You are on page 1of 15

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कला शाखेअंतर्गत ‘मराठी’विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी) या पदवीसाठी


सादर के लेला प्रबंध

-विषय -
धर्म विषयक उदारमतवादी चळवळी व त्यांचे मराठी वैचारिक वाङ्मय

अभ्यासक
सौ.सविता संजय आष्टेकर
प्राथमिक शिक्षिका रायगड जिल्हा परिषद,कन्याशाळा,ता.कर्जत,जि.रायगड

मार्गदर्शक
डॉ.रवींद्र भास्करराव पाटील
(एम.ए,सेट.पीएच.डी)
मराठी विभाग प्रमुख,
रयत शिक्षण संस्थेचे, सावित्रीबाई फु ले महिला महाविद्यालय, सातारा
जून २०२०

1
भूमिका / संशोधनसूत्र -
एकोणिसावे शतक हे आधुनिक भारतातील समाजप्रबोधनाचे युग मानले जाते. ह्या शतकात
समाजसुधारकांची एक साखळीच निर्माण झाली. ह्या विचारवंतानी ज्या सुधारणावादी चळवळी सुरु के ल्या. त्यात
बुद्धीवाद व मानवता ह्यावर भर दिलेला होता. उदारमतवादी सिद्धांतांवर आधारित असे हे बदल व्यक्तिस्वातंत्र,
समता ,सर्वधर्मसमभाव,सामाजिक न्याय याकडे झुकणारे होते. या विशिष्ट चळवळी निर्माण होण्याची कारणे,
संदर्भ त्यासाठी निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती, त्या चळवळींमागील प्रेरणा, , त्यातील प्रयोगशीलता व
वेगळेपण यांचा वाड्मयीन दृष्टीने अभ्यास करण्याची गरज अभ्यासकास वाटली.
या अभ्यासातून तत्कालीन वैचारिक वाड्मयाचा सर्वांगीण शोध घेऊन काही निरीक्षणे नोंदवणे. धार्मिक
चळवळींच्या परिणामाने निर्माण झालेल्या मराठी वैचारिक साहित्याने मराठी वाङ्मयपरंपरेत काय योगदान दिले?
त्याचे वेगळेपण कोणते? यांचा अभ्यास करणे.चळवळींच्या उद्गात्यांच्या वैचारिक व धर्मविषयक दृष्टिकोनांचा
मागोवा घेणे अशा भूमिके तून ‘धर्मविषयक उदारमतवादी चळवळी व त्यांचे मराठी वैचारिक वाङमय’ या
प्रबंधात एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात उदयास आलेल्या धर्मविषयक उदारमतवादी चळवळींच्या कार्याचा व
निवडक धर्मविषयक वैचारिक वाङमयाचा अभ्यास के लेला आहे.
इंग्रजी राजवटीच्या व पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावातून इ.स.१८२८ मध्ये बंगालमध्ये राजा राममोहन
राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना के ली होती.महाराष्ट्रातही इ.स.१८४० पासून धर्मसुधारणेच्या चळवळी
उदयास आल्या.या काळात वाड्मयीन क्षेत्र समृद्ध करणारे वैचारिक वाङ्मय फार मोठ्या प्रमाणात या चळवळींच्या
परिणामाने निर्माण झाले. तत्कालीन सर्वप्रकारच्या साहित्यप्रकारावर या चळवळीतील विचारांचा प्रभाव पडलेला
आहे. त्यामुळे मराठी वाङ्मयनिर्मितीमध्ये एक प्रकारची वैचारिक क्रांती घडून आली.
हिंदू धर्मात पूर्वापार चालत आलेली विषमता , जात व वर्ण व्यवस्थेची उतरंड , धार्मिक अंधश्रद्धा,
कालबाह्य रूढी , परंपरा, स्त्रियाचे शोषण , ग्रंथप्रामाण्याला दिले गेलेले महत्व, एकाच गुन्ह्यासाठी जाती,
वर्णानुसार असलेले शिक्षेचे भिन्न स्वरूप , शुद्रातिशुद्रांवर होणारे अन्याय अत्याचार ,त्यांना माणूस म्हणून
जगण्याचे अधिकार नाकारले जाणे , प्राण्यांपेक्षाही त्यांना दिली जाणारी हीन वागणूक या सामाजिक वास्तवाचे
भान ठेवून ‘हिंदुधर्म सुधारणा’ व ‘सामाजिक सुधारणा’ या उद्देशाने मानवधर्म सभा,परमहंससभा,प्रार्थना
समाज,सत्यशोधक समाज ह्या धर्मविषयक उदारमतवादी चळवळींनी कार्य के ले. ह्या चळवळींच्या
माध्यमातून घडलेले कार्य , त्यांचा सामाजिक सुधारणेसंबंधातील वैचारिक दृष्टिकोन व त्यातून निर्माण
झालेले वैचारिक वाङ्मय आणि या सर्वांच्या परिणामाने घडून आलेल्या सामाजिक सुधारणा यांचा एकत्रित
अभ्यास महाराष्ट्रात उदयास आलेल्या या चळवळींच्या संदर्भाने झाला नसल्यामुळे अभ्यासकास ह्या विषयावर
संशोधन करणे महत्वाचे वाटले.
या अभ्यासामुळे, तत्कालीन सामाजिक समस्या सारख्याच असल्या तरी या वेगवेगळ्या
चळवळींनी त्या समस्यांच्या निराकरणासाठी स्वतःचा वेगवेगळा विचार कसा के ला होता, हे त्यांच्या
वैचारिक वाङ्मयातून समजून घेता आले.या धर्मविषयक उदारमतवादी चळवळींचे धर्मविषयक विचार,
2
धर्मविषयक समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा स्वतंत्र दृष्टीकोन याचे प्रतिबिंब त्यांच्या वैचारिक वाङ्मयात पडलेले
दिसून आले. निश्चित के लेल्या अभ्यासविषयाची गृहीतके मांडल्यानंतर व उद्दिष्टे निश्चितीनंतर संशोधन
आराखड्यानुसार संशोधन कार्य करण्यासाठी प्रकरणनिहाय अभ्यासविषयाची आखणी घटक,उपघटक,त्यांचे
स्वरूप व मर्यादा लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे के ली.एकू ण सहा प्रकरणांमध्ये अभ्यासविषय मांडलेला आहे.
१. प्रकरण पहिले : एकोणिसाव्या शतकातील समाजजीवनाचा संक्षिप्त
आढावा.
२. प्रकरण दुसरे : धर्मविषयक उदारमतवादी चळवळींच्या निर्मितीची कारणे
३. प्रकरण तिसरे : महाराष्ट्रातील धर्मविषयक उदारमतवादी चळवळी
४. प्रकरण चौथे : चळवळींच्या उद्गात्यांचे योगदान
५. प्रकरण पाच : धर्मविषयक उदारमतवादी चळवळींच्या वैचारिक लेखनाचा
चिकित्सक अभ्यास
६. प्रकरण सहा : उपसंहार – निष्कर्ष
प्रकरणांच्या उपरोक्त मांडणीनंतर संशोधन करत असताना के लेल्या अभ्यासातून अनुक्रमणिके च्या स्वरुपात,
विषयाच्या मांडणीत अधिक घटक ,उपघटक समाविष्ट होत गेले.
 प्रकरण पहिले : एकोणिसाव्या शतकातील समाजजीवनाचा संक्षिप्त आढावा.
या पहिल्या प्रकरणात धर्मविषयक उदारमतवादी चळवळींच्या निर्मितीपूर्वीच्या परिस्थितीचा मागोवा
घेतला आहे.ज्यामुळे विविध धर्मविषयक चळवळींच्या कार्यातून समाजजीवनात झालेल्या बदलांचे परिणाम
तपासता येतील.
उत्तर पेशवाईत व इंग्रजी राजवटीत महाराष्ट्रामध्ये देवभोळेपणा , भाबडेपणा आणि अंधश्रद्धा भरपूर
होत्या. शकु न- अपशकु न , उपासतापास , कर्मकांड , तीर्थयात्रा , व्रतवैकल्ये यांचे प्रस्थ तर सवाई माधवरावच्या
काळापासून फार वाढले होते. मराठे शूरवीर, धाडशी , काटक होते. मुत्सद्देगिरीत ते निष्णात होते, पण धर्म व
धर्माशी संबधित समजुतीबाबत ते कमालीचे भित्रे होते. जुन्या प्रस्थापित गोष्टी ज्या वाडवडिलांपासून चलत
आलेल्या आहेत, त्यांचे पालन आपण के ले पाहिजे . जातीत अथवा घराण्यात चालत आलेल्या प्रथांची
अंमलबजावणी निष्ठेने के ली पाहिजे, असे पालन करणे हाच खरा गृहस्थधर्म अशी सर्वांची समजूत होती .
आपत्काळी कु लदैवतांचे नामस्मरण के ले की विध्ने दूर होतात , गुलाल, भंडारा , उदी जवळ बाळगल्यास रक्षण
होते, अशी श्रद्धा त्या काळातील समाजाची होती. ग्रहणापूर्वी व ग्रहणानंतरच्या अनेक दिवसांत सर्व राजकीय व
सामाजिक व्यवहार ठप्प होत असत. या काळात ग्रहणांच्या अरिष्टातून सुटका करण्यासाटी पेशवे ,सरदारमंडळी व
श्रीमंत लोक तसेच गोरगरीब आपापल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म, तुलादान, ग्रहशांती करण्यात आपला वेळ
घालवीत.अंतर्गत उच्च-नीचता, रूढी-परंपरांना कवटाळणे आणि विशिष्ट समाज रचनेत हीन-दीन ठरवल्या

