You are on page 1of 20

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सर्वसामान्य लोक "माऊली" या नावानेच हाक मारतात. तेराव्या
शतकाच्या अगदी शेवटी ज्यांनी या महाराष्ट्रात जे अलौकिक असे जीवन जगून दाखवले त्यांच्या विषयी
अजूनही सर्व भाविकांच्या मनात एक विलक्षण श्रद्धा आहे, आदर आहे.
याचे मुख्य कारण हे त्यांनी के लेले चमत्कार नसून संस्कृ तातील भगवद्गीता मराठीत आणण्याचे जे थोर
कार्य के ले तेच होय. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी किं वा भावार्थ दीपिका म्हणतो.
ज्ञानेश्वरीविषयी सर्वच भाविक, पंडित, तत्वज्ञानी मान डोलावतात, हात जोडतात. पण ज्ञानेश्वरीच्या
अंतरंगात कोण कोण डोकावतात हे पहाणे सगळ्यात जास्त गरजेचे आहे.
सुमारे सातशे वर्षांपूर्वी त्यांनी वापरलेली मराठी भाषा ही आताच्या काळात समजायला खूपच अवघड
आहे, तसेच त्यात अनेक उपमा, दृष्टांत असे वापरले आहेत की ते समजावून घेतानाच इतके कठीण जाते
तर ते स्वतः समजावून घेऊन इतरांना सांगणे हे आणखी अवघड झाले आहे.
सहाजिकच ज्ञानेश्वरीला के वळ नमस्कार करणारेच जास्त आहेत. फार झाले तर पारायणे करण्याचा एक
पवित्र ग्रंथ एवढेच महत्व तिला दिले जाते.
स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या चौदाव्या वर्षी लिहिली हे ही आपणच मोठ्या अभिमानाने सांगतो
आणि ती वाचायची के व्हा तर म्हातारपणी, पेन्शनीत निघाल्यावरच असा मोठा विरोधाभासही आपणच
निर्माण करतो.
ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा तर भाषा समजत नाही, अर्थ समजत नाही - हे मुख्य कारण सर्व
सामान्यांकडून दिले जाते. हे समजून घेता येण्यासारखे आहे. याला एक उपाय म्हणजे या भाषेचा डौल,
नजाकत जर आधी समजून घेतली तर जरा गोडी लागून काहीबाही तरी ज्ञानेश्वरी आपण वाचण्याचा प्रयत्न
करु.
याकरता आपण सरळ ओव्याच वाचायला सुरुवात करु या तर....
ज्या ओव्या एकदम अपिल होतात त्या तरी आधी पाहू यात जरा ......(अध्याय पहिला)
जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ।।५६।।
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ।।५७।।
हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ।।५८।।
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ।।५९।।
कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां । हा अनुरागु भोगितां । कु मुदिनी जाणे ।।६०।।
ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलोनि अंतःकरणें । आथिला तोचि जाणें । मानूं इये ।।६१।।
चांदणे हेच ज्याचे अन्न आहे असा चकोर पक्षी ही एक कविकल्पना. शरदऋतूतील स्वच्छ चांदणे पडले
असताना ज्याप्रमाणे चकोराची पिले हे अमृतकण अतिशय हळुवारपणे हे कोवळे अमृतकण टिपतील
त्याप्रमाणे अतिशय हळुवार अंतःकरणाने ही ज्ञानेश्वरी तुम्ही श्रोतेजन अनुभवा.
शब्दांशिवाय संवादण्याची, इंद्रियांना जाणू न देता भोगण्याची ही गोष्ट आहे. थेट सिद्धांतांनाच भिडण्याची
अपेक्षा माऊली करताहेत.
जसे भुंगे हे इतक्या हळुवारपणे कमळातील परागकण नेतात की त्या कमळाला पत्ताही लागत नाही
त्याप्रमाणे श्रोत्यांनी अतितरलपणे या ग्रंथाचा अनुभव घ्यावा.
चंद्रविकासी कमळाची अजून एक उपमा माऊली देतात - चंद्र उगवला की हे कमळ फु लते जणू काही
आपली जागा न सोडता ते जणू चंद्राला आलिंगन देते अशा अतिशय भावविभोर पद्धतीने, स्थिर
अंतःकरणाने जो हे वाचेल (अनुभवेल) त्याच्याच हे सारं लक्षात येईल.
अशा भावपूर्ण अंतःकरणाने जर ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात के ली तर काही बाही हातात पडावे अशी
आशा आहे.
मी कोणी ज्ञानेश्वरीचा जाणकार वा अंतरंग अधिकारी नाही. एकं दर लोकांना ज्ञानेश्वरीविषयी आवड तर
वाटतेच पण त्याच जोडीला भाषेचा अडसरही जाणवतो हा एक विचित्र तिढा कसा सोडवता येईल
याकरता हा खटाटोप. आपल्या पैकी कोणी अजून सोप्या पद्धतीने या ओव्या समजावून सांगितल्या तर
त्यांचे स्वागतच आहे.
मुख्य भाग असा आहे की ज्ञानेश्वरीची गोडी लागून ती जास्तीत जास्त लोकांनी वाचावी, त्याचा अभ्यास
करावा.
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत
स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष न मावे
म्हणूनि वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे
अशा अतिशय सार्थ शब्दात पांवसच्या स्वामी स्वरुपानंदांनी माऊलींचे सुरेख वर्णन के ले आहे. माऊली हे
योग्यांचे योगी, विरक्त, तत्वज्ञ, संतश्रेष्ठ, गुरुं चे गुरु, सत्कविवर इतके च काय प्रत्यक्ष भगवंतच....
अशा या अतिशय पवित्र माऊलींचे स्मरण करायचे ते ज्ञानेश्वरी वाचून, ज्ञानेश्वरी अभ्यासून .....
ज्ञानेश्वरीच्या पवित्र ओव्या वाचताना आपले अंतःकरण भरुन येते याचे कारण हे एका महाभागवताचे
शब्द आहेत. एका योगेश्वराच्या, ज्ञानियाच्या ठिकाणी असलेला भक्तिभाव यात काठोकाठ भरलेला आहे.
तत्कालिन समाजाने या सर्व भावंडांना संपूर्णतः बहिष्कृ त के ले, त्यांच्या मात्यापितरांना देहदंडाची शिक्षा
सुनावली, माऊलींची व त्यांच्या भावंडांची कु चेष्टा -अवहेलना के ली - आणि तरीही या महापुरुषाच्या
ज्ञानेश्वरी ग्रंथात या समाजाबद्दल कटुतेचा एक शब्दही नाही. एवढेच नव्हे तर या समाजाबद्दल अपरंपार प्रेम
व करुणाच भरुन वहाते आहे. यामुळेच ते संपूर्ण जगाची माऊली म्हणून ओळखले जातात.
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट के ली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट के ली ॥२॥
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा के लासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥
श्रवनाचे मिषें बैसावें येउनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥ ----संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज ।।
कै वल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ।। --शांतिब्रह्म श्री एकनाथ
महाराज ।।
ज्ञानियांचा राजा । गुरुमहाराव । म्हणती ज्ञानदेव । तुम्हा ऐसे ।। ---- जगद्गुरु श्री तुकाराम महाराज ।।
खरोखर, गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वरमहाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पीतांबर नेसून,
अर्जुनाच्या रथावर बसून, रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षांनी, भगवंत कपडे
बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. त्यात
सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे. - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.
ग्रंथ नव्हे कादंबरी हा मनरंजनाची । सबळ पुण्ण्य बुध हो ज्याचे तोची हिला वाची । ---- श्री दासगणू
महाराज, श्री ज्ञानेश्वरी संदर्भात.
स्वामी स्वरुपानंदांचे सद्गुरु स्वामी गणेशनाथमहाराज हे ज्ञानेश्वरीला इतका पवित्र ग्रंथ मानत की पूजा वगैरे
झाल्यावर सोवळ्यातच ते ज्ञानेश्वरी वाचत, इतरत्र कु ठेही ज्ञानेश्वरी नेण्याला, वाचायला त्यांचा सक्त विरोध
असे.
माधानचे सुप्रसिद्ध संत गुलाबरावमहाराज - हे अंध असले तरी प्रज्ञाचक्षु होते. त्यांच्या दर्शनाला जो कोणी
येईल त्याचे हात हातात घेत व लगेच त्याचे नाव सांगत. असे हे गुलाबरावमहाराज प्रकांडपंडित ही होते.
त्यांच्याबरोबर कायम एक मोठी पेटी असायची - पुस्तकांची -त्यात विविध विषयावरची पुस्तके -ती
सगळी महाराजांनी दुसर्‍याकडून वाचून घेतलेली - पण कु ठल्या पानावर काय लिहिले आहे हे महाराज
क्षणार्धात सांगू शकत. तत्कालिन अनेक विद्वान्/पंडित्/शास्त्रज्ञ यांजबरोबर वादविवादही करायचे, त्यांना
वादात हरवायचे....... असे हे महाराज मधुराभक्तीचे अधिकारी होते - ते स्वतःला श्रीकृ ष्णपत्नी म्हणवून
साडी वगैरे नेसून श्रीकृ ष्णाची पूजाअर्चा करायचे (कात्यायनीव्रत)... याचबरोबर ते स्वतःला
ज्ञानेश्वरकन्यका म्हणवून घ्यायचे - इतके माऊलीप्रेम...... ते जेव्हा आळंदीला जायचे तेव्हा जसजशी
आळंदी जवळ यायची तसतसे ते इतके कासाविस व्हायचे की वेशीपासून बैलगाडीतून उडी मारुन धावत
सुटायचे - माऊली, माऊली हाक मारत - ते थेट समाधीला मिठी मारेपर्यंत...... मगच शांत व्हायचे....
