धा. मग राजकारणी मागे कसे राहतील?... सोनियाजी, मनमोहनजी, लालूजी तर
कधी मोदीजी सुद्धा... असो.
सिकंदर आणि त्याचे गुरू अरस्तु (Aristotle) यांची एक छोटी कथा मला इथे नमूद
करावीशी वाटते.
विश्वविजेता सिकंदर एकदा आपले गुरू अरस्तु (Aristotle)बरोबर जात होते.
रस्त्यात त्यांना एक नदी लागली. नदीला पूर आलेला होता. सिकंदर म्हणाला, “गुरुजी,
मी पाण्यात जाऊन पाणी किती खोल आहे ते पाहतो.’ त्यावर गुरुजी म्हणाले, “तू नाही,
मी जाणार.’ सिकंदरनी अचानक पाण्यात उडी घेतली. हे पाहून अरस्तुने पण सिकंदरला
वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. काही वेळानंतर दोघेही नदी पार करून दुसऱ्या तीरावर
जेव्हा पोहोचले तेव्हा अरस्तु सिकंदरला म्हणाले, “तुला काही झाले असते तर?’ त्यावर
सिकंदर म्हणाला, “जर सिकंदर बुडाला असता तर आपण माझ्यासारखे शेकडो सिकंदर
घडवू शकला असतात, पण तुम्हाला काही झाले असते तर माझ्यासारखे शेकडो सिकंदर
मिळूनसुद्धा अरस्तुंसारखा एक गुरू घडवू शकले नसते.’ गुरूचा महिमा सांगताना संत
कबीर म्हणतात,
“यह तन है विष की वेलरी। गुरु है अमृत की खान।
शीश दिये भी गुरु मिले। तो भी सस्ती है जान।”
प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात एक अरस्तुची गरज असतेच. MAD सरांच्या
रूपात त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा अरस्तु गवसला, असे मी समजते. ज्याप्रमाणे
परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुद्धा सोन्यात रूपांतर होते, त्याचप्रमाणे MAD Sir म्हणजेच
बाबांच्या सान्निध्यात राहून माझ्या जीवनाचे देखील सोने झाले आहे, असेच मी समजते.
{ सौ. नयन सारंग देशपांडे, ज्येष्ठ सून, पुणे
***
156
माझे मामा...
वर्णा ते खामगाव, गेलोच तर कुठे नातेवाइकांकडे कार्यक्रमानिमित्त. असं खामगाव
सोडून औरंगाबादला स्थायिक होऊ, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मुकुंदा मामांमुळे
ते घडून आलं. आम्ही औरंगाबादला आलो की मामांकडे जात असू तेव्हा ते आईला
म्हणायचे, “तुझी मुलं हुशार आहेत, तिथे त्यांना फारसं भवितव्य नाही. इथे शिकले तर
त्याचे चीज होईल.’ काकांनाही (माझ्या वडिलांना) ते पटलं, तसं सोपं नव्हतंच ते, पण
त्यांच्या भरवशावरच आम्ही खामगाव सोडलं. मामा- मामींनी अगदी घर शोधण्यापासून
लक्ष दिलं. घर मिळेपर्यंत ३-४ दिवस त्यांच्याकडेच राहिलो आम्ही. नंतरही त्यांचा आधार
होताच.
पंकजदादा व यदु दादा दोघांनाही गणितासाठी त्यांच मोलाचं मार्गदर्शन मिळालं.
पण माझा पिंडच एकंदरीत अभ्यासू नसल्याने मामा हेच नातं राहिलं, पण मैत्रिणी आणि
ओळखीतल्यांना एम.ए.डी. सर माझे मामा आहेत म्हणून सांगायला खूप अभिमान
वाटायचा. माझी “काॅलर टाईट’!!! मॅड सर असा उल्लेख केला की मात्र खूप राग
यायचा. बोलणारा अर्थही लक्षात न घेता त्यांचं ते नाव घेत असे. MAD या शब्दाला
त्यांनी वजनच मिळवून दिलं होतं.
आईचे ते चुलत भाऊ होते, पण अगदी सख्ख्या भावाप्रमाणे दरवर्षी न चुकता
भाऊबीज-राखी पौर्णिमेसाठी यायचे. मामा-मामी दोघेही यायचे. ते आले की वातावरण
एकदम हलकं-फुलकं, हसतं-खेळतं. ओवाळून झाल्यावर म्हणायचे “४-५ महिन्यांनी
मोठी असल्याचा अधिकार घे, नमस्कार करतो.’ सगळे खळखळून हसायचे.
मुकुंदमामा, गोविंदमामा, कमल मावशी आणि आई हे सगळे भेटले की तर विचारायलाच
नको. आम्ही लहान होतो, पण हे सगळं ऐकायला मज्जा यायची. आई आम्हाला जुन्या
आठवणी सांगताना हमखास मुकुंदामामा, गोविंदमामा, कमल मावशी यांच्याबद्दल
सांगतेच.
मुकुंदा मामांच्या लग्नातला एक किस्सा-विहिणीच्या पंगतीत घास भरवण्याचा
कार्यक्रम होता. दोघेही शीघ्र कवी. त्यामुळे उखाण्यांची जुगलबंदी खूप रंगली. वसुधामामी
-“आजकालच्या मुली असतात धीट, मुकुंदरावांना घास भरवते मीठ!’ त्यावर
मुकुंदामामाचं उत्तर होतं - “सरकारनं काढली नवी नवी नाणी. वसुधाला पाजतो
थंडगार पाणी !’
157
ते विलक्षण बुद्धिमान तर होतेच, पण दिलदार, विनोदी, हजरजबाबी, जबाबदार,
प्रेमळ, नाती जपणारे असे होते आणि त्यांना साजेशी जोडीदारीण मिळाली वसुधामामी.
त्यांनी जे खडतर आयुष्य काढलं ते कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून ते फार
धडपड करायचे. ते आता ह्या जगात नाहीत, पण त्यांनी आमच्यासाठी जे केलंय ते
कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही.

{ सौ. गायत्री देशपांडे–सोंगदे,


पुणे

***

158
जिथे मुलांना पंख फुटतात...
काका म्हणजे ज्ञानाचा स्रोत. मुकुंदकाकांचे शिक्षण क्षेत्रातील काम अतुलनीय
आहे. इतिहासाने दखल घ्यावी असे. मुकुंदकाका शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांना कलेच्या
स्वादाने शिकविणारे अतिसमृद्ध असलेली व्यक्ती म्हणून समोर आले! सारे काही देऊन
टाकावे, असे कितीजण भेटतात? म्हणजे अगदी काकांप्रमाणे, विद्यार्थ्यांकरिता उधळून
अलख निरंजन व्हावे, असे किती जण भेटतात? शिक्षण पद्धतीचे विद्यार्थ्याला आकलन
किती होणार हा मोठा प्रश्न. काकांप्रमाणेच शिक्षकांनी मुलांशी योग्य संवाद साधला तर
मुलं उत्तम प्रकारे ज्ञान आत्मसात करू शकतात. अनेकांना मनातल्या मनात आजवर
जपलेल्या काकांच्या (MAD SIR)आदर्शांचं, नीती-नियमांचं, व्हॅल्यू सिस्टीमचं परत
एकदा स्वतःच्याच मनात नक्कीच दर्शन घडत असेल. पुन्हा एकदा MAD Sirयांच्या
नुसत्या आठवणीनेच स्वतःमध्ये सकारात्मकपणा वाढतोय, असे नक्कीच जाणवेल.
गणित या विषयाची रुची बाळगणाऱ्या, गणित शिकण्याचे औत्सुक्य असणाऱ्या,
गणित विषयाचे प्रेम असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, स्वतःचे भवितव्य उज्ज्वल घडविण्यासाठी
विद्यार्थ्यांनी Prof. Dr. M.A. Deshpande Sirयांची आदर्श प्रतिमा समोर ठेवावी,
असा सल्ला शिक्षण क्षेत्रातील दिग्गज, निरनिराळे विचारवंत, वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज,
सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगपती, छोटे-मोठे व्यावसायिक
आदी मंडळी देतांना मी नेहमीच अनुभवले आहे.
काही पालक स्वतःच्या आकांक्षांचे ओझे आपल्या पाल्यावर लादतात आणि यशस्वी
माणसाविषयीची मतं ते आपल्या पाल्यावर लादू पाहतात. एकंदर अशीच थोडी फार
अवस्था विद्यार्थ्यांची. पण औरंगाबादचे गणितज्ञ MAD Sir यांच्या शिकविण्यामुळे
साध्य केलेल्या यशाचं परीक्षण असंख्य विद्यार्थ्यांनी केलं आहे. वैशिष्ट्य म्हणजे, सरांनी
विद्यार्थ्यांना जे द्यावंसं वाटतं, त्यासाठी खूप अभ्यास केला. वेळ दिला. योग्य मॉडेल
शोधलं.
शिक्षणाची बिकट वाट अंगीकारून यशस्वी होणे किती अवघड असतं हेपालकांना
नीट ठाऊक असतंच, शिक्षणव्यवस्थेपासून विषमतेपर्यंत अनेक विषय या निमित्तानं
नेहमीच पालकांसमोर येतातच. परंतु त्या वाटेवरून SIR स्वत: गेले. यावर काय करता
येईल? विद्यार्थ्यांना या वाटेवरून निर्भीडपणे सकारात्मक जायला प्रवृत्त केलं. त्याबद्दल
सातत्यानं विद्यार्थ्यांशी संवाद साधला, गणितामध्ये यश संपादन करण्यासाठी गणित
159
विषयाचे दडपण घालवून “मुन्नाभाई एमबीबीएस” नं गाजवलेली “एक जादूकी झप्पी”
प्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी रुची वाढवून यश संपादन करण्याचा मार्गही सुकर
केला.
आपण privileged आहोत. MAD SIR म्हणजे खूप निष्णात त , त्यांचे
बहुमूल्य मार्गदर्शन आम्हास लाभले, काकांच्या सान्निध्यात यश संपादन केलेली माझी
मित्रमंडळी मला सतत सांगायची.आणि मलाही नेहमीच मी त्यांच्या कुटुंबातीलच एक
सदस्य म्हणून खूपच अभिमान वाटायचा आणि सदैव वाटतच राहील. “डिअर जिंदगीत”
काकांना समाजामध्ये कर्तृत्वाला मिळालेला सन्मान पाहून आपल्याला काकांसारखी
किमान एकतरी भूमिका प्रत्यक्ष आयुष्यात जगता आली तरी मी खूपच समाधानी होईन.
आणि पितृतुल्य मुकुंदकाकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करता येईल.
खूप लिहावंसं वाटतं, पण शब्द तोकडे पडतात, काकांच्या आठवणी व्याकूळ
करणाऱ्या आहेत.