3
गेलेल्या जातीवर लादल्या गेलेल्या नियमांच्या चौकटीवर ‘पहारा’ देणे ह्यातच भारतीय समाजाचे सामर्थ्य खर्च
होत होते. असे म्हणावे लागेल.ब्रि
ही व्रतवैकल्ये का करावयाची ? धर्मनियम आपण का पाळावयाचे ? या सगळ्या जुन्या पुराण्या गोष्टींना आज
काही अर्थ आहे काय ? तर्कावर व बुद्धीवर आपण ह्या गोष्टी का पारखून घेऊ नयेत ? असे प्रश्न त्या काळी कोणी
उपस्थित के ले नाहीत . जुन्या अंधश्रद्धांच्या विरोधात एखाद दुसऱ्या संताने आवाज उठविला तरी समाजाने या सर्व
अंधश्रद्धांचे पालन के ले . चिकित्सा , बुद्धिप्रामाण्य, तर्क या गोष्टी जणू काही त्या काळात हद्दपार झाल्या
होत्या.इंग्रजी शिक्षण घेणारा पहिल्या पिढीतील सुशिक्षित वर्ग मात्र स्वतःला असे प्रश्न विचारू लागला.असे
चिकित्सक विचार करणारे नवसुधारणावादी यांच्या प्रयत्नांतून सुधारणावादी चळवळींचा जन्म झाला.

 प्रकरण दुसरे : धर्मविषयक उदारमतवादी चळवळींच्या निर्मितीची कारणे


या प्रकरणात धर्मविषयक चळवळींच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या पारतंत्र्य काळातील घटनांचा
अभ्यास के लेला आहे. इंग्रजाच्या सत्तेबरोबर या देशात पाश्चात्य ज्ञान विज्ञानाचा प्रवेश झाला.व त्यामुळे
आधुनिक शिक्षण, संस्कृ ती, समाजव्यवस्था आणि स्वातंत्र्य यासारख्या नव्या जाणिवांनीही भारतात प्रवेश
के ला.इंग्रजांचा उद्देश असो वा नसो, पश्‍चिमेकडील नवी राजकीय मुल्ये, विज्ञान संशोधनाची जिज्ञासा, सामाजिक
न्यायाच्या कल्पना यांचा परिचयही भारताला होऊ शकला. त्यातूनच भारतीय विचारवंतांनी सामाजिक सुधारणांचे
विचार मांडले. धर्मविषयक उदारमतवादी चळवळींच्या निर्मितीला इंग्रजी राजवट,त्यांचे कायदे,व शिक्षणातून प्राप्त
झालेले आधुनिक बदल कारणीभूत ठरले.ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्याचा प्रभावही नावसुधारकांवर पडला. हिंदू
धर्मातील उणेपण शोधून काढून त्यावर कडाडून हल्ला करणे व स्वधर्माचे श्रेष्ठत्व लोकांच्या मनावर ठसविणे अशा
स्वरूपाचे धर्मिक कार्याचा अवलंब मिशन-यांनी के ला. याचा परिणाम असा झाला की आपल्या धर्मसंकल्पना
अंधश्रद्धा, आचारविचार , रूढी परंपरा ह्यांचा एतद्देशीयांकडून डोळसपणे विचार होऊ लागला . मिशनऱ्यांच्या
तीव्र टीके मुळे लोकांना येथील संस्कृ तीतील काही रूढी परंपरांची कालबाह्यता जाणवू लागली. दोष दिसू
लागले. .विशेषतः ख्रिस्ती धर्मातील समता , मानवतावाद , एके श्ववाद उपेक्षितांविषयीची कणव यांसारख्या
तत्वांनी भारतातील अनेक विचारवंतांना मोठीच मोहिनी घातली. त्यामुळे सुशिक्षित लोकांपैकी विष्णू भास्कर
करमरकर , रामकृ ष्ण विनायक मोडक , नारायण शेषाद्री , बाबा पदमनजी इत्यादींनी जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा
त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला.हिंदू धर्मावरील ह्या संकटाने विचारवंत चिंतीत झाले. सर्वसामान्य समाजाची
अवस्था मोठी विलक्षण झाली होती. एकीकडे मिशनरी हाकारत होते . दुसरीकडे नवे सुधारक नवा विचार मांडत
होते . तिसरीकडे कर्मडांची चिकाटी सुटत नव्हती.
अशा त्रिविध परिस्थितीत ब्रिटिश सरकारने प्रजेच्या शिक्षणासाठी जबाबदारी तत्वत: स्वीकारलेली असली
तरी समाजातील सनातनी वर्गाच्या दडपणामुळे खालच्या जातीमधील मुलांना सरकारी शाळेत प्रवेश मिळत नसे .
मिशनरी मात्र त्यांना प्रेमाने बोलवत होते . शाळेत येण्याबद्दल पैसे देत होते . अशा परिस्थितीत खालच्या जातीची
उपस्थिती हे मिशनरी शाळांचे खास वैशिष्ट्य ठरत होते.अशा प्रकारे सेवाभावी वृतीने काम करणारे मिशनरी
भारताच्या कानाकोपऱ्यातील दलित आदिवासीपर्यत पोहोचले.

4
मराठेकालीन न्यायपद्धतीचा एक मोठा दोष म्हणजे गुन्हा व शिक्षा यांचे प्रमाण ठरलेले नव्हते .
जातीवरून न्यायदानाचे व शिक्षेचे स्वरूप निश्चित होत असे. ब्रिटिश प्रशासनाने ,भारतीयसमाजाची सामाजिक,
धार्मिक, सांस्कृ तिक पार्श्वभूमी लक्षात घेता येथे स्थापित के लेले कायदे म्हणजे त्यांच्या धैर्याची परिसिमा होय .
शेकडो वर्षांचे सनातनी धर्ममार्तंडांचे वर्चस्व , जीवनाचा मुख्य भाग असलेल्या चाली-रीती, रितीरिवाज ह्यांचा
प्रभाव असतानाही समाजात कायदे करून सुधारणा घडवून आणणे हे सोपे कार्य नव्हते. शतकभर ब्रिटिश
अधिकाऱ्यांनी भारतीय समाजाचे के लेले वास्तववादी अवलोकन , भारतीयांना दिलेले काळानुरूप शिक्षण व
त्यातून शिक्षितांना आधुनिक विचारसरणीस समजून घेण्याची त्यांनी दिलेली संधी ह्या सर्वांचा परिणाम असा
झाला की, सुधारकांनी हे कायदे निर्मितीसाठी इंग्रजांना पुरेपूर सहकार्य के ले. इंग्रज राज्यकर्त्यांनी न्यायदानात
चालत आलेला भेदभाव व अन्याय दूर के ला . सामान्य जनांत विश्वास, आपुलकी निर्माण के ली.दंगेधोपे व
अराजकतेस पायबंद बसला . राज्यातील दरोडेखोर, गुंड,पेंढारी यांचा बंदोबस्त के ला गेला . त्यामुळे प्रजेला
शांतता व सुव्यवस्था अनुभवता आली . पिढयानपिढया चाललेले दंगे, दरोडे यामुळे शेतकरी व नागरी जीवन
शांततामय जीवन उपभोगू लागले. धर्म विषयक उदारमतवादी चळवळी निर्माण होण्यासाठी ब्रिटिशांनी के लेले
कायदे महत्वपूर्ण ठरले आहेत.या कायद्यांचा आधार असल्यामुळे सुधारकांना समाजातील अनिष्ट प्रथा परंपरांवर
चौफे र हल्ले चढविता आले.हे कायदे म्हणजे सुधारकांची समाजातून होणारी टीका परताविण्यासाठीची ढालच
होती.