त्याकाळातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व - श्री. ल. रा. पांगारकर हे महाराजांच्या अगदी जवळचे. ते एकदा
महाराजांबरोबर आळंदीला गेले होते- माऊलींना अभिषेक करायचा म्हणून सर्व साहित्य घेऊन पांगारकर
पूजेला बसले - शेजारी महाराज बसलेले. पांगारकरांचे ते दूध-दही -पंचामृत समाधीवर हाताने पसरवणे
चालू होते - हे करताना त्यांच्या बोटातील अंगठी समाधीवर घासल्याचा सूक्ष्म आवाज झाला मात्र -
महाराज कळवळून ओरडलेच जवळजवळ - अरे पांगारकर, ते बोटातले अंगठ्या, सल्ले फे कू न दे बरं आधी
- माऊलींच्या अंगावर किती ओरखडे उठताहेत........
एका महापुरुषांच्या (स्वामी स्वरुपानंदांचे उत्तराधिकारी) समवेत आळंदीला माऊलींच्या दर्शनाचा योग
मला आलेला होता. समाधि-दर्शनाच्या आधी हरिपाठाचे वाचन, काही काळ ध्यान, ज्ञानेश्वरी वाचन असे
सारे यथास्थित व्हायचे व मगच भावपूर्ण अंतःकरणाने समाधीचे दर्शन असे सगळे ते असायचे.
ते महापुरुष म्हणत - "पटकन दर्शन व मग निवांतपणे फराळ - हे असले काय उपयोगाचे ? माऊलींच्या
दर्शनाला जायचे तर आपली काही तयारी नको ? माऊलींचेच ग्रंथ वाचून मन निर्मळ, शांत, प्रसन्न झाले
की मग दर्शन घ्यायला आपण काहीबाही पात्र झालो"
अशा अनेक संत-महात्म्यांना जसे माऊलींबद्दल अतीव प्रेम, आदर, श्रद्धा आहे तसेच सर्वसामान्यांनाही
आहे, इतके च काय अगदी तिर्‍हाईत, अनोळखी वाटणार्‍या परदेशी मंडळींनाही आहे -------
ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यातील दूरदर्शनवर मी पाहिलेला एक प्रसंग. एका परदेशी माणसाची
मुलाखत घेतली जात होती. तो परदेशी, गोरा इसम बर्‍यापैकी मराठी बोलत होता.
मुलाखतकार : तुम्ही महाराष्ट्रात कसे आलात ?
परदेशी इसम : काही वर्षांपूर्वी संशोधनाकरता मी आफ्रिके च्या जंगलात गेलो होतो. तिथे मला
डायरियाचा जबरदस्त त्रास झाला. अनेक वेगवेगळी औषधे घेऊनही काही फरक पडेना. अशात माझ्या
एका भारतीय मित्राने मला आयुर्वेदिक वैद्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या आयुर्वेदिक औषधांनी
मी पूर्ण बरा झालो. मग पुढे हा आयुर्वेद काय आहे हे शिकण्यासाठी मी भारतात आलो आणि आता
पुण्यात एका वैद्यांकडे आयुर्वेदाचे शिक्षण घेत आहे.
मुलाखतकार : तुम्ही जगभरात अनेक ठिकाणे फिरलेले दिसता - कु ठे कु ठे गेला होतात, कु ठली ठिकाणे
तुम्हाला विशेष आवडली ?
परदेशी इसम : मी जगभरातल्या सर्व प्रमुख, मोठ्या मोठ्या शहरांमधे फिरलो आहे, आफ्रिके तील जंगले,
वाळवंटे तुडवली आहेत. अमेरिका, युरोप, आशियातील जवळ जवळ सर्व मोठी शहरे मी पाहिली आहेत,
पण माझे सगळ्यात आवडते ठिकाण आळंदी. इथे पुण्याजवळची जी आळंदी आहे ती.., (हसत
हसत) ....ती चोराची आळंदी नाही बरं का ? माऊलींची आळंदी.....
मुलाखतकार : (अतीव आश्चर्याने) माऊलींची आळंदी ? ती का आवडते तुम्हाला ?
परदेशी इसम : का म्हणजे ? अहो, प्रत्यक्ष माऊलीच आहे ना तिथे..
एवढे म्हणून त्या परदेशी इसमाने तिथल्या तिथे दोन्ही हात जोडून माऊलींच्या नावाचा जयघोष के ला...
हे सगळे पहात असताना मी विचार के ला की कोण हा परदेशी इसम ? काय याला माऊलींचे चरित्र माहित
असणार ? काय याचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास असणार ? पण याला माऊलींचे इतके प्रेम कसे काय ?
आणि माझ्या लक्षात आले आईबद्दल कु ठल्याही लेकराला प्रेम वाटणारच की.... त्यासाठी आईची
कु ठली भाषा वगैरे कळण्याची गरज असते का ? आणि असलीच आईची भाषा तर ती फक्त प्रेमाची भाषा
आणि लेकराला ती कळणारच की....
........अशी ही लोकोत्तर माऊली.
आपल्याला मराठी भाषा लिहिता वाचता येते हे आपले के वढे भाग्य - कारण याच भाषेत माऊलींची
ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांचे अभंग आहेत, समर्थांचे सर्व वाङ्मय आहे.....
अशा माऊलींची ज्ञानेश्वरीची एक जरी ओवी कोणी ऐकली, वाचली वा म्हटली तरी तो धन्यच झाला.
कां फे डित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचें जैसें ।।१९९-अ. १६।।
(पोखीत = पोषण करणे ; पादप = वृक्ष ; आप = पाणी)
कां जगाचें आंध्य फे डित । श्रियेचीं राउळें उघडित । निघे जैसा भास्वत । प्रदक्षिणे ।।२००।।
(आंध्य = काजळी, अंधार ; श्रिया = लक्ष्मी, भास्वत = सूर्य)
तैसीं बांधिलीं सोडित । बुडालीं काढित । सांकडी फे डित । आर्तांचिया ।।२०१।।
(साकडी = संकट, अडथळे, आर्त = दु:खी)
किं बहुना दिवसराती । पुढिलांचें सुख उन्नति । आणित आणित स्वार्थीं । प्रवेशिजे ।।२०२।।
(पुढीलांचे = दुसर्‍याचे)
परमपवित्र गंगामैया ही तिच्या ठिकाणी सुस्नात होणार्‍या भाविकांचे पाप-ताप दूर करते, तसेच तीरावरील
सर्व वृक्षांचे संवर्धनही करते. सूर्य देव उगवताक्षणी जगाचा अंधार दूर होतो, सूर्यविकासिनी कमळे
उमलतात - तसेच संत महात्म्यांचे जीवन के वळ दुसर्‍यासाठीच असते. अनेक बद्ध जिवांना ते सोडवतात,
संसारात बुडालेल्यांना हात देतात, आर्तांची संकटे दूर करतात - रात्रंदिन दुसर्‍यांच्या सुख-उन्नतीसाठी
जगणे हाच संतांचा निजस्वार्थ होय ......
या सारख्या ओव्या नुसत्या वाचल्या तरी किती प्रसन्न वाटते - अशा ओव्या वाचता वाचताच त्यांचा अर्थ
कळू लागेल - ते शब्द आपल्या वाणीत बसून जातील आणि कधी भाग्याने ते आठवले तर माऊलींच्या
प्रेमाने नेत्र भरुन येतीलच येतील.....
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ३
मागील भागात आपण पाहिले की श्री ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे. म्हणजेच इथे वाचकाच्या
ह्रदयात सद्भाव असणे खूप गरजेचे आहे. भावपूर्ण, हळुवार अंतःकरणानेच हा ग्रंथ वाचावा, नव्हे तो
अनुभवावा असे स्वतः माऊलींनीच सांगितले आहे.
आता माऊली किती रसिकतेने काय काय लिहितात ते पाहू ..... अध्याय पहिला - महाभारतकार व्यासांचे
गुणगौरव माऊली करताहेत -
नाना कथारूपें भारती। प्रकटली असे त्रिजगतीं ।आविष्करोनि महामतीं। व्यासाचिये ।।३२।। ...................
(भारती = महाभारत)
म्हणौनि हा काव्यांरावो। ग्रंथ गुरुवतीचा ठावो । एथूनि रसां झाला आवो। रसाळपणाचा ।।३३।। .........