{ विश्वजित तुकारामपंत देशपांडे (धावडेकर)


नाशिक

***

160
आदरणीय बाबा……
आदरणीय बाबा,
सर्वप्रथम तुम्हाला, तुमच्या स्मृतींना मनापासून नमस्कार!
कुठून आणि कसं सुरू करू हा प्रश्नच आहे खरं तर! आपलं आवडतं माणूस
आपल्या आयुष्यातून निघून जातं, तेव्हा काय त्रास होत असेल हे मला तुम्ही आम्हा
सगळ्यांना सोडून गेलात तेव्हा चांगलंच जाणवलं.
बाबा, आज तुम्ही नाहीत, पण तुमच्याशी रोज संवाद होतोच मनातल्या मनात. खूप
काही साचलं आहे मनात. आज व्यक्त होणारच आहे.
तुमचा जीवन प्रवास आठवला ना की, असं वाटतं, सगळंच अवघड तुम्ही सोपं
कसं केलं? मी घरातल्या इतरांकडून म्हणा किंवा बाहेरच्या लोकांकडून तुमचा जीवन
प्रवास ऐकला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तुमचे बालपण गेले. आर्थिकदृष्ट्या
तुमची परिस्थिती खूपच हलाखीची होती. पण परिस्थितीपुढे तुम्ही कधीच झुकला नाहीत.
तुमची प्रचंड बुद्धिमत्ता, मेहनत या बळावर तुम्ही परिस्थितीवर मात करत तुमचे शिक्षण
पूर्ण केले. जालना जिल्ह्याच्या एका छोट्या खेड्यातून औरंगाबादपर्यंतचा तुमचा प्रवास
साधा नाही, सोपा तर अजिबातच नाही. पण तुमची मेहनत, चिकाटी आणि जिद्द तुम्हाला
खूप मोठं बनवून जाते. त्या खेड्यातून सुरू झालेला तुमचा प्रवास; मग औरंगाबाद शहरात
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक आणि मग
तिथेच गणित विभागाचे प्रमुख म्हणून तुम्ही काम पाहिले. खरंच गणितासारखा विषय
तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने शिकवत असत की मुलं त्यात इतके रंगून जायचे की, तो
तास संपूच नये असं वाटायचं. तुम्हाला नेहमी बारावीच्या मुलांना शिकवायला खूप
आवडायचं. कारण इथून पुढे त्यांचं भविष्य घडणार असतं, असं तुम्ही नेहमी म्हणायचा.
तरुण पिढीवर, त्यांच्या हुशारीवर तुम्हाला खूप विश्वास आणि म्हणूनच तुम्ही त्यांना खूप
मन लावून जितकं देता येईल तितकं ज्ञान द्यायचात. खरं तर गणितासारखा विषय तुम्ही
त्यांच्यात रुजवायचात. काहीही झालं तरी तुम्ही पहाटे पाचला जागे झालेलेच असायचा
आणि तुमच्या ५.४५ च्या बॅचला अतिशय प्रसन्न मनाने सुरुवात व्हायची. कधीच तुम्हाला
मी कंटाळलेलं पाहिलं नाही. उत्साही चेहऱ्यावर कायम एक स्मितहास्य. तुम्ही सुरू
केलेल्या क्लासची कोणतीही जाहिरात न करताही हजारोंनी विद्यार्थी शिकण्यास येत होते.
एखाद्या विद्यार्थ्याची गरिबीची परिस्थिती असेल, तो फीस देऊ शकत नसेल तरी तुम्ही
161
कधीच त्याला शिकण्यापासून दूर होऊ दिलं नाही. खरंच हे तुम्हीच करू शकलात. कारण
तुम्ही गरिबी जवळून पहिली होती आणि हुशार असून परिस्थितीमुळे कसा त्रास होतो हे
तुम्ही स्वतः अनुभवल्यामुळे या मुलांना तुम्ही असेच शिकवले. गरीब विद्यार्थ्यांप्रती तुमची
असलेली आत्मीयता वेळोवेळी जाणवायची. विद्यार्थी तुमच्या सगळ्यात जवळचा.
आधी तो मग सगळं. खरंच हाडाचे शिक्षक होता तुम्ही. आपले नातेही तुम्ही खूप वेगळ्या
पद्धतीने जपले. तुम्ही नेहमी आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटावा असेच राहिलात.
आपल्या दोघांचं नातं म्हणजे मैत्रीचं पण आदरयुक्त प्रेमाचं. निखळ, निर्व्याज आणि
निस्सीम आनंद देणारं. जीवनाला दिशा देणारं.
लहानपणापासूनच तुम्ही नेहमी माझ्या आवडीचा विचार करत होतात. मला अजूनही
आठवतं, मी साधारण आठ वर्षांचा असेन, तेव्हा मला टेबल टेनिस खेळाची आवड
निर्माण झाली. खरं पाहायला गेलं तर हा खेळ; पण जे काही करायचं ते छानच, असं
तुमचं नेहमी म्हणणं असायचं आणि म्हणूनच याचं मला योग्य प्रशिक्षण मिळावं म्हणून
तुम्ही खूप जणांचा सल्ला घेतला होता. एका चांगल्या टेबल टेनिस कोचिंगमध्ये दाखल
केलं होतं. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप वेगळा पण सखोल
असायचा. वडील मुलाचं नातं तुम्ही खूपच छान पद्धतीनं फुलवलं आणि आज तुम्ही
नसतानाही ते सुगंध देत योग्य दिशा देत आहे. तो काळ तर तुमच्या व्यग्रतेचा होता,
पण तरीही वेळ काढून तुम्ही मला क्लासला सोडायला यायचे. कधीच वेळ नाही,
असं कारण सांगितलं नाही. खरंच आजच्या पालकांनी तुमच्याकडून हे घेण्यासारखेच
आहे. मला आजही आठवतं, तुम्ही वाल्मीच्या ऑफिसर टूरसाठी मुंबईला गेला होतात;
येताना अतिशय महागाची, दर्जेदार टेबल टेनिसची बॅट माझ्यासाठी घेऊन आलात.
मला तर माहीतही नव्हते की, तुम्ही मला इतकी छान भेट द्याल. एक वडील म्हणून
तुम्ही नेहमीच खास होतात. मी खूप छान खेळायला लागलो, खूप स्पर्धा जिंकत होतो,
पुढे राज्य संघातही निवड झाली. तेव्हा मी नववीत होतो आणि या सगळ्यात अभ्यास
हवा तसा झाला नाही, अपेक्षेपेक्षा कमी मार्क आले. खरं तर तुमच्या जागी दुसरे कोणी
असते तर खूप रागावले असते, पण तुम्ही चिडला नाहीत. उलट खूप छान समजावून
सांगितलं. त्यावेळी तुम्ही म्हणालात,”अरे,असाच खेळत राहिलास तर सायन्स ग्रॅज्युएट
कसा होशील? आता तुझा तूच विचार कर.” तुमच्या त्या वाक्याने माझ्या मनावर खूप
162
परिणाम झाला आणि माझी टेबल टेनिसची रॅकेट सुटली आणि जे अभ्यासाला लागलो ते
आज एक बालरोगतज्ज्ञ म्हणून नावारूपाला आलो. खरंच आज विचार करतो की, जर
त्यावेळी तुम्ही मला रागावला असतात तर इतक्या आनंदानं अभ्यासाला लागलोच नसतो
आणि तेव्हापासून तुम्ही माझे हिरोच झालात. तेव्हापासून तुम्ही जी गोष्ट माझ्यासाठी
ठरवली ती किती योग्य हे मला मनातून वाटायला लागलं ते आज तुम्ही नसतानाही स्पष्ट
जाणवते आहे. तुमची विचार करण्याची पद्धत खरंच खूप दूरदृष्टी असणारी होती,पण