 प्रकरण तिसरे : महाराष्ट्रातील धर्मविषयक उदारमतवादी चळवळ


या प्रकरणात बंगालमध्ये धर्मविषयक चळवळींचा पाया ठरलेला ब्राह्मो समाज,महाराष्ट्रात,सुरतेतील
मानवधर्मसभेतून निर्माण झालेली परमहंससभा,त्यातून निर्माण झालेला प्रार्थना समाज व सत्यशोधक
समाज ह्या धर्मविषयक उदारमतवादी चळवळींच्या कार्याचा मागोवा घेतला आहे.
एखादी संस्था जेव्हा स्थापिली जाते तेव्हा ती त्यावेळच्या काळाची अशी एक विशेष गरज असते.
माणसाच्या अनेक गरजा आहेत. बौद्धिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक, अध्यात्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक
इत्यादी ..इत्यादी.यापैकी कोणत्या गरजांवर अधिकाधिक लक्ष कें द्रित करावे असे संबंधित संस्थेस का वाटले
असावे? ह्याची सत्यासत्यता त्या संस्थेच्या कार्य किं वा शिकवणुकीद्वारे समजून घेणे सोपे जाते. व त्या काळाच्या
तुकड्यातील सर्व मानवजातीस हितावह नसलेल्या अशा कोणत्या समस्या निवारण्यास या संस्थांची मदत झाली
याचाही आढावा घेता येतो.तसेच संस्थेशी निगडित समाज निर्माते व त्या विशिष्ट संस्थेच्या सभासदांचा किं वा
समाजधर्मियांचा वैचारिक दृष्टीकोनही अगदी जवळून समजण्यास मदत होते.
ब्राह्मो समाज - आधुनिक काळात भारतातील धर्मसुधारणेच्या चळवळीचा प्रारंभ बंगालमध्ये झालेला
दिसतो. इंग्रजी आमदानीचा प्रारंभ बंगालमध्ये झाल्यामुळे तेथील जनतेचा पाश्चात्य आधुनिक संस्कृ तीशी सर्वप्रथम
संपर्क आला. भारतातील नवशिक्षितांना या काळात ख्रिश्चन धर्माचे आकर्षण वाटू लागले होते, या दृष्टीने धर्म
सुधारणा व सामाजिक सुधारणायाविषयी विचारमंथन होऊ लागले. या पार्श्वभूमीवर राजा राममोहन रॉय यांनी हिंदू,
मुस्लिम व ख्रिश्चन धर्मांचा सखोल अभ्यास के ला व पश्चिमेकडील उदारमतवादी दृष्टिकोनातून हिंदू धर्मात सुधारणा

5
घडवून आणण्याचा निश्चय के ला. इ.स. १८०५ साली ‘आत्मीय सभा’ स्थापन करून त्यांनी प्रथमच धर्म व
तत्त्वज्ञानाची चर्चा घडवून आणली. सर्व धर्मातील चांगल्या तत्वांचा स्वीकार करून हिंदू धर्माला अधिक व्यापक
उदारमतवादी स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने इ.स. १८२८ साली त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना के ली.
इस्लाम धर्मातील एके श्वरवाद, सुफी पंथाची समर्पणाची भावना, ख्रिस्ती धर्मातील नीतिविषयक तत्वे, हिंदु
धर्मातील पवित्र्याच्या संकल्पना आणि पाश्चिमात्य जीवनसरणीतील बुद्धिप्रामाण्यवाद यांचा स्वीकार करून ब्राह्मो
समाजाने धार्मिक सुधारणांची चळवळ सुरू के ली.
मानवधर्म सभा - दादोबा पांडुरंग आणि दुर्गाराम मंछाराम यांनी पुढाकार घेवून आपल्या समविचारी
मित्रांच्या सहाय्याने २२ जून १८४४ रोजी ‘मानवधर्मसभा’ नावाची संस्था स्थापन के ली. १३ मानवधर्म सभेचे
अध्यक्ष दादोबा व दुर्गाराम मंछाराम हे दफ्तरदार होते.१४ मानवधर्म सभा मूळ गुजरातमधील.गुजरात व महाराष्ट्र
पूर्वी मुंबई प्रांताचे भाग असल्यामुळे दोन्ही राज्यांतील घटना घडामोडींचा परिणाम परस्परांवर होत असे.या
संघटनेतील सदस्यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. त्यांचा जाती संस्थेला विरोध होता, या सभेतील आचार-विचार
अतिशय उदार व समता-मानवतावादी होते. मानवधर्मसभेने, जादूगार व मांत्रिक यांच्याविरुद्ध मोहीम उधडली
आणि ती यशस्वीपणे चालवली. हिंदू धर्माला शुद्ध स्वरूपात आणण्यासाठीच त्यांचे हे प्रयत्न होते. दादोबा
पांडुरंग यांनी या सभेच्या प्रचारासाठी “धर्मविवेचन” ग्रंथ लिहिला. पुढे १८४६ साली दादोबांची मुंबईला बदली
झाली. बाळशास्त्री जांभेकरांच्या मृत्यूमुळे रिकामी झालेली जागा भरण्याचे निमित्त दाखविण्यात आले असले तरी
मानवधर्म सभेच्या कार्याला चाप लावण्यासाठी दादोबांना मुंबईत हलविण्यात आले असावे.असा तर्क आहे.
परमहंस सभा – परमहंस सभा ही महाराष्ट्राच्या सांस्कृ तिक धार्मिक क्रांतीची नांदी. सामाजिक, धार्मिक
सुधारणा चळवळीचा पहिला व महत्त्वाचा टप्पा म्हणून ही संघटना महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परमहंस सभा १८४९
मध्ये स्थापन झाली. परमहंससभेने जातिभेदाचा निषेध के ला होता. म्हणून या सभेतील सर्व लोक प्रार्थना
झाल्यानंतर अस्पृश्य आचाऱ्यांनी तयार के लेले भोजन घेत.ख्रिस्ती माणसाने बनविलेले पाव खाल्ल्याशिवाय,
मुसलमान माणसाने आणलेले पाणी प्याल्याशिवाय तसेच ‘मी जातिभेद मानणार नाही’ अशी प्रतिज्ञा
घेतल्याशिवाय या सभेचे सभासद करून घेतले जात नसे. या सभेसाठी दादोबा पांडुरंगानी प्रार्थना मराठीत रचल्या
होत्या. या सभेत सर्व धर्माचे लोक होते. या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी ‘पारमहंसिक ब्राह्मधर्म’
हा काव्यग्रंथ लिहिला होता.
ही संस्था मोडकळीस येण्याचे कारण त्यांच्या सभासदांच्या नावाचे पुस्तक पळविले, सभेचे कार्य गुप्त
चालावे की उघड चालावे याबद्दल सभासदांमध्ये मतभेद झाले किं वा तिच्या अध्यक्षांच्या म्हणजे रामचंद्र
बाळकृ ष्णांच्या कलकत्त्याला जाण्यामुळे तिच्यावर योग्य नियंत्रण राहिले नाही, यापैकी काहीही असो, काही
निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तिचे कार्य चालूच ठेवलं होते यात शंका नाही. सतत पंधरा वर्षे दादोबा पांडुरंग आणि
त्यांच्या पुरोगामी विचारसरणीच्या सहकाऱ्यांनी जे कार्य के ले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. पुढील काळात
समाजाचे धर्मजीवन शुद्ध होण्यास या कार्याचा हातभार लागला. महाराष्ट्रात धर्मसुधारणेच्या चळवळीचा
अग्रमान परमहंस सभेला द्यावा लागतो. परमहंस सभेच्या सभासदांची हिंदु धर्मावर निष्ठा होती . आर्य, त्यांचा
वैदिक काळ,त्या काळातील शुद्ध हिंदु धर्म त्यांना अभिप्रेत होता.

