You are on page 1of 6

कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटाचा इतिहास

( प्रा. डॉ. सतीश कदम, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, 9422650044 )

प्राचीन काळापासून खानदेश आणि मराठवाड्याला जोडणारा मार्ग म्हणजे गौताला अभयारण्याचा भाग असून या परिसरात
वास्तव्य असणार्‍या गौतम ऋषीमुळे याला गौताळा हे नाव पडले, तर काही इतिहासकारांच्यामते या परिसरात राहणार्‍या गवळ्यामुळे याला
गौताळा हे नाव पडले असावे. खरंतर मराठवाड्यातून खानदेशात जाताना येथे अजिंठ्याच्या डोंगर रांगातून एकदम खाली उतरावे लागते.
त्यामुळे प्राचीनकाळी त्याला खालदेश 1 म्हणत असत, पुढे ल ऐवजी न शब्द रूढ झाला. तसं पहिलंतर खानदेश हे प्राचीन नाव नाही. कारण
विश्वकोशाच्या चौथ्या खंडानुसार, या प्रदेशाला पूर्वी ऋषिक देश म्हणत, तर पुढे देवगिरीच्या यादवांच्या शिलालेखात याला सेऊण देश 2
म्हणून उल्लेखलेले आहे. काहींनी याला खानदेशात वाहणार्‍या कान नदीवरून याला कानदेश 3 हे नाव मिळाल्याचे सांगितले आहे. कान चे पुढे
खान झाले. मात्र काही इतिहासकारांनी थाळनेरचा फारुकी राजा मलिक नसीर याला 1417 साली गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने “
खान”4 ही पदवी दिली, त्या खानाचा प्रदेश म्हणजे खानदेश असे सांगितले आहे. काहींनी याला पांडवकालीन खांडवदेश 5 म्हटले आहे,
त्यातील खिंड किं वा खंडपासून खानदेश शब्द तयार झाला. असो, मराठवाड्याचाही असाच इतिहास आहे. मात्र येथील खिंड हा शब्द महत्वाचा
असून खानदेश आणि मराठवाड्याला जोडणारी खिंड म्हणजे आजचा घाट आहे हे मात्र निश्चित आहे.

आज येथूनच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर 9 किमी लांबीच्या महाराष्ट्रातील प्रमुख घाटापैकी एक असणार्‍या कन्नड
चाळीसगाव दरम्यानच्या रांजनगाव किं वा ओट्रम घाटाच्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे.6 उत्तर भारतातून दक्षिणेत जाण्यासाठी
अजिंठ्याचा डोंगर पालथा घालवा लागतो. याकरिता आपणास रांजनगाव आणि अजिंठा पास फर्दापूर येथून जावे लागते. प्राचीनकाळी मात्र
खानदेशातून मराठवाड्यात येण्यासाठी विविध नावाने छोटे मोठे घाट होते.

1. कालघाट – पाटणा ते आंबा (कन्नडजवळील पाटणा गणितीतज्ञ भास्कराचार्याचे गाव )

2. घायघाट – अहंकारी ते अंबाला

3. गणेशघाट – पाटणा ते कलंकी

4. हणवत घाट – पिंपळनेर ते लोध्रा

5. शेकसोंडा घाट - खर्डी ते लोध्रा

याप्रमाणे घाट असलेतरी आज फक्त औट्रम किं वा गौताळा घाटाचाच रहदारीसाठी वापर होतो आहे. ज्याला चाळीसगाव, रांजनगाव
किं वा कन्नडचा घाटही म्हटले जाते.

औट्रम कोण होता


कागदोपत्री ज्याच्या नावाने हा घाट आहे, तो सर जेम्स औट्रम (Sir James Outram ) हा ईस्ट इंडिया कं पनीच्या
सैन्याचा भारतातील एक अधिकारी होता. लंडनमधील वेस्टमिस्टर येथे 29 जानेवरी 1803 रोजी त्याचा जन्म झाला. वडिलांचे लवकरच
निधन झाल्यानंतर त्याच्या आईने त्याला वाढविले. आणि वयाच्या 22 व्या वर्षी तो लष्करात भरती होऊन तो भारतात लेफ्टनंट म्हणून दाखल
झाला. 5 ऑगस्ट 1819 ला औट्रमला 4th Native Infantry Battalion7 मध्ये भरती करून पुणे, राजकोट वगैरे भागात नोकरी
के ल्यानंतर त्याला इ.स. 1825 ला खानदेशात पाठविण्यात आले. तेथे औट्रम हा 23 Battalion चा कमांडर म्हणून दाखल झाला.