कोणतीच गोष्ट तुम्ही लादली नाही. ती प्रसन्न मनाने, प्रेमळ भावनेने मांडली म्हणूनच
ती पटत गेली. फार कमी घरांमध्ये वडील आणि मुलाचं इतकं छान नातं असतं.. पण
आपलं नातं खूपच सुंदर आहे. होतं, असं मी कधी म्हणणारच नाही, कारण तुम्ही सतत
माझ्याबरोबरच असणार आहात.
सगळ्या विद्यार्थ्यांना तुमच्या क्लासमध्ये यायची इच्छा असायची. त्यासाठी खूप
खटपट करायचे ते. मला नेहमी प्रश्न पडायचा, नेमकं काय आहे तुमच्या शिकवण्यात?
मात्र जेव्हा १२ वीला तुमच्यासमोर तुमचा विद्यार्थी म्हणून शिकायला सुरुवात केली
तेव्हा खऱ्या अर्थानं कळलं की, तुम्ही इतके विद्यार्थिप्रिय का आहात. हावभाव करून
शिकवलेले गणिताचे अत्यंत अवघड समीकरण आजही तसंच लक्षात आहे. १२ वीला
चांगले मार्क मिळाले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी MBBS ला गेलो. कारण मला
माहीत होतं, विश्वास होता की, तुम्ही कधीच माझ्याबाबत चुकीचा निर्णय घेणार नाही.
मी एवढं तुमचं ऐकणं यासाठी तुम्ही माझ्या मनात लहानपणापासून तुमच्याविषयी तसा
विश्वास निर्माण केला होता. खूप सुंदर नातं निर्माण केलं होतं तुम्ही. मला आजही
आठवतं बाबा, तुम्ही मला सोडायला होस्टेलवर आला होतात. मी पहिल्यांदाच घरापासून
दूर राहत असल्याने अगदी भावूक झालो होतो, रडवेला झालो होतो. तुम्ही मला खूप
छान समजावून सांगितलं होतं. तुम्हाला माहीत नसेल, पण तुमच्या डोळ्यामधलं पाणी
मी पाहिलं होतं. तुम्ही अत्यंत प्रेमळ, पण तितकेच वास्तववादी. स्वीकारून पुढे जायचं,
पण चांगलं करायची नेहमीच चिकाटी असावी हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवलंत. जेव्हा
जेव्हा यायचात तेव्हा विचारपूस करताना तुमच्या शब्दांतली काळजी, ओलावा खूप
जाणवायचा. खूप छान पद्धतीनं नेहमी मार्गदर्शन करायचा तुम्ही. MBBS झाल्यावर नंतर
पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर, प्रॅक्टिससाठी सरळ औरंगाबाद गाठले आणि आज या छोट्या
163
छोट्या मुलांचे पालक दवाखान्यात येतात आणि सांगतात, आम्ही सरांकडेच शिकलो
आहोत. तुमच्याविषयी भरभरून बोलतात. किती आत्मिक सुख मिळते मला हे शब्दांत
सांगता नाही येणार बाबा. मला खूप अभिमान वाटतो तुमचा आणि माझ्या भाग्याचाही
की, मी तुमचा मुलगा झालो. तुमच्यावर त्यांचा असलेला दृढ विश्वास आमच्यातही
एक घट्ट नातं निर्माण करतोआणि त्यांचा माझ्यावरचा विश्वासही वाढतो. हे सगळं
फक्त आणि फक्त तुम्ही केलेल्या तपश्चर्येचं फळ आहे. अमृत बाल रुग्णालयात तुम्ही
दिलेलं मार्गदर्शन खूपच कामाला आलं म्हणूनच तर ते आज इतकं भक्कमपणे उभं आहे.
आपली माणसं आपल्यासोबत उभी राहिली की भीती निघून जाते.
बाबा, खूप छान साथ दिली नेहमीच तुम्ही आणि मार्गही दाखवला म्हणूनच तुमचा
सतत भास हा होतच राहतो.
बाबा, २०१९ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हार्ट अॅटॅक आला,
त्यातून बरे वाटते ना वाटते तोच तुमचा किडनीचा विकार समोर आला. त्यानंतर तुम्ही
आजारांच्या चक्रव्यूहात अडकत असल्याचे जाणवत होते मला. डायलेसिससाठी
दवाखान्यात जावे लागायचे. छोट्यातली छोटी तपासणी आणि शरीरात होणारे बदल
मी अगदी जवळून बघत होतो. त्यावर मात कशी करावी याच्याच विचारात असायचो.
खूप काळजी वाटत होती तुमची, पण दाखवू शकत नव्हतो. दिवसातून तीन-चार वेळेस
तुमच्या खोलीत डोकावायचो. तुम्हाला त्या अवस्थेत बघून जीवाची खूप घालमेल
व्हायची. किडनीचा विकार थोडा बरा होतो न होतो तो तुम्हाला डायबेटिक न्यूरोपथीसाठी
दररोज थेरपी द्यायला थेरपिस्ट यायचा. सगळे तुमची खूप काळजी घेत होते. डायलेसिस
चालू असतानाच तुमच्या हृदयाची गती कमी झाल्याचे कळले. ECG केल्यावर तर हार्ट
ब्लॉकनंतर पेसमेकर सर्जरी करावी लागली. सगळं एकामागून एक चालूच होतं. एक
महिना जातो ना जातो तोच Myaesthenia Gravisया तुमच्या जुन्या आजारानं डोकं
वर काढलं. तुमचा आजार रोज वाढत होता. बाबा, मला आजही तुम्हाला दवाखान्यात
नेतानाचा तो प्रसंग तसाच्या तसा आठवतो. रात्रीचे १०.३० वाजले होते, तुम्हाला खूप दम
लागत होता. व्हीलचेअरवरून तुम्हाला बाहेर आणताना खरं तर तुम्हाला खूप त्रास होत
होता तरी तुमचा चेहरा प्रसन्नच होता. दारातून बाहेर जाताना मुलांना आणि अपूर्वाला
तुम्ही बाय बाय केलं. पण तेव्हा तुम्हाला जाणवत होतं की, तुम्ही आता यातून बाहेर पडणं
164
अवघड. यानंतर बाबा तुम्ही पुन्हा घरी परतलाच नाहीत! पुण्याला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये
उपचारासाठी नेलं तुम्हाला, पण आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही. बाबा, आम्ही
कोणीही १४ ऑक्टोबर विसरूच शकत नाही. यादिवशी आम्हाला पोरके करून तुम्ही
कायमचे गेलात!!
खूप वर्षांपासून खूप गोष्टी मनात साचवून ठेवल्या होत्या. आज त्या कागदावर
उतरवल्या आणि तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. माणसं आपल्यात असली की, ती
आपल्यासाठी किती खास आहेत हे सांगायचं राहून जातं. पण ती गेली की ती पोकळी
भरलीच जात नाही. बाबा, तुम्ही खूपच खास होता!! खूप विद्यार्थी घडवले, आम्हाला
घडवलं, एक चांगला माणूस म्हणून जगलात आणि खूप जणांना जगवलंत. मला खूप
खूप अभिमान आहे तुमचा. खूप छान वाटतं मला तुमचा मुलगा आहे म्हणून सांगताना.
आज देहाने सोबत नसाल, पण मनानं कायम माझ्यासोबतच आहात हे मला माहीत
आहे. जेव्हा जेव्हा टेन्शन येतं तेव्हा डोळे बंद करून तुमचा चेहरा आठवतो. क्षणात
सगळा शीण, टेन्शन निघून जातं. बाकी काही नको, असाच आशीर्वाद नेहमी असू द्या.
कायम आमच्यासोबत राहा.