6
प्रार्थना समाज - १८६६ झाली रामचंद्र बाळकृ ष्णांचे निधन झाल्यावर १७ सप्टेंबर १८६६ रोजी या
कार्यकर्त्यांनी (परमहंससभा) संस्थेचे कार्य उघडपणे चालविण्याचा विचार करण्याकरता दादोबा पांडुरंग यांचे बंधू
आत्माराम पांडुरंग यांच्या घरी एक सभा बोलावली. या सभेमध्ये असे ठरले की, जातिभेद, बालविवाह,
विधवाविवाह अशा सारख्या सामाजिक गोष्टींवर भर न देता परमार्थसाधनेकडेच प्रथम विशेष लक्ष
पुरवावे. लोकक्षोभ टाळण्याचा हा मार्ग होता हे उघड दिसते. प्रार्थनासमजाचे ‘परमहंससभा’ हे नाव
टाळले,पावभक्षण विधीसारखा क्षोभकारक प्रवेश विधि ठेवला नाही. इतके असूनही प्रार्थना समाजाच्या
सभासदांची संख्या प्रथम पंचविसावर गेली नव्हती!हे सभासद सर्वच किं वा बहुतेक परमहंस सभेचे जुने सभासद
होते.”५० येतो परमहंस सभेतील काही जाचक अटी शिथिल करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.
प्रार्थना समाज सीमित राहण्याची कार्ये.
प्रार्थना समाजाला विचारवंत आणि स्वार्थत्यागी नेतृत्व लाभूनही ठराविक शहरांपुरते त्याचे कार्य पोहोचू
शकले. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूंना त्यांच्या
कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही. त्याच बरोबर प्रार्थना समाजाच्या प्रवर्तकांत विचारात आणि कृ तीत
बऱ्याच वेळी विसंगती दिसून येई. हा समाज ब्रिटिश सत्तेचे समर्थन करी. त्यामुळे त्याची व्याप्ती वाढली नाही. मात्र
त्यांच्या कार्यामुळे धर्मपरिवर्तन चळवळ हळूहळू महाराष्ट्रात वाढू लागली हे नाकारून चालणार नाही. प्रार्थना
समाजाचे नेतृत्व बुद्धिजीवी लोकांकडे होते. बहुजन समाजासाठी त्यांनी प्रयत्न के ले, पण ते बहुजन समाजाशी
एकरूप झाले नाहीत. ५२
आधी अध्यात्मिक उन्नती मग सामाजिक उन्नती अशी नीति प्रार्थना समाजाने येथे मांडलेली आहे.
व्यक्ती विकासाचा प्रभाव सामाजिक विकासावर होत असतो हे खरे; परंतु विकासाच्या अशा कप्पेबंद दृष्टीकोनाचा
काहीच फायदा होत नसतो. एकांगी विकासावर भर देण्यापेक्षा सर्वांगीण विकासावर लक्ष कें द्रित करण्यावर
समाजाने भर देणे आवश्यक होते’ तत्कालीन परिस्थितीची ती महत्त्वपूर्ण गरज होती.
सत्यशोधक समाज - २४ सप्टेंबर १८७३ रोजी ब्राह्मणी धर्माचे खंडन आणि सत्यधर्माचे मंडन
करण्यासाठी महात्मा जोतीबा फु ले यांनी सत्यशोधक समाज स्थापन के ला.शतकानुशतके अज्ञानाने, दारिद्र्याने व
हीन संस्कृ तीने ग्रासलेल्या हिंदुसमाजातील जनतेला आत्मपरिक्षण करण्याचा पहिला आदेश जोतिबांमुळे
मिळाला. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता ज्यावेळी धर्मविषयक उदारमतवादी चळवळींची निर्मिती होत
होती त्यावेळी समाजाचे सुस्पष्टपणे ब्राह्मण पांढरपेशे व ब्राह्मणेत्तर असे विभाजन झाल्याचे दिसून येते. पांढरपेशी
गटाचे नेतृत्व प्रार्थना समाजाने तर ब्राह्मणेतर गटाचे नेतृत्व सत्यशोधक समाजाने के ले.सत्यशोधक समाजामुळे
धार्मिक सुधारणेच्या चळवळीला व्यापक परिणाम प्राप्त झाले.धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा एकाच
नाण्याच्या दोन बाजू आहेत.हे या चळवळीने अधिक प्रकर्षाने लक्षात आणून दिले.शिवाय सामाजिक विषमता
निर्मूलनासाठी शूद्र वर्गाला आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक हक्क प्राप्त झाले पाहिजेत यावर या चळवळीने भर
दिला. ही चळवळ शहरी मध्यमवर्गीयांपुरती राहिली नाही. ती खेड्यांपर्यंत पोहोचली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे
सत्यशोधक समाजाने ब्राह्मणेतरांमध्ये कार्यकत्यांची एक फळी निर्माण के ली. सत्यशोधक समाजाने
धर्मसुधारणेच्या चळवळीला शूद्रातिशूद्रांच्या उत्थापनाची नवी दिशा दिली. राष्ट्रीय अंदोलनाला सामाजिक