(गुरुवती = गौरवाचे, ठावो = ठिकाण, आवो = डौल)
तेवींचि आइका आणिक एक। एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक।आणि महाबोधीं कोंवळीक। दुणावली ।।३४।।
(पावली शब्दश्री । येथे सत्शास्त्रता । वाढली मृदुता । महाबोधी ।। - स्वामी स्वरुपानंद)
एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें। सुखाचें एथ ।।३५।।
माधुर्यीं मधुरता । श्रुंगारीं सुरेखता । रूढपण उचितां । दिसे भलें ।।३६।।
एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा।म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा। दोष हरले ।।३७।।
....( कळाविदपण = कु शलता, अवलीळा = सहज)
आणि पाहतां नावेक। रंगीं सुरंगतेची आगळीक।गुणां सगुणपणाचें बिक। बहुवस एथ ।।३८।।
.. ( नावेक=जरा/थोडेसे/अंमळ, आगळीक=अधिकपणा,........................................ बिक =थोरपण,
बहुवस=जास्त)
भानुचेनि तेजें धवळलें। जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें।तैसें व्यासमति कवळिलें। मिरवे विश्व ।।३९।।.....
(धवळले=प्रकाशले,उजळले)
कां सुक्षेत्रीं बीज घातलें। तें आपुलियापरी विस्तारलें।तैसें भारतीं सुरवाडलें। अर्थजात ।।४०।। .......
(सुरवाडलें=फु लले, अर्थजात =पुरुषार्थ )
ना तरी नगरांतरीं वसिजे। तरी नागराचि होईजे।तैसें व्यासोक्तितेजें। धवळत सकळ ।।४१।।
कीं प्रथमवयसाकाळीं। लावण्याची नव्हाळी।प्रगटे जैसी आगळी। अंगनाअंगीं ।।४२।।.....(प्रथमवयसाकळी
= नुकतेच तारुण्य लाभलेली, .............................................................................नव्हाळी = बहर,
अंगना = स्त्री)
ना तरी उद्यानीं माधवी घडे। तेथ वनशोभेची खाणी उघडे।आदिलापासौनि अपाडें। जियापरी।।४३।।
.................(माधवी = वसंत, आदिलापासौनि = मूळच्यापेक्षा वेगळे,............अपाडे = असाधारण)
नानाघनीभूत सुवर्ण। जैसें न्याहाळितां साधारण।मग अलंकारीं बरवेपण। निवाडु दावी ।।४४।।....(बरवेपण
= सौंदर्य, निवाडु = वेगळेपण)
तैसें व्यासोक्ति अळंकारिलें। आवडे तें बरवेपण पातलें।तें जाणोनि काय आश्रयिलें। इतिहासीं ।।४५।। ....
(बरवेपण = सौंदर्य, निवाडु = वेगळेपण) माउली म्हणतात - व्यासमुनींच्या महामतीतून हे प्रगट झाले आहे.
हे नुसते काव्य नसून - काव्यराज आहे, श्रेष्ठ ग्रंथ आहे. यात सर्व साहित्यरसांना रसाळपणा प्राप्त झाला
आहे.
चातुर्य शहाणे होणे, सिद्धांतांना रुची प्राप्त होणे, सुखाला सौभाग्य लाभणे, माधुर्यी मधुरता, शृंगारी सुरेखता
- ही खास माऊलींची प्रतिभाशैली आहे - हे असे सारे त्यांनाच सुचू जाणे - या अशा ओव्यांचा अर्थ के व्हा
समजून येईल तर - या ओव्या नुसत्या वाचत गेलो तरीही - यांना जी एक अवीट गोडी आहे ती वाचतानाच
लक्षात यावी....
ज्ञानेश्वरी वाचताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नुसते शब्दार्थ कळले की ज्ञानेश्वरी
कळली असे होणार नाही - तर त्यातील सौंदर्य, रसिकता, भावार्थ हे सगळेच्या सगळे ज्ञानेश्वरी वाचता
वाचता हळुहळु जेव्हा आपल्या अंतरात उतरत जाईल तेव्हाच त्याची खरी गोडी चाखता येईल.
अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर समजा आपण खूप सुरेल शास्त्रीय संगीत ऐकत आहोत. त्यातले
राग, त्या ताना, पलटे, समेवर येणे किं वा ते तबल्याचे बोल आपल्याला काही कळत नाहीये - तरीही तो
संपूर्ण स्वरमाहोल जसा आपल्याला अगदी भुरळ घालतो, गुंगवून ठेवतो - तसेच सुरुवातीच्या ज्ञानेश्वरी
वाचनाचे आहे - याकरता ती आधी वाचणे फार गरजेचे आहे.
यानंतरची गोष्ट आहे ती ज्ञानेश्वरीचे सौंदर्य, भावार्थ जाणून घेण्याची... जसे - गानमैफिलीत समोरचा
कलाकार समेवर अलगद कसा येतो हे आपल्याला कळणे कठीण वाटत असतानाच शेजारील एखाद्या
जाणकार रसिकाने दिलेल्या दिलखुलास वाहवामुळे ते सहज समजून येते, आपल्याही नकळत
आपल्याला हळुहळु ते चक्क कळू लागते तसेच हे आहे. एखादी अवघड तान कशी तीन सप्तकात लीलया
घेतात हे कोणी थोडे उलगडून सांगितले तर तेही समजू लागते तसेच या ग्रंथाचे आहे - याचे सौंदर्य उलगडून
दाखवणारा कोणी भेटला -जशी स्वामी स्वरुपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी - तर हे सारे नक्कीच कळू लागेल.
ज्ञानेश्वरीची खर्‍या अर्थाने गोडी लागेल.
आता परत वर दिलेल्या ओव्या पाहूया ....
नुकतेच तारुण्य प्राप्त झालेली स्त्री जशी जास्तच सुंदर दिसते, एखाद्या वनाला/ बागेला वसंत ऋतूत जसे
आगळेच सौंदर्य प्राप्त होते, अलंकारामुळे मूळचे घनीभूत सुवर्ण जसे खर्‍या अर्थाने (वेगळेपणाने) उठून
दिसते तसे व्यासांच्या कौशल्यामुळे हे सगळे उठून दिसते आहे. म्हणून की काय इतिहासाने भारताचा
(महाभारताचा) आश्रय घेतला आहे.
अशी ही रसाळ, अद्वितीय ज्ञानेश्वरी आहे.
वाचे बरवें कवित्व। कवित्वीं बरवें रसिकत्व। रसिकत्वीं परतत्व। स्पर्शु जैसा ।। ३४७ - अ. १८।।
(जसे वाणीचे सौंदर्य कवित्वामुळे खुलते, यापुढे हे कवित्वही रसपूर्ण असावे, आणि अजून उत्कट गोष्ट
म्हणजे या रसास परतत्वाचा स्पर्श - म्हणजेच ते जीवनाचे रहस्य उलगडून दाखवणारे असावे) - अशी जी
चढती श्रेणी माऊलींनीच सांगितली आहे तशी वाटचाल करण्याचा हा एक अल्प प्रयत्न....
कारण हे कवित्व, रसाळता हे सर्व परतत्वाकडे वाटचाल करणारे आहे म्हणून ते अद्वितीय.
ती अक्षरे नव्हती देखा।ब्रह्मसाम्राज्यदीपिका।अर्जुनालागी चित्कळिका।उजळिल्या श्रीकृ ष्णे ।।१७८- अ.
११।।
माऊलींचे शब्द हे साधे शब्द नव्हेतच - या जणू ब्रह्मसाम्राज्य दाखविणार्‍या चित्कळिका कशा आहेत हेच
आपल्याला हळुहळु जाणून घ्यायचे आहे ...
असाच हा अभ्यास वाढवत नेऊया.....
----------------------------------------------------------------------------------------
जनमेजयाचे अवलीळा। दोष हरले = एक पौराणिक दाखला - जनमेजयाने (अभिमन्यूचा नातू) भागवत
ऐकल्यामुळे त्याचे अनेक शारीरिक दोष नाहीसे झाले.
श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ४
तत्वज्ञ म्हणून माऊली एखादा विषय कसा सुरेख दृष्टांत, उपमा, उदाहरणे देऊन सांगतात ते पाहूया..
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । स्वभावनियतं कर्म कु र्वन्नाप्नोति किल्बिषम् ।।४७-अ. १८।।
उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा । स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ -गीताई॥
अगा आपुला हा स्वधर्मु। आचरणीं जरी विषमु।तरी पाहावा तो परिणामु। फळेल जेणें ।।९२३।। ...... (विषम
= कठीण, अवघड, परिणाम=शेवटी)
अरे, आपला हा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे मोक्षरुपी मोठे
फळ प्राप्त होणार त्या परिणामावर लक्ष ठेवले पाहिजे.
जैं सुखालागीं आपणपयां। निंबचि आथी धनंजया।तैं कडुवटपणा तयाचिया। उबगिजेना ।।९२४।। .....
(उबगिजेना=कं टाळत नाही)
हे धनंजया, कडुनिंबाचे सेवन के ले असता जर आपल्याला तो निंबच सुखकर होत असेल तर त्याच्या
कडुपणाला कं टाळू नये.
फळणया ऐलीकडे। के ळीतें पाहातां आस मोडे।ऐसी त्यजिली तरी जोडे। तैसें कें गोमटें ।।९२५।।...(आस
मोडे=आशा रहात नाही)
के ळ विण्याचे पूर्वी तिच्या झाडाकडे पाहिले तर आशा भंग होतो (निराशा होते) आणि अशा स्थितीतच जर
ती झाडे तोडून, उपटून टाकली तर त्या के ळीपासून उत्तम (गोमटी) फळे कोठून प्राप्त होणार ?