तुमचाच,
मंदार

***

165
सर ते सासरे… नव्हे, प्रेमळ वडील!
“चला मिस भालगावकर, तुम्ही सांगा या Problem चे Solution”, मनात घर
करून राहिलेलं हे वाक्य आजही प्रत्यक्ष ऐकल्याचा भास होतो.
हो! मी औरंगाबादची असल्यामुळे बारावी Maths ला सरांकडे ट्युशनला जात
असे. खरं तर माझं मेडिकलला जायचं पक्कं होतं. पण General Group असल्यामुळे
व Maths खूप Weak असल्यामुळे मी सरांकडे ट्युशनला जात असे. पण सरांमुळे
Maths सोपे वाटायला लागले व माझे दोन्ही ग्रुप चांगले आले.
तेव्हा बारावीला ट्युशनला जात असताना मी कधी कल्पनाही केली नाही की मी
सरांची सून होऊन देशपांडे यांच्या घरी येईल. डॉ. मंदार सोबत लग्न ठरल्याची Excite-
ment तर होतीच पण त्याबरोबर MAD सरांची सून होण्यामागचे Proud Feeling पण
होते. सर क्लास मध्ये जसे हसत खेळत गणित शिकवायचे तसेच घरातही ते वातावरण
हलकंफुलकं करायचे. त्यांचा Sense Of Humor खूप चांगला होता.
लग्नाआधी ते सर्वजण जेव्हा आमच्या घरी आले होते. तेव्हा मी सर्वांना पोहे दिले.
सर म्हणाले, ‘अपूर्वा पोहे चांगले झाले’.
मी : ‘पोहे मी नाही केले सर.’
सर : ‘पण चांगले आणलेस.’
हे ऐकून त्याच क्षणी माझा सासर या शब्दाचा Stress निघून गेला. सर व मॅडमचे
आई व बाबा केव्हा होऊन गेले माझे मलाच कळले नाही. पुढे बाबांनी मला Post Grad-
uation करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मी Gynecologist झाले. बाबांकडे कुठलाही
Problem घेऊन गेले की ते चुटकीसरशी सोडवत असत. ते खूप चांगले समुपदेशक
होते. त्यांनी आम्हा सर्वांना जीवन जगण्याचे खूप धडे दिले आहेत. वडील म्हणून ते घरात
आणि सगळ्या नातेवाईकांत आदर्श होते.
बाबांना डायबिटीस होता. त्यांना गोड चहा आवडायचा. मी त्यांच्या चहात कधी
साखर घालत नसे. म्हणून ते मला चहा करायला सांगतच नव्हते. मी केलेल्या पोह्यांना
ते ‘मेडिकल पोहे’ म्हणून संबोधायचे. कारण त्यात तेल कमी असे. पण मी केलेला एक
पदार्थ त्यांना खूप आवडत असे. तो म्हणजे ‘धावडेकरी पिठले.’ आधी घरात ते फक्त
त्यांनाच येत होते. PG Entrance तयारीच्या वेळेस त्यांनी पिठलं कसं करायचं हे मला
शिकवलं. Typical धावडेकर पद्धतीचे पिठले त्यांच्यानंतर फक्त मला जमते, असे
166
बाबांनी मला Certificate दिले होते.
नातवांमध्ये बाबा खूप रमत असत. संध्याकाळची शेवटची बॅच झाली की, मुलांना
गाडीत चक्कर मारायला न्यायचे व खूप खाऊ घेऊन यायचे. नंतर TV बघताना एक
एक पाकीट फस्त. आजोबा व नातवंडे खूष. चारही नातवंडांच्या नामकरण विधीचे
पाळणा गीत त्यांनी स्वतः रचले. त्यांचे वाचन अफाट होते. ते एक प्रतिभावंत कवी होते.
पहाटेपासून कविता गात गणिते सोडवणारे सर व विद्यार्थी आणि तो अवर्णनीय वर्ग
आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.
बाबा स्वतःच्या तब्येतीकडे फारसे लक्ष देत नसत. वयाच्या पस्तिशीत त्यांना मधुमेह
व उच्च रक्तदाबाचा आजार जडला. आपल्या कामाबद्दल असलेली प्रचंड आस्था व
निष्ठा या समोर त्यांना त्यांचे आजार काहीच वाटत नसत व ते स्वतःला झोकून देऊन
अविरत विद्यादानाचे काम करीत होते. रेग्युलर बॅच संपल्यावर त्यांचे मोतीबिंदूचे
ऑपरेशन करायचे ठरले होते. त्यासाठी आम्ही त्यांच्या सर्व तपासण्या करून घेतल्या.
Angiography मध्ये त्यांना Major Blocks आले होते. डॉक्टरांनी त्यांना त्वरित By-
pass Surgery करण्याचा सल्ला दिला होता. आम्हा सर्वांना वाटत होते आता लवकरात
लवकर बाबांचे ऑपरेशन करून घ्यावे. पण बाबांनी त्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना Crash
Course घेईल असे Promise केले होते. त्यामुळे त्यांनी त्या वर्षी Crash Course
घेतलाच व त्यानंतरच बायपास ऑपरेशन करून घेतले.
पुढे काही वर्षातच त्यांना किडनीचा आजार झाला व Myasthenia Gravis हा
Rare आजार पण झाला. हा आजार लाखांमध्ये एकाला होतो. पण ते खचले नाहीत.
औषधे घेऊन त्यांनी शिकवणे चालूच ठेवले. त्यातच त्यांचे मन रमत असे. शेवटी जेव्हा
बाबा Bed Ridden झाले तेव्हा ते खूपच शांत झाले. आम्हाला वाटले Psychologist चे
Opinion घ्यावे.
पण झाले उलटेच. Psychologist बाबांचा विद्यार्थीच निघाला आणि बाबांनीच
त्याचे counseling केले. बाबा म्हणाले I am happy and satisfied in life, I am
not at all depressed. इतका आनंदी, उत्साही आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात चैतन्य
निर्माण करणारा माणूस स्वतः निराश होऊच शकत नाही.
शेवटचा एक महिना ते हॉस्पिटलमध्येच होते. एक दिवसाआड डायलिसिस व
167
मायस्थेनिया ग्रेव्हिस साठी प्लाझ्माफेरेसिस सुरू होते. सुरुवातीला औरंगाबाद येथील
मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये व नंतर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये
त्यांच्यावर उपचार केले. ते नेहमी पॉझिटिव्ह राहायचे. शेवटपर्यंत ते मेंटली अलर्ट होते.
ICU मध्ये असताना सुद्धा तिथल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना हसतमुखाने स्वागत करणे,
बाय म्हणणे ते विसरत नव्हते. इतका त्यांना माणसांचा लळा होता. त्यांना एकदा भेटलेली
व्यक्ती त्यांना कधी विसरू शकत नाही.
He fought like a warrior salute to him.

{ डॉ. सौ. अपूर्वा देशपांडे


धाकटी सून, औरंगाबाद

***

168
वटवृक्ष
प्रत्येक कुटुंबात एक वटवृक्ष असतो. तो आपल्या छायेखाली आपल्या कुटुंबातील
सगळ्यांना एक मायेची सावली देतो. त्या सावलीत सगळेजण आपले जीवन आनंदात
जगत असतात. तो वटवृक्ष म्हणजे आमच्या घराण्याची ओळख होती, आहे आणि नेहमी
राहील. ते म्हणजे आमचे सर्वांचे मुकुंदकाका होय. आयुष्यभर सरस्वतीची उपासना
आराधना केली. साहजिकच सरस्वती नेत्यांना वरदहस्त दिला व आपल्या ज्ञानदानाचे
पुण्य काम करत त्यांनी आपली एक नवीन ओळख निर्माण केली. स्वकष्टाने मिळवलेले
त्यांचे यश होते. त्यामुळे त्यांचे यश टिकाऊ होते. सरस्वतीची आराधना त्यांनी मनापासून
केली. त्यामुळे हजारो विद्यार्थी त्यांनी घडविले. अनेक यशस्वी पिढ्या त्यांनी घडवल्या
आहेत. ते गणिताचे प्राध्यापक होते. शून्यापासून सुरुवात केली, पण आज ते मनाने,
विचाराने, धनाने धनवान होते.
८ नोव्हेंबर १९९२ साली मी या धावडेकर कुटुंबात सून म्हणून प्रवेश केला.
त्यावेळेस माझी श्री. मुकुंद काकांची ओळख झाली. त्या दिवसापासून आजतागायत
मी मुकुंदकाकांचे मौल्यवान पैलू पाहिले. प्रत्येक जण जीवनात येतो. पण बोटावर
मोजण्याइतकेच आपले जीवन सार्थ करतात. त्यात श्रेष्ठ स्थान मुकुंदकाकांचे आहे.
यशस्वी खूप जण असतात. पण ते यश डोक्यात न जाता जमिनीवर घट्ट पाय रोवून
उभे राहणे एखाद्यालाच जमते. ते यशस्वी जीवन म्हणजे श्री. मुकुंदकाका होय. आमचे
परमभाग्य ते आमचे काका आहेत.
कौटुंबिक कार्यक्रमात ते अग्रगण्य असायचे. प्रत्येक गोष्टीत पुढाकार असायचा.
नुसते पुढाकार घेत नसत,तरते जबाबदारीने कार्य पार पाडायचे. सगळ्यांना ते कष्टाची
आणि आर्थिक मदत करायचे. सगळ्यांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागायचे. माझी
माणसं सगळे सुखी असायला पाहिजेत हा त्यांचा तळमळीचा विचार असायचा. त्यासाठी
ते प्रयत्न करायचे. काका एक आदरणीय, पूजनीय व्यक्ती होते. कोणतंही कार्य त्यांना
विचारल्याशिवाय होत नसे. यांची एक आदरयुक्त भीती होती, पण डोक्यावर मायेचं
छत्र आहे, असं वाटायचं. आमच्या लग्नात काकांनी भिंतीवरचे घड्याळ दिले होते. ते
अजूनही आमच्याकडे आहे.
मला काकांची एक गोष्ट आवर्जून लिहावीशी वाटते. दुःखद प्रसंगी त्या दुःखाला
सामोरं जाताना आपले काम, कर्तव्य काका चोखपणे करत असत. माझ्या सासऱ्यांना
169
देवाज्ञा झाली. त्यावेळेस माझा मोठा मुलगा काकांकडे शिकवणीला जात असे. तो
बारावीत होता. काका संध्याकाळी घरी आले व मुलाला म्हणाले, आजोबा आज गेले,
उद्यापासून शिकवणीला यायचे. घरी बसायचे नाही. एखादा सरस्वतीचा निस्सीम भक्तच
हे करू शकतो.
साधेपणा हा काकांचा एक गुण होता. काका नेहमी सुख-दुःखाच्या प्रसंगी
सगळ्यांकडे यायचे. सुखात सगळ्यांना शुभाशीर्वाद द्यायचे. दुःखद प्रसंगी आधार द्यायचे.
जीवनात एखाद्यालाच ते जमते. काकांना आधारवड म्हटले तरी हरकत नाही. कोणत्याही
कार्यक्रमात काका जुन्या गोष्टींमध्ये खूप रमत असत. अशा यशस्वी पुरुषामागे एक
खंबीर यशस्वी स्त्री असते. प्रसन्न हसतमुख चेहरा, यशस्वी खंबीर सहचारिणी काकांना
लाभल्यामुळे काका, प्रत्येक गोष्टीत कार्यक्रमात सहभाग घेत असत. ते हसरे व्यक्तिमत्त्व
म्हणजे आमच्या वसुधा काकू. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण भूतलावर
विश्वासाने खंबीर साथ एकमेकांना देत त्यांनी एक नवीन यशस्वी विश्व निर्माण केलं.
काकूंची खंबीर हसतमुख साथ व काकांची अथक मेहनत यावर त्यांनी आपलं साम्राज्य
मिळवलं. घराला अमृतवेल हे नाव सार्थ आहे. कारण त्यांची यशाची वेल त्यांची मुले
यशस्वीपणे सांभाळत आहेत.
माझा मुलगा केदार अपंग म्हणणार नाही, पण राजहंस म्हणेल असा आहे. काका
आजारी होते. हेडगेवार रुग्णालयात आम्ही त्यांना भेटायला गेलो. जवळपास दोन ते तीन
तास काकांशी गप्पा मारल्या. विषयाला विषय निघत होते. काकूही होत्या. काका म्हणाले,
केदारमुळे तुम्ही भाग्यवान आहात. मग मला म्हणाले, तुझे दुःख मी शब्दांत सांगू शकणार
नाही. कारण ते एका आईचे दुःख आहे. मग म्हणाले, माझ्या मुलाची तुला कायम साथ
आहे. आम्हा दोघांना खूप आधार वाटला. एक मायेचा हात डोक्यावर आहे. खूप बरे
वाटले. शंभर हत्तींचे बळ आले. एक नवीन उभारी आली. प्रारब्धात विधिलिखित असते,
ते होतेच. पण प्रेमाचे, आपुलकीचे दोन शब्द खूप काही करून जातात. बरे वाटले.
माझ्या मोठ्या मुलाचे लग्न ठरले तेव्हा काका आजारी होते. आम्ही साखरपुड्याचे
त्यांना सांगायला गेलो. काकांना बरे नव्हते. तरीही काका उठून समोर आले. आस्थेने
विचारपूस केली. आम्हीही त्यांना सगळे सांगितले. खूप बरे वाटले. तब्येतीमुळे काका
साखरपुड्याला, लग्नाला येऊ शकत नव्हते. त्यांना नातसून पाहायची खूप इच्छा होती.
170
आमची खूप मोठी चूक झाली. त्यांना नातसून पाहता आली नाही.
काका, आयुष्यभर ही सल मनात राहील, तुम्हाला तिला दाखवता आलं नाही. माफ
करा काका. आम्हाला माहीत आहे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, कारण
सरस्वतीचा पुजारी मनाने,विचाराने समृद्ध असतो. तो कधीच कोणावर रुसत नाही.
नेहमीच गोकुळात राहणाऱ्या काकांना असं अचानक जावं लागलं. नियतीसमोर
कोणी काही करू शकत नाही हेच खरे.
वटवृक्षाचे साम्राज्य खूप मोठे आहे. आमच्या धावडेकर देशपांडे कुटुंबात त्यांचे
योगदान खूप मोठे आहे. नेहमी प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, प्रत्येकाची
आपुलकीने विचारपूस करणारे, पाठीवर मायेचा हात ठेवणारे, कुटुंबाबद्दल आत्मीयता
असणारे, यश भरभरून असूनही जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे राहणाऱ्या काकांनी एक
यशस्वी साम्राज्य निर्माण केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितेतील दोन ओळी मला आठवतात..
दिव्यत्वाची जेथ प्रचीती। तेथे कर माझे जुळती ।।