7
सुधारणेचे नवे भान प्राप्त करून दिले. उस्पृश्योद्धार, शेतकऱ्यांची उन्नती, कामगारांचा उत्कर्ष, स्त्री-पुरूष समानता
अशा विविध बांजूनी ही चळवळ विकसित झाली.
सत्यशोधक समाज स्थापून महात्मा फु ले यांनी सामाजिक आंदोलनाचा जो प्रयत्न के ला. या
आंदोलनाच्या मुळाशी काही विधायक स्वरूपाच्या ध्येयाचा विचार होता. तो म्हणजेच मूलभूत मानवी हक्कांचा
विचार होय. समाजातील बहुसंख्य जनतेचे सामाजिक शोषण बंद करून सर्व मानवांना मुक्त करणारा विचार
म्हणजेच मानवी हक्कांचा विाचार होय.समोर असलेल्या परंपरागत समाजसंस्था नष्ट करून त्या जागी स्थानापन्न
करावयाच्या सामाजिक संस्था ह्या ज्या तत्वावर आधारलेल्या असल्या पाहिजेत ती तत्वे म्हणजे आधुनिक
मानवी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुता ही होत. ही तत्वे गृहित धरून महात्मा जोतीबा फु ले यांनी सत्यशोधक
समाजाची चळवळ उर्जित के ली.ख्रिस्तधर्मी आपला पवित्र ग्रंथ जगाात कोठेही वाचू शकतात, मुसलमान
आपले कु राण कोठेही वाचू शकतात; मग ब्राह्मणांनी आपला वेद आणि मनुसंहिता का लपवावी,
असा मूलभूत प्रश्न त्यांनी विचारला आहे. या बिनतोड प्रश्नाने शूद्रातिशूद्रांनी हिंदू धर्मग्रंथ वाचू नयेत, असे
म्हणणे किती अन्यायाचे आहे, हे तर दिसतेच,पण त्याचबरोबर त्या लपवाछपवीतच या धर्माची गोम आहे,हेही
उघड होते आणि जोतीरावांच्या टीके ची यथार्थता पटते. हक्क हे मागून मिळतीलच असे नाही. ते मिळवायचे
असतील तर कनिष्ठ वर्गाला वरिष्ठ वर्गाशी लढा द्यावा लागेल.आपले नैसर्गिक मानवी हक्क स्वबळावर
मिळविण्याचा आपण प्रयत्न के ला पाहिजे . ही दृष्टी महात्मा फु ले यांच्या सत्यशोधक समाजाने दिली. शोषक
आणि शोषित असे दोन घटक समाजात दिसून येतात . शोषक आणि शोषित दोघांना जागे करण्याचे
कार्य महात्मा फु लेंनी के ले .
ब्रिटिश राजवटीच्या योगाने घडून आलेल्या स्थित्यंतराचा परिणाम म्हणून धर्मविषयक उदारमतवादी
चळवळींचा उदय झाला. मुळासकट समाज बदलणे असा ह्या चळवळींचा उद्देश नव्हता तर, धार्मिक जीवनातील
धार्मिक अंधश्रद्धा कमी करून सामाजिक प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न ह्या चळवळींनी के ला.
४. प्रकरण चौथे : चळवळींच्या उद्गात्यांचे योगदान
या प्रकरणात धर्मविषयक उदारमतवादीचळवळींच्या उद्गात्यांच्या सुधारणावादी विचार व कार्याचा
अभ्यास के ला आहे.दादोबा पांडुरंग तर्खडकर - १९ व्या शतकात सामाजसुधारणेचे प्रयत्न करणारे अनेक
अग्रणी होऊन गेले. त्यात दादोबांचे नाव आदराने घेतले जाते. त्या काळातील समविचारी लोकांना एकत्रित
करून त्यांनी मानवधर्मसभा, परमहंससभा, बॉम्बे असोसिएशन, सरकारी पुस्तक समिती इ. संघटना स्थापून त्यात
सक्रीय भाग घेतला. दादोबाच्या विचारांतून जन्मास आलेल्या मानवधर्मसभेने, जादूगार व मांत्रिक यांच्याविरुद्ध
मोहीम उघडली आणि ती यशस्वीपणे चालवली.त्यांनी स्थापिलेल्या मानवधर्मसभेचे कार्य तीन वर्ष चालले.
दुर्गारामांची शाळा तिथल्या विरोधकांनी जाळली त्यामध्ये मानवधर्मसभेची अर्धी कागदपत्रे जाळून गेली. अशा त-
हेने ही संस्था संपुष्टात आली. भिल्लांच्या बंडांचा यशस्वीपणे बिमोड के ल्यामुळे त्यांना रावबहादूर ही पदवी
सरकारने देऊन सन्मानित के ले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना महाराष्ट्रातले पहिले धर्मसुधारक मानले जाते.
पहिले ग्रंथकार, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांना ओळखले जाते. समाजप्रबोधनात त्यांचा मोलाचा वाटा
आहे. शिक्षण व धर्मक्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करण्याचा त्यांनी प्रयत्न के ल्याचे आढळून येते. प्रत्येक धर्मात

8
चांगले आणि वाईट असे दोन्ही घटक असतात. नीरक्षीर न्यायाने सर्व धर्मांमधले चांगले घटक शोधून, त्यांना
सामावून घेणारा एक मानवधर्म समाज निर्मितीचे प्रगल्भ विचार त्यांनी मांडले.
महात्मा ज्योतिबा फु ले – महात्मा फु ले यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात शिक्षणक्षेत्रापासून झाली.
म्हणूनच शूद्रातिशूद्रांचे शोषणाचे जे ‘ मूळ ‘ कारण ते ‘अविद्या’ याचे परिणाम म्हणजे मती,नीति,गती,जाणे आणि
परिणामस्वरूप शिक्षणापासून वंचित गट जो शुद्र म्हणून ओळखला जातो त्यांच्यावर अनर्थ ओढवणे,या प्रश्नालाच
त्यांनी सर्वप्रथम हात घातला. इ. स. १८४८ मध्ये पुण्यात शाळा काढता ना सर्वप्रथम स्त्रियांच्या शिक्षणाचा विचार
त्यांनी के ला. कारण कु टुंबात स्रियांचे योगदान सर्वात अधिक असल्याचे दिसून येते. ती शिक्षित झाली ; तर
तिच्यायोगे संपूर्ण कु टुंब शिक्षित होईल. अज्ञान दूर होऊन गुलामगिरीची जाणीव जितकी लवकर होईल, तितकी
सामाजिक समता प्रस्थापित होण्यास गती मिळेल.हे ते जाणून होते.

महात्मा फु ले यांच्यावर त्यांच्या लेखनाची भाषा प्रचलित साहित्याच्या लेखनभाषेच्या नियमात बसत
नसल्याची टीका झालेली आहे. पण त्यांचे साहित्य हे समाज जीवनाचे वास्तव मांडणारे एक माध्यम आहे. असे
जेव्हा दिसून येते, तेव्हा सामाजिक भेदाभेद, उच्च-नीचता, अर्थहीन रूढी, परंपरा आणि वर्णव्यवस्थेत नाडल्या
गेलेल्या स्त्री व शूद्रातिशूद्रांच्या तत्कालीन स्थितीचे त्यांनी के लेले वास्तवदर्शी वर्णन याचे मोल समजून येते. त्या
काळातील सामाजिक रचनेतील दोष इतक्या जहालपणे त्यांनी का मांडलेले आहेत हेही लक्षात येत जाते. हिंदूचे
धर्मग्रंथ बनावट आहेत . मतलबी लोकांनी स्वतःचे श्रेष्ठत्व राखण्यासाठी असे धर्मग्रंथ निर्माण के ले आहेत . असे
त्यांनी म्हटले आहे.

न्या.म.गो.रानडे - रानडे म्हणतात,“आपण जी राजकीय प्रगती साधू इच्छितो तिच्या पूर्वी नसली तरी
निदान तिच्या बरोबरीने सामाजिक प्रगती झाली पाहिजे. बंधनाऐवजी स्वातंत्र्य, भोळेपणाऐवजी श्रद्धा, बाबावाक्य
ऐवजी बुद्धिवाद, असंघटित जीवनाऐवजी संघटित जीवन, असहिष्णुतेऐवजी सहिष्णुता आणि आंधळ्या
दैववादाऐवजी मानवी प्रतिष्ठा असा बदल आपल्याला घडवून आणावयाचा आहे.”सामाजिक सुधारणा ही
राजकीय स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. कारण जुन्या प्रथा-परंपरा बुरसटलेले विचार, त्यांच्या जागी
मानवतेस पोषक ठरणारे नवविचार पेरल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही. सामाजिक समता प्राप्त
झाली तरच राजकीय स्वातंत्र्याचा योग्य पद्धतीने समाज उपभोग घेऊ शके ल. अशी विचारांची मांडणी न्यायमूर्ती
म.गो. रानडे करतात. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावरच राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक
प्रश्नांचा शेवट अवलंबून आहे म्हणूनच कोणत्याही एक प्रकारच्या सुधारणेचा आग्रह धरणे हितावह नसल्याचे ते
स्पष्ट करतात.

ब्रिटिश राजवटीचा संबंध जेव्हा येथील दारिद्र्याशी लावला जात होता तेव्हा रानडे यांनी ब्रिटिशांच्या
राजवटीमुळे दारिद्र्य आले हे नाकबूल के ले आहे. ते म्हणतात, “या देशातील दारिद्र्याचे अस्तित्व सिद्ध
करण्याची काहीही गरज नाही. तसेच ती के वळ परकीय सत्ता व स्पर्धा यामुळे उद्भवली असेही नव्हे. दारिद्र्याचा
वारसा फार जुना आहे. आपल्याला हे दारिद्र्य आता बोचक वाटते याचे कारण हे की, युगायुगाच्या निद्रेतून
आपण जागे झालो आहोत; आपल्या डोळ्यांना दृष्टिलाभ झाला आहे आणि आपली कर्णेद्रीयेही काम करू

9
लागली आहेत.” इंग्रजी शिक्षणामुळे सत्यस्थितीची जाणीव आपणास होत आहे. वस्तुस्थिती जशी आहे तशी ती
पाहण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होत आहे. याची जाणीव ते करून देतात.
शेतीविकासास पोषक नवकल्पनांचा स्वीकार व प्रत्यक्ष कृ तीचा आराखडा त्यांनी मांडलेला आहे.
न्यायमूर्ती म.गो.रानडे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार के ला. दुसरा विवाह के ल्यानंतर त्यांना अनेकांच्या टीके स
सामोरे जावे लागले. “सामाजिक बाबतीत रानडे बोलल्याप्रमाणे के व्हा के व्हा कृ ती करून दाखवित नसत.”असा
आरोप त्यांच्यावर आजही के ला जातो.रानड्यांनी धर्म, तत्त्वज्ञान, राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सर्व
विषयांच्या संदर्भाने वैचारिक जागृतीचे महत्वपूर्ण काम के ल्याचे आढळून येते.