तेवीं स्वधर्मु सांकडु। देखोनि के ला जरी कडु।तरी मोक्षसुरवाडु। अंतरला कीं ।।९२६।।.... (सांकडु = कठीण,
मोक्षसुरवाडु=मोक्षसुख)
त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे पाहून तो कडू के ला (सोडून दिला) तर तो मोक्षसुखाला
अंतरला नाही का ? (दुरावला नाही का)
आणि आपुली माये। कु ब्ज जरी आहे।तरी जीये तें नोहे। स्नेह कु ऱ्हें कीं ।।९२७।।.. (कु र्‍हे=वाईट)
आणि समज, आपली आई जरी कु बडी (कु रुप) असली तरी ज्या तिच्या प्रेमामुळे आपण जगतो, ते तिचे
प्रेम काय वाकडे असते का?
येरी जिया पराविया। रंभेहुनि बरविया।तिया काय कराविया। बाळकें तेणें ? ।।९२८।।..(येरी=इतर,
पराविया=परक्या, बरव्या=चांगल्या)
एर्‍हवी इतर दुसर्‍या स्त्रिया जरी रंभेहूनही सुस्वरुप अशा असल्या तरी त्या बालकाला त्या घेऊन काय
करायच्या आहेत ?
अगा पाणियाहूनि बहुवें। तुपीं गुण कीर आहे।परी मीना काय होये। असणें तेथ ।।९२९।।..(बहुवे=जास्त,
कीर= खरोखर, मीना=माशाला)
अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत, हे अगदी खरे; पण त्या तुपात माशाला ठेवून काय उपयोग ? तो
जगेल तरी का?
पैं आघविया जगा जें विख। तें विख किडियाचें पीयूख।आणि जगा गूळ तें देख। मरण तया ।।९३०।। ....
(विख =विष, पीयूख= अमृत)
हे पहा ! जे (विषारी वनस्पतीतील विष) सर्व जगाला विष आहे, तेच विष त्यातील किड्याला अमृत
(जीवन) आहे; आणि गूळ जो सार्‍या जगाला गोड आहे, तोच त्या किड्यांना मृत्यु-मारक आहे.
म्हणौनि जे विहित जया जेणें। फिटे संसाराचें धरणें। क्रिया कठोर तऱ्ही तेणें। तेचि करावी ।।९३१।।
म्हणून शास्त्राने ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे व ज्याच्या आचरणाने संसाराचे धरणे फिटते-बंधन
तुटते, ते विहित कर्माचरण कितीहि कष्टसाध्य असले तरी तेच विहित कर्माचरण करावे.
येरा पराचारा बरविया। ऐसें होईल टेंकलेया।
पायांचें चालणें डोइया। के लें जैसें ।।९३२।।..(पराचारा = पर आचार, बरविया=चांगले, उत्तम, )
आपल्या विहित कर्मावाचून इतर धर्म (दुसर्‍याचा धर्म) उत्तम म्हणून जर त्याचे आचरण के ले तर, पायाने
चालण्याचे काम डोक्याने करावे त्याप्रमाणे होईल (उलट ते दु:खाला मात्र कारण होईल)
यालागीं कर्म आपुले। जें जातिस्वभावें असे आलें।
तें करी तेणें जिंतिलें। कर्मबंधातें ।।९३३।।
याकरिता आपल्या जातिस्वभावानुसार आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आपले आहे त्याचे जो
आचरण करतो, त्यानेच कर्मबंधाला जिंकले असे समज.
आणि स्वधर्मुचि पाळावा। परधर्मु तो गाळावा।
हा नेमुही पांडवा। न कीजेचि पै गा ? ।।९३४।।... (गाळावा= टाकावा, सोडावा)
आणि म्हणूनच अर्जुना ! परधर्माचा त्याग करावा व स्वधर्माचेच आचरण करावे असा नियम नको का
करावयाला ?
तरी आत्मा दृष्ट नोहे। तंव कर्म करणें कां ठाये ? ।
आणि करणें तेथ आहे। आयासु आधीं ।।९३५।। (का ठाये = राहिल काय, आयास=सायास, कष्ट )
जर असा नियम न के ला तर आत्मा जोपर्यंत यथार्थ अनुभूतिदृष्ट्या, दृष्ट झाला नाही तोपर्यंत कर्म करण्याचे
राहिल काय? (तर नाही), म्हणून ते स्वकर्म अवश्य के लेच पाहिजे आणि कोणतेहि कर्म करणे म्हटले तरी
त्यात आरंभी सायास हे आहेतच.
स्वभावतः आपल्या वाट्याला आलेले जे विहित कर्म तो स्वधर्म. (जसे विद्यार्थ्याला अभ्यास, आईला
मुलाचे संगोपन, इ.) तो आपल्या वाट्याला आल्याने त्याचेच नीट आचरण के ले तर सुरुवातीला जरी तो
कठीण, विचित्र, नकोसा, त्रासदायक वाटला तरी तो अंतिमतः (परिणामी) कसा उपयुक्त असतो हे माऊली
आपल्याला उलगडून सांगत आहेत. हा स्वधर्म आचरीत असतानाच जर अनायासे मोक्ष मिळणार असेल
तर तो कठीण म्हणून अजिबात सोडून देता कामा नये.
आपला स्वधर्म जरी सुरुवातीला कडुनिंबासारखा कडु वाटला तरी स्वधर्म असल्याने त्याला कं टाळून
चालत नाही. कारण औषध हे चवीला कडू असले तरी त्याचा परिणाम हा जसा उत्तम आरोग्य प्राप्त करुन
देणारा असाच असतो.
पुढे माऊलींना स्वधर्माला आईची उपमा दिली आहे. एखादी आई जरी कु बडी, कु रुप असली तरी तिचे
मुलावर जे प्रेम असते ते काय वेडेवाकडे असते का? आणि तिच्या मुलाच्या दृष्टीने विचार के ला तर
एखाद्या रंभा-उर्वशीपेक्षाही सुंदर बाईपेक्षाही जशी त्याला ती कु रुप आईच प्रिय असते तसे स्वधर्माचे आहे.
तो वरवर जरी कु रुप भासला तरी त्याच्याशिवाय आपले जिणेच कठीण असते.
तूप हे पाण्यापेक्षा खूप मौल्यवान असले तरी माशाला जसे जगण्यासाठी पाणीच आवश्यक असते तसा
स्वधर्म आपल्याला इतर कोणापेक्षाही (परधर्म) जास्त मूल्यवान असतो.
काही किडे हे विषारी (आपल्या दृष्टीने) वनस्पतींवर जगतात. ही वनस्पती आपल्याला विषारी असली तरी
त्या किड्याच्या दृष्टीने अमृतासम असते. आणि आपल्या दृष्टीने खाद्य असा गूळ त्या किड्याला मात्र
विषासम असतो.
अशा प्रकारची अनेक उदाहरणे देऊन माऊलींनी स्वधर्माचे जे श्रेष्ठत्व विशद के ले आहे ते कायम
अभ्यासण्यासारखे आहे. आई जशी मुलाला स्वभावतः मिळालेली असते तसा स्वधर्म हा स्वभावतः
मिळालेला असतो - तो कु ठे शोधून मिळण्यासारखा नाही. हा स्वधर्म सोडून परधर्म (दुसरा जे आचरण
करीत असतो ते काम) जरी कितीही सुंदर, चांगले असे वाटले तरी अशा परधर्माचे आचरण किती घातक,
विपरित असते हे माऊलींनी किती छान समजावून सांगितले आहे.
कर्मयोगातील बारकावे असोत, भक्ताची लक्षणे असोत, ज्ञानयोगाचे मर्म असो - माऊली ते अतिशय
सुरसरित्या, साधी-सोपी उदाहरणे देऊन इतके सुरेख समजावतात की ते वाचतच रहावे असे होऊन जाते.
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ६ - एक वेगळा पैलू.
श्री ज्ञानेश्वर महाराज हे नक्की होते तरी कोण ?
योगी ? का भक्त ? का तत्वज्ञानी ? का कविश्रेष्ठ ? का विरक्त संत ? का ज्ञानराज ???
माझ्यामते तर ते या सगळ्या गोष्टी मिळून तयार झालेले आणि या सगळ्या विशेषणांच्याही पलिकडले
एक अद्भुत रसायन होते .....
मी स्वतः ज्ञानेश्वरीचा अंतरंग अभ्यासक नाही, अधिकारी तर बिलकु ल नाही. के वळ ज्ञानेश्वरीविषयी
थोडेफार प्रेम निर्माण झाल्याने ज्ञानेश्वरीचा वेगवेगळ्या पद्धतीने मागोवा घेत असतो, अभ्यास करायचा
प्रयत्न करीत असतो. व हे सर्व चिंतन प्रकट करायला सध्यातरी मला हे एक योग्य ठिकाण वाटते म्हणून
इथे ते सारे लिहित असतो.