{ मंजूषा देशपांडे
पुतणसून, औरंगाबाद

***

171
मना चंदनाचे परी त्वां झिजावे….
देह त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।
मना चंदनाचे परि त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ।।
समर्थ रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’ मधला हा श्लोक मुकुंदकाकांसाठी अगदी
समर्पक वाटतो. त्यांची परोपकारी वृत्ती, अफाट बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती, शिकवण्याची
अनोखी शैली, माणुसकी, चौफेर ज्ञान, विनोदाची जाण, सहृदयता काय काय वर्णन
करावे असे वाटते.
आपुलकीनं चिंब करणाऱ्या आपल्या सभोवतालचे वातावरण आनंदी व प्रेरणादायी
करण्याचा ध्यास, आचरणात प्रचंड तत्परता हे सगळंच ज्यांच्या जगण्यात चपखलपणे
लागू पडेल ते म्हणजे मुकुंदराव काका.. !! शिकवणे हा त्यांचा प्राण होता. शेवटपर्यंत
त्यांनी ते व्रत सोडले नाही. जसे शिकवण्यावर प्रेम तसेच विद्यार्थ्यांशीही त्यांचे अनोखे
नाते होते. हजारो विद्यार्थ्यांना शिकवलेले असताना अनेक वर्षांनी जरी विद्यार्थी भेटले
तरी ते नावानिशी, कुटुंबासह... कोणत्या वर्षी व कोणत्या batch मध्ये शिकले हे सगळे
त्यांच्या स्मरणात असे. संगीताचा साधक आपली कला सादर करताना मैफल जसा
सजवत जातो, प्रेक्षक कविता, गाणी, तत्त्वज्ञान, वाचन, विनोद, व्यासंग या सर्व गोष्टींचा
समावेश असलेले special script होतं गणिताचं…. त्यांची ही unique शैली साध्य
करणं कोणालाही शक्य नाही.
त्यांच्या आयुष्यात संघर्ष, खाचखळगे कल्पनातीत होते. पण त्यांनी त्याचा कधीच
बाऊ केला नाही. त्यांच्या उदात्त करुणेचा अनुभव कुटुंबातील प्रत्येकानी घेतला आहे,
कुटुंब म्हणजे फक्त सख्खी भावंडे, मुलं एवढंच मर्यादित नव्हतं, तर चुलत मावस इतरही
नातेवाईकांना काही समस्या असतील तर शक्यतो तेच पुढाकार घेऊन सोडवत. वैयक्तिक
आणि व्यावसायिक आयुष्यात कुठल्याही प्रसंगी फक्त सल्लाच नव्हे, तर विचार व
कृती सहित शेवटपर्यंत मार्गदर्शन करीत असत.. अगदी निरपेक्षपणाने. आम्हा सर्वांसाठी
काका दीपस्तंभ होते. आम्ही सर्व सख्खी, चुलत, भावंडं नोकरी, शिक्षण,व्यवसायाच्या
निमित्ताने औरंगाबादला येत असू तेव्हा काकांचा संदर्भ देत असू. माझ्याही आयुष्यातल्या
अडचणी महत्त्वाचे प्रश्न सोडवायला काका आणि काकूंनी सुद्धा पालकत्वाच्या भूमिकेत
172
प्रतिनिधित्व केलं. आयुष्यभर ते स्मरणात राहील. काका-काकूंचे पूर्ण संस्कार मुलं आणि
नातवंडांमध्ये उतरले दिसतात.
त्यांच्या तब्येतीच्या चढ-उताराची बातमी कळत होती, पण घरातल्यांचे सर्वांचे
प्रयत्न, उत्तमोत्तम उपचार यांना अजून काही काळानंतर यश येईल असं वाटत असताना
त्यांच्या निधनाची बातमी कळाली. त्यांची भेट होऊ न शकल्याची हुरहूर कायम मनात
राहील. त्यांची पोकळी तर सर्वांनाच जाणवेल.
शेवटी त्यांची ध्येयनिष्ठा, परोपकारी, कनवाळू वृत्ती व सर्वच चांगल्या गोष्टींचे
अनुकरण करणं ही खरी श्रद्धांजली ठरेल…!!

{ अर्चना देशपांडे जाडे,


निगडी, पुणे.