त्याकाळी धरणगाव हे खानदेशचे उपविभागीय कें द्र असलेतरी याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस कार्यालय
अशी महत्वाची कार्यालये होती. तेथेच औट्रमने आपले झोपडीवजा कार्यालय थाटले. प्रत्यक्षपणे 1825 ते 1836 पर्यन्त औट्रम 8 खानदेशात
वास्तव्यास होता. पुढे त्याने आपल्या निवासस्थांनासाठी मोठा बंगला बांधला जो पुढे विविध कार्यालयासाठी वापरला जाऊ लागला. कं पनीने
त्याच्या बंगल्याबाहेरील शिलालेखावर “ हिंदुस्थानचे बेयर्ड , निष्कलंक व निर्दोष सरदार” होण्याचा पाया येथे घातला असे लिहिलेले आहे.

त्यावेळची खानदेशातील परिस्थिती - इंग्रजांच्या कालखंडात खानदेश ( धुळे, नंदुरबार, जळगाव आणि एरोंडोल ) हा एकच
जिल्हा होता. प्रशासनाकरिता ब्रिटिशांची छावणी धरणगाव याठिकाणी होती. राज्यकारभार करताना सर्वात मोठी अडचण ही आदिवासी भिल्लांची
होती. खानदेशातून वर जाताना या घाटामध्ये भिल्लांच्या टोळ्या लूटमार करायच्या. पुढे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्यास सुरुवात
के ली. काजीसिंग, भीमा, भागोजी, मेवाश्या, काळूबाबा, महादेव आणि खंडू नाईक, तंट्या भिल्ल इत्यादींच्या टोळ्यांनी इंग्रजांना मोठा उपद्रव
देण्यास सुरुवात के ली होती. मोगल, मराठा, निजाम असो की इंग्रज सर्वच सत्ता त्यांच्यापुढे हतबल झाल्या होत्या. याकामी इंग्रजांना बराचसा
पैसा आणि सैन्य खर्च करावे लागत होते.9

भिल्लाविरोधात औट्रमची अनोखी शक्कल - खानदेशात नोकरी करताना त्याने अनेक नावीन्यपूर्ण योजना आखल्या. ज्या
भिल्लांच्या विरोधात इंग्रजांना मोठी शक्ति खर्चावी लागत होती, त्याच 9 भिल्लांना औट्रमने आपले body guard म्हणून नेमले. एवढेच
नाहीतर भिल्लाची स्वतंत्र फलटण ( Bhill Crops )10 उभी करून 1826 ला त्यांच्यासाठी धरणगावात मोठी वसाहत बांधली.
आदिवासीचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून त्याने कधी कधी आपला मुक्काम त्यांच्यासोबत घनदाट जंगलात घालविला.

1825 ते 1830 या दरम्यान औट्रमने स्वत:ला धरणगाव परिसरात स्वत:ला गुंतवून घेतले. यावेळी बंडखोरांना शासन
करणे, गुन्हेगारांना पकडणे यासारख्या धडक कारवाया के ल्या. यासोबतच विविध जाती जमातीचे स्वतंत्र रजिस्टर बनवून भिल्ल टोळ्यांना खुश
करण्यासाठी त्यांना जमीन देणे, इनाम, पेन्शन, बक्षीस देणे यासारखे उपक्रम सुरू के ले.11 त्याच्यातील अचाट साहसामुळे भिल्लांना तो आपल्या
जवळचा वाटू लागला. त्यावेळी गौताळा अभयारण्यात जंगली श्वापदांचा मोठा वावर होता. त्यासाठी स्वत: हातात बंदूक घेऊन त्यांचा
बंदोबस्त के ला. 1825 ते 1836 च्या दरम्यान त्याने 235 वाघ, 16 चित्ते, 25 हरिण, 12 गवे मारल्याची नोंद सापडते.12 आदिवासींचा
विश्वास संपादन के ल्यानंतर त्याने भिल्लांना पोलिस, जकात नाके अशा विविध नोकरीवर घेतले. एवढेच नाहीतर औट्रमने उभा के लेली भिल्ल
रेजिमेंटचा वापर पुढे ज्या ज्या ठिकाणी आदिवासींचे उठाव व्हायला लागले तेथे होऊ लागला. औट्रामने सुरू के लेली फलटणीचे रूपांतर पुढे
1891 साली पोलिस दलात 13 करण्यात आले. आजही आपणास कन्नड आणि धरणगाव याठिकाणी भिल्ल फलटणीचे अवशेष पाहण्यास
मिळतात. साहजिकच रांजनगाव, आंबा नावाने ओळखला जाणारा हा घाट आता लुटारूपासून सुरक्षित झाला. आपल्या हयातीत औट्रमने या
घाटाची मोठ्या प्रमाणात दुरूस्तीही के ली.