खरे तर ज्ञानदेव हे नाथसंप्रदायी कारण मत्स्येंद्रनाथांपासून थेट गहिनीनाथांपर्यंत आलेल्या या संप्रदायामधे
गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रहित के ल्याचा उल्लेख आहे व स्वतः निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे सद्गुरु.
पण मत्स्येंद्रनाथांपासून थेट गहिनीनाथांपर्यंतचे सर्व नाथ हे मुख्यतः योगी (हटयोगी) होते. समाजापासून
तर ते दूर होतेच पण सगुण - उपासना, भक्ति याबाबतही त्यांनी कु ठे फार प्रचार के ल्याचे दिसत नाही.
त्यांचा भर निर्गुण उपासनेवरच होता.
मात्र निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताई यांनी हा हटयोग राजयोग बनवला. सत्कर्माच्या पायावर
उभारलेल्या या परमार्थात कर्म, भक्ति, उपासना व ज्ञान या सर्वांनाच स्थान देऊन सर्वसामान्यांकरता एक
राजमार्गच जणू त्यांनी आखून दिला. यात भक्तिला प्राधान्य होते. सर्वसाधारण मनुष्याचा कल हा
सगुणाकडे असल्याने सगुणाकडून निर्गुणाकडे अशी ही वाटचाल सुलभतम होते हे त्यांनी विशेषत्वाने
प्रतिपादन के ले.
दुसरा भाग असा की हटयोगाला लागणारे अति कठीण यम - नियम हे सांसारिकाला त्यामानाने शिथिल
करुन टाकले, मात्र नीतीयुक्त आचरण हा पाया मात्र भक्कम पाहिजेच याचे वारंवार प्रतिपादन के ले.
त्यांना अभिप्रेत असलेला परमार्थ (जो मला वाटला तो) खालीलप्रमाणे-
१] आपल्या वाट्याला आलेली कर्मे उत्तम प्रकारे करुन ती ईश्वरार्पण करणे. (त्याच्या फळाविषयी फिकीर
न करणे)
२] पूजा - नामस्मरण, किर्तन, तीर्थयात्रा अशा प्रकारे सगुणोपासनेने अंतःकरण भक्तियुक्त राखणे. यात
गतानुगतिकत्व न आणता भक्तियोगात जास्तीजास्त जिवंतपणा आणणे यावर त्यांचा भर होता.
३] या सर्व भक्तियोग, कर्मयोगाचा मोहरा भगवतप्राप्ती हाच होता. सकाम भक्तिचा पुरस्कार त्यांनी कधीही
के ला नाही. भगवतप्राप्तीचा अर्थही के वळ सगुण दर्शन न मानता अखंड समाधान, शांति यांची प्राप्ती हीच
भगवत्कृ पेची ओळख हा भागही त्यांनी सुस्पष्ट के ला.
४] त्याकाळच्या रुढी लक्षात घेता कर्मकांड (यज्ञयाग) हा एका विशिष्ट वर्णाचा अधिकार मानला जात
असे. पण हे सर्व कर्मकांड मोडीत काढून परमात्मप्राप्ती हे ध्येय समोर ठेऊन तशी वाटचाल करणारा तो
भागवत असे सांगून सर्वसमावेशक असा भागवत धर्म त्यांनी स्थापन के ला. इथे कोणा एका वर्णाची
मक्ते दारी नव्हती तर कोणीही सर्वसामान्य त्यात सामील होऊ शकत असे.
हे सर्व ज्यात सविस्तरपणे लिहिले आहे असा ज्ञानेश्वरी ग्रंथ भागवतांमधे अतिशय मान्य झाला.
माऊलींच्या समकालीन अनेक संत होते ज्यांचे अभंग खूप प्रसिद्धी पावले, सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी
आदराचे, प्रेमाचे स्थान पटकावले. पण ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वैशिष्ट्य हे होते की भगवद्गीता या प्रमाण
ग्रंथावरील एक आगळेवेगळे संस्करण आणि ते देखील त्याकाळच्या बोली किं वा सर्वसामान्यांच्या भाषेत
म्हणजेच मर्‍हाठी / महाराष्ट्र भाषेत ते के लेले होते. यात के वळ प्रत्येक श्लोकाचा अर्थ मराठीत दिलेला
नाहीये तर त्यावेळेस संजयाच्या, अर्जुनाच्या इतके च काय तर प्रत्यक्ष भगवंतांच्या मनात काय भाव उमटले
असतील याचे मनोज्ञ वर्णन आहे. यामुळेच या ग्रंथाला भावार्थ दीपिका असेही म्हणतात.
एखादे पद भगवंतांनी - "अद्वेष्टा सर्व भूतानां" म्हणून संक्षिप्तरित्या सांगितले असल्यास त्याचे आपल्या
प्रतिभेने सुस्पष्ट व रसाळ वर्णन करणे हे के वळ माऊलीच करु जाणोत.
सध्या उपलब्ध असलेली ग्रंथालये, आंतरजाल, दळणवळण असली कु ठलीही संसाधने जवळ नसताना
अतिशय सूक्ष्म ग्रहणशक्ति, अपूर्व प्रतिभा व मुख्य अंतःस्फू र्ति (विश्वात्मक भावातून निर्माण झालेली)
याच्या जोरावर निर्माण झालेले हे साहित्य कालातीत अशा स्वरुपाचे आहे.
माऊलींची उत्तुंग प्रतिभा, आगळे रसिकत्व यामुळे ज्ञानेश्वरी ग्रंथातील उपमा, दृष्टांत, अलंकार या व अशा
अनेक साहित्यिक गुणांकडेच वाचक पहिल्यांदा आकर्षित होतो - जे योग्यही आहे. पण या सगळ्याचा
रसास्वाद घेताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की यात सांगितलेले तत्वज्ञान हे आत्ता या
काळातही जगण्यासारखे आहे - किं बहुना तसे कोणीतरी जगून दाखवावे याकरता या महापुरुषाचा सगळा
अट्टाहास आहे, के वळ वाङ्मयीन, साहित्यिक मूल्ये दाखवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही.
हे सगळे के वळ ज्ञानेश्वरी वाचून समजून येईल हे सर्वथैव अशक्य आहे - हे समजून येण्यासाठी ज्ञानेश्वरी
जगणारी कोणी व्यक्ति भेटणे हे अतिशय गरजेचे आहे - भले त्याची भाषा शहरी असेल वा ग्रामीण असेल,
भले त्याला साहित्य कळत असेल वा नसेल.... पण ज्ञानेश्वरीचे त्या व्यक्तिला इतके मोल वाटत असेल की
यातील एक तरी ओवी मी अनुभवणारच असा त्या व्यक्तीचा ठाम निश्चय झालेला असेल - असे ज्ञानेश्वरीचे
जगावेगळे प्रेम लागणे ही पूर्णतः वेगळी गोष्ट आहे पण जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे असे मला तरी
प्रामाणिकपणे वाटते.
एखादा प्रवचनकार वा प्राध्यापक वा अभ्यासू हा ज्ञानेश्वरीचे साहित्यिक मूल्य उत्तम तर्‍हेने जाणत असेल,
समजावून देऊ शके ल पण त्यात सांगितलेल्या तत्वांचा अभ्यास तो करत असेल का यात शंकाच
आहे.... कारण यात सांगितलेले आचरण्याचा काही बाही प्रयत्न हा एखादा उत्तम साधक वा संतच करु
जाणे - कारण या अशा मंडळींनी त्या साहित्यिक मूल्यांच्या पल्याड जाऊन त्या तत्वाचा शोध घ्यायचा
प्रयत्न के लेला आहे - अशा मंडळींची संगती ही खरी ज्ञानेश्वरी समजावून द्यायला मदत करु शके ल -
एरव्ही माऊली म्हणतात तसे रसाळ फळातला मधुर गर, रस चाखण्याऐवजी बाहेरचे रंगीत साल
चाटण्यासारखे ते होईल....
याठिकाणी पोहोण्याचे उदाहरण योग्य होईल. एखाद्या तलावाच्या/विहिरीच्या काठावर उभे राहून
पोहोण्यावरची अनेक पुस्तके कोणी वाचली व पाण्यात उडी टाकली तर तो जसा निश्चितच बुडणार तसे
हा ग्रंथ आचरणात आणण्याचा किं चितही प्रयत्न न करता नुसता वाचणारा वा अभ्यासणारा काय मिळवू
शकणार हे काय सांगायला पाहिजे ?
आपल्या आचरणात न आणता ज्ञानेश्वरीसारख्या पारमार्थिक ग्रंथाचा के वळ सखोल अभ्यास ही श्री
गोंदवलेकरमहाराजांच्या दृष्टीने के वळ एक बौद्धिक करमणूक, फारतर बौद्धिक कसरत.
या महान ग्रंथात अत्युच्च जीवनाचे जे यथार्थ दर्शन घडविले आहे ते जगण्याला कोणी प्रवृत्त झाला तर तो
ज्ञानेश्वरी काहीबाही जाणू शकला असे होईल.