***

173
माझे एक पान
डॉ. मुकुंद देशपांडे सर,
काय लिहू आणि किती लिहू…. चार ओळींमध्ये बंदिस्त करण्यासारखं बाबांचं
व्यक्तिमत्त्व नाही.
प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. श्री. मुकुंदराव देशपांडे साहेब. म्हणजे आपले M.A.D. सर,
त्यांच्या जीवनातले ...माझे एक पान.
त्यांच्या जीवनातला माझा प्रवास सुरू करताना माझी आणि त्यांची फारशी ओळख
नव्हती. मी डॉ. मंदार देशपांडे सर यांच्या रुग्णालयात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत आहे.
त्यांची पहिल्यांदा मार्च-२०१९ मध्ये रुग्णालयात भेट झाली आणि कालांतराने आमची
मैत्री झाली. मार्च २०१९ ला बाबांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्या दिवशीपासून त्यांची काळजी घ्यावी ही जबाबदारी डॉ. मंदार देशपांडे सर यांनी
मला दिली. मी ती स्वीकारली व कार्यरत झालो. बाबांची देखरेख व शुश्रूषा करणे तसेच
त्यांची सर्व प्रकारे जबाबदारी माझ्यावर होती. मी आरोग्यसेवक ह्या नात्यानं त्यांच्यासोबत
होतोच, पण त्यापलीकडे त्यांनी म्हणजे (आई आणि बाबा) यांनी मला आपल्या मनात
मुलाचं स्थान दिलं.
बाप आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण. पण ह्याचा अनुभव मी प्रत्येक क्षणी
घेतला. बाबांसोबत रोज भेटताना एक आपुलकी जाणवायची. या भावनांमध्ये मला माझे
वडील दिसायचे. खरे बघितले तर मी त्यांचा काळजीवाहक होतो, पण तेच माझी खरी
काळजी घायचे.
बघता-बघता दिवस सरत गेले, आई आणि बाबा माझे सोबती झाले. बाबांविषयी
म्हटले तर आज शब्द कमी पडतील, दिवस असो वा रात्र, बाबा आमचे खास...
मला आजही त्यांची प्रत्येक गोष्ट लक्षात आहे. ते गणितातले विशेषज्ञ असूनही त्यांचे
व्यक्तिमत्त्व अतिशय साधे होते. त्यांच्या सवयी मला पाठ झाल्या होत्या. रोज सकाळी
उठून देवाचे स्मरण करणे, रोज बातम्यांचा आढावा घेणे, फावल्या वेळेत व्यायाम करणे,
रोज पुस्तक वाचन करणे, न्यूजपेपर वाचणे, काही धार्मिक गोष्टी सांगणे व धार्मिक
कादंबरी वाचणे या त्यांच्या नित्याच्या गोष्टी होत्या. (वाचन हा त्यांचा सर्वांत आवडीचा
विषय होता) रोज आपल्या नातवंडांसोबत गप्पा मारणे व त्यांना छानशी गोष्टी सांगणे
हीदेखील त्यांची खरी ओळख होती. संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारे
174
बाबा असतात. कालांतराने बाबांची प्रकृती अगदी ठणठणीत झाली. या जीवन प्रवासात
बाबा मला कधीच निराश दिसले नाहीत. आपली घरातील सर्वजण काळजी घेतात हे ते
अगदी जाणून असायचे. पण आपल्यामुळे कुणाला त्रास नको, याची नेहमी ते दक्षता घेत
असत. या प्रवासात असताना बाबांची आठवड्यात दोन ते तीन वेळा Dialysisही प्रक्रिया
सुरू असायची. यासाठीही बाबा नेहमी अगदी वेळेवर पूर्ण तयारीत असायचे. या जीवन
प्रवासात असताना एका रात्री बाबांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उपचारादरम्यान
ICU मध्ये दाखल करण्यात आले. बाबांना श्वास घेण्यास त्रास असल्याने ते मला हाताने
सांगायचे आणि ते माझ्या लक्षात यायचे. एकदा रात्री २ वाजता on-duty स्टाफनी मला
विनंती करून म्हटले की, आपण आहात तोपर्यंत मी थोडीशी झोप घेते. पण हे ऐकताच
बाबांनी मला इशारा केला की, तू झोपायला जा. ती रात्र मला आजही आठवते. त्या
रात्रीदेखील ते माझी काळजी करत होते. आपल्या जीवाची पर्वा न करता ते इतरांचीही
काळजी करायचे.
अशी व्यक्ती माझ्या जीवनात कधी आली नव्हती. त्यांच्या या प्रवासात त्यांची पत्नी
(आई) वडील मुलगा सारंगदादा, धाकटा मुलगा डॉ. मंदार देशपांडे, सूनबाई, नातवंडे
असा परिवार यांनी त्यांची खूप काळजी घेतली.
डॉ. मंदार देशपांडे हे वैद्यकीय सेवेत असूनही त्यांनी आपल्या वडिलांसाठी खूप
परिश्रम घेतले व आपल्या वडिलांसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. एकेदिवशी पुण्यात
उपचार सुरू असताना बाबांची तब्येत गंभीर झाली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी
प्रयत्न सुरू होते. एकाएकी दु:खद वार्ता कानी आली.
१४ऑक्टोबर २०१९रोजी बाबांना देवाज्ञा झाली. हे ऐकून मी नतमस्तक झालो आणि
म्हणालो, या जगातील एक देवमाणूस देवाघरी गेला.
आजही त्यांची आठवण येते….बाबा हे शहाळ्यासारखे होते. बाहेरून कितीही कठोर
असलेतरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झराच होते.
आजही मी त्यांचा ऋणी आहे,आभारी आहे,त्यांच्या या अमूल्य प्रेमासाठी...
{ सुशील पीटर (ब्रदर)
अमृत बाल रुग्णालय, औरंगाबाद
***
175
माझ्या आठवणीतले आजोबा
आपल्या आयुष्यात अशी एकच गोष्ट आहे जी आपण COPY न करता सारखी
PASTE होत असते ....
ती म्हणजे आठवण...
एका चित्रपटातील आजोबा आणि नातवातला संवाद मला येथे सांगावासा वाटतो.
नातू : आजोबा, नातू म्हणजे काय हो ?
आजोबा : (जरा विचार करून) नातू म्हणजे ना, आजोबांच्या आयुष्यातला
सगळ्यात शेवटचा Best friend. नातवा आधी खूप मित्र असतात, पण नातवानंतर
कोणीच Best friend होत नाही.
नातू : आजोबा, मग आजोबा म्हणजे काय हो?
आजोबा : आजोबा म्हणजे नातवाच्या आयुष्यातला पहिला Best friend जो
शेवटच्या श्वासापर्यंत नातवाचा मित्र असतो.
किती सुंदर कल्पना आहे, नाही का? आजोबा-एक अतूट नातं......सगळ्याना
त्यांच्या पलीकडे एक नातं असतं.......आजोबा ....
हाताचे बोट धरून मला चालायला शिकवणारे… दोन्ही हातांनी हवेत उडवून
फुलासारखे अलगद झेलणारे…ओठांचा चंबू करून माझ्याशी लाडं लाडं बोलणारे….
संगीताच्या तालावर माझ्यासमवेत डोलणारे…. माझ्यासाठी स्वलिखित पाळणा रचून
माझ्यावर जिवापाड प्रेम करणारे… आपला खाऊ माझ्यासाठी खिशात जपून ठेवणारे….
कुपीतल्या राक्षसाची आणि रंजन गंजनच्या गोष्टी रंगवून रंगवून सांगणारे…. पत्त्यांचा डाव
रंगला असताना स्वतः हरल्यावर कधीकधी चिडणारे… चल चल रे नौजवान म्हणत मला
chess शिकवणारे… शाळेच्या Gathering मध्ये माझा ५ मिनिटांचा खेळ पाहण्यासाठी
५ तासांचा प्रवास करणारे…
Grandfather-Grandmother Day ला कधीच न चुकवणारे…आवडीने
आणि आपुलकीने मला गणित शिकवणारे…. चांगला निकाल लागताच आनंदाने
बक्षीस देणारे…. स्वावलंबनाचा मंत्र देऊन माझा आत्मविश्वास वाढवणारे…. माझे
आयुष्य घडवण्यासाठी दिवस-रात्र एक करणारे…. आयुष्याच्या वळणावर कधी हताश
झाल्यावर, माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारे…. त्यांच्या मनमोकळ्या गप्पांमध्ये
नेहमी सगळ्यांना रंगवून टाकणारे….
176
माझे आजोबा आज माझ्यासोबत नाहीत, पण त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण
आणि त्यांनी मला दिलेले प्रेम हे आठवणींच्या स्वरूपात सदैव माझ्या मनात कायम
राहील.

{ सोहम देशपांडे (नातू)
पुणे

***

मोठा नातू, चि. सोहम याने


आजोबांचे काढलेले स्केच.

177
My Grandfather: An Inspirational Hero
More and more when I single out the person who inspired me most,
I go back to my grandfather. When I think of all the blessings in my
life, Grandpa comes right there at the top of the list!
I am often told by my parents that, when I was an infant, After
completing his morning tuitions he would wash his hands and gently
come near me and sing a song in his old melodious voice, "सुंदर ते ध्यान
उभे विटेवरी', and as he carried over his song I would indistinctly move
my limbs and somehow managed to dance with excitement. As I grew
older as a young boy I would offer him water in his morning tuitions, I
used to observe that with full passions, grits and energy he would run
his classes. Whenever I would come across any questions I would ask
him and within a span of seconds he would answer them. He knew the
ins and outs of everything I could dream of!
I still remember him telling me bedtime stories. His most loved and
realistic story which he would narrate with full curiosity was ‘कुपीतल्या
राक्षसाची कथा’. While narrating the role of the evil genie he would say it
with very scary facial expressions and would also grasp my shoulders
that I would shiver.
During my first year classical singing training, my classical vocal
coach arranged a singing competition in Guru Poornima. During that
period my grandpa was in Pune living with my uncle and aunty. My
kaka played the ‘Raag Yaman’ on his speaker to give it a try. My
grandpa found my voice so melodious and sweet that he thought it
was of a professional singer. Eventually, kaka disclosed that it was of
your beloved grandson Shaunak. From then onwards he payed much
more interest on selecting songs for my performances and taking my
rehearsals. He also used to tell me that he too had a gifted sweet voice
178
in his young days. For my second year Singing competition during
Ganesh Utsav in our colony, he chose a very perfect song for my sweet
soothing voice ‘तोरा मन दर्पन कहलाए’. And I bagged the first prize. I give
all the credits to him. During his 70’s he turned pale with anaemia,
diabetes and myasthenia gravis. On such difficulties too when I was
singing another song rather than practicing for one, he called me in his
room and told that to focus on one thing at a time and asked me to sing
it.
He would also play chess with me. I still remember his
favourite opening dialogue "चल चल रे नौजवान', which he would say
when moving his first pawn towards the centre. He and me had
extensive fun playing chess together and enjoyed it to the hilt. He
would also watch ‘Takeshi’s Castle’, a very famous comedy show on
TV. While any player would accidentally fall off we both would be in
fits of laughter. Also he and me would crack jokes and would spill our
beans away.
I still remember him completing my two silly covets as a
young boy were, I wanted to have an absolute glimpse of cows and
other ruminants which he would relax to ‘Bhaji Mandi’, Gulmandi cow
barn. He would say "शौनक, पोटभरुन हम्मा बघून घे'. Another silly covet
was riding a horse which he completed successfully during my thread
ceremony.
I also remember him taking me and Aaji to his favourite
restaurant ‘Kailash’. We both would have hearty feasts consisting of
many delicacies. I remember he would like ‘Masala dosa’ and ‘chaha’.
One day (when I was in grade 6) I waked up early as it was
my maths exam and I had a doubt in ‘prime factorisation’. He was in
179
a very deep sleep. I still made him wake and without any thought he
waked up with lightning rapidity and cleared all my doubts. I am very
thankful for him clearing my doubts.
There are many other nostalgic memories which cannot be
jotted on a piece of paper.
I still miss you grandfather the most loving, encouraging and a
very intellectual soul I have ever met. Ajoba you made my childhood
unforgettable. I love you very much!

You are near,


Even if I don’t see you….
You are with me,
Even if you are far away…..
You dwell in my heart,
In my thoughts,
In my life,
Always……

{ शौनक मंदार देशपांडे


नातू, औरंगाबाद

***

180
MY GRANDFATHER
MY GRANDFATHER
WHO RAN TO HELP ME WHEN I FELL?
AND HOW WOULD BE A PRETTY STORY TELL?
OR KISS THE PLACE TO MAKE IT WELL?
MY GRANDFATHER

WHO EXPLAINED ME MATHS IN AN EASY WAY?


WHO TAUGHT ME TO LAUGH, LOVE, WORK AND PLAY?
WHO GUIDED ME DAY TO DAY?
MY GRANDFATHER

WHO NEVER REALLY GREW OLD?


WHOSE HEART WAS MADE OF GOLD?
WHO TAUGHT ME TO BE BRAVE AND BOLD?
MY GRANDFATHER

WHO ALWAYS HAD TIME TO LISTEN TO ME?


WHO BOUGHT CHOCOLATES AND SWEETS FOR ME?
AND WHO WROTE AND SANG LULLABY FOR ME?
MY GRANFATHER

WHO SIPPED LASSI FROM MY WATER BOTTLE?