डॉ.रामकृ ष्ण गोपाळ भंडारकर - डॉ.भांडारकर हे प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक सदस्य होते.
हिंदू-धर्मात ईश्वरप्राप्तीसाठीचे जे विधी के ले जात. त्यासाठी विशिष्ट जातीचे पुरोहितच ग्राह्य धरले जात असत. यास
प्रार्थना समाजाचा विरोध होता. ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी पोपटासारखे मंत्रपठण करून विविध विधींच्या वेळी
दक्षिणा उकळणाऱ्यांविषयी त्यांच्या मनात राग होता. ही पौरोहित्याची मक्ते दारी दूर करण्याचा प्रयत्न प्रार्थनासमाज
करत होता. सन १८७८ साली डॉ. भांडारकर यांनी एक ब्राह्मविवाहविधि प.वा. सदाशिव पांडुरंग के ळकर यांच्या
पुनर्विवाहाचे वेळी तयार के ला. त्यांनी रचलेल्या ब्रह्मविवाह पद्धतीने १८९६ पासून सन १९३५ पर्यंत किमान २४
ब्रह्मविवाह झाल्याची नोंद सापडते.
डॉ.भांडारकरांना स्वतःला धर्मातील उच्च-नीचतेचा प्रत्यय आला होता. आधुनिक विचारसरणी ,
अभ्यासूवृत्ती, तर्क शास्त्रीय दृष्टिकोन व असामान्य योग्यता असतानाही पुनर्विवाह प्रकरणात त्यांना डावलले गेले.
शंकराचार्यांसमोर पुण्याला झालेला वाद १८७० सालच्या मार्च महिन्यात नऊ दिवस चालला होता. दोन्ही बाजूंस
नामांकित शास्त्र्यांची पंच या नात्याने नेमणूक झाली होती. भांडारकरांना पंचांत दाखल करावे अशी मंडनपक्षाची
इच्छा होती, पण सारस्वत जातीत जन्मास आल्याचा दोष भांडारकरांना याप्रसंगी जाचला. भांडारकरांचा दोष
जन्मसिद्ध असल्यामुळे पंचाऐवजी मदतनिसांच्या मालिके त बसण्याची त्यांजवर पाळी आली. पुनर्विवाहाच्या या
वादात मंडन पक्षाला हार पत्करावी लागली.येथून पुढे त्यांच्या सामाजिक त्रासाला सुरुवात झाली. या सर्वाला
त्यांनी धैर्याने तोंड दिले. बहिष्कृ त के ल्यानंतर डॉ.भांडारकरांना समाजाने दिलेली वागणूक पाहता
समाजसुधारकांचा जीवनप्रवास किती खडतर होता व त्यांनी निवडलेला मार्ग किती काट्याकु ट्यांचा होता हे
समजून येते.
५.प्रकरण पाच : धर्मविषयक उदारमतवादी चळवळींच्या वैचारिक लेखनाचा चिकित्सक अभ्यास
या प्रकरणात धर्मविवेचन(धर्मपुस्तक), सार्वजनिक सत्यधर्म(धर्मग्रंथ), एके श्वरनिष्ठांची कै फियत (निबंध),
सुबोधपत्रिका(संपादकीय लेख), अस्पृश्यांची कै फियत (शोधप्रबंध) अशा धर्मविषयक विचार मांडणाऱ्या अनुक्रमे
दादोबा पांडुरंग, महात्मा जोतीबा फु ले, न्या.म.गो.रानडे, द्वा.गो .वैद्य, व महर्षी वि.रा.शिंदे यांच्या
वैचारिक लेखनाचा मागोवा घेतला आहे.
‘धर्मविवेचन’ या पुस्तकात मांडलेले दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे धर्मविषयक विचार –
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या जाती मूळच्या ईश्वर निर्मित असत्या तर या सर्वांच्या शरीर रचनेत काही भेद
त्याने का के ला नाही. शारीरिक सोडा, बुद्धी, ज्ञान व भाव यात तरी काही विशेष भेद आढळतात का? परंतु तसेही
10
काही सिद्ध होत नाही. जे गुण, जो स्व-भाव क्षत्रियांमध्ये आढळतो; तेच गुण तसाच स्वभाव ब्राह्मण, वैश्य
शुद्रांमध्येही आढळतो.ईश्वरानेच जर जाती निर्माण के ल्या असत्या तर त्याने प्रत्येक जातीमध्ये काहीतरी भेद
नक्कीच ठेवला असता जेणेकरून त्या ओळखता येतील. या सृष्टीत चार प्रकारचे व्यवहार करणारे लोक दिसतात.
लोकांस सन्मार्गास लावणे, जीवनव्यवहार सुरळीत चालविणे, प्रपंचासाठी आवश्यक पदार्थांची निर्मिती व
विनिमय करणे. आणि चौथे म्हणजे सेवा करणे. या मानवी मूळ प्रवृत्तींना मूळशास्त्राकारांनी वर्ण नामे दिली.
यावरून हे चार वर्ण किं वा वर्ग अप्रशस्त आहेत असेही म्हणता येत नाही. पण या प्रवृत्तींचा संबंध कु ळ किं वा
जातीशी लावून उच्चनीचता मनात धरून वर्तन करणे हे मात्र अप्रशस्त होय.
मुखातून ब्राह्मण, बाहुतून क्षत्रिय, मांड्यातून वैश्य, व पायातून शूद्र जन्मले. तेव्हा या पंडित विद्वानांना प्रश्न पडत
नसेल का? “काय त्या ईश्वरी पुरुषाने मूळच्या ब्राह्मणास आपल्या तोंडातून ओकले असेल, आणि क्षत्रिय, वैश्य,
शूद्र हे काय त्या पुरुषाचे बाहू, ऊरु आणि चरण फोडून निघाले असतील किं वा कसे. जेव्हा मनुष्याला जाती
निर्मितीमागचे षडयंत्र व सत्य समजेल तेव्हा सत्यप्राप्ती झालेला मनुष्य ह्या बंधनातून मुक्त होण्यासाठी नक्की संघर्ष
करेल.
महात्मा फु ले ह्यांच्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकाचे परीक्षण –
सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे महात्मा जोतीबा फु ले यांच्या सत्यशोधक समाजाची
कार्यप्रणाली व्यक्त करणारी संहिता म्हणावी लागेल . या पुस्तकातून फु ल्यांनी स्वीकारलेला ‘ एके श्वर ‘ म्हणजे
निर्गुण , निराकार असा प्ररमेश्वर नसून विश्वाच्या निर्मितीच्या मुळाशी असणारी शक्ती होय . यास ते ‘निर्मिक ‘
म्हणतात . या ग्रंथात त्यांनी स्त्री व पुरुष या दोनच जाती मानाव्यात असे सातत्याने स्पष्टीकरण के ल्याचे लक्षात
येते. ‘ मानवता ‘ धर्मात सर्व जाती-जमाती ,धर्म विलीन होऊन जावेत ही त्यांची इच्छा ग्रंथात प्रकट होते . दैनंदिन
जीवनव्यवहारात करावयाची कर्मे यांत सुधारणा करून ती क्रियाकर्मे करण्यासाठी असणाऱ्या ‘मध्यस्था’ ची गरज
त्यांनी पूर्णतः नाकारली आहे . प्रत्येक आनंदाच्या व दु:खाच्या विधीप्रसंगी ‘ सामाजिक ‘ जाणीव ठेवण्याचा
त्यांनी सातत्याने आग्रह धरल्याचे दिसून येते . उदा . अनाथ , पंगु , गरजू , यांना कोणताही विधी ( आनंद किं वा
दु:खदायक) असो त्यावेळी दान करावे असे म्हटले आहे . नीति , प्रामाणिकपणा , स्पष्टवक्ते पणा , दीर्घोद्योग ,
स्त्रीपुरुष समानता , तर्काधिष्ठितकृ ती , निरपेक्ष प्रेम, साधार श्रद्धा , या मूल्यांनी युक्त जीवन जगण्याची मानवाला ते
सातत्याने प्रेरणा देत असल्याचे स्पष्ट होते . वर्तमान काळावर लक्ष कें द्रित करून कृ तियुक्त जीवन कसे जगावे ?
याचे आदर्श मार्गदर्शन या ग्रंथाद्वारे त्यांनी के ल्याचे स्पष्ट होते . विचारशुद्धी के ल्याने आचारप्रक्रिया सुधारेल आणि
त्यांचे फलित काय असेल ? हे मांडण्याचा उत्कृ ष्ट नमुना म्हणजे हा ग्रंथ होय . काळानुसार पुढे जाताना परंपरागत
कृ ती आंधळेपणाने न करता वैज्ञानिक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी लोकांना तयार करण्याचा त्यांचा प्रामाणिक
प्रयत्न ह्या ग्रंथातून दिसून येतो . देव, स्वर्ग , नर्क ह्या कल्पना ज्या कोणी पहिल्या नाहीत त्यासंबंधाने व्यर्थ विचार
करण्यापेक्षा जे उपलब्ध असे सिद्ध ज्ञान आहे,त्याआधारे विकास साधण्यासाठी प्रयत्न करावा असे या ग्रंथातून ते
सूचित करत आहेत . सर्व धर्मग्रंथ हे मानवनिर्मित असून ‘ समुहाने एकत्रित व आनंदाने नांदण्यासाठीचे नियम
त्यात आहेत . के वळ एक हिंदुधर्मात पशुपक्ष्यांची पूजा होते पण मनुष्यप्राण्यांमध्ये इतका टोकाचा भेद के ला जातो
की शूद्रांचा स्पर्श किं वा सावलीचा सुद्धा विटाळ पाळला जातो . हा विरोधाभास का ? याविषयी विचारमंथन
होण्यास दृष्टी मिळावी ह्यासाठी ते अत्यंत तळमळीने लेखनप्रपंच करत असल्याचे ह्या पुस्तकातून स्पष्ट होते .
11
न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधुता ,या मुल्यांवर आधरित समाजरचना व्हावी व समाजातील विषमता दूर
होऊन ‘विविधतेतून एकता’ निर्माण व्हावी व सर्व जातीधर्म, वर्णभेद लयास जावेत यासाठीची तळमळ
त्यांच्या लेखनात दिसून येते . थोडक्यात, सामाजिक प्राणी अशी ओळख असणाऱ्या मनुष्याने त्याला
मिळालेल्या सारासार विवेकबुद्धीचा वापर करून सत्यनिष्ठेने जीवन कसे जगावे ? याचे मार्गदर्शन म्हणजे हे पुस्तक
होय .