ज्ञानेश्वरीची ही विशेषता सांगणारे महापुरुष माझ्या जीवनात आल्यानेच ही दृष्टी मला लाभली हे मी
प्रांजळपणे व नम्रपणे सांगू इच्छितो. असेच कोणी महापुरुष ज्ञानेश्वरी वाचकांना, ज्ञानेश्वरीचे प्रेम निर्माण
झालेल्या भाविकांना प्राप्त होवोत ही माऊलींच्याच चरणी प्रार्थना.
नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।। हे असे अगदी सर्वार्थाने खरे आहे.
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अगाध, असीम आहे. यातले तत्वज्ञान उमगणे हेच जिथे मोठे कठीण काम तर ते
समजल्यावर आचरणात आणण्याचे काम तर अजून कठीणतम... पण, अगदीच काही नाही तरी शुद्ध भाव
ठेउन जो कोणी ज्ञानेश्वरी वाचत राहील, माऊलींची करुणा भाके ल त्याच्यावर माऊली स्वतः कृ पा
करतात, मार्ग दाखवतात असा सश्रद्ध भक्तांचा अनुभव आहे - कोणीही भाविक तो घेऊ शकतो.
हरि ॐ
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....
अध्याय नववा - राजविद्याराजगुह्ययोगः
ज्ञानेश्वरीत नवव्या अध्यायाला विशेष महत्व आहे. स्वतः माऊलींनीच त्याचे गुणगान गायले आहे. असे
म्हणतात की जेव्हा माऊलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा नवव्या अध्याय म्हणत म्हणतच ते त्या पायर्‍
या उतरत होते - इतका हा अध्याय त्यांच्या आवडीचा होता.
दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला या नवव्या अध्यायाचे महात्म्य सांगणार्‍या या गोड ओव्या पहा -
तिये आघवांचि जें महाभारतीं । तें लाभे कृ ष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो
एकलाचि नवमीं ।।३१।। ( कृ ष्णार्जुनवाचोक्तीं=कृ ष्णार्जुन संवाद; सातेशती = गीतेचे सातशे श्लोक आहेत
त्याला उद्देशून; नवमी=नववा अध्याय)
अवघ्या महाभारतात जे काही तत्वज्ञान सांगण्यात आलेले आहे ते कृ ष्णार्जुन संवादाच्यारुपाने या सातशे
श्लोकात (भगवद्गीतेच्या) समाविष्ट झाले आहे ते सारेच्या सारे तत्वज्ञान या एकट्या अध्यायात (नवव्या)
एकत्र के ले गेले - इतके या नवव्याचे महात्म्य ...
म्हणौनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मग मी वायां । गर्व कां करूं ? ।।३२।।
म्हणोनि त्यांतील । अभिप्राय नीट । सर्वथा प्रकट । करावया ॥७०॥
कृ पेविण मज । नाहीं झालें धैर्य । मी तों वायां काय । गर्व करूं ॥७१॥ (अभंग ज्ञानेश्वरी)
हें ऐसें अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्यपण नवमाचें । तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभू ।।३५।।
असे हे गीतेचे अध्याय पण नववा अध्यायाचे काय महात्म्य सांगावे... ते के वळ शब्दातीत आहे - त्या
अध्यायावर मी काही निरुपण के ले हे के वळ तुमचे सामर्थ्य आहे गुरुराजा...
अनुर्वाच्यपण नवमींचे असे जे त्यांनी म्हटले आहे त्या अध्यायातील हा तेरावा श्लोक. दैवी प्रकृ तीचा
आश्रय के लेले महात्मे मला कसे भजतात हे भगवान सांगत आहेत.
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृ तीमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ।।१३।।
(दैवी संपत्ति जोडूनि महात्मे भजती मज । अनन्य-भावे जाणूनि मी विश्वारंभ शाश्वत ॥ १३ ॥ -गीताई)
इथे महात्मे या शब्दावर माऊलींचे जे अप्रतिम निरुपण आहे ते असे .........
तरी जयाचे चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जया निजेलियातें उपासी । वैराग्य गा ।।१८८।।
(क्षेत्रसंन्यासी =एकाच क्षेत्रात आयुष्यभर रहाणारे संन्यासी)
या महात्म्यांचे मन इतके चोख (निर्मळ, पवित्र) आहे की तिथे मी क्षेत्रसंन्यासी होऊन रहातो. या महात्म्यांचे
वैराग्य एवढे थोर आहे की हे महात्मे झोपलेले असतानाही ते त्यांना सोडून जात नाही. (हे महात्मे अखंड
वैराग्यशील असतात - सर्व दृष्य, अदृष्य पदार्थांविषयी ते अतिशय विरक्त असतात - कारण एक ब्रह्मच
आनंदरुप असून इतर कु ठल्याही गोष्टी पासून हा आनंद मिळत नाही हे त्यांच्या अनुभवाला पूर्णपणे
आलेले असते.)
जयाचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्म करी राणिवा । जयाचें मन ओलावा । विवेकासी ।।१८९।।
सद्भावाविषयी या महात्म्यांच्या ठिकाणी असणारी आस्था पाहिली की जणू येथे धर्मच राज्य करतोय असे
वाटावे. यांच्या मनाला जी ओल आहे ती विवेकाचीच.
सद्भाव आणि विवेक हे संतांचे विशेष गुण माऊलींनी येथे अधोरेखीत के लेत. सत् म्हणजेच परमात्म्याची
सतत जाणीव व विवेकयुक्त वर्तन यामुळेच त्यांना महात्मा म्हणायचे.
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसी आले । पालव नवे ।।१९०।।
ज्यांच्या ठिकाणी ज्ञान भरभरुन असते (जे ज्ञानरुपच असतात), जे कायमच पूर्णतृप्त असतात आणि
त्यांच्याकडे पाहिले असता शांतिला जणू नवी पालवी फु टली आहे असे वाटावे.
(ज्ञान, पूर्णतृप्तता आणि शांती हे या महात्म्यांचे अजून विशेष गुण. इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान)
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आनंदसमुद्रीं कुं भ । चुबकळोनि भरिले ।।१९१।।
हे महात्मे म्हणजे जणू ब्रह्माला आलेले कोवळे कोंबच, हे जणू धैर्यरुपी मंडपाचे खांब, हे म्हणजे जणू
आनंदसागरातले कुं भच.
(यांच्या रुपाने ब्रह्म जणू साकार झाले आहे. हे मूर्तिमंत धैर्य. -साधकांना ज्याची विशेष गरज असते ते जे
धैर्य - ते ज्यांच्याकडे पाहूनही कळते इतके ते धैर्यशील असतात. आनंद त्यांच्या आंत-बाहेर भरुन असतो.)
जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कै वल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे
।।१९२।।
भक्ति यांच्या ठिकाणी इतकी भरुन असते की जे त्यापुढे मोक्षालाही तुच्छ लेखतात. यांचे सहज वर्तन हे
म्हणजे जिवंत नीतीच असते.
जे आघवांचि करणीं । लेईले शांतीचीं लेणीं । जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज ।।१९३।।
यांच्या सर्व कर्मात एक शांतीच भरुन असते - जणू यांनी शांतीरुप अलंकारच परीधान के ले आहेत. यांचे
चित्त माझ्याठिकाणी कायमच रत असल्याने ते जणू मला गवसणी घातल्यासारखे व्यापक आहे.
ऐसें जे महानुभाव । दैविये प्रकृ तीचें दैव । जे जाणोनियां सर्व । स्वरूप माझें ।।१९४।।
असे जे हे महानुभाव हे दैवी प्रकृ तीचे भाग्यच कारण यांनीच माझे स्वरुप जाणले आहे.
मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाहीं ।।१९५।।
असे हे महात्मे मला चढत्या-वाढत्या प्रेमाने भजतच असतात, यांच्या मनाला द्वैत (दुजेपण) स्पर्शही करु
शकत नाही - हे माझ्याशी एकरुप होऊन मला भजतात (शिवो भूत्वा शिवं यजेत)
आता या सगळ्या ओव्या परत नीट चालीत वाचूयात .... म्हणजे यातली खरी गोडी लक्षात येईल ....
तरी जयाचे चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जया निजेलियातें उपासी । वैराग्य गा ।।१८८।।
जयाचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्म करी राणिवा । जयाचें मन ओलावा । विवेकासी ।।१८९।।
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसी आले । पालव नवे ।।१९०।।
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आनंदसमुद्रीं कुं भ । चुबकळोनि भरिले ।।१९१।।
जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कै वल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे
।।१९२।।
जे आघवांचि करणीं । लेईले शांतीचीं लेणीं । जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज ।।१९३।।
ऐसें जे महानुभाव । दैविये प्रकृ तीचें दैव । जे जाणोनियां सर्व । स्वरूप माझें ।।१९४।।
मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाहीं ।।१९५।।

हे असे वर्णन करणे, त्या सुरेख पद्धतीने उपमा वापरणे - हे के वळ माऊलीच करु जाणे - दुसर्‍या कोणी या
महात्म्यांचे वर्णन - निर्मळ मनाचे, वैराग्यशील, विवेकी, ज्ञानी, शांतीरुप असे साधे शब्द वापरुन के ले
असते तर ते आपल्या वाणीत, चित्तात इतके ठसले नसते जितके माऊलींनी ते मधु-मधुतर करुन ठेवले
आहे....