ईस्ट इंडिया कं पनीसाठी औट्रमचे कार्य - गुजरात, कलकत्ता, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड, पाकिस्तान अशा
अनेकठिकाणी त्याने आपले कार्य उत्तमरितीने पार पाडले. लखनौ आणि अवध संस्थानचे रेसिडेंट म्हणूनही काम पाहिले. स्वत:च्या हिंमतीवर
पुढे तो लष्करातील लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोहोचला. 1830 साली सूरत येथील डांग लोकांनी के लेल्या बंडात औट्रमने महत्वपूर्ण
कामगिरी करत हा उठाव मोडीत काढण्यासाठी Bhill Regiment चा वापर के ला. 1857 च्या उठावात त्याने के लेल्या कामगिरीबाबत
लंडनच्या सभागृहाने औट्रमच्या अभिनंदनाचा ठराव पास करून त्याला रोख 1000 डॉलर आणि “ Baronet ” ही पदवी दिली. जुलै
1860 साली स्वत:चे एक लाख रुपये खर्चून त्याने कोलकत्ता येथे Outram Institute नावाने सैनिकासाठी एक संस्था सुरू के ली.
अशारितीने ईस्ट इंडिया कं पनीसाठी औट्रम हा इंग्रजांच्या गळ्यातील ताईत बनला.

औट्रमचा सन्मान - दुसर्‍या महायुद्धासह ज्या ज्या ठिकाणी गरज असेल तेथे औट्रम आपल्या लष्करी सेवेसाठी हजर राहिला.
प्रकृ ती स्वास्थ्य ठीक नसल्याने शेवटी तो लंडनला परत गेला. 11 मार्च 1863 रोजी या महान सेनानीने जगाचा निरोप घेतला. यावेळी
Times Of India ने औट्रमच्या दुख:द निधनाची बातमी देताना एक छान ओळ वापरली होती. “ No Lips will Open” सलग
40 वर्षे त्याने लष्कराची सेवा के ली. शासकीय इतमामात त्याचा अंत्यसंस्कार करून त्याची कबर बांधल्यानंतर त्यावर कोरलेली अक्षरे फार
बोलकी आहेत.

“Sir James Outran,

Lieutenant General Outran,

His Life was given to India, Faithful Servant of England

The Bayard of India”

पुढे 1863 ला लंडनमध्ये त्याचा पूर्णाकृ ती पुतळा उभा के ला, कोलकत्ता येथेही घोड्यावर स्वार असलेला पूर्णाकृ ती पुतळा
आहे. औट्रमच्या नावाने कोलकत्त्यात हुगळी नदीवर घाट बांधलेला आहे. त्याला Outran Ghat14 म्हणतात, याठिकाणाहून देशपरदेशात
जहाजाची ये जा चालू असते. आजही हा घाट अतिशय प्रसिद्ध आहे, सिंगापूरला औट्रमच्या नावाने रोड आहे, दिल्लीतील एका रस्त्याला
औट्रमचे नाव आहे.त्याला Outran Line म्हटले जाते, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आजच्या जमशेदाबादचे नाव पूर्वी औट्रमच होते,
न्यूझीलंडमध्ये डू नेनिन भागात औट्रम नावाने एक गाव आहे, शतरंज के खिलाडी नावाच्या सिनेमात औट्रमचे पात्र छान रेखाटले आहे. विशेष
म्हणजे त्याची भूमिका रिचर्ड अटीनब्युरो ने पार पाडलेली आहे.
औट्रमच्या नावाने घाटाचे नामांतर - चाळीसगाववरून कन्नडला जाण्यासाठी आता जो घाट वापरला जातो त्याला पूर्वी आंबा
घाट, रांजनगाव पास अशी विविध नावे आहेत. खरंतर 1681 साली औरंगजेबाने या घाटाला प्रथमत: दुरुस्त के लेले आहे. त्यानंतर इंग्रजांच्या
काळात औट्रमने 1827 साली भिल्लांच्या मदतीने घाटाचे बरेचसे काम काम के ले होते.