न्या.म.गो रानडे यांच्या एके श्वरनिष्ठांची कै फियतचा सारांश -


एके श्वरनिष्ठांची कै फियत म्हणजे प्रार्थनासमाजाची शिकवण प्रार्थनासमाजीयांपर्यंत समग्र
पोहोचविण्यासाठीची पूर्णतः के लेली सोय आहे.धर्मासंबंधीचे न्या. म. गो. रानडे यांचे विचार येथे स्पष्ट झालेले
आहेत. विविध धर्म-संप्रदाय धर्मातील तथ्ये, त्यामागील शास्त्र समजून न घेता, के वळ रूढी-परंपरा पाळावयाच्या
म्हणून जे सोपस्कार करतात ते कितपत योग्य आहे यावर भाष्य के ले आहे. जगाच्या लय, उत्पत्ती, स्थितीबाबत
विविध धर्मांमध्ये ठाम वचने आढळतात. आणि ती प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने मांडली गेली आहेत. हे
स्पष्ट के ले आहे. जे अनाकलनीय आहे, तर्क व विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेले नाही. अशा गुढांचा नाद
सोडून विश्वाच्या व ईश्वराच्या परस्पर संबंधाच्या विचाराने परमेश्वर दयाळू असून तो या सृष्टीचा नियंता आहे.
ह्याबाबतचे ज्ञान वाढेल असे संगितले आहे.
दैवावर विश्वास किं वा स्व-सामर्थ्यावर विश्वास ह्या दोन बाबींपैकी मध्यममार्ग प्रार्थनासमाज स्विकारतो
जसे की, देव त्याने माणसामध्ये निर्माण के लेल्या विविध कौशल्य किं वा क्षमताच्या सहाय्याने माणसाचा विकास
करवून घेत असतो. शिक्षण, संगत व परिस्थिती हे घटक मनुष्याच्या विकासावर परिणाम करतात. स्वतःमधील
सारासार विवेकशक्ती मनुष्याने सतत जागृत ठेवली पाहिजे. दैव किं वा नशीबावर अवलंबून राहून मनुष्य स्वतःचा
विकास करू शकत नाही. किं वा त्याच्या कर्माच्या प्रायश्चित्तातून त्याची सुटका होणार नाही. मागील जन्माचे गूढ
उलगडत बसण्यापेक्षा मिळालेले प्राप्त जीवन कसे सफलतापूर्वक जगता येईल याचा विचार मनुष्याने करावा.
प्रत्येक धर्माला देश-कालादि मर्यादा असतात. साक्षात्काराला इतके अधिक महत्व देण्याची गरज नाही.
साधूसंतांना, त्यांनी दिलेल्या नीतीशिक्षणाचा मान दिला पाहिजे. तीर्थस्थानांना प्राचीन थोर पुरुष्यांच्या कर्तुत्वाचे
मोल चढलेले असते. म्हणून ती वंदनीय आहेत. तेथे गेल्यामुळे त्यांच्या अनुकरणाची प्रेरणा हृदयात जागृत होते;
पण तेथे कर्मकांडादी विशेष विधी करणे चुकीचे आहे. जन्म, मृत्यू, विवाह वगैरे घटना विशिष्ट संस्कारांच्या द्वारे
साजरे करण्यावर प्रार्थनासमाज हरकत घेत नाही; पण संस्कारविधींसाठी धर्मोपाध्याय एका विशिष्ट जातीचेच
असावेत हे मानने भ्रामक व चुकीचे आहे असे प्रार्थनासमाजाचे ठाम मत आहे. मनुष्याचे वर्तन सदसद्विवेकबुद्धीस
स्मरून असावे. इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण करू नये. स्वतःवर होणारा अन्यायही सहन करू नये.सदाचरणाने
अहंकारादी विकार नष्ट होऊन मनुष्यास ईश्वरसानिध्य प्राप्त होते. ईश्वरसानिध्यात राहणारा मनुष्य तो देहातबद्ध
असला तरी त्याच्या आत्म्यास मुक्ती मिळून तो मोक्षावस्था प्राप्त करू शकतो.
सुबोधपत्रिके तील द्वा.गो. वैद्य यांच्या निवडक संपादकीय लेखांतील प्रार्थना समाजाचे
अत्मोन्नतीकारक विचार -