एखादी व्यक्ती भगवंताशी इतकी कशी एकरुप होऊन राहील असा आपल्या सारख्या सामान्य माणसांना
प्रश्न पडेल त्यामुळे एक उदाहरण देतो ज्यामुळे हे कळायला सोपे जाईल.
खूप वर्षांपूर्वी एकदा (भारतरत्न) भीमसेन जोशी एका सांगितिक मैफिलीसाठी मुंबईहून कलकत्याला
रेल्वेने निघाले होते. त्यांनी रेल्वेच्या बोगीत पाऊल ठेवले तर समोरच प्रख्यात गायक उ. बडे गुलाम अलि
खाँ साहेब त्यांच्या सहकार्‍यांसोबत बसलेले. भीमसेनजी अतिशय खूष झाले - कारण त्याकाळी तो
प्रवास जवळजवळ अडीच-तीन दिवसांचा. इतका मोठा काळ खाँ साहेबांचा सहवास मिळणार ही
पंडितजींच्या दृष्टीने एक पर्वणीच..
हे सर्व भीमसेनजींनीच लिहून ठेवले आहे.. तर ते पुढे लिहितात - गाडीत बसल्यावर खाँ साहेबांच्या तंबोर्‍
याची गवसणी जी निघाली ती पार कलकत्ता स्टेशन येईपर्यंत... खाँ साहेब सतत गाण्यात मश्गूल होते -
अधून मधून खाणे-पिणे, बाजूच्या मंडळींशी गप्पा चालू होत्या -पण खाँ साहेबांचा मुख्य भाग होता संगीत
- ते जणू त्यांच्या श्वासाश्वासात भरुन राहिल्यासारखे प्रगट होत होते - ते कायमच संगीतात बुडालेले होते -
खाणे-पिणे-गप्पा याकरता तेवढ्यापुरते त्यातून ते बाहेर आल्यासारखे वाटायचे पण मधूनच एखादी तान,
मींड अशी घेत होते की कोणाच्याही सहज लक्षात यावे की संगीताने यांना आंत-बाहेर व्यापून टाकले
आहे.....
आता आपल्या लक्षात येईल की कोणत्याही महात्म्याबाबत नेमके असेच असते - परमेश्वराच्या ओढीने,
त्याच्या अस्तित्वाने त्या महापुरुषाला आत-बाहेर व्यापून टाकलेले असते - त्यामुळे तो आपल्या सारखे
जरी व्यवहार करताना दिसला तरी, आत परमेश्वराच्या अखंड अनुसंधानातच तो असतो -आणि मग
सहाजिकच ती शांती, ते वैराग्य, तो आनंद, ते नीतीयुक्त आचरण असे सगळे दैवी गुण त्याच्या ठायी सहज
प्रकट झालेले दिसतात.
अशा महात्म्याचे - "तोही नेत्री पाहे । श्रवणी ऐकतु आहे । परी तेथीचा नोहे । नवल देखे ।।" असे नेमके
वर्णन माउलींनी ज्ञानेश्वरीतच के लेले आहे.....
आता कधी महात्मा असा शब्द जरी आपल्या कानावर आला, वाचनात आला तर हे सगळे, सगळे वर्णन
पुन्हा पुन्हा आपल्याला आठवत राहील ते माऊलींच्या अद्वितीय, रसाळ भाषेमुळेच....
...... .. तरी जयाचे चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जया निजेलियातें उपासी । वैराग्य गा ।।
१८८।।
जयाचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्म करी राणिवा । जयाचें मन ओलावा । विवेकासी........
ही ती ज्ञानेश्वरीची करामत ..... हे ते माउलींचे न संपणारे देणे .....
हरि ॐ तत् सत् ।।
श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ९ - माऊलीविरचित भक्त लक्षणे ..
तयांचें आम्हां व्यसन । ते आमुचें निधिनिधान । किं बहुना समाधान । ते मिळती तैं ....
अर्थात - माऊलीविरचित भक्त लक्षणे ......
तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ।।२२३।।
दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ।।२२४।।
श्रीमद भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायाला "भक्तियोग" अशी यथार्थ संज्ञा आहे - कारण
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ् कारः समदुःखसुखः क्षमी ।।१३।। येथपासून ते अध्यायाच्या शेवटपर्यंत म्हणजे -
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।।२०।। येथपर्यंत भगवंतांनी जी भक्त लक्षणे सांगितली आहेत
ती तर अप्रतिम आहेतच पण त्यावर माऊलींनी स्वयंप्रज्ञेने जे रसाळ व अतिशय अद्भुत भाष्य के ले आहे ते
तर अधिक बहारीचं आहे.
तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ।।२२३।।
दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ।।२२४।।
या दोन ओव्या के वळ वानगी दाखल घेतल्या आहेत. माऊली म्हणतात - वस्तुतः ब्रह्म / परब्रह्म हे मुळात
निर्गुण, निराकार - पण भक्ताबाबत मात्र हे परब्रह्म इतके हळवे (?) होते की विचारायची सोय नाही !!
त्या निर्गुण, निराकारालाही त्या भक्ताचा इतका मोह होतो की अगदी साकार रुप धारण करावेसे वाटते -
अचक्षु (डोळे विरहित) असूनही त्याला डोळे प्राप्त व्हावे असे डोहळे लागतात - का तर तो भक्त पाहता
यावा म्हणून..
त्या साकाराच्या हातात कमळ का असते तर ते जणू त्या भक्ताची पूजा करण्यासाठी....
त्या साकाराला असे वाटते की या आपल्या प्रिय भक्ताला आलिंगन द्यायला दोन हात कमीच पडतील
म्हणूनच की काय "चार हातांचे" (दोंवरी दोनी) असे ते (चतुर्भुज) रुपडे सज्ज होऊन येते.....
माऊलींची प्रतिभा इतकी अफाट आहे की त्या निर्गुण निराकाराला ब्रह्माला सगुण साकार का व्हावेसे
वाटते याचे या दोनच ओव्यात त्यांनी असे काही प्रत्ययकारी वर्णन के ले आहे की आपण के वळ दिङ्मूढ
होऊन जातो ....
मात्र त्याआधी भक्त कोणाला म्हणायचे हे पाहणे अतिशय आवश्यक आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या
दृष्टीने भक्त कोण तर - जो देवळात जातो, पूजा-अर्चा करतो, जोरजोरात भजने - आरत्या म्हणतो तो भक्त.
पण भगवंतांनी काय आणि सार्‍या संतांनी काय भक्त कोणाला म्हणायचे हे अतिशय सुस्पष्टपणे विशद
के ले आहे -
विभक्तपणें नसावें । तरीच भक्त म्हणवावें ।
नाहींतरी वेर्थचि सिणावें । खटाटोपें ।।१३।। - श्री समर्थ. ( जो भगवंताशी एकरुप होऊन भजन करतो तो
भक्त)
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारुनी ।। - तुकोबा
शिवो भूत्वा शिवं यजेत । (शिवरुप होऊनच शिवाची पूजा करायची)
(आधी होता संतसंग । तुका झाला पांडुरंग । त्याचे भजन राहीना । मूळ स्वभाव जाईना)
लाली मेरे श्याम की जहाँ देखे वहाँ श्याम । मैं धुंडन गयी श्याम को मैं खुदही बन गयी श्याम । - मीराबाई.
भगवंतांनी तर अद्वेष्टा, निर्मम, निरहंकारी येथपासून स्तुति-निंदेला समान लेखणारा, संतुष्ट अशा अनेक
लक्षणांनी भक्त म्हणजे काय ते सांगितले आहे (जे मुळातून बघणे गरजेचे आहे)
हे सगळे पहाता आपण सर्वसामान्यजण भक्ति करत असतो का आणखी काय हा संशोधनाचाच विषय
होईल...
भक्ताचे मुख्य लक्षण म्हणजे - भगवंताशी एकरुप झालेला तो भक्त. असा भक्त देहाने जरी या जगात
वावरत असला तरी मनाने तो भगवंताशी एकरुपच झालेला असतो. देह-मन-बुद्धी त्याने परमेश्वराला
पूर्णपणे अर्पण के लेली असतात आणि आपल्या आयुष्यात जे काही होते ते भगवंताच्याच इच्छेने घडते
असा त्याचा ठाम निश्चय असतो - मग ती गोष्ट इतरांच्या दृष्टीने चांगली असो किं वा वाईट असो, सुख असो
वा दु:ख असो.
यानिमित्ताने एक गोष्ट आठवली - जरा जुन्या काळची गोष्ट - एक नवविवाहित जोडपे त्यांच्या मूळगावी
जाण्यासाठी एका जहाजातून प्रवास करीत असतात - नेमके वादळ होते - जहाज डगमगायला लागते -
सर्व प्रवासी भयभीत होऊन जातात - कोणी प्रार्थना करतंय - तर कोणी वाचवा - वाचवा म्हणून
ओरडतंय... या सगळ्या गदारोळात तो नवरा मात्र शांत बसलेला असतो - त्यामुळे त्याची बायको
आश्चर्यचकित होऊन त्याला विचारते - तुम्हाला या वादळाची भिती नाही वाटत ? तुम्ही प्रार्थना नाही
करत? त्यावर तो पती त्याच्या जवळची तलवार काढून तिच्या मानेवर ठेवतो आणि तिला विचारतो -
तुझ्या मानेवर ही धारदार तलवार असूनही भिती वाटण्याऐवजी तू तर चक्क हसत आहेस ??