WHO CAME AND ATE DOSA IN MY HOTEL?
AND WHO WAS ALWAYS MY BESTIE, IN MY FAMILY?
MY LOVELY GRANDFATHER

कु. स्वरा देशपांडे


नात, पुणे
***

181
देव्हारा
स्मरास्मरा हो गजाननासी स्मरा, आई जगदंबे तुझे नमन हे माझे दोन्ही करा
गृहलक्ष्मी मी होताच….भासले हे मजसी,
अमृत वास्तू हाच खरा देव्हारा .. अमृतवेल म्हणजे जणू कस्तुरीचा झरा...
मी मुकुंदरावांची पुतणसून. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी आमचे औरंगाबादला
स्थायिक होण्याचे ठरवले. जानेफळहून आम्ही औरंगाबादला आलो. ते साल होते १९८८
चे. काही दिवसांनी पदमपुऱ्यात काकांकडे जाण्याचा योग आला. काकांबद्दल खूप काही
ऐकले होते. त्यांच्याशी आपण काय बोलावे, अशी मनात भीतीही वाटत होती. परंतु त्यांना
भेटल्यावर…..व्वा..छान…सूनबाई तू आलीस! अशा प्रेमळ शब्दांनी एक आपुलकीची वीण
विणली गेली.
काका-काकूंना पाहिल्यावर त्यांचे पदमपुऱ्यातील घर “अमृत” म्हणजे देव्हाराच वाटले.
व त्या देव्हाऱ्यातील दोन मूर्ती लक्ष्मी-नारायण असा मला क्षणभर भास झाला.
आम्ही त्यावेळी सुपारी हनुमान रोडवर एका छोट्या खोलीत संसार थाटला होता.
औरंगाबादला आपला कसा निभाव लागेल वगैरे प्रश्न सतत सतावत होते. आर्थिक बाजूही
कमकुवत. पण काकांच्या एक-दोन भेटीतच सर्व धावडेकर व्यक्तींच्या बालपणाची साखळी
समजून गेली. “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे.” या उक्तीप्रमाणे वागत गेलो.
काकांचा आशीर्वाद तर होताच. माझ्या मनातील…संसारातील अनेक प्रश्न त्यांच्याशी
बोलल्यावर गप्पा मारल्यावर सुटले. आयुष्य कसे जगावे, आलेल्या प्रत्येक प्रसंगाला
न डगमगता कसे सामोरे जावे. अशा अनेक मौलिक विचारांनी मला दिलासा मिळाला.
आम्हाला मुलगा झाल्यावर विपुलला घेऊन काकांकडे गेलो. प्रत्येकवेळी तोच जिव्हाळा, तीच
आपुलकी आम्हाला त्यांच्या सहवासात मिळाली. श्रीमंती-गरिबी हा ऊन-सावल्यांचा खेळ
असून चांगली वागणूक हीच खरी संपत्ती या मौलिक विचारांचा ठेवा मिळाला.
धावडेकर देशपांडेंच्या प्रत्येक लग्नात लग्न जमवण्यापासून ते त्यांच्या संसाराच्या समस्या
सोडवण्यापर्यंत न थकता काका-काकूंनी काम केलेले पाहिले आहे. काकांच्या आशीर्वादाच्या
सावलीत आमच्या सगळ्यांच्या संसाराच्या रोपाचा वृक्ष केव्हा झाला ते कळलेच नाही.
मुकुंदकाका ही एक अद्भुत शक्ती होती. ती आज आमच्यात नाही. पण त्या शक्तीने
घालून दिलेल्या मार्गावरून आम्ही चालत राहू, हीच त्यांना वाहिलेली सुमनांजली.
{ सौ. शुभांगी देशपांडे, औरंगाबाद
182
माझे दुसरे पान
जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पानं दिली. पहिल्या
पानावर "जन्म’ लिहिला आणि तिसऱ्या पानावर "मृत्यू’ लिहिला. जे दुसरं पान कोरं
ठेवलं, ते मानवाच्या हाती दिलं. त्यावर हवं ते हवं तसं लिहायला. त्या पानाला "जीवन’
म्हणतात. हा विनोबांचा विचार खूप पूर्वी वाचनात आला होता. डॉ. मुकुंदराव देशपांडे या
व्यक्तीबद्दल लिहावं वाटलं तर सतत तोच विचार, तेच शब्द मनात घोळू लागले. का?
काय कारण? काय संदर्भ?
मुकुंदराव देशपांडे उर्फ मुकुंदराव काका / मामा,भाऊजी किंवा मॅड सर अशा नावाने
जगलेल्या या व्यक्तीने त्या दुसऱ्या पानावर जे काही लिहिलं ते खरंच असा त्रयस्थासारखं
लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवणं सोपं. आणि तसं अनुभवायला मिळणं हाही नशिबाचाच
भाग. नशीब काढलं माझ्या नशिबाने म्हणायचं!
त्या दुसऱ्या पानावर काय नव्हतं? काकांच्या भाषेतच सांगायचं तर एक "एक्स’
होता, शून्य किमतीचा. त्याला ज्ञानाचा "वाय’ येऊन मिळाला आणि किंमत वाढली.
त्या "एक्स’ अधिक "वाय’ला मिश्कील स्वभावाच्या, दातृत्वाच्या "झेड’नं गुणलं
आणि उभं राहिलं मॅड सर उर्फ माझे मुकुंदराव काकांच्या आयुष्याचं मोठं, पण सहज
असं समीकरण! आधीचा "एक्स’ टेंडिंग टू "झिरो’ संपला आणि सुरू झाला "एक्स’चा
इन्फिनिटीचा प्रवास...
"एक्स’ टेंडिंग टू "इन्फिनिटी’...
सुरुवातीचे विद्यार्थ्यांचे छोटे छोटे कंटूर, तीन-चार पिढ्याभर पसरलेले
एक्सपोनेन्शियल ग्राफ झाले. काकांचं समीकरण वाढत गेलं. अनेक चल (व्हेरिएबल्स)
आली-गेली, वेगवेगळ्या नात्यांनी, परिस्थितीने पण मूळ "एक्स’ आपल्या "वाय’ आणि
"झेड’ला घेऊन समीकरणाचा तोल सांभाळत उभा होता. घट्ट पाय रोवून अनेक गणितांना
सोडवत चालला होता. अनेक गणितं आपोआप सुटली. काहींना या समीकरणाने ठोकलं,
ढकललं तेव्हा सुटका मिळाली, तर काहींना अर्धवट का होईना समीकरणाने मार्ग
दाखवला. "अ’,"ब’,"क’,"ड’ साऱ्यात लपलं होतं ते समीकरण. कठीण असलं तरी,
सोपं असलं तरी. एक मिश्कील चेहराच काकांचा. त्या "एक्स’ चा…
"एक्स’ आपलं जीवन पान शांतपणे भरत राहिला. बेरीज, वजाबाकी, गुणाकार,
भागाकार सारं पचवून "एक्स’ एवढा मोठा झाला की नशिबाने ते पान आदरानं लिहिलं
183
आणि तेवढ्याच आदरानं मिटलंही...
गणित जगणाऱ्या अत्यंत कमी लोकांमधले आमचे मुकुंदराव काका गेले तेव्हा
साऱ्यांनाच जाणवलं, यांच्या जीवनाचं ते पान वाचायला अनेकांची दुसरी पानं जोडावी
लागतील. त्याशिवाय काकांचं पान अपुरं आहे. त्या अनेकांच्या गर्दीत माझ्या दुसऱ्या
पानातील थोडं... त्या बहरलेल्या ताटव्यातलं एक फूल ...
अनेक वर्षं मला "माझे काका’ म्हणून माहीत असलेले मुकुंद काका बारावीत माझे
गुरू झाले आणि त्यांच्याबरोबरचे अनुभव विभागले गेले. घर आणि बारावी. घरात काका
जेवढे गमतीशीर असायचे तेवढेच क्लासमध्येही. मात्र, घरात फुटणारं हसू जेवढं सात
मजली होतं तेवढीच क्लासमधली आदरयुक्त भीती सात मजली होती. तेवढीच खरी
असायची. डायबिटीस असून केळीची चोरी व्हायची माझ्या साक्षीने. मावशीला सांगू
नकोस, पण मी एक डझन दोन किंवा तीन केळी आणल्या. वरच्या गायब करायला सोप्या
जातात. अशी कबुली देऊन आपल्या पार्टीत घ्यायचे काका. नंतर मावशी केराची टोपली
तपासेल हे माहीत असूनसुद्धा साल तिकडे टाकायचे काका. काय म्हणावं आता. हसूच
यायचं आपलं साक्षीदार असण्याचं! असे काका होते, माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात
अवघड वळणाचे साक्षीदार आणि शिल्पकार माझ्या त्या पुढच्या प्रगतीचे.
कधीही न रागावता, डोळे मोठे न करता जे काही त्यांनी शिकवलं ते कदाचित
माझ्या आई वडिलांनाही जमलं नसतं. एकेका स्टेपवर रुतणारं माझं गणितच नाही, तर
आयुष्यातले धडेपण सुधारले. आपली आवड १००% जपणं, जोपासणं साऱ्यांनाच जमतं
असं नाही. पण काकांनी दाखवलं त्या आवडीला आयुष्य, आपलं करिअर बनवायचं.
सारं सोपं होत जातं. काकांकडून मिळालेलं बारावीतलं गणित अनेकांना आयुष्याची
दिशा देऊन गेलं. पण काकांसाठी गणित केवळ दिशा नाही, तर अख्खं आयुष्य होतं.
त्यांच्याकडे बघून माझ्या आवडीचा शोध सुरू झाला अगदी नकळत. आपलं स्वत्व
"individuality' हा काकांकडून मिळालं हा दुसरा धडा.
ठराविक पांढरा फुल बाह्यांचा शर्ट, एका बाहीचं बटण लावलेलं, दुसरं मोकळंच,
काळसर छटांची पँट, कॅन्व्हासचे बूट आणि व्हिक्सचा इन्हेलर म्हणजे माझे काका! साधे
अगदी साधे. हा पेहराव, देण्याचा स्वभाव, मिश्कीलता यात पैसा, मान, सन्मान आणि
काळ फारसा बदल घडवू शकले नाहीत.
184
अरसिक जीवनात काका गोडी आणत, शाब्दिक कोट्या एक शब्द किंवा अनेक
वाक्यं कसलंच बंधन नाही, सारं सहज जमायचं. हसू फुटायचं, पण कुणाचं हृदय किंवा
स्वाभिमान दुखावल्याचं ऐकलं नाही. निर्मळ, निरागस कॉमेडी असायची. मावशीला
त्यांचे विनोद पाठ झाले असेनात का. आम्ही त्या रिपीट किश्शांवर, विनोदावर प्रत्येकवेळी
तेवढेच मनापासून हसायचो. अगदी खळखळून दिलेली दाद असायची ती!
जशी विनोदबुद्धी तसंच कवी मन होतं काकांचं. कविता, गाणी,चारोळ्या एवढ्या
चपखल आणि सुंदर करत काका की खरंच जणू वरदहस्तच होता त्यांच्यावर. लग्नातली
विहीण, डोहाळेजेवणाचे डोहाळे, बारशाचा पाळणा. काकांचे शब्द, लावलेल्या चाली
आणि मावशीचा गोड आवाज कार्यक्रम कसा संपूर्ण करून जायचा. हसू,रडू,कौतुक सारं
आपसूक यायचं ते ऐकून. शब्दांची कमाल, त्या सुरांची कमाल! मैफल रंगायची अगदी
अंताक्षरीचीसुद्धा. हा गडी खूप डिमांडमध्ये असायचा.
गणितासारखा अत्यंत कोरडा विषय, निरस वाटणारा, पण तो छंद असणारे काका
विनोद, गप्पा आणि गाण्यांच्या दुनियेत इतक्या सहजतेने रमायचे हे गूढ होतं. पण काका
असेच होते. त्यांच्या शर्ट-पँटच्या काळ्या-पांढऱ्या रंगसंगतीसारखे, पूर्ण विरोधाभासी.
पण तरीही जगन्मान्य. Contrasting yet appealing. ज्या काकांनी लहानपणी
कुपीतल्या राक्षसाची गोष्ट सांगितली त्याच काकांनी गणित शिकवलं.
माझ्यासाठी काका नेहमीच कलाकार होते आणि राहिले. त्या माणसाने सगळं
रंगवलं. गणित, किस्से ,कहाण्या, गाणी,गप्पांच्या मैफली, कुपीतला राक्षस आणि असंख्य
लोकांची आयुष्यं कोणाचंही श्रीमुख ना रंगवता!असे माझे मुकुंदराव काका, माझ्या
दुसऱ्या पानातले तुमच्यासाठी.