1869 -70 मध्ये खानदेशात मोठा दुष्काळ पडला होता. यासाठी सरकारने 1, 84, 260 रुपयाचा निधि मंजूर के ला होता
त्यातील चाळीसगाव कन्नड घाटासाठी 20,000 रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे प्रथमच हा घाट खडीकरण करून मजबूत झाल्याने
तो मोटर गाडी जाण्यासाठी सज्ज झाला. तेव्हा 1872 ला खानदेशचे कलेक्टर एशबरनर (L. R. Ashburner ) यांनी या घाटाचे
उद्घाटन के ले आणि यावेळी घाटाचे नामांतर “ Outram Ghat ” 15 असे के ले, जे आज रुजू झालेले आहे. याविषयी इ.स. 1871 ला

इंग्रज सरकारच्या General Report मध्ये एक अहवाल देण्यात आला होता त्यानुसार, “The opening of the Outram
Ghat to traffic is the only other important work requiring separate notice. This Ghat is

situated on the line connecting Chalisgaon and Kannad. The allotment for this work in the

Budget was Rs. 20,000.”16 घाटाच्या वरच्याबाजूला कन्नडपासून निजामाची हद्द होती, त्यामुळे निजामानेही औट्राम घाटावर
1,45,106 रुपये17 खर्च के ल्याचा उल्लेख फसली 1331 म्हणजे इ. स. 1921 च्या General administration report
सापडतो.

अलीकडे देशभरात अनेक मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यात औरंगाबाद धुळे रस्त्याचाही समावेश आहे.
त्यानुसार बाकी इतर रस्त्याच्या कामासोबतच कन्नड चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटाचे कामही स्वतंत्रपणे प्रस्तावित असून राष्ट्रीय महामार्ग
क्रमांक 211 वरील किमी क्रमांक 376 ते 390 या दरम्यान आता औट्राम घाटाचे रूपांतर औट्रम बोगद्यात होणार असून त्यासाठी
National Highway Authority of India ( NHAT ) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी विशेष लक्ष घातले असून या
कामाच्या सर्वेसाठी Amburg Engineering company, Switzerland या कं पनीला सर्वे आणि डिजाइनचे काम देण्यात
आलेले असून त्यानुसार या बोगद्यातून आता एकाचवेळी रस्ते आणि रेल्वे वाहतूक होणार असून चौपदरी मार्गात दोन्ही बाजूला 7 -7 किमी
रस्ता बनविला जाणार आहे. यासाठी 16,893,729,352 ( 1700 कोटी )18 रुपये येणार असून 2022 पर्यन्त औट्राम बोगदा तयार
होणार आहे. काही असो एका दूरदेशी माणसाने के लेल्या कामाची पावती म्हणून रस्ता असो बोगदा “ औट्रम” चे त्यावर नाव कोरले जाईल हे
निश्चित.

XXX
संदर्भ ग्रंथसूची

1. मोरवंचीकर रा. श्री. खानदेशचा इतिहास ( प्राचीन कालखंड ) का. स. वाणी मराठी प्रगत

अद्ययन कें द्र, धुळे, पृ. 141

2. मराठी विश्वकोश, भाग 4, भूगोल

3. जगताप पी. डी. खानदेश इतिहास दशा आणी दिशा, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय,

जळगाव, 1997, पृ. 9

4. शहा मु. ब. खानदेश नामचर्या – खानदेशाचा सांस्कृ तिक इतिहास, खंड 1, का. स. वाणी,

मराठी प्रगत अध्ययन कें द्र, धुळे, 2004, पृ. 141

5. जगताप पी. डी. उपरोक्त, पृ. 9

6. कदम सतीश, गाळीव इतिहास - औट्रम घाटाचा इतिहास, दैनिक पुण्यनगरी, दिनांक जानेवारी

2021
7. Goldsmid C. B. James Outram : A biography, Smith and Elder Co. London, 1881,
P.32
8. Lion Trotter, The Bayard of India, William Black wood and sons, London, 1903,
P. 27
9. तडवी अजिज रशीद, सातपुड्यातील आदिवासी तडवी, हर्षवर्धन प्रकाशन, बीड, 2016, पृ.

10. A. H. A. Simcox, Khandesh Bhill Crops ( 1825 -1891 ) Thacker and Company,
Bombay, P. 51
11. पाडवी वीरसिंग, भिल्ल आदिवासींचा उठाव, का. स. वाणी, मराठी प्रगत अद्ययन संस्था,

धुळे, 2004, पृ. 5

12. Gazetteer of the Bombay Presidency Vol. XII, Khandesh, Govt. Central
Press, 1880, P. 317
13. गारे गोविंद, आदिवासी वीर पुरुष, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, 1994, पृ. 17

14. Bose Arunava, Evincepus Publishing, Chhattinsgarh, 2019, P. 109


15. A. H. A. Simcox, Khandesh Bhill Crops, Ebid, P. 41
16. General Report of the Administration of the Bombay Presidency, Annual Report
for the year 1871, 72, Govt. central Press, Bombay, P. 105
17. Report of the Administration of H.E.H. Nizam’s Dominions, The superintendent,
Govt Central Press, Hyderabad, 1925
18. Lokamat News Network, Aurangabad, 16 December 2017

You might also like