12
माणसाला जे दु:ख होते त्याचे दोन प्रकार आहेत. “एक शारीरिक आणि दुसरे आध्यात्मिक .
आध्यात्मिक दुःख दूर करण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो तो म्हणजे, चांगले प्राप्त करण्यासाठी
वाईटाचा त्याग करणे, धैर्य मिळविण्यासाठी भित्रेपणा त्यागने, आणि धर्मिकबळ प्राप्त करण्यासाठी अधार्मिक जे ते
सर्व त्यागावे लागते, तर पुण्यसंचय मिळविण्यासाठी पापाचा त्याग करावा लागतो.म्हणूनच दु:खा पासून
मुक्ततेसाठी काही गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे. अनिष्ट स्थितीतून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे
‘आत्मपरीक्षण करणे होय’.
धार्मिक वृत्तीच्या लोकांना आत्मपरीक्षण करणे सोपे जाते. कारण तो मनाने देवाशी जोडला गेलेला
असतो; पण सामान्य प्रपंचासक्त जनांस हे सर्व अवघड वाटते. कारण ते व्यावहारिक समस्या निवारण्यात गुंतलेले
असतात. देवपूजा, कर्मकांडे यापेक्षा “स्वतःचे आचरण” हे आत्त्मोन्न्तीचे प्रमुख साधन आहे. आमच्या पूर्वजांनी
आध्यात्मज्ञानात फार प्रगति के लेली आहे, हे सर्व जरी खरे आहे, तरी जोपर्यंत बरे, वाईट, सत्य, असत्य, धर्म्य,
अधर्म्य यांची निवड करून जे चांगले आहे, सत्य आहे, धर्म्य आहे, ते आमच्या आचरणात आम्ही आणणार
नाही, तोपर्यंत आम्ही के वळ भारवाहक आहो. कृ तियुक्त धर्माची आज मोठी आवश्यकता असली तरी
कालमानास शोभण्यासारखे म्हणजे प्रचलित समाजास आवश्यक असणाऱ्या गरजांच्या संबधाने कर्म व्हायला
हवे. लोकसेवेसाठी संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. स्त्री-पुरुष दोघांनी मिळून भेदभाव विसरून जनसेवेचे व्रत
अंगिकारले पाहिजे.
महर्षी वि.रा.शिंदे यांच्या ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ मधील अस्पृश्यताविषयक विचार -
अस्पृश्यता ही भारतीय सामाजिक संस्कृ तीचे एक विशिष्ठ आणि मुख्य लक्षण आहे.१)जातीच्या जाती
वंशपरंपरेने अस्पृश्य मानणे.२) त्या अस्पृश्य जाती कायम टिकाव्यात म्हणून त्यांना निराळ्या वस्तीत डांबणे.३)
जर कोणी स्पृश्य वा अस्पृश्यांनी हा स्पृश्यास्पृश्यतेचा नियम मोडला तर राजकीय व धार्मिक कायद्याची
अंमलबजावणी करणे ही तीन लक्षणे त्यांनी भारतीय अस्पृश्यतेची सांगितली आहेत. अस्पृश्यता के वळ स्थानिक
अथवा धार्मिक नसून ती जातीय उर्फ राष्ट्रीय आणि नित्य स्वरुपाची आहे. इ. स. १८४३ मध्ये हिंदुस्थानात
सरकारने कायदा करून येथील गुलामगिरी बेकायदेशीर के ली ; पण अस्पृश्यता नष्ट झाली नाही.नित्य विटाळ
मानणे , गावाबाहेर रहावयास लावणे व कायदाच्या दृष्टीने निराश्रित असणे अशा स्वरुपाची अस्पृश्यता भरतखंडात
व शेजारी ब्रह्मदेशात आढळून येते. अस्पृश्यता निर्माण होण्याची कारणे,“पहिले जातीद्वेष अथवा वर्णद्वेष
आणि दुसरे वृत्तिमत्सर होय. अस्पृश्यता टिकण्याचे एक महत्वपूर्ण कारण म्हणजे, “ विशेषतः ग्रामबाहय , हीन
मानलेल्या जातींचे सारे व्यवहार हत्या व हीन कर्माशीच अधिकाधिक निगडीत होत गेल्यामुळे त्यांची अस्पृश्यता
व बहिष्कार उत्तरोत्तर दुणावत व दृढावत जाणेच क्रमप्राप्त होते.महर्षी शिंदे एक अनुभवसिद्ध मत नोंदवितात ते
म्हणजे, “ हिंदुस्थानात काय किं वा कोठेही काय,वरिष्ठ म्हणून गाजलेल्यांपेक्षा त्यांनी पायाखाली तुडविलेल्या
कनिष्ठ वर्गातच त्या राष्ट्राच्या खऱ्या माणुसकीची व स्थानिक स्वभावाची लक्षणे सूक्ष्म संशोधकांना जास्त
आढळून येण्यासारखी आहेत. हे मी निरनिराळ्या देशातील आजन्म घेतलेल्या माझ्या अनुभवांवरून म्हणू शकतो.
ब्रिटिश काळात इ. स . १८६७ ते ७२ च्या दरम्यान (कित्येक मोठी संस्थाने वगळून ) पहिली शिरगणती
झाली. त्यानंतर इ. स . १८८१ व १८९१ मध्ये खानेसुमा-या झाल्या. परंतु आधुनिक समाजशास्त्रीय दृष्टीने इ . स .
१९०१ मधील १ मार्च रोजी खानेसुमारी झाली. “ ह्या रिपोर्टात शोधू पाहता अस्पृश्यांचे जातवार आणि प्रांतवार
13
जे आकडे मिळाले , ते एकत्र करिता एकू न ५,३२,३६,६३२ हा अवाढव्य आकडा तयार झाला. तोवर अस्पृश्यांनी
संख्या खरोखर एवढी मोठी असेल अशी कल्पनाच नव्हती. सन १९०१ ह्या वर्षी आखिल भारताची जनसंख्या
२९,४३,६१,०५६ होती. तिच्या पैकी ५ कोटीहूनही जास्त वरील संख्या अस्पृश्यांची ठरली . त्यामुळे एकषष्ठांश
भारत अस्पृश्य हे एक पुढे ब्रीदवाक्यच बनून राहिले !” भारतीय समाजाचे प्रमुख चार भाग पडतात .१ .
शिकलेला उच्चस्तरीय वर्ग २. इतर समाज ३. हीन समाज आणि ४ .आदिवासी समाज यातील तिसरा वर्ग सर्वत्र
सहज आढळतो .
अस्पृश्योद्धारापेक्षा अस्पृश्यता निवारणावर अधिक भर दिल्याचे त्यांच्या एकं दर विचारांतून स्पष्ट होते.
हिंदुधर्म हे एक मायपोट आहे! हिंदू धर्माची एकच एक खास अशी व्याख्या करणे कठीण असल्याचे शिंदे कबूल
करतात व “ हिंदू धर्माची खरी व्याख्या म्हणजे जो कोणी आपल्यास हिंदू म्हणवीत असेल , तोच हिंदू.” अशी
व्याख्या ते करतात. महर्षी शिंदे एक विचार करावयास लावणारी बाब मांडतात ती म्हणजे, “ आजच्या आमच्या
ह्या खंडवजा मोठ्या देशात असे अनेक असंस्कृ त मागासलेले जनसमूह आहेत की , ते आपण हिंदू आहोत की
नाही , ह्या प्रश्नाला काहीच उत्तर देऊ शकत नाहीत ; किबहुना देऊ इच्छितही नाहीत. समाजातील अत्यंत वाईट
अशी मुरळी प्रथा वाढण्याचे व टिकण्याचे एक कारण सांगताना महर्षी शिंदे म्हणतात , “ वरिष्ठ वर्गावर जी अनेक
सामाजिक व घरगुती बंधने आहेत ती ह्या तिरस्कृ त वर्गावर नसल्यामुळे त्यांना इतर प्रामाणिकपणाचे धंदे
करण्याला इतरांसारखा वाव नसल्याने साहजिकच त्यांचा पाय अधिकाधिक खोलात उतरतो.अस्पृश्यतेची गोम
बाहेरील वागणुकीवर नसून मनातील समजुतीवरच अवलंबून आहे हे सिद्ध होते . अस्पृश्यता समजून घेण्यास
इतिहासाची साधने इतकी अपुरी आहेत की त्यावरून अस्पृश्यता कशी निर्माण झाली?अस्पृश्य मुळचे कोण?हे
समजून घेण्यास मानवनिर्मित ग्रंथ, पुराणांशिवाय वस्तुनिष्ठ आधार नाहीत.अस्पृश्यते संबंधी इतिहासाची साधने
कमी असण्याचे कारण,जेते स्वतःची कु कर्मे इतिहासात कशी नोंदवतील? आणि जित झालेले ज्ञानी व चलाख
असते तर ते जित झालेच नसते.असे विश्लेषण महर्षी शिंदे करतात.

अभ्यासक मार्गदर्शक
सौ.सविता संजय आष्टेकर डॉ.रवींद्र भास्करराव पाटील.

14
15

You might also like