पत्नी म्हणते - तुमच्या हातात तलवार असल्यावर भिती कसली ?
पती - नेमके हेच आत्ता माझ्या मनात आहे - हे वादळ इतरांना कितीही भितीदायक असले माझ्या दृष्टीने ते
भगवंताच्याच इच्छेने होते आहे - जर त्याची इच्छा असेल की मी बुडावे तर मला त्याचे बिलकु ल वाईट
वाटणार नाही - त्यामुळे मी उगाचच घाबरुन कशाला जाऊ ? आणि त्यामुळेच - "हे देवा, मला वाचव"
अशी प्रार्थना करणे ही माझ्या दृष्टीने अतिशय विचित्र गोष्ट ...- मी असे कदापिही करणार नाही. "तो" जे
काही करतो आहे ते सर्वच्या सर्व माझ्या भल्याचेच - असा माझा दृढ विश्वास आहे...
भक्ति ही सुळावरील पोळी असं तुकोबांनी जे म्हटलंय ते थोडेसे तरी आपल्या लक्षात यावे .... जरा कु ठे
आपले डोके दुखले किं वा ताप आला तर - हे भगवंता, वाचव रे मला !! , कु ठे आहेस तू ?? माझी जराही
काळजी तुला नाही का ?? असे म्हणणारे आपण कु ठे आणि "फु टो हे मस्तक तुटो हे शरीर । नामाचा गजर
सोडू नये" म्हणणारे तुकोबा कु ठे - आपले आपल्यालाच कळून येईल ....
भक्त ऐसे जाणा जे देही उदास - हे भक्ताचे मुख्य लक्षण म्हणून बुवांनी का सांगितलंय ते लक्षात यावे.
भक्ताला काळजी असते उपासनेची, साधनेची. संसारातल्या सुखाने तो हुरळून जात नाही वा दु:खाने खचून
जात नाही. तो म्हणतो - संसार म्हटला कि सुख-दु:ख आलेच - पण हे भगवंता, मला तुझा विसर पडू देऊ
नकोस... या सुख-दु:खातही मला तुझाच आठव असू दे ....
भक्ताचे चित्त भगवंताच्या ठिकाणी अतिशय स्थिर झालेले असल्याने भौतिक मान-अपमान, सुख-दु:खे
याने तो भक्त अजिबात विचलित होत नाही. याचा अर्थ असा नाही की सर्व संवेदना हरवून बसलेला तो
एक उदास मानव-प्राणी होऊन रहातो. तर आपण जेवढा मान-अपमान, सुख-दु:खाचा बाऊ करतो तेवढा
तो अज्जिबात करत नाही.
जेव्हा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा प्रत्यक्ष सुरु झाला तेव्हा त्यांचे सद्गुरु निवृत्तीनाथ हे पूर्णतः
बोधावर असलेले महापुरुषही अक्षरशः धाय मोकलून रडू लागले - याचे कारण त्यांच्या ठिकाणी
अंतःकरण नावाचीही चीज होती. पण नंतर मात्र स्वतःला आवरुन स्वहस्ते त्यांनी माऊलींना समाधीस्थळी
नेऊन बसवले, त्यांना प्रेमाने आशीर्वादही दिले.
याउलट एखादी व्यक्ति अकारण आपल्याला काही अपशब्द बोलली असेल तर आपण ती गोष्ट वर्षानुवर्षे
अंतःकरणात धरुन ठेवतो - हा आपल्यातला आणि संतांमधला फरक....
(व. पुं. च्या एका कथेमधे एक पात्र - अमुक अमुक व्यक्तिं चा हात माझ्या मृतदेहालाही लागू नये असे जे
पार मृत्यूपत्रात लिहून ठेवतो - यात आपल्या दृढतर देहबुद्धीचे जणू प्रतिबिंबच उमटले आहे असे वाटते. )
भक्ताचे ह्रदय सदा सर्वकाळ मोकळे असल्याने त्यात अशा विचित्र गोष्टी भरलेल्या नसतातच तर दया -
क्षमा - शांति - ईश्वरभाव अशा गुणांनी तिथे वास के लेला असतो - सहाजिकच भक्ताचे ह्रदय कायमच
प्रसन्न, पवित्र असते.
अशा दैवी गुणांनी युक्त असा जो भक्त त्याचे वर्णन, त्याचे कौतुक प्रत्यक्ष भगवंतालाही किती आहे हे
माऊलींनी त्या दोन ओव्यात इतक्या सार्थपणे के ले आहे की त्या अध्यायातील इतर श्लोकांवरही
माऊलींनी कसे निरुपण के ले आहे ते आपण सहजच पाहू लागतो, अभ्यासू लागतो .....
जो सर्व भूतांच्या ठायीं । द्वेषांतें नेणेंचि कहीं । आपपरु नाहीं । चैतन्या जैसा ।।१४४।।
- जो कोणाही भूतमात्राचा (व्यक्तिचा) द्वेष करीत नाही, जसा चैतन्याला आप-पर (आपला आणि परावा)
असा भाव नसतो तसेच या भक्ताचे असते.
वार्षियेवीण सागरू । जैसा जळें नित्य निर्भरु । तैसा निरुपचारु । संतोषी जो ।।१५१।।
- पाऊस पडला तरच समुद्र भरलेला असतो असे काही नसते - तो सदोदित जलसंपन्नच असतो तसा हा
भक्त सदा (कोणी काही दिल्याशिवाय - निरुपचारी) संतोषयुक्त असतो -
जगचि देह जाहलें । म्हणौनि प्रियाप्रिय गेलें । हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ।।१६८।।
या जगात सर्वत्र मीच भरुन राहिलो आहे असा ज्याचा बोध/ भाव असतो (त्याला दुसरा कोणी असा
उरतच नाही - दुजेनवीण) त्यामुळे प्रिय - अप्रिय किं वा हर्ष-खेद अशी द्वंद्वे त्याच्याकरता शिल्लक रहात
नाहीत. (ठेले =संपून जाणे)
जयाचिया ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा । सुखासि चढावा । जयाचें असणें ।।१७२।।
ज्याला कोणाकडून कसलीही अपेक्षा नसते. त्यामुळे त्याच्याठिकाणी सुख सदोदित वाढतच असते.
(चढावा=उत्तरोत्तर वाढ)
जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे । म्हणौनि भोगविशेखें । हरिखेजेना ।।१९०।।
आत्मलाभासारखी सर्वात गोमटी वस्तू प्राप्त झाल्यामुळे कु ठल्याही भौतिक गोष्टींचा भोग प्राप्त झाला तरी
तो हुरळून जात नाही.
हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किं बहुना चराचर । आपण जाहला ।।२१३।।
मग याहीवरी पार्था । माझ्या भजनीं आस्था । तरी तयातें मी माथां । मुकु ट करीं ।।२१४।।
- हा भक्त आत्मरुप झाल्यामुळे सगळ्या विश्वात मीच आत्मतत्वाने भरुन राहिलो आहे अशी ज्याची ठाम
खात्रीच असते आणि एवढ्या उत्तुंग बोधावर असलेला हा विश्वात्मक भक्त माझ्या भजनात रमून असतो
त्या भक्ताला मी माझ्या माथ्यावर मुकु टाप्रमाणे धारण करतो.
(अणूरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा...)
या काही ओव्या के वळ उदाहरणादाखल देत आहे - जिज्ञासूंनी त्या मुळातूनच वाचाव्या अशी प्रेमाने व
कळकळीने विनंती करतो.
तें तीर्थ तें क्षेत्र । जगीं तेंचि पवित्र । भक्ति कथेसि मैत्र । जयां पुरुषां ।।२३५।।
आम्हीं तयांचें करूं ध्यान । ते आमुचें देवतार्चन । ते वांचूनि आन । गोमटें नाहीं ।।२३६।।
तयांचें आम्हां व्यसन । ते आमुचें निधिनिधान । किं बहुना समाधान । ते मिळती तैं ।।२३७।। - या ओव्यांनी
माऊलींनी त्या भक्तिलक्षणाचा समारोप के ला आहे तो ही किती ह्रद्य आणि गोड आहे पहा. असा जो खरा
भक्त त्याचे जणू देवालाही व्यसन लागलंय .... - प्रत्यक्ष देवाला ज्याची भक्ति करावी (पूजाअर्चा करावी)
असे वाटते ते हे भक्त ... इतक्या उंचीवर माऊलींनी सगळं नेऊन ठेवलंय .....
आपण यातून काय शिकायचे हे वेगळे सांगणे न लगे ....
माऊलींना अभिप्रेत असलेले हे भक्त वगैरे ही आपल्याला फारच उंचीवरची (किं वा अप्राप्यच म्हणाना..)
गोष्ट झाली - या उभ्या आयुष्यात निदान एक चांगला - गुणी माणूस बनता आले तरी खूप झाले असे
वाटते - त्यासाठीच माऊलींचरणी अंतःकरणापासून प्रार्थना ......
हरि ॐ ।।

You might also like