{तृप्ती समीर गोगटे,


पुणे

***

185
‘रोळे’ज थिएरम आणि जिंकलेले १०० रुपये
मी जालना स.भु. हायस्कूलमधून १० वी केली आणि ११ वीला औरंगाबाद स.भु. विज्ञान
महाविद्यालयामध्ये आलो. ११ वीच्या सहामाही परीक्षेत नीट न जमल्यामुळे काही
जाणकार व्यक्तींनी ‘आय.सी.डी. मध्ये शिकवणी लाव’ असे सांगितले. काय कारण
असायचं काय माहीत, पण मी खूपदा क्लास मिस करायचो. फिजिक्समध्ये इलेक्ट्रिकल
विषयाचा प्रवाह काही डोक्यातून जायचाच नाही. पण एका विषयाची प्रचंड गोडी
लागली आणि तो म्हणजे मॅथ्स. याचं कारण होतं MAD सरांची शिकवण्याची खास
स्टाईल. काही काही शब्दांवरून घेतलेला लांब हेल त्या टॅापिकच्या महत्त्वाच्या भागावर
एम्फसाईज करून जायचा.
मग काय...Derivatives & Integrations माझ्या घरी भांडे घासायलाच येऊ
लागले. कॅल्क्युलसला बगलेत मारून लॉग टेबल बाये हाथ का खेल. या शिकवणी वर्गात
MAD सरांची अजून एक आईस (ice ok?) ब्रेकिंग आणि ग्राऊंड शॅटरिंग प्रथा म्हणजे
लवकर प्रॉब्लेम सोडवणाऱ्यालाॲान द स्पाॅट कॅश प्राईज…. ११ वी आणि १२ वीमध्ये मी हे
दोनदा कमावले आहे. तिसऱ्या वेळेस माझा आणि आनंद चावरेचा टाय झालेला. (तोच
टाय घालून आनंद मग नंतर सुप्रीमकोर्टात प्रॅक्टिस करायचा.) तेव्हा १०० रुपये म्हणजे
वर्ल्डकप जिंकल्यासारखे वाटायचे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त MAD
सरांची साथ मला लाभली असेल.
ब्लेमिंग ॲान ‘जनरल ग्रुप’ते मेडिकल आणि इंजिनिअरिंगला ‘थोडा है, थोडे की
जरूरत थी’ असे झाले. मग ते ‘और भी है राहे’ वगैरे लाळचाटे व्यवसायाकडे न वळता
सरळ B.Sc. ला भरती झालो. जे जे खेकडे मेडिकल अन इंजिनिअरिंगच्या जाळ्यात
नाही अडकले ते सगळे तिकडे गेले. तर मुद्द्याची गोष्ट म्हणजे तिथे मॅथ्सला पुन्हा MAD
सरच होते.
इथे आमचे चांगले जमले. पहिल्या दोन वर्षी मी आणि एक भिलाईहून आलेली
मुलगी असे दोघंच B.Sc. मॅथ्समध्ये डिस्टिंक्शनमध्ये आलो. सेकंड इयरला एकदा
MAD सरांनी मला क्लासमध्ये बडबड करताना पकडले आणि ‘चल, हा अमुक अमुक
थिएरम वाचून दाखव’असे म्हणाले. कॉट बाय सरप्राईज, मी जरा चिडलो होतो. तो
थिएरम ‘रोले’ चा होता. मग मी काही इंग्लिश उच्चार मुद्दाम मराठवाडी स्टाईलने केले.
आणि खूप घाईघाईत पटकन वाचून टाकला. ते ऐकल्यावर सर म्हणाले, ‘असं वाचतात
186
व्हय?’ मी म्हणालो ‘लँग्वेज आहे आणि मला असाच अक्सेंट येतो,’ मग सर म्हणाले,
‘बरं बाबा, मग त्या Rolle ला ना तू “रोळे” म्हण’. मग काय? त्यावर हसू आले मला
आणि मग सगळ्या वर्गालाच. आणि मी सरांना ‘सॉरी सर’ म्हणून खाली बसलो.
मी MCA करता करता माझे मामा (श्री. बी. एस. देशपांडे) यांच्या १० वीच्या
क्लासेसमध्ये मॅथ्स शिकवायचो. तिथे मी MAD सरांची स्टाईल कॉपी करायचो. त्यांच्या
प्रमाणेच लाँग स्ट्रेच्ड सेंटेन्सेस आणि वर्ड्स, काही महत्त्वाचे एम्फासाईज करायला.
मीहीप्रथम गणित सोडवणाऱ्याला १० रुपये द्यायचो. तो एक मॅजिक फॉर्म्युला होता
क्लासला एकाग्र करण्याचा.
आयुष्यात सगळेच शिक्षक आपल्याला शिकवतात. पण मोजकेच त्यांचा वाॅटरमार्क
सोडून जातात. MAD सरच असे एक आणि एकमेवच.

 किरण पांडे
 यु. के.

***

187
आठवणींचेक्षण…
कपिलाषष्ठीचा योग.. MAD सरांमुळे माझ्या मनात हे शब्द एकदम फिट्ट बसले आहेत.
एकदा वर्गात समीकरण सोडवताना अगदी दुर्मिळपणे आढळून येणाऱ्या संख्येला ‘हा
म्हणजे कपिलाषष्ठीचा योग’ असे त्यांनी वर्णन केले. क्लास संपल्यावर ते विद्यार्थ्यांशी
गप्पा मारताना मी आपले बाळबोधपणे त्यांना “सर, हा कपिलाषष्ठीचा योग म्हणजे
काय?’ असे विचारले आणि त्यांनी हसतच तेदेखील समजावून सांगितले.

 शिरीष आठवले
 यु. एस. ए.
***

Priorities ठरवल्या पाहिजेत, आधी नक्की काय करायचं हे ठरवलं पाहिजे, हे सांगताना
सर एक सत्यकथेवर आधारित किस्सा सांगायचे.
ऐश्वर्या राय १० वीला होती, तेव्हाच तिने ठरवलं होतं की मला नटी व्हायचं. तिने
तिच्या आईला सांगूनही टाकलं ..सरळ .. मला काही अभ्यासात रस नाही, मला
चित्रपटात काम करायचंय. त्यावर अख्ख्या क्लासचा गलका व्हायचा... हम्म हम्म्म्म्म
हम्म हम्म्म्मम्म. ….
त्यावर तिची आई काय म्हणाली तिला, आधी तू १० वी कर, १२ वी कर, मग
ग्रॅजुएशन कर, नंतर .... बरं का.... नंतर जे करायचं ते कर. थोडक्यात काय, तर तिची
आई म्हणाली “आधी हे तं कssssssर, मग ते.’
अशा प्रकारे “आधी हे तं कssssssर, मग ते’ हा वाक्प्रचार रूढ झाला.

 केदार काशीक
 पुणे
***

188

You might also like